दैवं चैवात्र पंचम
जीवनात दैवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यासाठी दैवाची साथ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने दैवाचे महत्व स्वीकारावेच लागेल. माणूस भलेही स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्या अक्कलहुशारीचा डंका पिटवत असेल, पण त्यामागे त्याचे दैव काम करीत असते. स्वतःच्या हिमतीवर, स्वबळावर हे सारे निर्माण केले आहे असे मानणारा व्यक्ती दैवावर विश्वास ठेवत नाही. परंतु जो दुःखी आहे, अनंत कष्ट उपसून सुद्धा ज्याला यश मिळाले नाही ती व्यक्ती मात्र दैवावर अविश्वास दाखवित रडत बसते. आज आपलं सगळच चांगला आहे, बुद्धी देखील चांगली आहे. परंतु भविष्यकाळ उज्ज्वल बनवायचा असेल तर कुशल रहावेच लागते. गेल्या जन्मात जी काही कर्मे केली त्याचे यथायोग्य फळ दैव रूपाने या जन्मात प्राप्त झाले आहे. एखाद्या श्रीमंताच्या घरी जन्मलेल्या बालकांना पाहून सहज म्हटल्या जाते की, काय दैेव आहे त्याचे, जन्मल्याबरोबर करोडपतींच्या यादीत आहे. जीवनात दैव फार मोठे काम करते. सामान्य माणसाने विचार केला ना समजेल की जीवनात दैव किती महत्त्वाचे आहे ?
खेडेगावात उद्योगधंदे नसतात. हाताला काम नसते म्हणून खिशात पैसा नसतो. श्रीमंत जर व्हायचे असेल तर भरपूर काम करावे लागते आणि भरपूर प्रमाणात काम फक्त शहरातच मिळू शकते. त्यासाठी खेडेगावातील बेरोजगार युवकांची लोंढे शहराकडे धाव घेतात. मोठ्या शहरात आल्यानंतर प्रत्येकालाच लहान मोठ्या स्वरूपात काम मिळते. परंतु ज्यांचे दैव चांगले असते त्यांची वर्षानुवर्षे प्रगतीच होत राहते. काही वर्षानंतर तो त्या शहरातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीतील पंक्तीत सुद्धा बसतो. शहरात आलेले सर्वच जण करोडपती होतात असेही नाही. ज्यांचे दैव चांगले अशांनाच यश मिळते. ज्यांचे दैव नाही ते रिकाम्या हाताने परत फिरतात. जीवनात दैवाला देखील स्थान आहे हे लक्षात ठेवूनच जीवन व्यवहार केला पाहिजे. वरील उदाहरण फक्त शहरात येणार्या बेरोजगार युवक एवढ्यापुरताच मर्यादित असून प्रत्येक क्षेत्रात असेअनुभव बघायला मिळतात.
वैयक्तिक जीवनात तर दैवाचे महत्त्व आहेच पण ऐतिहासिकदृष्ट्या देखील विचार केला तर अशा कित्येक घटना आहेत की जिथे दैव आहेच असे मानावे लागेल. परंतु इतिहासकार त्यास दैव मानीत नाहीत ही बाब वेगळी. छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्र्याच्या तुरुंगात बंद केले होते. किल्ल्यामधून बाहेर पळून जाण्यासाठी महाराजांनी कमालीची युक्ती योजली. येथून दररोज मिठाईच्या पेट्या आत बाहेर जात असत. रखवालदार त्यांची रोज कसून तपासणी करीत असत. एके दिवशी महाराज एका पेटीत बसले. रखवालदार पहिल्या एक-दोन पेट्यांची तपासणी केली परंतु त्यानंतरच्या पेट्या त्यांनी तपासले नाहीत. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना तेथून पलायन करता आले, हे दैव नव्हे का? महाराजांच्या दिमतीला दैव राहिला नसता तर त्यांची वरील युक्ती असफल ठरली असती की नाही ? असा विचार केला तर....
भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राजकारणात आले नसते तर ते एका शाळेवर शिक्षक राहिले असते असे त्यांनी एका भाषणात बोलतांना व्यक्त केले. त्यांचे दैव यांना शिक्षक बनवू दिले नाही कारण त्यांना भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपतीपदावर बसायचे होते. म्हणून असे म्हटले जाते की दैवापुढे कोणाचे काही चालत नाही. दे रे हरी पलंगावरी म्हणत बसले तरी दैव इकडे धावून येत नाही. काही ही न करता आपण दैवाला नेहमी दोष देत राहतो. तसेच जीवनात दैवाला आपण पहिले स्थान देतो. वास्तविक दैवाचे स्थान पाचवी आहे. संस्कृत मध्ये याविषयी सुंदर वर्णन केले आहे त्याची आठवण सर्वांनी नेहमी ठेवावीत.
अधिष्ठानं तथा कर्ता करणंच प्रथग्विधम
विविधाश्च पृथक चेष्टा दैवं चैवात्र पंचमम
याचा अर्थ अधिष्ठान पहा,कर्ता पहा, मग त्यानंतर जे यश मिळते ते दैवामुळे असे म्हणायला हरकत नाही. तेंव्हा चला तर मग आपल्या दैवाला दोष न देता काम करीत राहू आणि शेवटी दैवाकडे पाहू या.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
No comments:
Post a Comment