Sunday, 10 February 2019

आज सोनियाचा दिन : प्रतिक्रिया

*--शुभेच्छा संदेश*

प्रती;
श्री. ना.सा.येवतीकरसर,
सुप्रसिद्ध स्तंभलेखक.

माझे परमस्नेही, सुप्रसिद्ध स्तंभलेखक व आदर्श शिक्षक श्री.ना. सा. येवतीकरसरांनी एक फाईल पाठवली. नवीन पुस्तक प्रकाशित करत आहे, आपण सर्व लेख वाचून आपल्या शुभेच्छा पाठवाल का ? असे विचारले. 'आज सोनियाचा दिन' हे नावच असे आहे की, यामध्ये नक्की काय आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागणार आहे. तशी ती मलाही लागली होती. या नावाने येणा-या या पुस्तकाबद्दल व त्यातील आशयाबद्दल उत्सुक होऊन सर्व लेख अधिरतेने वाचले. ना. सा. सरांचे हे सहावे ई-बुक आहे. तसेच स्त॔भलेखक म्हणूनही त्यांचा प्रवास आणि प्रतिभा अनेक वर्ष व्यक्त झाली आहे. हाच अनुभव या पुस्तकातूनही येत आहे.

आपल्या समर्थ लेखनीतून साकारलेले 'आज सोनियाचा दिन'  लवकरच प्रकाशित होत आहे. आजपर्यंत फक्त दिनदर्शिकेवर दिसणारे व फक्त त्याच दिवसापूरते चर्चेचे ठरणारे 'जागतिक दिन किंवा विशेष दिन' यावर सखोल प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे. सर्वप्रथम आपण अतिशय मेहनतीने लेखांकित केलेले हे ज्ञानकण आता एकत्रितपणे तमाम जनतेसाठी खुले होत आहेत, याचा मला खूप आनंद होत आहे. या पुस्तकाच्या रूपाने नव्या पिढीसाठी एक नवे दालन खुले होत आहे. येणारा प्रत्येक दिन आपण स्वत:चे 'योगदान (देऊन) दिन' म्हणून पाळला तर तो प्रत्येक दिन 'सोनियाचा दिन' ठरेल यात तिळमात्र शंका नाही.

जगभरात पाळल्या जाणा-या काही विशेष दिवसांना जागतिक दिन, आंतरराष्ट्रीय दिन असे म्हणतात. या सर्व शब्दांच्या अर्थामध्ये किंवा उपयोगांत काहीही फरक नाही. यापैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत आणि काही राष्टसंघाने पुरस्कृत केलेले आहेत. या दिवसांशिवाय काही दिवस विशिष्ट देशातच पाळले जातात. अशा सर्व प्रकारच्या दिवसांची खोलवर व सर्वांगीण माहिती देणारी एक लेख मालिका 'आज सोनियाचा दिन' या पुस्तकात ना. सा. सरांनी मांडली आहे. असे दिवस पाळल्याने नक्की किती फायदा होतो हा वादाचा मुद्दा असू शकतो. 

मी वाचलेला एक लेख आठवतो, ज्यातून असे दिवस पाळण्याचे महत्व पटविणे सोपे होईल - वर्षभरात मातृ, पितृ, शिक्षक, रोझ, एड्स, व्हॅलेटीन असे वेगवेगळे 'दिन' साजरे केले जातात. अशा परिस्थितीत 'नो घटस्फोट डे' असा दिवस साजरा करायचे एखाद्या देशाने ठरविले तर..? त्या दिवशी कुणाचीही  सोडचिठ्ठी-घटस्फोटाचा अर्जच घ्यायचा नाही. असा एक 'पाळीक दिवस' 8 जुलै रशियातील नोव्हगोरोद प्रदेशात आहे. 'व्हॅलेंनटीन डे' च्या तोडीचा हा पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी सार्वजनिक सुट्टी दिली जाते. लग्नगाठ बांधायला महत्व दिले जाते. शुभमंगल विवाह करणे भाग्याचे समजले जाते. कुणाच्या तरी डोक्यातून आफलातून आयडिया निघते, समाज ती स्विकारतो. त्यामुळे घटस्फोट फार कमी होतील असे नाही... पण काडीमोडांच्या प्रकारावर किमान एक दिवस विचार करायला मिळेल. काही डोकी थोडीतरी थंडावतील. लग्नाचे आयुष्य एक दिवसाने वाढेल... तडजोड झालीच तर... आनंदच आहे..!

'आज सोनियाचा दिन' या पुस्तकात ना. सा. सरांनी हेच पटवून द्यायचा प्रयत्न केला आहे. जे जे आपणांस ठावे, ते ते दुस-या शिकवावे ! शहाणे करून सोडावे सकलजन !! या शिकवणुकीशी इमान राखणा-या ना. सा. येवतीकरसर या हाडाच्या शिक्षकाने अविरत साधनेचे आणि चौफेर व्यासंगाचे संचित जनतेला भरभरून दिले आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर चार वाचकांनी रक्तदान केले, एखाद्याला पाण्याबद्दल समाजात जनजागृती करावीशी वाटली, कोणाची देशभक्ती उसळून आली, कोणी आरोग्यासाठी सकाळी लवकर उठू लागले तर ना. सा. सरांचा हा पुस्तक प्रयत्न नक्की यशस्वी होईल. या पुस्तकाला मोजता न येण्यासारखी उंची त्यांनी दिली आहे.

आपल्यासारख्या माझ्या एका सन्मित्राचे पुस्तक तमाम जनतेसाठी अर्पण होत असताना मनोमन आनंद होत आहे. आपण आपला हा लेखनप्रवास असाच पुढे चालू ठेवावा. आपल्या हातून आणखी साहित्यकृती निर्माण व्हाव्यात आणि वाचकांना दर्जेदार   साहित्य वाचायला मिळावे यासाठी या पुस्तकाला व ना. सा. येवतीकरसरांना पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा !

श्री. संजय नलावडे, मुंबई
                             

No comments:

Post a Comment

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...