शतदा प्रेम करावे ....
प्रेम म्हणजे काय असतं ? एकमेकांबद्दल असलेला जिव्हाळा, माया, ममता आणि लळा म्हणजे प्रेम. आपल्या आवडत्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून जे काळजी घेतली जाते तिथे प्रेम अनुभवयास मिळते. जीवनात प्रत्येक जण कुणावर नाही तर कुणावर प्रेम करतच असतो. आईचे मुलांवरील प्रेम असो किंवा बहिणीचे भावावरील प्रेम. काही जण आपल्या घरातील प्रत्येक सदस्या वर तर प्रेम करतातच त्याशिवाय घरातील पाळीव प्राण्यांवर देखील जीवापाड प्रेम करतात. या प्रेमापायी ते जनावर देखील त्यांच्यावर तेवढेच प्रेम करते. आमच्या बाजूला एकाच्या घरी कुत्रा होता. तो खूपच प्रामाणिक होता. त्याचे मालकांवर खूप प्रेम होते. मालकांचे देखील त्याच्यावर अपार प्रेम होते. त्याच्या हाताने टाकलेला भाकरीचा तुकडाच तो खात असे अन्यथा कशालाही तोंड लावत नसे. मालक कधी गावाला गेला तर तो येईपर्यंत वाट पाहत असे. इतके त्यांचे अपार प्रेम होते. एके दिवशी त्या मालकांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या प्रामाणिक कुत्र्याला एका ठिकाणी बांधून ठेवले होते. त्यादिवशी तो दिवसभर अश्रू गाळत राहिला. एक दिवस - दोन दिवस असे करत सात दिवस तो उपाशी च राहिला आणि आठव्या दिवशी तो ही आपला प्राण सोडला. सांगायचा तात्पर्य म्हणजे एखाद्यावर जीवापाड प्रेम करा ते ही आपल्यावर जीवापाड प्रेम करतात. पण मनात स्वार्थी भाव ठेवून प्रेम केल्याने ते कधी ना कधी उघडे पडते आणि त्याचा व्हायचा तेच परिणाम होतो. आई आपल्या मुलांवर जे प्रेम करते त्यात कोणताही स्वार्थ नसतो. निस्वार्थ भावनेने केलेले प्रेम अजरामर होते.
मुले देखील आपल्या आई - वडिलांवर खूप प्रेम करतात. मात्र काही वेळा प्रेम वयाच्या स्थित्यंरानुसार बदलत राहते. मुलांचा जन्म, बालपण आणि शिक्षण या क्रिया पूर्ण होईपर्यंत आई-वडील आणि मूल यांच्यात अतूट प्रेम असते. दोघे ही एकमेकांचे काळजी घेतात. त्यानंतर होते मुलांचे लग्न. यामुळे मुलगी असलेली आपली लाडकी परी दुसऱ्याची घरी सून म्हणून जाते तर आपला लाडका मुलगा कोणाचा जावई तर कोणाचा नवरा अश्या भूमिकेत जातो. त्याच्यावर एक जबाबदारी वाढते. ज्याप्रकारे आपल्या आई-वडिलांवर प्रेम करीत होता अगदी तसेच बायकोवर आणि बायकोकडील जे कोणते गणगोत आहेत त्यांच्यावर देखील तेवढेच प्रेम करावे लागते. येथे जे प्रेमाची वाटणी होते, असे वाटते की येथून मुलांचे आई - वडिलांवरील प्रेम कमी होत आहे असा अंदाज बांधला जातो. नव्हे कमी होतेच असा सर्वाना विश्वास वाटतो. बालपणी आई वडिलांवर प्रेम करणारा तरुणपणात आपल्या बायकोवर प्रेम करतो यात कुठे शंका घेण्यासारखी बाब नाही. मात्र काही मुलं बायकोच्या एवढ्या वशीकरण मध्ये जातात की, तिच्या शिवाय कोणाचे ही ऐकत नाही असा आरोप बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतो. त्याचे प्रेम इथे थांबत नाही. तर संसारात अपत्याचे आगमन झाले की, तो लेकरांच्या प्रेमात पडतो. त्यांना काय हवं काय नको याची सर्व काळजी तो घेत राहतो. मुलं मोठी झाली की पुन्हा तेच चक्र चालू राहते. आजी - आजोबा झाले की आपल्या नातवंडावर खूप प्रेम दिसून येते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आपली माणसं सर्व जवळ असावीत, आपल्या नजरेत असावी अशी तळमळ असते. काही जणांना यात यश मिळते तर काही जणांना अपयश मिळते. अपयश मिळालेल्या व्यक्तींनी नाउमेद किंवा हताश न होता कुठे प्रेम निर्माण करता येईल काय याचा शोध घ्यावा आणि इतरांना प्रेम देण्यासाठी नेहमी तत्पर असावे. पूज्य साने गुरुजी यांनी आपल्या खरा धर्म या कवितेत म्हटल्याप्रमाणे खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे.
खरोखरच आपल्या जीवनात प्रेम आणि माणुसकी तयार करायचे असेल तर जेथे खरी गरज आहे तिथे तन मन धन सर्वस्व अर्पण करून काम केल्याने जे समाधान मिळते ते किती ही पैसा खर्च करून मिळणार नाही. म्हणून वयापरत्वे बदलत जाणाऱ्या प्रेमाला आपण सर्व जण समजून घ्यावे. तरुणपणी मुलामुलींमध्ये आकर्षण असते. मात्र या वयात केलेली एक चूक आयुष्यभर वाळवी सारखी आपल्या जीवनाला पोखरत असते. म्हणून प्रेमाच्या नावाखाली कुणी ही फसू नका. जागरूकतेने राहा. मजेत आणि मस्तीत गाणे गुणगुणत राहावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
No comments:
Post a Comment