Wednesday, 7 December 2016

हमें तो लूट लिया

*हमें तो लूट लिया ...........*

मोबाईलमुळे आज जग बदलल्यासारखे आणि जवळ आल्यासारखे वाटत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोबाईलची क्रांती संपूर्ण इतिहास बदलून टाकली आहे. आजही ते पोस्टातील पत्रव्यवहाराचे दिवस आठवले की " डाकिया डाक लाया " हे गीत आठवण आल्या शिवाय राहत नाही. पोस्टमन गावात आला म्हटले की, लोक उत्साहाने त्याच्याकडे पाहायचे कोणाचे पत्र आले म्हणून....? सासरी गेलेल्या मुलींचे पत्र आले काय म्हणून आई वाट पहायची तर, माहेराहुन काही खुशाली आहे काय म्हणून मुलगी वाट बघत असायची. महिनोनमहीने आई-मुलींची बातचीत व्हायची नाही. पत्राद्वारे काय ते ख्यालीखुशाली कळायचे. त्यामुळे महिन्यात कधी भेटले तर दिवसरात्र गप्पा मारायच्या, पण आज काळ बदलला. मोबाईलच्या सुविधेमुळे आज मुलगी सासरी आहे असे वाटतच नाही कारण दिवसातुन दोन-तीन वेळा तरी मोबाईल वर त्यांचे थेट बोलणे होत असते. त्यामुळे पूर्वी असलेली तळमळ आणि आस्था हे दोन्ही आज दिसत नाही, हे ही सत्य असेल कदाचित. बाहेरगावी शिकायला असलेला मुलगा दर महिन्याला पैसे पाठविण्यासाठी घरी पत्र पाठवायाचा. तब्बल 15 - 20 दिवसा नंतर त्याला ते मिळायचे. आपला अभ्यास आणि निकाल मुले पत्राद्वारे कळवायचे. पण आज मुलांच्या अगोदर आई-बाबाना त्यांचे गुण कळत आहेत. हे सर्व मोबाईल मुळे शक्य होत आहे. म्हणजे मोबाईल चांगले आहे तर....! आम्ही ही त्यास काही नावे ठेवत नाही, मात्र याच मोबाइलने आज कित्येक लोकांना तंगुन सोडले आहे. सोडता ही येत नाही अन धरता ही येत नाही अशी कात्रीत सापडल्यासारखी स्थिती झाली आहे. फोनचा प्रवास ही थक्क करून टाकणारी आहे. पूर्वी घरात ट्रिंग ट्रिंग करणारी फोन हळूहळू मोबाईल चे रूप कधी घेतले हे कळले देखील नाही. एवढेच नाही तर मोबाईल स्मार्ट फोनचे रूप धारण केले हे ही कळले नाही. आज प्रत्येक जण यामुळे स्मार्ट झाला आहे. क्षणात त्यांना हवी ती माहिती मिळत आहे आणि एकमेकांना संपर्क करणे अधिक सोपे झाले आहे. मात्र याच स्मार्ट फोनमुळे त्याला अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे, हे ही विसरून चालणार नाही.
स्मार्ट फोन चांगले जरी वाटत असेल तरी यामुळे लोकं आता चुप झाली आहेत. पूर्वीसारखे बडबड करेनाशी झाली. कारण चोवीस तास त्यांचे डोके त्या मोबाईलच्या स्क्रीन वरच चिकटुन राहत आहे. कधी गाणे पाहणे, तर कधी चित्रपट पाहणे यामुळे मोबाईल सदैव त्यांच्या हाती दिसत आहे. तरुण आणि युवकाना तर या स्मार्ट फोनने अक्षरशः वेड लावले आहे. मागे काही दिवसा पूर्वी एक बातमी वाचण्यात आली होती की, वडिलांनी स्मार्ट फोन घेऊन देण्यास नकार दिल्यामुळे एका युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. काय म्हणावे या तरूण पिढीला .....! आपले अभ्यास आणि मेहनत करण्याच्या या वयात कशाला पाहिजे आपणास स्मार्ट फोन ? त्यांचे उत्तर फार मजेशीर असते ते म्हणतात की माझे सारे मित्र फेसबुक आणि व्हाट्सएप्पचा वापर करतात आणि मी एकटाच वापरत नाही त्यामुळे सर्व मुले माझी टिंगल उडवतात. मला ही फेसबुक आणि व्हाट्सएप्पचा वापर करायचे आहे आणि मित्राशी सदा कनेक्टेड राहायचे आहे. यापेक्षा त्यांना अभ्यास महत्वाचे वाटत नाही ही आजची युवा पिढी. त्यांचे पुढील भविष्य कसे असेल काही कल्पनाही करवत नाही. याचा वापर चांगल्या कामासाठी होत असेल तर ठीक आहे अन्यथा ती पिढी बरबाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फेसबुक वरुन युवकास काही भविष्याचे मार्गदर्शन मिळेल असे वाटत नाही कारण निव्वळ करमणुकीचे एक माध्यम म्हणजे फेसबुक. ज्याला निवांत वेळ आहे, ज्याला कशाचीही काळजी किंवा चिंता नाही अश्या लोकांनी हे वापरावे म्हणजे त्यांचा वेळ मित्रासोबत घालाविता येईल आणि वेळ निघुन जाईल. तेंव्हा युवकानी आपला वेळ संपविण्यासाठी स्मार्ट फोन वापरायचे का ? याचा प्रथम विचार करणे आवश्यक आहे. फेसबुकने सर्वात जास्त भुरळ घातली आहे ती नवयुवकांना. दिवस रात्र फेसबुकवर चैटिंग करत फिरताना घरातील कोणत्याच व्यक्ती सोबत बोलत नाहीत. चिडिचुप व्यवहार चालू असतो. आईने जेवायला बोलावले तरी 'आत्ता एका मिनिटात आलो' म्हणत एक तास उलटतो तरी त्यांची जेवण करण्याची तयारी नसते. म्हणजे तहानभूक विसरून ते या फेसबुकचा वापर करतात. हे कुठे तरी थांबले पाहिजे. यासाठी तरुणाचे याबाबतीत समुपदेशन करणे आवश्यक आहे. वेळेचे काही बंधन स्वतः ला लावून याचा वापर केल्यास हे माध्यम आपणास देणगी ठरु शकते.
फेसबुकच्या नंतर वापरली जाणारी सर्वात जास्त लोकप्रिय झालेली सोशल साइट म्हणजे व्हाट्सएप्प होय. यामुळे तर आबालापासून वृद्धापर्यंत पुरुष आणि स्त्री सारेच जण वेडे बनले आहेत की काय अशी शंका मनात येते. कारण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपी जाईपर्यंत येथे एकमेकांच्या गप्पा न बोलता गपगुमान चालू राहते. घरात कोण आले ? कोण गेले ? याचे त्यांना काही सोयरसूतक नसते. ते आपल्या धुंदीत मदमस्त होऊन रंगून गेलेले असतात. सध्या भारतात जेवढे मोबाईल धारक आहेत त्यातील पाऊण टक्के हे व्हाट्सएप्प चा वापर करतात नव्हे करावेच लागते.
सरकार म्हणते व्हाट्सएपचा वापर करा आत्ता सर्व माहिती यावरच मिळणार, घरी गेल्यानंतर बायको म्हणते पहिले ते व्हाट्सएप बंद करा, घरात काय चालले आहे याकडे तुमचे अजिबात लक्ष नाही, लेकराचे अभ्यास घेणे नाही, बाजारात जाऊन काही सामान आणने नाही, घरातल्या कामात कसलीच मदत नाही,  दिवसरात्र त्या मोबाईल मध्येच डोके खुपसून बसायची सवय लागली, नाही रोगच लागलाय. स्त्री कर्मचारीच्या बाबतीत यापेक्षा काही वेगळे नाही. दिवसभर मोबाईल बघितल्यावर खायला कधी करणार ? या प्रश्नाने ती जागी होते. अन कामाला लागते. हे संवाद कर्मचारी वर्ग असलेल्या घरात सध्या ऐकू येत आहे. कोणत्याही कार्यालयात जावे तेथे हे दोन माध्यम चालूच राहतात. शाळा-महाविद्यालययात सुध्दा हेच चालू असते. त्यामुळे ' शांतता मोबाइल चालू ' असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

सोशल मिडीया मध्ये पालकानी खुप जागरूकपणे पाऊल उचलायला हवे. आपला जास्तीत जास्त वेळ जर पालकानी सोशल मिडीया तील फेसबुक किंवा व्हाट्सअप वर घालवू लागले तर आपले पाल्य बिघडणार नाही हे कश्यावरुन. म्हणून दिवसातील ठराविक वेळ यासाठी देऊन बाकी च्या वेळी आपल्या घरातील पती, पत्नी आई वडील आणि मुले यांच्याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. आज घराघरात अशा तक्रारी ऐकायला येत आहेत की, आमचे हे सदानकदा मोबाईलवरच असतात. घरातल्या कोणाकडे मुळी लक्षच नसते. घरी तेच आणि बाहेरही तेच काय करावे कळत नाही. हे स्मार्ट फोन आल्या पासून ना खुप गप्प गप्प असतात. त्यांचे पूर्वी सारखे बोलणे आत्ता खुप कमी झाले आहे. खळखळुन हसणे आणि हसविणे देखील कमी झाले. जेवताना देखील ते बोलत नाहीत. नेहमी त्यांच्या डोक्यात कश्याचे तरी विचार चालूच असतात. सायंकाळी बाहेर फिरायला जाणे कमी झाले आहे. मित्रासोबत बोलणे कमी झाले. नातेवाईकासोबत वागणे विक्षिप्त झाले. हे सर्व या सोशल मिडीया तील फेसबुक आणि व्हाट्सअप मुळे घडत आहे. मुलांचे संगोपन करण्याची फार मोठी जबाबदारी पालकावर आहे म्हणून सोशल मिडीया चा वापर करीत असताना जरा स्वतः ला जपणे आवश्यक आहे. पालक असलेल्या माता भगिनी यांनी सुद्धा या माध्यमापासून दूर रहावे. महिलांचे व्हाट्सअप आणि फेसबुक सारख्या सोशल मिडीया वर जास्त वावर नसेल ही कदाचित मात्र फोनवर बोलण्याचे प्रमाणा वर मात्र नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. काही महिला फोनवर एक-एक तास संभाषण करतात. त्याचे देखील परिणाम कुटुंबावर होतात. त्यामुळे फोनचा वापर शक्यतो कमी करावा. आजच्या काळात फोन जवळीक आणणारे साधन असले तरी फोनच्या माध्यमातून काही जरी गैरसमज पसरले तर दुरावा निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे त्याचा वापर योग्य पध्दतीने करणे पालकासाठी खुप आवश्यक आहे.

व्हाट्सएपचा वापर करण्यावर काही घरात वादविवाद भांडणतंटे होत असल्याचे ऐकू येत आहेत. यावरून लक्षात येईल की, लोकांना या सोशल मीडियातील फेसबूक आणि व्हाट्सएप किती वेड लावले आहे. एखाद्या दिवशी जर इंटरनेट बंद असेल तर मानसिक स्वास्थ्य बिघडेल की काय अशी शंका सध्या मनात निर्माण होत आहे. याशिवाय मी जगूच शकत नाही असे सध्या ज्याला त्याला वाटत आहे. पण ते आभासी आहे. तेंव्हा फेसबुक आणि व्हाट्सएप व्यसन होणार नाही यांची काळजी आजपासून प्रत्येकानी घ्यावे. येणारा काळ अजुन कठिण येणार आहे. यावर एक जुने गीत आठवते ते म्हणजे ' हमें तो लूट लिया मिलके ......' याच गीतास ऐका वेगळ्या शब्दाने असे म्हणता येईल.

*हमें तो लूट लिया मिलके सोशल मीडियाने*
*फेसबुकवालोंने और व्हाट्सएपवालोंने*

- नागोराव सा. येवतीकर
   स्तंभलेखक
9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...