Sunday, 4 December 2016

माणुसकी जागवू ; विषमता संपवू

माणुसकी जागवू ; विषमता संपवू

भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक या देशात एकत्र राहतात. देशातील लोकांची एकता हीच राष्ट्रीय शक्ती आहे आणि वेळप्रसंगी ही शक्ती अनुभवास ही येते. सुमारे दोनशे ते तीनशे वर्षापूर्वी भारत हा देश मागासलेला होता मात्र नैसर्गिक साधनसंपत्ती मुळे समृध्द होता. भारताला सोने की चिडिया असेही म्हटले जायचे. परंतु भारतावर ब्रिटिश सरकारची वाईट नजर पडली. सुमारे दीडशे वर्षे भारतावर अधिराज्य केले शिवाय येथील सर्व साधनसंपत्ती लुटून नेली. इंग्रज नीती कधीही चांगली नव्हती. फोडा आणि राज्य करा हे त्यांचे तंत्र होते. भारतात ग्रामीण भागात राहणारी जनता इंग्रज येण्यापूर्वी खुप सुखात आणि आनंदात राहत होती. मात्र व्यापारी म्हणून ब्रिटिश भारतात आले आणि राज्यकर्ते बनून त्यांनी संपूर्ण भारताचा चेहरा पार बदलून टाकला.

इंग्रज जेंव्हा भारतातून गेले त्यावेळी देशात अनेक प्रकारची विषमता दिसून येत होती.

*धार्मिक विषमता :-*

देशातील सर्वात पहिली विषमता म्हणजे धार्मिक विषमता होती. धर्माच्या नावावर भारत आणि पाकिस्तान राज्याची निर्मिती झाली. हिंदू साठी भारत आणि मुस्लिम धर्मासाठी पाकिस्तान अशी सरळ फाळणी करण्यात ब्रिटिश यशस्वी झाले. तो तिढा गेल्या 60 ते 65 वर्षात सोडविता आला नाही. ब्रिटिशाच्या मनात जे कूट विचार होते ते त्यांनी जाता जाता करून गेले. मात्र आजपर्यंत ही धार्मिक विषमता नष्ट झाली नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीप्रमाणे प्रत्येकाची विचारधारा भिन्न असते. त्यामुळे काही लोक या गोष्टीला मानतात किंवा काही लोक कट्टर विरोध करतात. पण हिंदू असो वा मुस्लीम या दोघांनी सुद्धा सामंजस्यपणाने ह्या प्रश्नांची सोडवणूक केली तर अंर्तगत असलेला वाद मिटविण्यासाठी लवादाची काय गरज ? परंतु तसे होताना दिसत नाही. दररोज सीमारेषेवर गोळीबार होत आहेत आणि रोज सैनिक मारला जात आहे. कधी आपला तर कधी त्यांचा. बंदुकीच्या गोळीने ही समस्या धार्मिक विषमता संपणार नाही. खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे ही परमपूज्य साने गुरुजीं यांचे वचन लक्षात घेणे आवश्यक आहे.

ग्रामीण भारतामध्ये आज ही हिंदू-मुस्लिम एकोपा दिसून येतो. मात्र या उलट चे चित्र शहरात पाहायला मिळते. धार्मिक शिक्षण देणाऱ्या मंडळीनी समाजातील लोकांना आपल्या धर्माचे चांगले शिक्षण द्यावे यात काही संदेह नाही मात्र दुसऱ्या धर्मावर टीका, टिपण्णी न करता त्या धर्मात काय चांगले आहे किंवा काय घेता येते यांची माहिती द्यावी. यामुळे धर्मा-धर्मात असलेली तेढ कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल. ही धार्मिक विषमता कमी होण्यासाठी प्रत्येक जण विशेष करून प्रयत्न करणे गरजेचे आहे. धार्मिक तेढ निर्माण होणार नाही असे वर्तन ठेवल्यास भविष्य नक्कीच चांगले असेल.

*जातीय विषमता :-*

भारतात विविध जातीचे लोक एकत्र राहतात. हाताची पाचही बोटे सारखी नसतात या म्हणीप्रमाणे प्रत्येक जण जगावेगळा असतो, मग तो कोण्या ही जातीचा का असेना. पण भारतात सध्या जातीयतेवरुन खुप गढुळ वातावरण तयार होताना दिसून येत आहे. प्रत्येक व्यक्ती आपलीच जात सर्वश्रेष्ठ कशी आहे हे दाखविण्याची शर्यत लागली आहे की काय असे वाटू लागले. प्रत्येक जातीतील लोक आपली शक्ती प्रदर्शन दाखवित आहेत. एका समाजातील जातीचा मोर्चा निघाला म्हणाले की असे प्रत्येक जातीचे लोक मोर्चा काढत आहेत आणि यात सामान्य लोकांना विविध संकटाना तोंड द्यावे लागते. जातीयतेचे सर्वात जास्त चटके डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सहन करावे लागले. त्यातून त्यांना बरेच काही अनुभव आले. म्हणून तर त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरच्या दीक्षाभूमी वर हजारो अनुयायीना सोबत घेऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांनी समाजातील जातीयता नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण आज समाजातील ही जातीयतेची विषमता नष्ट झाली काय ? याचे उत्तर नाही असे मिळते. आजही समाजात जातीवरुन लोकांना उच्च-नीचतेची वागणूक दिली जाते. अमक्या कमी जातीचा आहे म्हणून त्यांच्या सोबत कुणी संपर्क करीत नाहीत की जवळ येऊ देत नाहीत. माझा एका मित्राला राहण्यासाठी किरायाने घर सुध्दा मिळाले नाही. कारण काय तर तो अमक्या जातीचा आहे. काय ही विषमता ? लोकांच्या आडनावावरुन ही लोक एकमेकाला दूर करताना दिसतात. ही जातीय विषमता नष्ट होणे आवश्यक आहे. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही म्हणून प्रत्येकाने सामंजस्यपणाने राहाणे आणि वागणे आवश्यक आहे ?  याचा एक वेळा विचार करावा.

*आर्थिक विषमता :-*

ज्यांच्याकडे पैसा त्यांच्याकडे सर्व काही उपलब्ध होते तर जो गरीब आहे त्यास एक वेळचे पोट भरण्यासाठी जेवण ही मिळत नाही अशी विदारक स्थिती भारतात बघायला मिळते ही आहे आर्थिक विषमता. श्रीमंत लोक गरीब व्यक्ती कडे फारच तुच्छ नजरेने पाहतात. त्यामुळे त्यांच्यात कधीच समानता दिसून येत नाही. समाजाने सुद्धा तशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. श्रीमंत माणसे आलीशान बंगल्यात रहावे आणि गरीब लोक झोपडीत रहावे असा विधिलिखित नियम केला आहे असे वाटते. दारिद्रयरेषेखालील लोकांच्या नावाच्या यादीतील नावे कमी होण्या ऐवजी दिवसेंदिवस त्यात भरच पडत आहे. या यादीत नाव यावे म्हणून लोक धडपड करताना पाहून या लोकांची कीव आल्याशिवाय राहत नाही. श्रीमंत लोकांची नावे या यादीत पाहून हसावे की रडावे हेच मुळात कळत नाही. दारिद्रयरेषेखालील जीवन जगणे खुप हालअपेष्टाचे असते असे चित्र कुठे ही दिसत नाही कारण मूळ दारिद्रयरेषेखालील लोक बाजूला राहतात आणि इतर लोक मात्र योजनेचा फायदा घेतात, याचा विचार सामान्य लोकांनी करावा. या देशात एका बाजूला घरात मुबलक अन्न आहे तर भूक लागत नाही आणि दुसऱ्या बाजूला भूक आहे पण त्यांना खायला अन्न मिळत नाही असे विरोधाभास असलेले चित्र दिसते. ही आर्थिक विषमता संपविणे आवश्यक आहे असे वाटते. यासाठी स्वातंत्र्य काळात विनोबा भावे यांनी संपूर्ण भारतात भूदान चळवळ सुरु केली होती. प्रत्येक व्यक्ती कडे संपत्ती किती प्रमाणात रहावा याविषयी एखादा कायदा निर्माण केले तर संपत्ती एका व्यक्ती जवळ एकवटल्या जाणार नाही. जसे की सध्या भारताचे पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांनी सोने वापरण्यावर निर्बंध आणले आहेत. विवाहित स्त्री 50, पुरुष 10 आणि अविवाहित स्त्री 25 तोळे सोने वापरता येईल असा नियम केला आहे. असेच काही नियम घर, बंगला, गाडी, पैसा याबाबत करायला हवे तरच ही आर्थिक विषमता दूर होऊ शकते.

*शैक्षणिक विषमता :-*

स्वातंत्र्यपूर्वी भारत देशात शिकलेल्या लोकांची संख्या फारच कमी होती त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशापुढे लोकांची निरक्षरता हा फार मोठा प्रश्न होता, यास शैक्षणिक विषमता असे म्हटले जाते. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटले आहे तर शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे त्याचे जे कुणी प्राशन करील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. या सारख्या तत्ववेत्या महान लोकांच्या म्हणण्यानुसार शैक्षणिक क्रांती होत गेली आणि समाजात आज थोडी फार समानता दिसून येत आहे. पण ती समानता पुरेशी नाही कारण आज ही शैक्षणिक विषमता भरपूर प्रमाणात दिसून येते. इयत्ता पाहिली ते आठव्या  वर्गापर्यंत मोफत शिक्षण दिले म्हणजे शैक्षणिक समानता मिळणार नाही. आरक्षणाचा लाभ घेऊन देखील आज किती लोक उच्च शिक्षण पूर्ण करतात हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. जर आरक्षण मिळालेच नसते तर या भारतात आज काय चित्र राहिले असते याचा कधी एक वेळा तरी विचार केला आहे का ? या प्रश्नवार एकदा विचार करा अन बघा आपले मन  किती अस्वस्थ होते ते. तरी सुध्दा ही शैक्षणिक विषमता नष्ट करण्यासाठी प्रत्येक शिक्षित व्यक्तिनी स्वतः हुन पुढाकार घेतला पाहिजे लोकांना शिक्षित आणि सजग करण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजे. तरच ही शैक्षणिक विषमता दूर होईल.

*स्त्री-पुरुष विषमता :-*

स्त्री पुरुष समानता हे फक्त कागदा वर लिहिण्यापुरते आणि भाषणात बोलण्यापुरते छान वाटते. पण प्रत्यक्षात मात्र स्त्री पुरुषा मध्ये कुठेच समानता आढळून येत नाही. घराच्या उंबरठ्यापासून ते थेट संसदेच्या दारापर्यंत पदोपदी आपणास स्त्री आणि पुरुषात विषमता दिसून येते. स्त्री सुद्धा एक व्यक्ती आहे म्हणून तिला घटनेने सर्व प्रकारचे हक्क दिले आहे. महिलांना 33 टक्के आरक्षण दिलेले आहे त्यामुळे तिचा विकास होईल आणि ही विषमता संपेल. पण या आरक्षण प्रणालीचा काही उपयोग होताना दिसत नाही. ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदच्या अध्यक्ष पदापर्यंत महिला निवडून जात आहेत. पदभार स्विकारत आहेत मात्र कार्यभार त्यांच्या पती, दीर, मुलगा यांच्या हाती आहे. ती फक्त सही पुरती शिल्लक उरली आहे. अश्याने स्त्री पुरुष  विषमता संपेल काय ? आज मुलीचा जन्मदर दर हजारी पुरुषामागे नऊशेच्या घरात आहे म्हणजे मुलगा आणि मुलगी यांच्या जन्म दरात शंभर चा फरक आहे. ही विषमता भरून निघाली नाही तर भविष्यकाळ खुपच अवघड आहे. प्रत्येक जण वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा असा हट्ट धरतात. मुलगी परया धन म्हणून तिच्या जन्माने नाके मुरडली जाते, तिचा जन्म नकोशी वाटते. ही विचारधारा संपुष्टात येणे आवश्यक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या विचाराने संविधान तयार केले ते स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न केले पाहिजे तरच धार्मिक, जातीय, सामाजिक, शैक्षणिक आणि स्त्री-पुरुषातील विषमता दूर होण्यास मदत मिळेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की गुलामाला गुलाम असल्याची जाणीव करून द्या म्हणजे तो गुलामगिरीविरुध्द बंड करून उठेल. त्यांच्या याच वचनाचा आपण असा अर्थ घेऊ या माणसाला माणूस असल्याची जाणीव करून द्या तो नक्की माणुसकी जपल्याशिवाय राहणार नाही. समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी प्रत्येकांची माणुसकी जागी व्हायला पाहिजे.

- नागोराव सा. येवतीकर

स्तंभलेखक , 9423625769

nagorao26@gmail.com

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...