Thursday 22 March 2018

आत्महत्या : एक चिंतन

अात्महत्या : एक चिंतन

" कर्जाच्या चिंतेपायी एका शेतकऱ्याची आत्महत्या", 
"परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या", 
" परीक्षेचा पेपर अवघड गेल्यामुळे नदीत उडी मारून एका युवकाची आत्महत्या",
" नैराश्याच्या गर्तेत एका बेरोजगार युवकाची आत्महत्या", 
"बायकोच्या त्रासाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या", 
"हुंड्यापायी नववधूने केली आत्महत्या", 
"महाविद्यालयात शिकणाऱ्या युवकाची आत्महत्या" 
" प्रेमात विफल झालेल्या एका युवकाची आत्महत्या " असे एक नाही अनेक आत्महत्येच्या बातम्या आपण रोज वाचत असतो आणि ऐकत असतो. आत्महत्येची बातमी प्रकाशित केल्याशिवाय पेपर पूर्ण होत नाही आणि अशी बातमी वाचल्याशिवाय वाचन पूर्ण होत नाही, अशीच काहीशी स्थिती आज दिसून येते. त्यांना आत्महत्या का करावी वाटली ? याचा जर विचार केला तर एक बाब प्रकर्षाने लक्षात येते ते म्हणजे आत्महत्या करणारे लोक अत्यंत शेवटच्या टोकाचे विचार करतात. समाजात किंवा कुटुंबात त्यांची काही तरी पत असते आणि ती पत नष्ट होताना त्यांना पहावले जात नाही. स्वतःची अब्रू अशी वेशीला टांगताना उघड्या डोळ्यांनी पाहवत नाही म्हणून ते कदाचित हा मार्ग स्वीकारत असतील असे वाटते. जेंव्हा जगणेच मुश्कील होऊन बसते आणि यापेक्षा मेलेले बरे असा जेंव्हा विचार मनात येतो तेंव्हा आपोआप ती पाऊले आत्महत्येकडे वळतात. एकाच बाबीवर जास्तीत जास्त वेळा विचार केला की माणूस टोकाची भूमिका घेऊ शकतो. माणसासमोर अनंत कष्ट आणि अडचणी असतात. त्या सर्व समस्येवर कुठे ना कुठे पर्याय असतो. मात्र ही समस्या सुटणार नाही आणि माझे काही खरे नाही असे जेंव्हा आपल्या मनाला वाटते तेंव्हा माणूस जीवन संपविण्याचा मार्ग धरतो. मात्र आजची वेळ उद्या नसते. उद्याची आपली सकाळ कदाचित वेगळी असू शकते. या आजच्या समस्येला उद्या पर्याय मिळू शकतो आणि समस्या संपू देखील शकते असा आशावाद जो ठेवतो तो कधीच आत्महत्येचा विचार करीत नाहीत. जे लोक आत्महत्येचा विचार करतात ते कमजोर मनाचे असतात. त्यांना काही गोष्टी सहन होत नाही. आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की, त्याचा परिणाम यांच्यावर होतो. आपल्या कुटुंबात, समाजात किंवा मित्र परिवारात असे आत्महत्येचे प्रसंग घडू नये यासाठी काही काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम कुटुंबात प्रेमाचे आणि हास्यमय वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. बहुतांश वेळा कौटुंबिक दूषित वातावरणामुळे लोकांचे मन विचलित होतात. नवरा-बायको यांचे भांडण मग ते कसल्याही प्रकारचे असेल त्यामुळे मन वितुष्ठ होतात. घरातील लहान मुलांना शक्यतो प्रत्येक गोष्टी साठी रागावून बोलणे उचित ठरत नाही. तसेच पालकांनी मुलांवर अपेक्षेचे ओझे न ठेवता मुलांकडून खूप मार्काची अपेक्षा ठेवू नये. कदाचित ते तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकल्या नाही तर त्यांच्या मनात एक वेगळाच विचार चालू होतो. म्हणून त्याची कुवत जशी असेल त्या पद्धतीने तो प्रगती करीत राहतो. जेंव्हा तो शहाणा आणि समजदार होईल त्यावेळी तो खरीच चांगली प्रगती करून दाखवेल. परंतु आपण नेहमी आपल्या मुलांची तुलना शेजारच्या मुलांशी करीत असतो आणि येथेच आपली फार मोठी गल्लत होते. मुले जसे जसे एकलकोंडी होत जातील तसेतसे ते वेगळाच विचार करत असतात. त्यामुळे नेहमी हसत खेळत वातावरण असणे अत्यावश्यक आहे. बेरोजगार युवकांच्या समस्या वेगळ्या आहेत. त्यांना रोजगार मिळत नाही उदास होतात. त्यामुळे ते व्यसनाच्या आहारी देखील जातात. मात्र युवकांनी आपल्या जवळ असलेल्या ज्ञान आणि कौशल्य याचा वापर करून स्वतः रोजगार निर्माण केल्यावर तुम्हीच दोन माणसाला कामावर ठेवू शकता. तसे विचार आपल्या डोक्यात यायला हवे. आपले डोके नको असेल त्याठिकाणी भलत्याच वेगात धावते आणि स्वतः ला जेंव्हा सिद्ध करायची वेळ येते तेंव्हा शांत झोप घेते. भारतात असे अनेक छोटे मोठे उद्योग आहेत ज्यातून आपणास रोजचे 50 रुपये तरी कमाई मिळते. माणसाच्या हातात पैसा नसला की काही सुचत नाही. मात्र हातात दहा रुपये असतील तर जो व्यक्तीचे दहाचे बारा कसे करायचे याचा जो विचार करतो तो कधी ही जीवनात असफल होत नाही. त्याच्या मनात कधी नैराश्य येत नाही. आत्महत्या करणाऱ्यात शेतकरी वर्गाची संख्या भरमसाठ आहे. निसर्गाची साथ चांगली मिळाली तर शेतकऱ्याला अजून दुसरे कोणी लागत नाही. मात्र दरवर्षी निसर्ग साथ देत नाही, वेळी यावेळी पाऊस पडून शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होते, हाता तोंडाशी आलेला घास जेंव्हा मातीत मिसळतो तेंव्हा काय वेदना आणि त्रास होत असेल ते शेतकरीच जाणतो. उभ्या जगाचा पोशिंदा आहे मात्र स्वतः उपाशी. डोळ्यासमोर नुकसान होत असताना जर शेतकऱ्यांना काही करता आले नाही तर त्याचे डोके चक्रावते. यावर्षी तरी कर्ज फेडू या विचारात असलेला शेतकरी परत एकदा त्या कर्जाच्या चक्रवाढ व्याजेत दाबला जातो. त्याच्या डोळ्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय नसतो. मात्र शेतकरी बांधवांनो असे कठोर पाऊल उचलण्यापूर्वी एक वार आपल्या बायकोला, आपल्या लेकरांना एकदा वळून बघा. तुमच्याशिवाय खरोखर ते सुखी जीवन जगू शकतील काय ? वृद्ध आई बाबांना तुमच्या पश्चयात कोण पाहणार आहे. परीक्षा आणि निकाल या दोन्ही काळात विद्यार्थी ताणतणाव मध्ये वावरत असतो. हुशार मुलांना जास्त गुण घेण्याची काळजी तर काही मुलांना पास होण्याची काळजी. नापास झाल्याने काही आभाळ कोसळणार नाही, पुढील वर्षी अजून जास्त जोमाने अभ्यास करण्याचा सकारात्मक विचार मनात आणावे लागतात. या सर्व बाबीचा विचार करून आत्महत्येला ठोकर मारावी. तसा विचार मनात आला तर मनाला जे आवडते ते करावे. आपले आवडते गाणे गुणगुणत राहावे, मित्रांच्या घोळक्यात राहावे, चित्रपट पाहावे, कुठे तरी फिरायला जावे, अश्या अवस्थेत एकटा कधी ही राहू नये, जवळच्या व्यक्तींनी अश्या अवस्थेत त्यांना एकटे ठेवू नये.  एकटा असलो की, काही ना काही विचार मनात घोळत राहतात. आज जे आहे ते उद्या राहणार नाही याचं आशेवर जीवन जगणारे आपले पूर्ण आयुष्य जगतात. या पृथ्वीतलावर जन्म घेणे जसे आपल्या हातात नाही तसे जीव संपविणे देखील आपल्या हातात नाही. आत्महत्या हा एक फार मोठा गुन्हा आहे, ज्याचे फळ आपल्या माघारी आपल्या प्रियजनाना मिळतो.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...