शेतकऱ्यांचा राजा व आद्य क्रांतीकारक - राजे उमाजी राजे नाईक
राजे उमाजी नाईक (१७९१–१८३२) हे मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक शूर क्रांतिकारक व लोकनायक म्हणून ओळखले जातात. त्यांना "पहिला क्रांतिकारक" असेही संबोधले जाते. ई.स. १७९१ मध्ये भिवडी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे त्यांचा जन्म झाला. ते नाईक घराण्यातील होते. लहानपणापासूनच त्यांच्यात शौर्य व न्यायप्रियता होती. सामान्य जनता, शेतकरी व गावकरी यांना ब्रिटिशांच्या अन्यायकारक करप्रणालीमुळे अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. इंग्रजांनी गावकऱ्यांवर लादलेले कर, महसूल व अन्याय याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला. त्यांचे साथीदार म्हणजे शेतकरी, धनगर व स्थानिक गावकरी होते. ते "गनिमी कावा" पद्धतीने लढा देत, त्यामुळे इंग्रजांना त्यांना पकडणे कठीण होत असे. इंग्रजांना उमाजी राजे यांच्या लढ्याची भीती वाटू लागली. शेवटी विश्वासघातामुळे ते इंग्रजांच्या ताब्यात आले. इ.स. १८३२ मध्ये पुण्यात त्यांना फाशी देण्यात आली.
त्यांच्या जीवनातील काही प्रसंग खूप महत्वाचे आहेत.
• शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिलेला उमाजी
एकदा ब्रिटिश सरकारचे महसूल अधिकारी एका गावात कर वसुलीला आले होते. शेतकऱ्यांची पिके नीट आलेली नव्हती, त्यामुळे ते कर देऊ शकत नव्हते. पण इंग्रज अधिकाऱ्यांनी निर्दयीपणे कराची वसुली सुरू केली. त्यांनी शेतकऱ्यांची जनावरे, शेतीची साधने आणि अन्नधान्य जप्त करायला सुरुवात केली. गावकऱ्यांची अवस्था पाहून उमाजी राजे नाईक संतापले. ते थेट त्या अधिकाऱ्यांच्या तंबूत शिरले व म्हणाले, “हा शेतकरी हा आपल्या मायभूमीचा कणा आहे. याच्या घामावर राज्य उभे आहे, आणि तुम्हीच याला लुबाडता ? शेतकऱ्यांवर असा अन्याय मी सहन करणार नाही ! ” असे म्हणत त्यांनी इंग्रजांच्या सिपायांवर झडप घातली. तेव्हा गावकरीही धैर्याने उमाजींना साथ देऊ लागले. इंग्रज सिपाई पळून गेले आणि गावकरी मुक्त झाले. या प्रसंगानंतर शेतकऱ्यांमध्ये उमाजी राजेंविषयी प्रचंड आदर निर्माण झाला. लोक त्यांना "शेतकऱ्यांचा राजा" म्हणू लागले.
उमाजी राजे हे शेतकरी–शोषित समाजाचे तारणहार म्हणून ओळखले जात. "शेतकऱ्यांचा राजा" अशी उपाधीही त्यांना लोकांनी दिली.
• दुसरा प्रसंग म्हणजे गनिमी काव्याचा प्रसंग
ब्रिटिश सैन्याने उमाजी राजे नाईक व त्यांच्या साथीदारांना पकडण्यासाठी एक मोठी छावणी उभारली होती. त्या छावणीत शेकडो सिपाई होते. शेतकऱ्यांना दहशत बसावी म्हणून इंग्रजांनी गावकऱ्यांकडून धान्य व जनावरे जप्त केली होती.
हे पाहून उमाजी राजेंनी आपल्या मावळ्यांना एकत्र केले आणि गनिमी काव्याने हल्ला करण्याचे ठरवले. रात्रीच्या अंधारात ते सर्वजण छावणीभोवती शांतपणे लपून बसले. अचानक त्यांनी मशाली पेटवल्या, शिट्ट्या मारल्या, डफ वाजवले, आणि चारही बाजूंनी "हर हर महादेव!" असा जयघोष करत छावणीवर धावा चढवला.
इंग्रजांना वाटले की हजारो सैनिकांनी छावणी घेरली आहे. घबराटीत त्यांनी शस्त्रास्त्रे व सामान सोडून पलायन केले. उमाजी राजेंनी जप्त केलेले धान्य, जनावरे पुन्हा शेतकऱ्यांना परत दिले. या प्रसंगानंतर शेतकरी अधिक निर्भय झाले आणि उमाजी राजेंची कीर्ती संपूर्ण पुणे-जुन्नर भागात पसरली. इंग्रज मात्र अधिकच चिडले आणि त्यांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले.
• त्यांच्या जीवनातील विश्वासघाताचा प्रसंग
उमाजी राजे नाईक इंग्रजांना बराच काळ चकवून गेले. त्यांच्या शौर्यामुळे व गनिमी काव्यामुळे इंग्रजांना त्यांना पकडणे अशक्य झाले होते. इंग्रजांनी मग चलाखीचा डाव खेळला. त्यांनी जाहीर केले, “ जो उमाजींना पकडून देईल, त्याला मोठे बक्षीस व जमीनजुमला दिला जाईल.”
काही लोभी लोक त्यांच्या या प्रलोभनाला बळी पडले. त्यातीलच एकाने उमाजी राजेंचा ठाव इंग्रजांना सांगितला.
एकदा उमाजी राजे आपल्या मावळ्यांसोबत जंगलात विसावले होते. त्यावेळी त्या विश्वासघातकाने इंग्रज सैन्याला गुप्त खूण दिली. अचानक इंग्रज सिपायांनी सर्व बाजूंनी छापा टाकला. उमाजी राजे शूरपणे लढले, पण संख्येने प्रचंड असलेल्या इंग्रज सैन्यापुढे ते पकडले गेले. इ.स. १८३२ मध्ये पुण्यातील फाशीच्या चौकात उमाजी राजेंना सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली. तेव्हा त्यांनी शेवटचे वाक्य उच्चारले –
“हा बळी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आहे ; माझा आत्मा मुक्त झाला ! ”
अशा रीतीने एका विश्वासघातामुळे शेतकऱ्यांचा राजा, मराठ्यांचा पहिला क्रांतिकारक हरपला. पण आजही त्यांचे नाव ऐकले की लोकांच्या डोळ्यांत आदर व अभिमान दिसतो. महाराष्ट्रात त्यांच्या स्मरणार्थ पुतळे, स्मारके उभारण्यात आली आहेत.
थोडक्यात, उमाजी राजे नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी, अन्यायाविरुद्ध व स्वराज्यासाठी इंग्रजांविरुद्ध झुंज देऊन आपले प्राण अर्पण केले. ते मराठी जनतेच्या मनात आजही क्रांतिकारक आदर्श म्हणून जिवंत आहेत.
त्यांच्यासाठी ही कविता
🌾 उमाजी राजेंची शौर्यगाथा 🌾
होता शेतकऱ्यांचा राजा,
जनतेचा होता आधार,
उमाजी नाईक तो शूरवीर
अन्यायाशी सदैव लढणार
गनिमी कावा शास्त्राने
इंग्रजांच्या छातीत धडकी भरली
गावकऱ्यांच्या हक्कासाठी
इंग्रजी सिपाईवर झडप घेतली
उमाजीची पसरली कीर्ती
इंग्रजाची डोकेदुखी वाढली
मग केला जालीम उपाय
लाखोची बक्षीस जाहीर केली
काही लोकांना झाला लोभ
उमाजीचा विसरला त्यांनी त्याग
राहण्याचा सांगून ठावठिकांना
पकडून दिले उमाजी नाईकाना
असा विश्वासघात त्यांचा झाला
पण ते झुकले नाही कधी
त्या फाशीच्या दोरीवरही
झळकली त्याची जिद्दी
आजही संपूर्ण महाराष्ट्रात
गायली जाते त्यांची गाथा,
उमाजी राजे नाईक म्हणजे
आपल्या स्वातंत्र्याचा प्रणेता
नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769
No comments:
Post a Comment