Monday, 2 February 2026

माहिती दिनविशेष - 03 फेब्रुवारी ( 03 February )

          नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 

मी नासा येवतीकर, आपल्यासाठी घेऊन आलोय दिनविशेष माहिती. आजच्या कार्यक्रमात आपण आद्यक्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......


आजच्या या कार्यक्रमात आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महान, पण तुलनेने दुर्लक्षित अशा आद्य क्रांतिकारकाची आठवण करून घेणार आहोत. ते म्हणजे राजे उमाजी नाईक.
ब्रिटिश राजवटीत भारतातील सामान्य जनता अन्याय, जुलूम आणि करांच्या ओझ्याखाली दबली होती. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत होते. अशा परिस्थितीत जेव्हा अनेक जण भयभीत होते, तेव्हा राजे उमाजी नाईक यांनी अन्यायाविरुद्ध बंड पुकारले.
उमाजीराजे नाईक यांचा जन्म रामोशी - बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी नाईक खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर येथे झाला. वडील दादोजी नाईक खोमणे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते. उमाजीराजे जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरे आणि करारी होते. राजे उमाजी नाईक यांचे गुरू त्यांचे वडीलच होते. 
ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून होणारा अन्याय पाहून उमाजी नाईक यांनी सशस्त्र लढ्याचा मार्ग स्वीकारला. सह्याद्रीच्या दुर्गम भागातून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह इंग्रजांच्या छावण्यांवर हल्ले केले. सरकारी खजिना लुटून तो गरीब आणि पीडित जनतेत वाटला. त्यामुळे सामान्य लोक त्यांना आपला रक्षक मानू लागले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानायचे असे एका इंग्रज अधिकाऱ्यांने नमूद केले आहे.
इंग्रजांसाठी उमाजी नाईक मोठे आव्हान बनले. त्यांना पकडण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात बक्षिसे जाहीर केली. तरीही अनेक वर्षे उमाजी नाईक इंग्रजांच्या हाती लागले नाहीत. त्यांच्या धैर्यामुळे आणि डावपेचांमुळे इंग्रज त्यांना “डोंगरातील वाघ” असे संबोधू लागले.
परंतु दुर्दैवाने शेवटी त्यांचे दोन साथीदार फितुर झाल्यामुळे उमाजी नाईक यांना अटक झाली. त्यांच्यावर खटला चालवून ३ फेब्रुवारी १८३२ साली पुणे येथे त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. शरीर जरी संपले, तरी त्यांच्या विचारांचा आणि लढ्याचा अंत कधीच झाला नाही.
राजे उमाजी नाईक यांचे बलिदान हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व आहे. त्यांनी दिलेला लढा हा केवळ इंग्रजांविरुद्ध नव्हता, तर अन्याय, शोषण आणि गुलामगिरीविरुद्ध होता.
आजच्या पिढीने त्यांच्या जीवनातून धैर्य, स्वाभिमान, देशप्रेम आणि सामाजिक न्यायाची शिकवण घ्यावी. आज त्यांची पुण्यतिथी अशा महान व्यक्तिमत्त्वांचे स्मरण करणे, हीच त्यांच्या कार्याला खरी मानवंदना ठरेल.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - उमाजीराजे नाईक यांचा जन्म कोणत्या समाजात झाला ?
बरोबर उत्तर आहे, रामोशी - बेरड समाजात उमाजीराजे नाईक यांचा जन्म झाला.

दुसरा प्रश्न - राजे उमाजी नाईक यांचे गुरू कोण होते ?
बरोबर उत्तर आहे, त्यांचे वडील दादोजी नाईक हे राजे उमाजी नाईक यांचे गुरू होते. 

तिसरा प्रश्न - राजे उमाजी नाईक कोणाला आदर्श मानायचे ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांना उमाजी नाईक आदर्श मानायचे.

चौथा प्रश्न - उमाजी नाईक यांचे वडील कोणत्या किल्याचे वतनदार होते ?
बरोबर उत्तर आहे, उमाजी नाईक यांचे वडील पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - उमाजी नाईक यांना कोठे फाशी देण्यात आली ?
बरोबर उत्तर आहे - पुणे येथे उमाजी नाईक यांना फाशी देण्यात आली.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

No comments:

Post a Comment

दिनविशेष माहिती - 11 फेब्रुवारी ( Swami Dayanand Sarswati )

         नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !  मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्र...