नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
कुसुमाग्रज
कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक अजरामर कवी, नाटककार व साहित्यिक होते. त्यांचे खरे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे होते. मराठी काव्य आणि नाटक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या लेखनातून देशप्रेम, मानवतावाद, स्वातंत्र्याची ओढ आणि सामाजिक जाणीव व्यक्त होते.
कुसुमाग्रज यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे बालपण नाशिक येथे गेले. लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड होती. शिक्षण घेत असतानाच त्यांनी लेखनास सुरुवात केली.
कुसुमाग्रजांनी कविता, नाटके, कथा, कादंबऱ्या अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केले. त्यांची काही प्रसिद्ध साहित्यकृती विशाखा काव्यसंग्रह, नटसम्राट प्रसिद्ध नाटक, हिमरेषा, आंधळा
त्यांच्या कवितांमध्ये स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि मानवतेचा संदेश दिसून येतो. विशाखा या काव्यसंग्रहामुळे ते विशेष प्रसिद्ध झाले. त्यांना तात्यासाहेब या नावानेही ओळखले जाते.
कुसुमाग्रज हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते सामाजिक जाणीव असलेले विचारवंत होते. त्यांनी समाजातील अन्याय, विषमता आणि अंधश्रद्धांविरुद्ध आवाज उठविला. त्यांच्या लेखनातून मानवतेचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश मिळतो.
त्यांना मराठी साहित्यातील सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार इ.स. १९८७ मध्ये प्राप्त झाला. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे ते दुसरे साहित्यिक होते. तसेच त्यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले.
कुसुमाग्रज यांचे निधन १० मार्च १९९९ रोजी झाले. ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी, 2013 रोजी घेण्यात आला.
कुसुमाग्रज हे मराठी साहित्याचे तेजस्वी नक्षत्र होते. त्यांच्या लेखनातून समाजाला प्रेरणा, दिशा आणि जागृती मिळाली. मराठी भाषेचा गौरव वाढविण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे.
आज मराठी भाषा गौरव दिन त्यानिमित्ताने सर्वाना खूप खूप शुभेच्छा आणि कवी कुसुमाग्रज यांना विनम्र अभिवादन 🙏
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - कुसुमाग्रज खरे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, कुसुमाग्रज खरे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे होते.
दुसरा प्रश्न - कुसुमाग्रज लिखित प्रसिद्ध नाटकाचे नाव सांगा.
बरोबर उत्तर आहे, कुसुमाग्रज लिखित प्रसिद्ध नाटकाचे नाव आहे नटसम्राट
तिसरा प्रश्न - कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?
बरोबर उत्तर आहे, कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
चौथा प्रश्न - कुसुमाग्रज यांना कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले ?
बरोबर उत्तर आहे, सन १९८७ मध्ये कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले.
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला ?
बरोबर उत्तर आहे - कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment