नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण छत्रपती राजाराम महाराज यांच्या विषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
छत्रपती राजाराम महाराज
छत्रपती राजाराम हे मराठा साम्राज्याचे पराक्रमी व धैर्यवान शासक होते. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धाकटे चिरंजीव होते. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर झाला. आईचे नाव सोयराबाई होते. लहानपणापासूनच त्यांना शौर्य, प्रशासन आणि युद्धकौशल्य यांचे शिक्षण देण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कठीण परिस्थितीत मराठ्यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी राजाराम महाराज यांच्याकडे आली. अत्यंत कठीण परिस्थितीत राजाराम महाराजांनी राज्याची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी त्यांचे वय अवघे १९ वर्षे होते. त्यांनी अत्यंत धैर्याने आणि संयमाने मोगलांविरुद्ध लढा सुरू ठेवला.
औरंगजेबाच्या सैन्याचा वाढता दबाव पाहता राजाराम महाराजांनी महाराष्ट्र सोडून तामिळनाडूमधील जिंजी (गिंजी) किल्ल्यावर आश्रय घेतला. तेथूनच त्यांनी मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली आणि मराठा सरदारांच्या मदतीने गनिमी काव्याच्या पद्धतीने मोगलांविरुद्ध संघर्ष चालू ठेवला. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांसारख्या पराक्रमी सरदारांनी त्यांच्या नेतृत्वाखाली मोठी कामगिरी बजावली.
राजाराम महाराजांचे राज्यकारभाराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. त्यांचे नेतृत्व, संयम आणि चिकाटी यामुळे मराठा साम्राज्य टिकून राहिले. त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनीही पुढे मोठ्या धैर्याने राज्यकारभार सांभाळला.
छत्रपती राजाराम यांचे २ मार्च १७०० रोजी सिंहगड येथे निधन झाले. त्यांचे आयुष्य जरी अल्प होते, तरी त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. मराठा साम्राज्य टिकवून ठेवण्यात त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या संघर्षामुळेच पुढे मराठा साम्राज्य अधिक बळकट झाले. त्यांच्या कार्यामुळे इतिहासात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - छत्रपती राजाराम हे कोणाचे चिरंजीव होते ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती राजाराम हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिरंजीव होते
दुसरा प्रश्न - छत्रपती राजाराम यांच्या आईचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती राजाराम यांच्या आईचे नाव सोयराबाई होते.
तिसरा प्रश्न - छत्रपती राजाराम यांच्या पत्नीचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती राजाराम यांच्या पत्नीचे नाव महाराणी ताराबाई असे होते.
चौथा प्रश्न - राज्याची सूत्रे हाती घेतली त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज यांचे वय किती होते ?
बरोबर उत्तर आहे, वयाच्या 19 व्या वर्षी छत्रपती राजाराम महाराज यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली.
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - छत्रपती राजाराम महाराज यांचे निधन कोठे झाले ?
बरोबर उत्तर आहे - सिंहगडावर दिनांक २ मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम महाराज यांचे निधन झाले.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment