नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
मुलांनो, तुम्हांला सर्वात जास्त कोणता खेळ आवडतो, सांगा पाहू......
हो... मला पण माहित आहे, तुम्हांला सर्वात जास्त क्रिकेट हा खेळ आवडतो.
तर आजच्या कार्यक्रमात आपण क्रिकेटचा बादशहा म्हणजे सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या विषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
सर डोनाल्ड ब्रॅडमन
सर डोनाल्ड ब्रॅडमन हे क्रिकेट जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक मानले जातात. क्रिकेटच्या इतिहासात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांच्या फलंदाजीची सरासरी आजही एक विक्रम मानली जाते.
सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचा जन्म २७ ऑगस्ट १९०८ रोजी ऑस्ट्रेलियातील कुटामुंड्रा येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची आवड होती. त्यांनी भिंतीवर चेंडू मारून त्यावर सराव करत आपल्या फलंदाजी विकसित केली.
ब्रॅडमन यांनी १९२८ साली ऑस्ट्रेलिया संघाकडून कसोटीत पदार्पण केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत ५२ कसोटी सामने खेळले आणि ६९९६ धावा केल्या. त्यांची कसोटी फलंदाजीची सरासरी ९९.९४ होती, जी आजपर्यंत कोणालाही गाठता आलेली नाही. कसोटी सामन्यातील त्यांची ३३४ ही सर्वोच्च धावसंख्या होती.
१९३० सालच्या इंग्लंड दौऱ्यात त्यांनी एका वर्षात ९७४ धावा करून विक्रम प्रस्थापित केला. त्यावेळी त्यांची खेळी संपूर्ण जगभर गाजली. त्यांना त्यांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे “द डॉन” म्हणून ओळखले जाऊ लागले.
१९४९ साली त्यांना “नाईट” हा किताब देण्यात आला, त्यामुळे ते “सर डोनाल्ड ब्रॅडमन” म्हणून ओळखले जाऊ लागले. ते ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे कर्णधारही होते. क्रिकेटमधील शिस्त, चिकाटी आणि उत्कृष्ट तंत्र यासाठी ते आदर्श मानले जातात. १९५८ साली त्यांनी क्रिकेट खेळाची शास्त्रोक्त माहिती सांगणारा 'दि आर्ट ऑफ क्रिकेट' नावाचे पुस्तक लिहिले.
सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचे २५ फेब्रुवारी २००१ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वाने एक महान खेळाडू गमावला.
सर डोनाल्ड ब्रॅडमन हे केवळ महान फलंदाज नव्हते, तर ते चिकाटी, परिश्रम आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक होते. त्यांनी क्रिकेट इतिहासात अनेक विक्रम केले आहेत. म्हणूनच त्यांना “क्रिकेटचा बादशहा” म्हणून ओळखले जाते.
आज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - “क्रिकेटचा बादशहा” म्हणून कोणाला ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, सर डोनाल्ड ब्रॅडमन यांना “क्रिकेटचा बादशहा” म्हणून ओळखले जाते.
दुसरा प्रश्न - सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी आपल्या कारकीर्दीत किती कसोटी सामने खेळले ?
बरोबर उत्तर आहे, सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी आपल्या कारकीर्दीत ५२ कसोटी सामने खेळले
तिसरा प्रश्न - सर डोनाल्ड ब्रॅडमन कोणत्या संघाकडून खेळत होते ?
बरोबर उत्तर आहे, सर डोनाल्ड ब्रॅडमन ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळत होते
चौथा प्रश्न - सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव सांगा.
बरोबर उत्तर आहे, दि आर्ट ऑफ क्रिकेट हे पुस्तक सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी लिहिले आहे.
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - सर डोनाल्ड ब्रॅडमन यांची कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या किती होती ?
बरोबर उत्तर आहे - सर डोनाल्ड ब्रॅडमन यांची कसोटी सामन्यातील त्यांची ३३४ ही सर्वोच्च धावसंख्या होती.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment