विशाल आणि गीता यांच्या संघर्षमय जीवनाची भावस्पर्शी दीर्घकथा
" पायगुण "
कथेचे दहा भाग आणि त्यांचे शीर्षक
१ संघर्षाच्या वाटेवरचा विशाल
२ स्वप्नांच्या शोधात
३ संसाराची नवी सुरुवात
४ नात्यांमधील दुरावा
५ सुखाच्या शोधातली पायपीट
६ अपूर्ण स्वप्नांची वेदना
७ एका चिमुकलीची चाहूल
८ आगमन लक्ष्मीचे
९ बदललेले दिवस, बदललेले नशीब
१० पायगुण : आनंदाची नवी पहाट
•••••••••••••••••^•••••••••••••••••••
भाग पहिला : संघर्षाच्या वाटेवरचा विशाल
माणसाचे आयुष्य म्हणजे एखाद्या नदीचा प्रवास. कधी शांतपणे वाहणारे पाणी, तर कधी खडकांवर आदळणाऱ्या लाटा. कधी हिरव्यागार काठांवरून आनंदाने धावणारा प्रवाह, तर कधी उन्हाने कोरड्या पडलेल्या पात्रातून वाट शोधणारी धडपड ! प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दुःखाचे असे अनेक ऋतू येत असतात. मात्र काही माणसे अशी असतात की, कितीही संकटे आली तरी चेहऱ्यावरील हास्य हरवू देत नाहीत. आपले धैर्य विचलित होऊ देत नाहीत. विशाल त्यापैकीच एक होता.
नावाप्रमाणेच त्याचे मनही विशाल होते. चाळिशीच्या उंबरठ्यावर असलेला विशाल एका सरकारी कार्यालयात नोकरीला होता. अंगात साधेपणा, बोलण्यात गोडवा आणि वागण्यात माणुसकी हे त्याचे वैशिष्ट्य होते. कोणाला काही अडचण आली की, मदतीसाठी सर्वप्रथम पुढे होणारा माणूस म्हणजे विशाल. स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात त्याला समाधान मिळत असे. त्याच्या मित्रमंडळींमध्ये एक वाक्य नेहमी ऐकायला मिळायचे.
"विशाल, अरे तू स्वतःसाठी कधी जगणार आहेस ?"
त्यावर तो नेहमी हसत उत्तर द्यायचा,
"अरे, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवता आलं ना, की आपलं जगणं सार्थकी लागलं असं समजायचं !"
पण या हसऱ्या चेहऱ्यामागे संघर्षाचा मोठा इतिहास दडलेला होता.
विशालचे बालपण फार काही सुखाचे नव्हते. घरची परिस्थिती साधारण होती. वडील स्वाभिमानी व कष्टाळू होते, पण मिळणारे उत्पन्न कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी पुरेसे नव्हते. आई घर सांभाळत असे. घरात आर्थिक चणचण असली तरी संस्कारांची श्रीमंती भरपूर होती. विशाल देखील स्वाभिमानी होता.
एकदा शाळेची फी भरण्यासाठी विशालकडे पैसे नव्हते. शिक्षकांनी फी भरण्याची आठवण करून दिली तेव्हा तो शांतपणे खाली मान घालून उभा राहिला.
"काय झालं विशाल ? फी भरली नाहीस अजून ?"
"सर, दोन दिवसांत भरतो."
"पण दोन दिवसांत नक्की भरशील ना ?"
"हो सर !"
शाळेतून घरी आल्यावर त्याने आईला विचारले,
"आई, माझी शाळेची फी कधी भरणार ?"
आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
"बाळा, थोडे दिवस थांब. तुझे बाबा पैसे जमवण्याचा प्रयत्न करत आहेत."
"आई, मी शाळेत जाणं बंद करू का ? मग फीचा प्रश्नच राहणार नाही."
हे ऐकताच आईच्या डोळ्यांत पाणी आले.
"असं पुन्हा कधी बोलू नकोस. आम्ही उपाशी राहू, पण तुला शिकवू. तू फक्त मन लावून अभ्यास कर."
आईचे ते शब्द विशालच्या मनावर कायमचे कोरले गेले. सुट्टीच्या दिवशी तो ही काम करू लागला आणि बाबाच्या कामात मदत करू लागला.
त्याने शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले. कधी मित्रांची जुनी पुस्तके वापरली, तर कधी रस्त्यावरील दिव्याखाली बसून अभ्यास केला. परिस्थितीने त्याची अनेकदा परीक्षा घेतली, पण त्याने हार मानली नाही.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळविण्याचे स्वप्न त्याने पाहिले. सरकारी नोकरी मिळविणे सोपे नव्हते. स्पर्धा परीक्षा, अर्ज, प्रवास, अभ्यास आणि अपयशाचा सामना असे अनेक टप्पे त्याच्या वाट्याला आले.
कधी परीक्षा चांगली जाऊनही निकाल निराशाजनक लागायचा. कधी मुलाखतीपर्यंत पोहोचूनही निवड व्हायची नाही. एकदा अपयशाने खचून तो घरी आला. वडील अंगणात बसले होते.
"काय झालं रे ? निकाल लागला का ?"
विशालने मान खाली घातली.
"नाही बाबा. यावेळेसही नाही."
वडिलांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
"बाळा, अपयश म्हणजे आयुष्य संपलं असं नसतं. प्रयत्न सोडले की मात्र माणूस खऱ्या अर्थाने हरतो."
त्या रात्री विशाल बराच वेळ जागाच होता. आई-वडिलांचे कष्ट त्याच्या डोळ्यांसमोर तरळत होते. मनाशी एकच निर्धार केला, काहीही झाले तरी हार मानायची नाही. प्रयत्न करत राहायचे.
सरकारी नोकरीसाठी थेट मुलाखतीतून निवड करण्यात येणार अशी जाहिरात वाचली आणि ती मुलाखत त्याने दिली. पूर्वानुभव आणि अभ्यासाच्या बळावर ती मुलाखत खूप चांगली झाली होती. त्याठिकाणी त्याची निवड होईल असे त्याला वाटलं नाही. पण अखेर त्याच्या नशिबाने मेहनतीला यश आले. सरकारी नोकरीचे नियुक्तिपत्र हातात पडले. तो दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवस होता. त्याने सर्वप्रथम आई-वडिलांच्या चरणी ते पत्र ठेवले.
"आई, बाबा, आज तुमच्या कष्टांचे चीज झाले !"
आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. वडिलांनी त्याला घट्ट जवळ घेतले.
"आज तू आम्हाला श्रीमंत केलंस रे !"
त्या दिवशी घरात गोडधोड झाले. शेजाऱ्यांना पेढे वाटले गेले. अनेक दिवसांनी त्या घरात आनंदाचा उत्सव साजरा होत होता. पण विशालला कुठे माहीत होते की, आयुष्याची खरी परीक्षा अजून बाकी आहे !
नोकरी लागली, संसार थाटला, तरी माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्न सुटतोच असे नाही. काही प्रश्न काळाबरोबर अधिक गुंतागुंतीचे होत जातात.
विशालच्या आयुष्यातही आता एका नव्या व्यक्तीचे आगमन होणार होते. तिचे नाव होते गीता !
गीता आणि विशाल यांच्या भेटीने एका नव्या संसाराची सुरुवात होणार होती. दोघांच्याही मनात असंख्य स्वप्ने होती. मात्र त्या स्वप्नांच्या वाटेवर कोणती वादळे त्यांची वाट पाहत होती, याची कल्पना त्यांना नव्हती. कारण आयुष्याच्या पुस्तकातील पुढचे पान आता उघडणार होते... आणि त्या पानावर लिहिली जाणार होती एका नव्या संघर्षाची कहाणी !
क्रमशः...
लेखक : नासा येवतीकर, धर्माबाद
पहिला भागाविषयी आपल्या प्रतिक्रिया comment मध्ये जरूर कळवावे.
•••••••••••••••••^•••••••••••••••••••
दुसरा भाग – स्वप्नांच्या शोधात आपल्या भेटीला लवकरच येईल.
No comments:
Post a Comment