नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आजच्या कार्यक्रमात आपण जागतिक नागरी संरक्षण दिन यां विषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
🌍 World Civil Defence Day
जगभरात दरवर्षी १ मार्च रोजी ‘जागतिक नागरी संरक्षण दिन’ साजरा केला जातो. नैसर्गिक आपत्ती, अपघात, युद्धस्थिती किंवा अन्य संकटांच्या काळात नागरिकांचे संरक्षण करणे आणि त्यांना सुरक्षिततेबाबत जागरूक करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
हा दिवस International Civil Defence Organization (ICDO) या संस्थेच्या पुढाकाराने साजरा केला जातो. १ मार्च १९७२ रोजी या संस्थेची अधिकृत स्थापना झाली. त्यानिमित्ताने हा दिवस ‘जागतिक नागरी संरक्षण दिन’ म्हणून घोषित करण्यात आला.
नागरी संरक्षण म्हणजे आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे जीवित व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी केलेली तयारी व उपाययोजना. यात भूकंप, पूर, आगी, चक्रीवादळ, महामारी, दहशतवादी हल्ले इत्यादी संकटांचा समावेश होतो.
या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे, नागरिकांना प्रथमोपचार व सुरक्षिततेचे प्रशिक्षण देणे, आपत्तीच्या काळात स्वयंसेवकांचे योगदान अधोरेखित करणे, शाळा, महाविद्यालये व कार्यालयांत सुरक्षा सराव (Mock Drill) आयोजित करणे.
भारतात नागरी संरक्षण कार्य गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली चालते. विविध राज्यांमध्ये स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाते. आपत्तीच्या वेळी बचावकार्य, प्रथमोपचार, अन्न-वाटप, लोकांना सुरक्षित स्थळी हलविणे अशी महत्त्वाची कामे केली जातात. राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाईन 112 अशी आहे. रस्त्यावर अपघात झाल्यास 108 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलाविता येते.
विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे मूलभूत ज्ञान घेणे, शाळेतील सरावात सहभागी होणे आणि संकटाच्या काळात शांतता राखणे आवश्यक आहे. जागरूक नागरिक हा सुरक्षित समाजाचा पाया असतो.
जागतिक नागरी संरक्षण दिन आपल्याला सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देतो. संकटे कधीही येऊ शकतात, परंतु योग्य प्रशिक्षण, सज्जता आणि सामूहिक प्रयत्न यांच्या बळावर आपण त्यांचा सामना करू शकतो. म्हणूनच या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - जगभरात दरवर्षी १ मार्च हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?
बरोबर उत्तर आहे, जगभरात दरवर्षी १ मार्च रोजी ‘जागतिक नागरी संरक्षण दिन’ साजरा केला जातो.
दुसरा प्रश्न - ICDO चे full form सांगा.
बरोबर उत्तर आहे, International Civil Defence Organization
तिसरा प्रश्न - रस्त्यावर अपघात झाल्यास कोणत्या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावे ?
बरोबर उत्तर आहे, रस्त्यावर अपघात झाल्यास 108 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावे.
चौथा प्रश्न - ICDO या संस्थेची अधिकृत स्थापना केव्हा झाली ?
बरोबर उत्तर आहे, १ मार्च १९७२ रोजी ICDO या संस्थेची अधिकृत स्थापना झाली.
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक काय आहे ?
बरोबर उत्तर आहे - राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाईन क्रं. 112 अशी आहे.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769