Sunday, 15 February 2026

दिनविशेष माहिती - 19 फेब्रुवारी ( Chatrapti Shivaji Maharaj )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक : छत्रपती शिवाजी महाराज
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती तर आईचे नाव जिजाऊ होते. राजमाता जिजाऊंनी त्यांना रामायण-महाभारताच्या कथा सांगून स्वाभिमान, धैर्य आणि धर्मनिष्ठा यांचे संस्कार दिले. दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी युद्धकला आणि प्रशासनकौशल्य आत्मसात केले. शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचे कुलदैवत तुळजाभवानी होते.
त्या काळात भारतावर परकीय सत्तेचे वर्चस्व होते. सामान्य जनतेवर अन्याय होत होता. अशा वेळी शिवाजी महाराजांनी “हिंदवी स्वराज्य” स्थापण्याचा निर्धार केला. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी पहिला किल्ला जिंकला तो म्हणजे तोरणा. छत्रपती शिवाजी महाराज यांना तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, हंबीरराव मोहिते, नेताजी पालकर, येसाजी कंक, जीवा महाला, कान्होजी जेधे, शिवा काशीद असे अनेक जीवाला जीव देणारे मावळे मिळाले. त्यामुळे रायगड, प्रतापगड, पुरंदर, सिंहगड, असे अनेक किल्ले जिंकले. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजानी बलाढ्य अफजलखानाचा वध केला. गनिमी काव्याच्या तंत्राने बलाढ्य शत्रूंवर विजय मिळवला. शिवाजी महाराज हे केवळ एक शूर योद्धे नव्हते, तर ते आदर्श राज्यकर्ते आणि लोकनायक होते. 
महाराजांचे राज्य हे लोकाभिमुख होते. त्यांनी शिस्तबद्ध लष्कर, सक्षम आरमार आणि न्यायप्रिय प्रशासन उभे केले. स्त्रियांचा सन्मान राखणे आणि सर्व धर्मांचा आदर करणे हे त्यांच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट्य होते. ६ जून १६७४ रोजी रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांना "जाणता राजा" म्हणून ओळखले जाते. स्वराज्याचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी ८ मंत्र्यांचे अष्टप्रधान मंडळ तयार केले. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यांचा जन्मदिवस सर्वत्र शिवजयंती म्हणून साजरी केली जाते.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिनांक ३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर निधन झाले. 
मुलांनो, शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला ध्येय, स्वाभिमान आणि संघटनशक्ती यांचे महत्त्व शिकवते. त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करून आपणही प्रामाणिक, धैर्यवान आणि राष्ट्रनिष्ठ नागरिक बनूया.

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्यावर झाला ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्यावर झाला ?

दुसरा प्रश्न - छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या पहिल्या किल्याचे नाव काय ? 
बरोबर उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या पहिल्या किल्याचे नाव तोरणा किल्ला.

तिसरा प्रश्न - छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी कोणाचा वध केला ? 
बरोबर उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी बलाढ्य अफजलखानाचा वध केला ? 

चौथा प्रश्न - "जाणता राजा" म्हणून कोणास ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांना "जाणता राजा" म्हणून ओळखले जाते.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजानी पारशी भाषेऐवजी कोणत्या भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले ?
बरोबर उत्तर आहे - स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजानी पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

No comments:

Post a Comment

दिनविशेष माहिती - 19 फेब्रुवारी ( Chatrapti Shivaji Maharaj )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !   मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण ...