नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन याविषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
आज २१ फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्या भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे.
१९५२ साली बांगलादेशातील विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेसाठी आंदोलन केले आणि बलिदान दिले. त्यांच्या स्मरणार्थ १९९९ साली युनेस्कोने २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला.
मातृभाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आपल्या भावना, विचार आणि परंपरा व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे मातृभाषा. संशोधनानुसार, मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांची आकलनशक्ती अधिक वाढते. आपण इंग्रजी किंवा इतर भाषा शिकाव्यात; पण त्याचबरोबर आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणे आणि तिचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे.
भाषावैज्ञानिक संस्थेच्या आकडेवारीनुसार जगात सुमारे ७,००० भाषा बोलल्या जातात. जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे मँडरिन चिनी भाषा आहे तर इंग्रजी ही जगभरात सर्वाधिक देशांमध्ये वापरली जाणारी द्वितीय क्रमांकाची भाषा आहे. तर भारतात १,६०० पेक्षा अधिक भाषा आणि उपभाषा बोलल्या जातात. भारतीय राज्यघटनेने २२ अधिकृत भाषा मान्य केल्या आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बंगाली आणि तिसऱ्या क्रमांकावर आपली मराठी भाषा बोलली जाते.
चला, आजच्या दिवशी आपण आपल्या मातृभाषेचा सन्मान राखण्याचा आणि तिचे संवर्धन करण्याचा संकल्प करूया.
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - युनेस्कोने २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून कोणत्या वर्षी घोषित केला ?
बरोबर उत्तर आहे, १९९९ साली युनेस्कोने २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला.
दुसरा प्रश्न - जगात सुमारे किती भाषा बोलल्या जातात.
बरोबर उत्तर आहे, जगात सुमारे ७,००० भाषा बोलल्या जातात.
तिसरा प्रश्न - जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे ?
बरोबर उत्तर आहे, जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे मँडरिन चिनी भाषा
चौथा प्रश्न - भारतीय राज्यघटनेने किती भाषा अधिकृत मान्य केल्या आहेत ?
बरोबर उत्तर आहे, भारतीय राज्यघटनेने २२ भाषा अधिकृत मान्य केल्या आहेत
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - २०११ च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे ?
बरोबर उत्तर आहे - २०११ च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी आहे.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment