नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण कॉ. गोविंद पानसरे यांच्या विषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
कॉ. गोविंद पानसरे
कॉ. गोविंद पानसरे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजवादी विचारवंत, लेखक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९३३ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हार या गावी गरीब कुटुंबात झाला. गरीब कष्टकऱ्यांच्या परिवारात ते वाढले. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते नगरपालिकेत शिपाई म्हणून आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात प्रोफेसर म्हणून ही काम केले. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि वकिली देखील केली. अनेक वर्षे कोल्हापुरातील वकीलांच्या संघटनेचे ते अध्यक्ष होते.
कॉ. पानसरे शालेय जीवनापासूनच सामाजिक चळवळींकडे आकर्षित झाले होते. सुरुवातीला राष्ट्र सेवा दल व त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. दहा वर्षांसाठी ते भाकपचे महाराष्ट्र सेक्रेटरी होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ व गोवा मुक्ती चळवळीत ते सहभागी होते. तडजोड न करता समाजातील सर्वांत जास्त शोषित लोकांच्या हक्कांसाठी लढणारे ते कार्यकर्ता होते. ते कष्टकऱ्यांच्या शेकडो संघर्षांमध्ये सहभागी झाले व अनेकांचे नेतृत्वदेखील केले, विशेषतः असंघटित क्षेत्रांतील कामगार, शेतमजूर, घरकामगार, ऑटोरिक्षा युनियन, दूध उत्पादक, झोपडपट्टी रहिवासी, इत्यादी. कोल्हापुरमधील टोलविरोधी आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते या आंदोलनात अग्रभागी होते.
गोविंद पानसरे यांनी अंधश्रद्धा, जातीयवाद आणि सामाजिक विषमता यांविरोधात ठाम भूमिका घेतली. ते प्रभावी वक्ते होते. त्यांच्या भाषणांतून सामाजिक समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानिक मूल्ये यांचा प्रचार केला जात असे.
त्यांचे सर्वात गाजलेले प्रसिद्ध पुस्तक म्हणजे शिवाजी कोण होता ? या पुस्तकात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लोककल्याणकारी आणि धर्मनिरपेक्ष दृष्टीकोनातून मांडले आहे. हे पुस्तक मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आणि अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले. हे पुस्तक आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे चे खरे दर्शन घडवते.
दिनांक १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी आपल्या पत्नीसमवेत मॉर्निंग वॉकसाठी गेले असता, काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर काही दिवस उपचार सुरू असताना दिनांक २० फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात मोठी शोककळा पसरली.
कॉ. गोविंद पानसरे हे प्रखर बुद्धीचे, तत्त्वनिष्ठ आणि समाजहितासाठी झटणारे नेते होते. त्यांच्या कार्यातून समाजात विचारस्वातंत्र्य, समता आणि न्याय यांची जाणीव निर्माण झाली. आजही त्यांचे कार्य आणि विचार समाजाला प्रेरणा देत आहेत. २००२ मध्ये कोल्हापूर महापालिकेने त्यांना कोल्हापूर भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले.
आज कॉ. गोविंद पानसरे यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला सादर प्रणाम !
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - गोविंद पानसरे प्रोफेसर म्हणून कोठे काम केले ?
बरोबर उत्तर आहे, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात गोविंद पानसरे हे प्रोफेसर म्हणून काम केले
दुसरा प्रश्न - गोविंद पानसरे यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते ?
बरोबर उत्तर आहे, शिवाजी कोण होता ? हे गोविंद पानसरे यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे.
तिसरा प्रश्न - कोल्हापूर महापालिकेने त्यांना कोल्हापूर भूषण पुरस्कार कोणत्या वर्षी दिले ?
बरोबर उत्तर आहे, २००२ मध्ये कोल्हापूर महापालिकेने त्यांना कोल्हापूर भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले.
चौथा प्रश्न - गोविंद पानसरे हे कोणत्या पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते ?
बरोबर उत्तर आहे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे गोविंद पानसरे हे सक्रिय कार्यकर्ते होते.
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - गोविंद पानसरे यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - गोविंद पानसरे यांचे दिनांक 20 फेब्रुवारी 2015 रोजी मुंबईत निधन झाले
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment