नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या विषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
वासुदेव बळवंत फडके
ब्रिटिश सरकार विरुद्ध सर्वात पहिल्यांदा आंदोलन करणारे आणि भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटविणारे आद्य क्रांतीकारक म्हणजे वासुदेव बळवंत फडके.
त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८४५ रोजी रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावी झाला. लहानपणापासूनच कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवार बाजीचे प्रशिक्षण मिळाले. त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना प्रबळ होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला ते रेल्वे विभागात नोकरीस होते, नंतर ते इंग्रजाच्या लष्करी विभागात कारकून पदावर नियुक्त झाले. परंतु इंग्रज सरकारच्या अन्यायकारक कारभारामुळे त्यांना तीव्र वेदना होत होत्या. भाकरीसाठी चाकरी करणार नाही असे म्हणत त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि इंग्रज सरकारच्या विरोधात जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली. विशेषतः १८७० च्या दशकात भयंकर दुष्काळ पडला. त्यात हजारो लोक उपासमारीने मृत्यूमुखी पडले. शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती, तरीही इंग्रज सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ही परिस्थिती पाहून वासुदेव फडके यांच्या मनात स्वराज्य स्थापनेची ज्वाला प्रज्वलित झाली.
वासुदेव फडके यांनी ठरवले की, अन्याय सहन करण्यापेक्षा त्याविरुद्ध लढा देणे आवश्यक आहे. त्यांनी शेतकरी, धनगर, कोळी आणि इतर वंचित समाजघटकांना एकत्र करून सशस्त्र पथक तयार केले. त्यांनी इंग्रजांच्या सरकारी खजिन्यांवर धाड टाकून मिळालेला पैसा गरजू लोकांसाठी वापरला. त्यांचा उद्देश वैयक्तिक लाभ नव्हता, तर भारताला परकीय सत्तेतून मुक्त करणे हा होता. म्हणूनच त्यांना भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक म्हटले जाते. वासुदेव फडके हे दत्तात्रयाचे उपासक होते. त्यांनी दत्त महात्म्य नावाचा सात हजार ओव्याचा ग्रंथ लिहिला.
ब्रिटिश सरकार त्यांच्या कार्यामुळे घाबरले आणि १८७९ साली त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला चालवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना अरेबिया येथील एडन येथील कारागृहात पाठविण्यात आले. तेथेही त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. कठोर कारावास आणि हालअपेष्टा सहन करत असतानाच १७ फेब्रुवारी १८८३ रोजी त्यांचे निधन झाले. १९८४ साली भारतीय टपाल खात्याने वासुदेव फडके यांचे चित्र असलेले ५० पैश्याचे तिकीट प्रकाशित केले.
फडके यांचे जीवन आपल्याला शिकवते की, देशासाठी त्याग आणि धैर्य आवश्यक असते. त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी आयुष्य अर्पण केले. त्यांच्या बलिदानामुळेच पुढील क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली आणि स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र झाला.
आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे जगत आहोत, ते अशा महान क्रांतिकारकांच्या त्यागामुळेच. चला, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपणही देशप्रेम, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांचा अंगीकार करूया.
आज वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम !
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - वासुदेव फडके यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, वासुदेव फडके रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावी वासुदेव फडके यांचा जन्म झाला.
दुसरा प्रश्न - वासुदेव फडके यांना काय म्हटले जाते ?
बरोबर उत्तर आहे, वासुदेव फडके यांना भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक म्हटले जाते.
तिसरा प्रश्न - वासुदेव फडके यांना ब्रिटिश सरकारने केव्हा अटक केली ?
बरोबर उत्तर आहे, १८७९ साली वासुदेव फडके यांना ब्रिटिश सरकारने अटक केली.
चौथा प्रश्न - अटक झाल्यानंतर वासुदेव फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवण्यात आले
बरोबर उत्तर आहे, अटक झाल्यानंतर वासुदेव फडके यांना एडन येथील कारागृहात ठेवण्यात आले
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - वासुदेव फडके यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - १७ फेब्रुवारी १८८३ रोजी वासुदेव फडके यांचे निधन झाले.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment