नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आजच्या कार्यक्रमात आपण मराठा साम्राज्याचे कर्तबगार आणि दूरदर्शी नेतृत्व असलेले श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांची माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
श्रीमंत थोरले माधवराव पेशवे
श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचा जन्म १६ फेब्रुवारी १७४५ रोजी झाला. ते नानासाहेब पेशवे यांचे पुत्र होते. पेशवे माधवराव पेशवे हे त्यांच्या उदारतेसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते गरिबांना पैसे, अन्न, कपडे आणि जमीन दान करायचे. त्यांच्याकडून दान घेण्यासाठी दूरदूरून लोक येत असत. त्यांच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नसे. प्रत्येकाला जे हवे होते ते नक्कीच मिळायचे.
१४ जानेवारी १७६१ रोजी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठा साम्राज्याची स्थिती अत्यंत बिकट झाली होती. राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळली होती आणि जनतेमध्ये निराशा पसरली होती. अशा कठीण वेळी, केवळ १६ वर्षांच्या वयात माधवरावांनी पेशव्यांची जबाबदारी स्वीकारली.
माधवरावांनी सर्वप्रथम प्रशासनात शिस्त आणली. त्यांनी महसूल व्यवस्था सुधारली, लष्कराची पुनर्रचना केली आणि सरदारांमध्ये एकोपा निर्माण केला. त्यांच्या पराक्रमामुळे आणि कुशल नेतृत्वामुळे मराठा साम्राज्याने पुन्हा उत्तर भारतात आपला प्रभाव निर्माण केला. १७६१ ते १७७२ पर्यंत म्हणजे अकरा वर्षे त्यांनी पेशवाई सांभाळली. या अकरा वर्षाच्या काळात त्यांनी मराठेशाहीचा सुवर्णकाळ पुन्हा आणला.
माधवराव पेशवे यांनी 'राक्षसभुवन'च्या लढाईत निजामावर विजय मिळवून मराठ्यांची ताकद दाखवून दिली. म्हैसूरच्या हैदरअलीचा वारंवार पराभव करून आपला वचक निर्माण केला.
त्यांच्या कारकिर्दीत न्याय, शिस्त आणि पारदर्शकता यांना महत्त्व होते. त्यांनी वैयक्तिक स्वार्थापेक्षा राज्यहिताला प्राधान्य दिले. ते कठोर शिस्तप्रिय होते आणि त्यांनी मराठी साम्राज्याला पुन्हा एकदा 'सर्वोच्च शक्ती' म्हणून उभे केले
थोरले माधवराव हे मराठी इतिहासातील 'छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचे' सर्वात कर्तबगार प्रशासक आणि मुत्सद्दी नेते मानले जातात.
दुर्दैवाने, पुणे जिल्ह्यातील थेऊर येथे १८ नोव्हेंबर १७७२ रोजी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी क्षयरोगाने त्यांचे निधन झाले, परंतु अल्पायुष्यात त्यांनी केलेले कार्य अजरामर आहे.
माधवराव पेशवे यांचे जीवन आपल्याला सांगते की, संकट कितीही मोठे असले तरी योग्य नेतृत्व, आत्मविश्वास आणि चिकाटी यामुळे परिस्थिती बदलता येते. चला, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपण कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि देशभक्त नागरिक बनण्याचा संकल्प करूया.
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - माधवराव पेशवे हे कोणाचे पुत्र होते ?
बरोबर उत्तर आहे, माधवराव पेशवे हे नानासाहेब पेशवे यांचे पुत्र होते.
दुसरा प्रश्न - माधवराव पेशवे यांनी कोणत्या वयात पेशव्यांची जबाबदारी स्वीकारली ?
बरोबर उत्तर आहे, १६ वर्षांच्या वयात माधवराव पेशवे यांनी पेशव्यांची जबाबदारी स्वीकारली.
तिसरा प्रश्न - माधवराव पेशवे यांनी कोणत्या लढाईत निजामचा पराभव केला ?
बरोबर उत्तर आहे, राक्षसभुवनच्या लढाईत माधवराव पेशवे यांनी निजामचा पराभव केला
चौथा प्रश्न - माधवराव पेशवे यांनी किती वर्षे पेशवाई सांभाळली ?
बरोबर उत्तर आहे, अकरा वर्षे माधवराव पेशवे यांनी पेशवाई सांभाळली
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - माधवराव पेशवे यांचे कोणत्या आजाराने निधन झाले ?
बरोबर उत्तर आहे - क्षयरोगाने माधवराव पेशवे यांचे निधन झाले.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment