Thursday, 12 November 2026

पायगुण कथा ( Story Paygun )


विशाल आणि गीता यांच्या संघर्षमय जीवनाची भावस्पर्शी दीर्घकथा 
                  " पायगुण "
कथेचे दहा भाग आणि त्यांचे शीर्षक

१ संघर्षाच्या वाटेवरचा विशाल
२ स्वप्नांच्या शोधात
३ संसाराची नवी सुरुवात
४ नात्यांमधील दुरावा
५ सुखाच्या शोधातली पायपीट
६ अपूर्ण स्वप्नांची वेदना
७ एका चिमुकलीची चाहूल
८ आगमन लक्ष्मीचे
९ बदललेले दिवस, बदललेले नशीब
१० पायगुण : आनंदाची नवी पहाट
•••••••••••••••••^•••••••••••••••••••
भाग पहिला : संघर्षाच्या वाटेवरचा विशाल

माणसाचे आयुष्य म्हणजे एखाद्या नदीचा प्रवास. कधी शांतपणे वाहणारे पाणी, तर कधी खडकांवर आदळणाऱ्या लाटा. कधी हिरव्यागार काठांवरून आनंदाने धावणारा प्रवाह, तर कधी उन्हाने कोरड्या पडलेल्या पात्रातून वाट शोधणारी धडपड ! प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दुःखाचे असे अनेक ऋतू येत असतात. मात्र काही माणसे अशी असतात की, कितीही संकटे आली तरी चेहऱ्यावरील हास्य हरवू देत नाहीत. आपले धैर्य विचलित होऊ देत नाहीत. विशाल त्यापैकीच एक होता.
नावाप्रमाणेच त्याचे मनही विशाल होते. चाळिशीच्या उंबरठ्यावर असलेला विशाल एका सरकारी कार्यालयात नोकरीला होता. अंगात साधेपणा, बोलण्यात गोडवा आणि वागण्यात माणुसकी हे त्याचे वैशिष्ट्य होते. कोणाला काही अडचण आली की, मदतीसाठी सर्वप्रथम पुढे होणारा माणूस म्हणजे विशाल. स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात त्याला समाधान मिळत असे. त्याच्या मित्रमंडळींमध्ये एक वाक्य नेहमी ऐकायला मिळायचे. 
"विशाल, अरे तू स्वतःसाठी कधी जगणार आहेस ?"
त्यावर तो नेहमी हसत उत्तर द्यायचा,
"अरे, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवता आलं ना, की आपलं जगणं सार्थकी लागलं असं समजायचं !"
पण या हसऱ्या चेहऱ्यामागे संघर्षाचा मोठा इतिहास दडलेला होता. 
विशालचे बालपण फार काही सुखाचे नव्हते. घरची परिस्थिती साधारण होती. वडील स्वाभिमानी व कष्टाळू होते, पण मिळणारे उत्पन्न कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी पुरेसे नव्हते. आई घर सांभाळत असे. घरात आर्थिक चणचण असली तरी संस्कारांची श्रीमंती भरपूर होती. विशाल देखील स्वाभिमानी होता. 
एकदा शाळेची फी भरण्यासाठी विशालकडे पैसे नव्हते. शिक्षकांनी फी भरण्याची आठवण करून दिली तेव्हा तो शांतपणे खाली मान घालून उभा राहिला.
"काय झालं विशाल ? फी भरली नाहीस अजून ?"
"सर, दोन दिवसांत भरतो."
"पण दोन दिवसांत नक्की भरशील ना ?"
"हो सर !"
शाळेतून घरी आल्यावर त्याने आईला विचारले,
"आई, माझी शाळेची फी कधी भरणार ?"
आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
"बाळा, थोडे दिवस थांब. तुझे बाबा पैसे जमवण्याचा प्रयत्न करत आहेत."
"आई, मी शाळेत जाणं बंद करू का ? मग फीचा प्रश्नच राहणार नाही."
हे ऐकताच आईच्या डोळ्यांत पाणी आले.
"असं पुन्हा कधी बोलू नकोस. आम्ही उपाशी राहू, पण तुला शिकवू. तू फक्त मन लावून अभ्यास कर."
आईचे ते शब्द विशालच्या मनावर कायमचे कोरले गेले. सुट्टीच्या दिवशी तो ही काम करू लागला आणि बाबाच्या कामात मदत करू लागला. 
त्याने शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले. कधी मित्रांची जुनी पुस्तके वापरली, तर कधी रस्त्यावरील दिव्याखाली बसून अभ्यास केला. परिस्थितीने त्याची अनेकदा परीक्षा घेतली, पण त्याने हार मानली नाही.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळविण्याचे स्वप्न त्याने पाहिले. सरकारी नोकरी मिळविणे सोपे नव्हते. स्पर्धा परीक्षा, अर्ज, प्रवास, अभ्यास आणि अपयशाचा सामना असे अनेक टप्पे त्याच्या वाट्याला आले.
कधी परीक्षा चांगली जाऊनही निकाल निराशाजनक लागायचा. कधी मुलाखतीपर्यंत पोहोचूनही निवड व्हायची नाही. एकदा अपयशाने खचून तो घरी आला. वडील अंगणात बसले होते.
"काय झालं रे ? निकाल लागला का ?"
विशालने मान खाली घातली.
"नाही बाबा. यावेळेसही नाही."
वडिलांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
"बाळा, अपयश म्हणजे आयुष्य संपलं असं नसतं. प्रयत्न सोडले की मात्र माणूस खऱ्या अर्थाने हरतो."
त्या रात्री विशाल बराच वेळ जागाच होता. आई-वडिलांचे कष्ट त्याच्या डोळ्यांसमोर तरळत होते. मनाशी एकच निर्धार केला, काहीही झाले तरी हार मानायची नाही. प्रयत्न करत राहायचे. 
सरकारी नोकरीसाठी थेट मुलाखतीतून निवड करण्यात येणार अशी जाहिरात वाचली आणि ती मुलाखत त्याने दिली. पूर्वानुभव आणि अभ्यासाच्या बळावर ती मुलाखत खूप चांगली झाली होती. त्याठिकाणी त्याची निवड होईल असे त्याला वाटलं नाही. पण अखेर त्याच्या नशिबाने मेहनतीला यश आले. सरकारी नोकरीचे नियुक्तिपत्र हातात पडले. तो दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवस होता. त्याने सर्वप्रथम आई-वडिलांच्या चरणी ते पत्र ठेवले.
"आई, बाबा, आज तुमच्या कष्टांचे चीज झाले !"
आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. वडिलांनी त्याला घट्ट जवळ घेतले.
"आज तू आम्हाला श्रीमंत केलंस रे !"
त्या दिवशी घरात गोडधोड झाले. शेजाऱ्यांना पेढे वाटले गेले. अनेक दिवसांनी त्या घरात आनंदाचा उत्सव साजरा होत होता. पण विशालला कुठे माहीत होते की, आयुष्याची खरी परीक्षा अजून बाकी आहे !
नोकरी लागली, संसार थाटला, तरी माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्न सुटतोच असे नाही. काही प्रश्न काळाबरोबर अधिक गुंतागुंतीचे होत जातात.
विशालच्या आयुष्यातही आता एका नव्या व्यक्तीचे आगमन होणार होते. तिचे नाव होते गीता ! 
गीता आणि विशाल यांच्या भेटीने एका नव्या संसाराची सुरुवात होणार होती. दोघांच्याही मनात असंख्य स्वप्ने होती. मात्र त्या स्वप्नांच्या वाटेवर कोणती वादळे त्यांची वाट पाहत होती, याची कल्पना त्यांना नव्हती. कारण आयुष्याच्या पुस्तकातील पुढचे पान आता उघडणार होते... आणि त्या पानावर लिहिली जाणार होती एका नव्या संघर्षाची कहाणी !
क्रमशः...
लेखक : नासा येवतीकर, धर्माबाद

पहिला भागाविषयी आपल्या प्रतिक्रिया comment मध्ये जरूर कळवावे. 
•••••••••••••••••^•••••••••••••••••••
दुसरा भाग – स्वप्नांच्या शोधात आपल्या भेटीला लवकरच येईल. 

Saturday, 7 November 2026

all about Teacher

शिक्षक काय शिकवतात ? विद्यार्थी काय शिकतात ? शितेवरून भाताची परीक्षा पाहणे योग्य आहे काय ? या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखातून देण्याचा एक प्रांजळ प्रयत्न ! आपण समजून घ्याल अशी अपेक्षा 


शिक्षकांना समजून घेऊ या ..........!
प्रत्येक दिवशी नवे काहीतरी शिकवणारा शिक्षक !

"शाळेत काय शिकविले जाते ?" किंवा " शाळेत शिक्षक काय शिकवतात? " हा प्रश्न वरकरणी अगदी साधा वाटतो. अनेकांच्या मते शाळेत मुलांना वाचायला, लिहायला, गणित करायला आणि परीक्षेत चांगले गुण मिळवायला शिकविले जाते. काही जणांना वाटते की शिक्षक रोज वर्गात येतात, पुस्तकातील धडा शिकवतात, गृहपाठ देतात आणि दिवस संपतो. पण खरोखरच शाळेचे विश्व एवढ्यापुरतेच मर्यादित आहे का? शाळेत रोज काय घडते, मुले रोज काय शिकतात आणि शिक्षक रोज कोणत्या नव्या अनुभवातून जातात, याचा विचार आपण कधी केला आहे का?

खरे तर शाळा म्हणजे केवळ चार भिंतींची इमारत नाही. शाळा म्हणजे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणारे संस्कारकेंद्र आहे. शाळेतील प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. काल जे शिकविले तेच आज शिकविले जाते असे नाही आणि आज जे शिकले तेच उद्या शिकायला मिळेल असेही नाही. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो. कधी पुस्तकातून ज्ञान मिळते, कधी शिक्षकांच्या अनुभवातून, कधी मित्रांच्या सहवासातून, तर कधी एखाद्या चुकीतूनही मोठी शिकवण मिळते.

शाळेतील प्रत्येक दिवस वेगळा असतो !
सकाळी शाळेची घंटा वाजते आणि एका नव्या दिवसाची सुरुवात होते. परिपाठात प्रार्थना होते, सुविचार सांगितला जातो, दिनविशेषाची माहिती दिली जाते. एखाद्या महान व्यक्तीचा जन्मदिवस, एखादी ऐतिहासिक घटना, राष्ट्रीय दिन किंवा जागतिक दिन यानिमित्ताने मुलांना नवीन माहिती मिळते.
प्रश्नमंजुषेतून मुलांच्या ज्ञानात भर पडते. बातम्यांच्या वाचनातून जगात काय घडत आहे, याची जाणीव होते. एखाद्या विद्यार्थ्याने नवीन सुविचार सांगितला, एखाद्याने सुंदर बातमी वाचली, तर इतर विद्यार्थ्यांनाही त्यातून प्रेरणा मिळते. हा केवळ परिपाठ नसतो, तर ज्ञान, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा एक छोटासा वर्ग असतो.
वर्गात गेल्यानंतरही नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. आज गणितात एखादी नवीन संकल्पना समजते, उद्या मराठीतील एखादा नवीन शब्द समजतो, तर परवा विज्ञानातील एखादा प्रयोग पाहायला मिळतो. कधी नकाशातून जगाची ओळख होते, कधी गोष्टीतून जीवनमूल्ये समजतात, तर कधी कवितेतून कल्पनाशक्तीला चालना मिळते. तर कधी मुलांना स्वतःला शोधण्याची संधी मिळते. 
म्हणजेच शाळेत दररोज काहीतरी नवीन घडत असते. हे नवीनपण केवळ अभ्यासक्रमात नसते, तर शिकण्याच्या अनुभवातही असते.

पुस्तकाबाहेरचे शिक्षण देखील  तितकेच महत्त्वाचे!
शाळेत एखाद्या दिवशी वृक्षारोपणाचा उपक्रम होतो. त्या दिवशी मुलांना केवळ झाडांची नावे शिकविली जात नाहीत, तर झाडांचे महत्त्व, त्यांची काळजी आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी समजते. त्यातून निसर्गावर प्रेम करण्याची वृत्ती जन्म घेऊ शकते. 
स्वच्छता अभियानातून स्वच्छतेचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजते. क्रीडा स्पर्धांतून जिंकण्याबरोबरच पराभव स्वीकारण्याची वृत्ती विकसित होते. सांस्कृतिक कार्यक्रमातून कला, सादरीकरण आणि संघभावना शिकायला मिळते. गटात काम करताना इतर मित्राचे कौशल्य जवळून पाहता येतात. 
शाळेत एखाद्या विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा होतो, एखादा सण साजरा केला जातो, एखाद्या महापुरुषाची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी केली जाते. या प्रत्येक प्रसंगातून मुलांना संस्कृती, परंपरा, सामाजिक जाणीव आणि परस्परांबद्दल आदरभाव शिकायला मिळतो. शाळेतील कोणतीही घटना किंवा कार्यक्रम साधा नसतो. त्यातून मुलांवर नकळत काही ना काही संस्कार करून जातात. 
कधी शाळेत एखादा पाहुणा येतो. त्यांचे अनुभव ऐकायला मिळतात. कधी एखाद्या व्यक्तीची यशोगाथा समजते. कधी शैक्षणिक सहलीतून प्रत्यक्ष निरीक्षणाची संधी मिळते. या गोष्टी पुस्तकातील धड्यांपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या मुलांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवतात.

शिक्षक म्हणजे केवळ पाठ शिकविणारा माणूस नव्हे !
शिक्षकांच्या कामाकडे पाहताना अनेकदा केवळ वर्गातील अध्यापन दिसते. परंतु एका शिक्षकाच्या दिवसाचा विचार केला तर त्यामागे किती मोठे काम असते, हे लक्षात येईल.
शिक्षक शाळेत येण्यापूर्वी आपले नियोजन करतात. विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी लक्षात घेऊन शिकविण्याच्या पद्धती ठरवतात. वर्गातील प्रत्येक मूल एकसारखे नसते. कोणाला लवकर समजते, कोणाला पुन्हा समजावून सांगावे लागते, कोणाला उदाहरणांची गरज असते, तर कोणाला प्रत्यक्ष कृतीतून शिकणे आवडते. या प्रत्येक गरजेनुसार शिक्षकांना आपली अध्यापन पद्धती बदलावी लागते. शिकवले आणि सोडून दिले असे शिक्षकांना करता येत नाही. प्रत्येक कृतीचा मागोवा घ्यावा लागतो. काही कृती पटकन आत्मसात होतात तर काही कृतीसाठी बराच वेळ लागू शकतो. 
एखादे मूल अभ्यासात मागे असेल तर त्याला प्रोत्साहन देणे, एखादे मूल सतत खोड्या करत असेल तर त्याच्या वर्तनामागील कारण समजून घेणे, एखादे मूल शांत असेल तर त्याला बोलते करणे, एखादे मूल शाळेत नियमित येत नसेल तर त्याच्या पालकांशी संपर्क साधणे, अशा अनेक जबाबदाऱ्या शिक्षक पार पाडतात. एका वर्गात वीस विद्यार्थी असतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचे अभ्यास शिक्षकांना करावे लागते. त्यामुळे शिक्षक रोजच दिव्य संकटातून परीक्षा देत पुढे जात असतो. 
शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत, तर त्यांना समजून घेतात, त्यांच्यातील सुप्त गुण शोधतात आणि त्यांच्या क्षमतांना योग्य दिशा देतात. तरीही बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न पडतो की, शिक्षक काय करतात ?

शिक्षकांचे काम म्हणजे गोड फळ देणारे झाड !
शिक्षकांचे काम समजून घ्यायचे असेल, तर एका गोड फळ देणाऱ्या झाडाचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवावे लागेल. एखादे बी जमिनीत पेरले की दुसऱ्याच दिवशी त्याला फळे लागत नाहीत. हे आपणा सर्वाना माहिती आहे. सर्वप्रथम त्यातून एक छोटेसे रोपटे बाहेर येते. त्याची काळजी घ्यावी लागते, त्याला पाणी द्यावे लागते, खत घालावे लागते, ऊन-वारा-थंडी-पाऊस सहन करत त्याची वाढ होऊ द्यावी लागते. हळूहळू ते रोपटे मोठे होते, त्याचे झाड बनते आणि कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्याला गोड फळे लागतात. शिक्षकांचे कामही अगदी असेच या गोड फळाच्या झाडासारखे असते.
शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाचे बीज पेरतात. त्याला संस्कारांचे पाणी देतात, अनुभवांचे खत घालतात आणि योग्य मार्गदर्शनाचे बळ देतात. कधी प्रेमाने समजावतात, कधी शिस्त लावतात, कधी प्रोत्साहन देतात, तर कधी विद्यार्थ्यांच्या चुका सुधारण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात. मात्र या प्रयत्नांचे परिणाम लगेच दिसून येत नाहीत.
आज पहिलीत शिकणाऱ्या मुलाला शिक्षक जे शिकवतात, त्याचा खरा परिणाम कदाचित दहा-पंधरा वर्षांनंतर दिसून येतो. आज शिकविलेली प्रामाणिकपणाची शिकवण उद्या त्याच्या कामात दिसते. आज लावलेली वाचनाची आवड भविष्यात त्याच्या ज्ञानात भर घालते. आज शिकविलेली शिस्त, स्वावलंबन, सहकार्य आणि माणुसकीची भावना त्याच्या संपूर्ण आयुष्याला दिशा देते. 
इतर अनेक प्रकारच्या कामांमध्ये केलेल्या प्रयत्नांचे परिणाम काही दिवसांत किंवा काही महिन्यांत दिसून येतात. एखादी वस्तू तयार केली की ती लगेच दिसते. एखादी इमारत बांधली की तिचे स्वरूप समोर येते. एखादे काम पूर्ण झाले की त्याचे फलित मोजता येते. परंतु शिक्षकांच्या कामाचे स्वरूप वेगळे आहे. शिक्षक आज जे पेरतात, त्याची फळे कदाचित अनेक वर्षांनी समाजाला मिळतात. शाळेतून एखादे मूल्य शिकविले आणि लगेच त्याची चाचणी होऊ शकत नाही. त्यासाठी काळ व वेळ याची वाट पाहावी लागते. 
एखादा विद्यार्थी मोठा अधिकारी होतो, डॉक्टर होतो, अभियंता होतो, उद्योजक होतो किंवा एक सामान्य पण प्रामाणिक नागरिक म्हणून समाजात वावरतो. त्याच्या यशामागे अनेक शिक्षकांचे मार्गदर्शन, संस्कार आणि कष्ट दडलेले असतात. त्या यशात शिक्षकांचा वाटाही असतो; मात्र तो नेहमी दिसेलच असे नाही.
झाडाची वाढ होत असताना त्याची मुळे किती खोलवर गेली आहेत, हे बाहेरून दिसत नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांनी रुजवलेले विचार, मूल्ये आणि संस्कार यांची खोलीही लगेच मोजता येत नाही. मुळे ज्याप्रकारे झाडाला तग धरून ठेवतात तसे शिक्षकांचे शिकविणे विद्यार्थ्यांना समाजात उभे राहण्यासाठी मदत करतात. 
म्हणून शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन केवळ आजच्या निकालावरून किंवा तात्काळ दिसणाऱ्या बदलांवरून करता कामा नये. शिक्षण ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे, हे प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही रोज काहीतरी नवीन शिकत असतात ! शिक्षक म्हणजे सर्व काही शिकून झालेले व्यक्तिमत्त्व नव्हे. शिक्षकही रोज शिकत असतात. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. त्याची समजण्याची पद्धत, आवड, क्षमता आणि शिकण्याचा वेग वेगळा असतो. त्यामुळे शिक्षकांनाही दररोज नवीन अनुभव मिळतात. कधी एखादा विद्यार्थी असा प्रश्न विचारतो की शिक्षकांनाही त्या विषयाचा अधिक अभ्यास करावा लागतो. कधी एखादे मूल अनपेक्षित उत्तर देते आणि विचार करण्याची नवी दिशा मिळते. कधी एखाद्या विद्यार्थ्याची कल्पकता पाहून शिक्षकही आश्चर्यचकित होतात. कधी एखाद्या विद्यार्थ्यांच्या अनपेक्षित वर्तनावर चिकित्सक अभ्यास करावा लागतो. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनाही नवनवीन तंत्रज्ञान, डिजिटल साधने, अध्यापनाच्या पद्धती आणि शैक्षणिक उपक्रम आत्मसात करावे लागत आहेत. त्यामुळे शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून आयुष्यभर शिकत राहणारा विद्यार्थीही असतो.

शिक्षणाच्या या प्रक्रियेत पालक आणि समाजाची भूमिका देखील महत्त्वाची आहे.  आज प्रत्येक पालकाला आपले मूल हुशार, गुणवंत आणि यशस्वी व्हावे असे वाटते. ही अपेक्षा योग्यच आहे. परंतु मुलांच्या प्रगतीची संपूर्ण जबाबदारी केवळ शाळेवर किंवा शिक्षकांवर टाकून चालेल काय ? या प्रक्रियेत आपली काहीच भूमिका नाही काय ? मुलांना नियमित शाळेत पाठविणे, घरी अभ्यासासाठी वेळ देणे, मोबाईलचा अनावश्यक वापर कमी करणे, वाचनाची सवय लावणे आणि शाळेतील प्रत्येक उपक्रमांमध्ये रस घेणे या गोष्टी पालकांनी करणे गरजेचे आहे. शाळेच्या पालक सभेच्या बैठकीला पालक म्हणून आपण भेट देतो का ? मुलांचे शाळेतील वर्तन कसे आहे ? याबाबत शिक्षकांसोबत संवाद करतो का ? हे देखील महत्वाचे आहे.  मुलाला कमी गुण मिळाले तर लगेच शिक्षकांना दोष देण्याऐवजी त्याच्या अडचणी समजून घ्याव्यात. शिक्षकांशी संवाद साधावा. मुलांच्या उपस्थितीबाबत, अभ्यासाबाबत आणि वर्तनाबाबत नियमित माहिती घ्यावी.
शाळा ही केवळ शिक्षकांची किंवा विद्यार्थ्यांची नसते. ती संपूर्ण समाजाची असते. शाळेच्या विकासात ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी आणि स्थानिक संस्था यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. या सर्वांचा सहभाग आला की सर्व काही व्यवस्थित होताना दिसून येते. 
शाळेत काही त्रुटी असतील तर त्या नक्कीच निदर्शनास आणून द्याव्यात. शिक्षकांच्या कामात सुधारणा होण्याची गरज असेल तर विधायक सूचना द्याव्यात. परंतु प्रत्येक गोष्टीत दोष शोधण्याऐवजी चांगल्या कामाचे कौतुक करण्याचीही सवय लावली पाहिजे. शिक्षकांच्या कामात सुधारणा होण्यास वाव असतो, हे मान्य केले पाहिजे. शिक्षकही माणूसच आहेत. त्यांच्याकडून चुका होऊ शकतात. मात्र त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांकडे, समर्पणाकडे आणि विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या कष्टांकडेही समाजाने संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे. नावडतीचे मीठ अळणी म्हणून नेहमीसारखे शाळा आणि शिक्षकांच्या नावाने बोटे मोडणे बंद करून प्रक्रियेला समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवे. 

शेवटी एवढेच सांगावे वाटते की, 
शाळेत फक्त पुस्तकातील धडे शिकविले जात नाहीत, तर जीवनाचे धडेही शिकविले जातात. शिक्षक फक्त अभ्यासक्रम पूर्ण करत नाहीत, तर उद्याच्या समाजाचे नागरिक घडवत असतात. शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर, अभियंता, अधिकारी किंवा उद्योजक होईलच असे नाही; पण तो एक चांगला माणूस, जबाबदार नागरिक आणि संवेदनशील व्यक्ती बनावा, ही अपेक्षा असते.
शाळा, शिक्षक, पालक आणि समाज हे शिक्षणरूपी रथाची चार महत्त्वाची चाके आहेत. यापैकी एक जरी चाक कमकुवत झाले, तरी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा प्रवास अडखळू शकतो, मंदावू शकतो.  म्हणून शाळेला प्रश्न विचारूया, पण तिच्या कार्याला समजून घेण्यासाठीही वेळ देऊया. शिक्षकांकडून अपेक्षा ठेवूया, पण त्यांना काम करण्यासाठी विश्वास आणि सहकार्यही देऊया. मुलांच्या भविष्याची चिंता करूया, पण त्यांच्या बालपणाचा आनंदही जपूया. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, शिक्षक आज विद्यार्थी घडवत असतात; पण प्रत्यक्षात ते उद्याचा समाज घडवत असतात. त्यांच्या कामाची फळे कधी त्यांच्या सेवाकाळात दिसतात, तर कधी निवृत्तीनंतरही अनेक वर्षांनी दिसत राहतात. शाळा म्हणजे रोज एक नवीन धडा, रोज एक नवीन अनुभव आणि रोज स्वतःला घडविण्याची एक नवीन संधी !शिक्षकांचे काम म्हणजे आज ज्ञानाचे बीज पेरणे, उद्या संस्कारांचे रोपटे वाढवणे आणि भविष्यात समाजाला गोड फळे देणारे वृक्ष निर्माण करणे. म्हणूनच शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन करताना तात्काळ दिसणाऱ्या परिणामांपेक्षा त्यांनी घडविलेल्या पिढ्यांकडे पाहायला हवे. कारण शिक्षकांचे खरे यश त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातून आणि त्यांनी घडविलेल्या समाजातून दिसून येते !

- नासा येवतीकर, स्तंभलेखक

Friday, 30 October 2026

दिनविशेष माहिती कार्यक्रम सूची ( All in 1 )

📚 दिनविशेष माहिती कार्यक्रम – वार्षिक संदर्भसूची

ज्ञान, प्रेरणा आणि संस्कारांचा एक अनोखा उपक्रम

संकलन व निवेदन : नासा येवतीकर, धर्माबाद

शालेय विद्यार्थ्यांमध्ये सामान्यज्ञानाची आवड निर्माण व्हावी, महापुरुषांचे जीवनकार्य समजावे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या दिवसांची माहिती मिळावी आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, या उद्देशाने 'दिनविशेष माहिती कार्यक्रम' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत दररोज एका महत्त्वपूर्ण दिनविशेषाची माहिती विद्यार्थ्यांसमोर सादर केली जाते. माहितीच्या शेवटी पाच प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आकलनाची पडताळणी केली जाते.

या कार्यक्रमातील प्रकाशित साहित्य दोन ब्लॉगवर उपलब्ध आहे.

  1. नासा येवतीकर ब्लॉग
  2. जि. प. प्रा. शाळा पिंपळगाव ब्लॉग

जानेवारी महिना

१ जानेवारी – डॉ. शांती स्वरूप भटनागर पुण्यतिथी

२ जानेवारी – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुण्यतिथी

३ जानेवारी – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती

५ जानेवारी – श्रीपाद नारायण पेंडसे जयंती

६ जानेवारी – बाळशास्त्री जांभेकर जयंती

७ जानेवारी – जानकीदेवी बजाज जयंती

८ जानेवारी – लॉर्ड बेडन-पॉवेल पुण्यतिथी

९ जानेवारी – डॉ. हरगोविंद खुराना जयंती

१० जानेवारी – दत्ताजी शिंदे पुण्यतिथी

१२ जानेवारी – राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती

१३ जानेवारी – राकेश शर्मा जयंती

१४ जानेवारी – भूगोल दिन

१५ जानेवारी – खाशाबा जाधव जयंती

१६ जानेवारी – न्यायमूर्ती महादेव रानडे पुण्यतिथी

१७ जानेवारी – दत्तात्रय रामचंद्र कापरेकर जयंती

१९ जानेवारी – जेम्स वॅट जयंती

२० जानेवारी – अपा शेर्पा जयंती

२१ जानेवारी – कवी माधव ज्यूलियन जयंती

२२ जानेवारी – समर्थ रामदास स्वामी

२३ जानेवारी – नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती

२४ जानेवारी – डॉ. होमी जहांगीर भाभा पुण्यतिथी

२६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन

२७ जानेवारी – जनरल अरुणकुमार वैद्य जयंती

२८ जानेवारी – लाला लजपतराय पुण्यतिथी

२९ जानेवारी – थॉमस पेन जयंती

३० जानेवारी – महात्मा गांधी पुण्यतिथी

३१ जानेवारी – मेजर सोमनाथ शर्मा जयंती

फेब्रुवारी महिना

९ फेब्रुवारी – पद्मविभूषण बाबा आमटे पुण्यतिथी

१० फेब्रुवारी – विचारवंत नरहर कुरुंदकर पुण्यतिथी

११ फेब्रुवारी – संशोधक थॉमस अल्वा एडिसन जयंती

१२ फेब्रुवारी – स्वामी दयानंद सरस्वती जयंती

१३ फेब्रुवारी – भारताची कोकिळा सरोजिनी नायडू जयंती

१४ फेब्रुवारी – कवयित्री संजीवनी मराठे जयंती

१५ फेब्रुवारी – संत सेवालाल महाराज जयंती

१६ फेब्रुवारी – थोरले माधवराव पेशवे जयंती

विशेष – महाशिवरात्री

मार्च महिना

१३ मार्च – नाना फडणवीस

१४ मार्च – अल्बर्ट आईनस्टाईन जयंती व जागतिक पाय दिन

जुलै महिना

१ जुलै – वसंतराव नाईक जयंती व कृषिदिन

८ जुलै – जागतिक ॲलर्जी प्रतिबंधक दिन

११ जुलै – जागतिक लोकसंख्या दिन

१३ जुलै – वीर बाजीप्रभू देशपांडे बलिदान दिन

१५ जुलै – जागतिक युवा कौशल्य दिन

१६ जुलै – जागतिक सर्पदिन

१८ जुलै – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन

२० जुलै – आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस व जागतिक बुद्धिबळ दिन

२२ जुलै – अजित पवार जयंती

२५ जुलै – कवी वसंत बापट जयंती

२९ जुलै – गुरुपौर्णिमा विशेष

सप्टेंबर व ऑक्टोबर महिने

या महिन्यांतील अनेक दिनविशेष कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळगाव या ब्लॉगवर प्रसिद्ध झाले आहेत.

१७ सप्टेंबर – मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन

२१ सप्टेंबर – आंतरराष्ट्रीय शांतता दिन

२५ सप्टेंबर – पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती

२९ सप्टेंबर – जागतिक हृदय दिन

२ ऑक्टोबर – महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती

५ ऑक्टोबर – जागतिक शिक्षक दिन

९ ऑक्टोबर – जागतिक टपाल दिन

१० ऑक्टोबर – जागतिक मानसिक आरोग्य दिन

१५ ऑक्टोबर – डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन

१६ ऑक्टोबर – जागतिक अन्न दिन

२१ ऑक्टोबर – पोलीस स्मृतिदिन

२४ ऑक्टोबर – संयुक्त राष्ट्र दिन

२६ ऑक्टोबर – अनंतराव भालेराव स्मृतिदिन

२७ ऑक्टोबर – डॉ. के. आर. नारायणन जयंती

२८ ऑक्टोबर – बिल गेट्स जन्मदिन

२९ ऑक्टोबर – जागतिक स्ट्रोक दिन

३० ऑक्टोबर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी

३१ ऑक्टोबर – सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिन


या उपक्रमाची वैशिष्ट्ये

१. विद्यार्थ्यांसाठी सोप्या व समजण्यासारख्या भाषेत माहिती.

२. महापुरुषांचे जीवनकार्य आणि विचारांची ओळख.

३. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिनांचे महत्त्व.

४. प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी पाच प्रश्नोत्तरे.

५. विद्यार्थ्यांच्या सामान्यज्ञानात भर घालणारा उपक्रम.

६. वाचन, श्रवण आणि आकलन कौशल्यांचा विकास.

आपल्यासाठी एक विनंती

शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि वाचक यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. आपल्या शाळेतील सकाळच्या परिपाठात या माहितीचा उपयोग करावा.

या उपक्रमात काही महत्त्वाचे दिनविशेष राहून गेले असतील किंवा काही सूचना असतील, तर त्या नक्की कळवाव्यात.

ज्ञान वाटल्याने वाढते. चला, ज्ञानाची ही ज्योत प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवूया!

आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना स्वागतार्ह आहेत.

संकलन व निवेदन : नासा येवतीकर, धर्माबाद मो. ९४२३६२५७६९

ब्लॉग : https://nasayeotikar.blogspot.com

https://zppspimpalgaondh.blogspot.com

टीप : ही वार्षिक संदर्भसूची अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. काही दिनविशेष व विषय नव्याने समाविष्ट केले जातील. वाचकांनी आपल्या सूचना व नवीन विषयांचे संदर्भ अवश्य कळवावेत.

धन्यवाद! 🙏

Monday, 12 October 2026

शिक्षा न करता शिस्त कशी घडवावी


शिक्षा न करता शिस्त कशी घडवावी ?
" शाळेतील प्रत्येक शिक्षकासमोर उभा असलेला एक गंभीर प्रश्न "
शाळा म्हणजे केवळ ज्ञान देण्याचे केंद्र नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी कार्यशाळा होय. येथे विद्यार्थी पुस्तकी ज्ञानासोबत सहजीवन, जबाबदारी, आत्मसंयम, परस्पर आदर आणि योग्य-अयोग्य यांतील फरक शिकत असतात. या प्रक्रियेत शिस्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करताना त्यांना शिक्षा करावी का, हा प्रश्न आज अनेक शिक्षकांसमोर उभा आहे. वर्गात गोंधळ घालणारे विद्यार्थी, वारंवार सूचना देऊनही न ऐकणारी मुले, गृहपाठ न करणारे विद्यार्थी, एकमेकांची चेष्टा करणारे किंवा शिक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणारे विद्यार्थी, ही परिस्थिती अनेक शिक्षकांसाठी आव्हानात्मक ठरते. अशा वेळी रागावणे, कठोर शब्द वापरणे किंवा शिक्षा करणे हा सोपा मार्ग वाटू शकतो. परंतु, या मार्गाने विद्यार्थ्यांच्या वर्तनात खरोखरच सकारात्मक बदल घडतो का ? की केवळ शिक्षकांसमोर शांत राहण्याची सवय निर्माण होते?
आजच्या शिक्षणव्यवस्थेला या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कारण शिस्त लावणे आणि शिस्त घडवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पहिल्या प्रक्रियेत बाह्य दबाव महत्त्वाचा असतो, तर दुसऱ्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या मनात योग्य वर्तनाची जाणीव निर्माण केली जाते. शिस्त म्हणजे शिक्षक वर्गात आले की शांत बसणे आणि शिक्षक बाहेर गेले की गोंधळ घालणे नव्हे. शिक्षकांच्या अनुपस्थितीतही नियमांचे पालन करणे, स्वतःच्या कृतींची जबाबदारी स्वीकारणे आणि इतरांच्या अधिकारांचा आदर करणे, ही खऱ्या शिस्तीची लक्षणे आहेत. भीतीमुळे विद्यार्थी काही काळ आज्ञाधारक राहू शकतो; मात्र त्यातून आत्मनियंत्रण विकसित होईलच असे नाही. सतत शिक्षा होण्याची भीती असलेल्या विद्यार्थ्याला आपली चूक मान्य करण्याऐवजी ती लपवावीशी वाटू शकते. याउलट, शिक्षकांशी विश्वासाचे नाते असलेला विद्यार्थी आपली अडचण सांगण्यास आणि चूक सुधारण्यास अधिक तयार होतो. म्हणूनच शिस्तीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना नियंत्रणात ठेवणे नसून, त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकवणे हे असले पाहिजे.
एखादा विद्यार्थी वारंवार वर्गात बोलतो, अभ्यासात लक्ष देत नाही किंवा इतरांना त्रास देतो, तेव्हा त्याला लगेच बेशिस्त ठरवणे योग्य नाही. त्याच्या वर्तनामागे कोणते कारण आहे, याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे आहे. कदाचित त्याला शिकवलेला विषय समजत नसेल, घरात काही तणाव असेल, त्याला पुरेसे भावनिक पाठबळ मिळत नसेल किंवा स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी तो असे वागत असेल. काही वेळा विद्यार्थ्यांना आपल्या भावना योग्य शब्दांत व्यक्त करता येत नाहीत आणि त्याचा परिणाम त्यांच्या वर्तनातून दिसून येतो. अशा प्रसंगी संपूर्ण वर्गासमोर विद्यार्थ्याला सुनावण्याऐवजी त्याच्याशी एकांतात संवाद साधावा. त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे आणि समस्या सोडविण्यासाठी त्याला सहभागी करून घ्यावे. प्रत्येक चुकीचे समर्थन करणे आवश्यक नाही; मात्र, चूक करणाऱ्या विद्यार्थ्याला समजून घेणे आवश्यक आहे. वर्गातील शिस्त टिकवण्यासाठी नियम आवश्यक आहेत. परंतु हे नियम केवळ शिक्षकांनी सांगितलेले आदेश न राहता विद्यार्थ्यांनी स्वीकारलेली सामूहिक जबाबदारी बनली पाहिजेत. वर्गाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांशी चर्चा करून एकमेकांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे, अपमानास्पद भाषा न वापरणे, वर्ग स्वच्छ ठेवणे, वेळेचे पालन करणे आणि स्वतःच्या कृतींची जबाबदारी स्वीकारणे, असे काही मूलभूत नियम ठरवता येतील. विद्यार्थ्यांना नियम का आवश्यक आहेत, त्यांचे उल्लंघन झाल्यास इतरांवर काय परिणाम होतात आणि प्रत्येकाने कोणती जबाबदारी पार पाडली पाहिजे, हे समजावून सांगावे. नियम स्पष्ट, मर्यादित आणि सर्वांसाठी समान असतील, तर त्यांचे पालन करणे सोपे जाते.
चूक झाल्यावर विद्यार्थ्याला त्रास देणे आणि त्या चुकीची जाणीव करून देणे यात मूलभूत फरक आहे. शिक्षेमुळे विद्यार्थ्याला आपल्यावर अन्याय झाला असे वाटू शकते; पण योग्य परिणामांमुळे त्याला आपल्या कृतीची जबाबदारी समजण्यास मदत होते. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याने वर्गात कचरा टाकला, तर त्याला अपमानित करण्याऐवजी तो कचरा योग्य ठिकाणी टाकण्यास सांगावे. एखाद्याने मित्राचे साहित्य खराब केले, तर नुकसान भरून काढण्यासाठी त्याने काय करावे, यावर चर्चा करावी. एखाद्या विद्यार्थ्याने दुसऱ्याला दुखावले असेल, तर त्या कृतीचा परिणाम समजावून सांगून परिस्थिती सुधारण्यास मदत करावी. अशा पद्धतीचा उद्देश विद्यार्थ्याला अपराधी ठरवणे नसून, चूक ओळखणे, तिचे परिणाम समजणे आणि सुधारणा करणे हा असतो. मात्र, या प्रक्रियेत अपमान, धमकी किंवा जबरदस्तीला स्थान असू नये. शिक्षकांचे लक्ष अनेकदा विद्यार्थ्यांच्या चुकांकडे अधिक जाते. मात्र, योग्य वर्तनाची दखल घेतली तर विद्यार्थ्यांना ते वर्तन पुन्हा करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. वेळेवर काम पूर्ण करणे, मित्राला मदत करणे, शांतपणे आपली बाजू मांडणे, स्वतःची चूक मान्य करणे किंवा वर्गाची जबाबदारी मनापासून पार पाडणे, अशा कृतींचे मनापासून कौतुक करावे. “आज तू मित्राचे म्हणणे शांतपणे ऐकलेस, हे चांगले केलेस,” किंवा “तू स्वतःची चूक मान्य केलीस, यासाठी तुझे कौतुक,” अशा शब्दांतून विद्यार्थ्याला त्याच्या वर्तनाचे महत्त्व समजते. प्रत्येक वेळी बक्षीस देण्याची गरज नसते. शिक्षकांचे प्रामाणिक कौतुक, विश्वासाने दिलेली जबाबदारी आणि प्रगतीची दखल हेही प्रभावी प्रेरणास्रोत ठरतात. मात्र, विद्यार्थ्यांची परस्पर तुलना करण्याऐवजी प्रत्येकाच्या वैयक्तिक प्रगतीवर भर द्यावा.
विद्यार्थ्यांनी आदराने बोलावे, अशी अपेक्षा करणारा शिक्षक त्यांच्याशी सन्मानाने संवाद साधतो का ? विद्यार्थ्यांनी चुका मान्य कराव्यात, असे सांगणारा शिक्षक स्वतःची चूक स्वीकारतो का ? हे प्रश्न प्रत्येक शिक्षकाने स्वतःला विचारायला हवेत. विद्यार्थी शिक्षकांच्या शब्दांइतकेच त्यांच्या कृतींचेही निरीक्षण करतात. त्यामुळे शिक्षकांचे वर्तन हेच विद्यार्थ्यांसाठी जिवंत पाठ्यपुस्तक असते. शिक्षकांनी रागाच्या क्षणी संयम राखला, सर्व विद्यार्थ्यांशी न्याय्य वर्तन केले, नियमांचे पालन केले आणि मतभेद संवादातून सोडवले, तर विद्यार्थ्यांना शिस्तीचा प्रत्यक्ष आदर्श अनुभवायला मिळतो. विद्यार्थ्यांचे मन एखाद्या टिपकागदाप्रमाणे असते. शिक्षकांची प्रत्येक कृती ते बारीक लक्ष देऊन पाहत असतात आणि त्याचे अनुकरण देखील करत असतात. म्हणून शिक्षकांनी आपले शाळेतील वर्तन योग्य ठेवायला हवे.
अधिकाराचा वापर आवश्यक असला, तरी त्याला न्याय, संवेदनशीलता आणि विश्वासाची जोड मिळाली पाहिजे. काही वेळा वर्गातील बेशिस्तपणामागे कंटाळा, निष्क्रियता किंवा शिकण्यात रस न वाटणे ही कारणे असू शकतात. सतत ऐकत बसण्यापेक्षा विद्यार्थ्यांना कृतीतून शिकण्याची संधी मिळाली, तर त्यांचा सहभाग वाढतो. गटचर्चा, शैक्षणिक खेळ, प्रश्नमंजुषा, प्रकल्प, भूमिकानाट्य आणि सहकार्याने पूर्ण करायची कामे यांचा वापर करता येतो. वर्गाची स्वच्छता, पुस्तकांचे व्यवस्थापन आणि शैक्षणिक साहित्याची काळजी अशा जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्यास त्यांच्यात मालकीची भावना निर्माण होते. प्रत्येक विद्यार्थ्याचे वय, क्षमता आणि गरजा वेगळ्या असतात. त्यामुळे सर्वांना एकाच पद्धतीने हाताळण्याऐवजी परिस्थितीनुसार अध्यापन आणि शिस्तीच्या पद्धतींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. ज्या वर्गात प्रश्न विचारल्यावर हसले जाते, चुका झाल्यावर अपमान केला जातो किंवा प्रत्येक वेळी ओरडण्याचा अनुभव येतो, त्या वर्गात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. अशा वातावरणात ते चुका लपवण्याचा किंवा सहभाग टाळण्याचा प्रयत्न करतात. याउलट, प्रत्येक विद्यार्थ्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणारा आणि मतभेदांचा आदर केला जाणारा वर्ग अधिक सकारात्मक ठरतो. शिक्षकांनी शांततेसाठी पूर्वनिश्चित संकेत वापरावेत, सूचना स्पष्ट द्याव्यात आणि वर्गात काय अपेक्षित आहे, याची विद्यार्थ्यांना जाणीव करून द्यावी. शिस्तीतील सातत्यही तितकेच महत्त्वाचे आहे. एकाच चुकीकडे एका विद्यार्थ्याच्या बाबतीत दुर्लक्ष करणे आणि दुसऱ्याला कठोर शिक्षा देणे, यामुळे अन्यायाची भावना निर्माण होते. नियमांची अंमलबजावणी न्याय्य, सुसंगत आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करणारी असावी.
विद्यार्थ्यांच्या वर्तनाची जबाबदारी केवळ शाळेची किंवा शिक्षकांची नसते. घरातील वातावरण, पालकांचे वर्तन, मित्रपरिवार आणि सामाजिक परिस्थिती यांचाही मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो. एखाद्या विद्यार्थ्याच्या वर्तनात वारंवार अडचणी दिसत असल्यास पालकांशी संवाद साधावा. केवळ तक्रार करण्याऐवजी विद्यार्थ्याच्या चांगल्या गुणांचा उल्लेख करून त्याच्या सुधारणेसाठी संयुक्त प्रयत्न करावेत. गरजेनुसार मुख्याध्यापक, समुपदेशक किंवा संबंधित तज्ज्ञांची मदत घ्यावी. शारीरिक शिक्षा, धमकी, अपमान आणि मानसिक छळ यांना शिस्तीची साधने मानता कामा नये. भारतातील बालकांच्या शिक्षणाच्या हक्कासंबंधी कायद्यात शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळास प्रतिबंध आहे. गंभीर किंवा वारंवार घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता शाळेच्या नियमानुसार योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे.
शिक्षा न करता शिस्त घडवणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक चुकीकडे दुर्लक्ष करणे नव्हे. शिक्षकांनी स्पष्ट मर्यादा आखल्या पाहिजेत, नियमांचे उल्लंघन झाल्यास योग्य ती प्रतिक्रिया दिली पाहिजे आणि आवश्यकतेनुसार ठाम भूमिका घेतली पाहिजे. फरक एवढाच की, ही भूमिका रागातून नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून घेतली पाहिजे. वारंवार घडणाऱ्या घटनांची नोंद ठेवणे, विद्यार्थ्याशी स्वतंत्रपणे चर्चा करणे, त्याच्या वर्तनातील बदलांचे निरीक्षण करणे आणि गरजेनुसार पुढील मदत उपलब्ध करून देणे, ही जबाबदारी शिक्षकांनी पार पाडली पाहिजे. प्रेमळ असणे म्हणजे शिस्तीबाबत तडजोड करणे नव्हे आणि कठोर असणे म्हणजे विद्यार्थ्याला दुखावणे नव्हे. प्रेम आणि ठामपणा यांचा समतोल साधण्यातच प्रभावी शिक्षकत्वाचे सामर्थ्य आहे. शिक्षणाचे अंतिम ध्येय केवळ आज्ञाधारक विद्यार्थी निर्माण करणे नाही, तर विचारशील, संवेदनशील, स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक घडवणे हे आहे. यासाठी विद्यार्थ्यांना नियमांची भीती वाटण्यापेक्षा त्यांच्या आवश्यकतेची जाणीव झाली पाहिजे. शिक्षकांनी सांगितले म्हणून नव्हे, तर ते योग्य आहे म्हणून विद्यार्थ्यांनी एखादी कृती केली, तरच शिस्तीचे खरे उद्दिष्ट साध्य झाले असे म्हणता येईल.
शिक्षा काही वेळा तात्पुरती शांतता निर्माण करू शकते; परंतु संवाद, विश्वास, सकारात्मक प्रोत्साहन, स्पष्ट मर्यादा आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या वर्तनात अधिक टिकाऊ बदल घडवता येतात. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. त्यामुळे त्याला समजून घेण्यासाठी संयम, संवेदनशीलता आणि योग्य दृष्टिकोन आवश्यक असतो. शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा मार्गदर्शक असतो. त्याच्या एका प्रेमळ शब्दातून आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो, एका योग्य कृतीतून जबाबदारीची जाणीव होऊ शकते आणि एका समजूतदार संवादातून विद्यार्थ्याच्या वर्तनाला नवी दिशा मिळू शकते.
खरी शिस्त तीच, जी शिक्षक समोर नसतानाही टिकून राहते. खरे शिक्षण तेच, जे विद्यार्थ्याला स्वतःची चूक ओळखून ती सुधारण्याची प्रेरणा देते. चला, आपण अशी शाळा घडवूया जिथे शिस्त असेल, पण दहशत नसेल; नियम असतील, पण अन्याय नसेल; शिक्षकांचा अधिकार असेल, पण विद्यार्थ्यांच्या आत्मसन्मानाशी तडजोड नसेल. कारण विद्यार्थ्यांना शिक्षा करून काही काळ शांत ठेवणे सोपे असते; पण त्यांना समजून घेऊन स्वतःहून शिस्त पाळणारे बनवणे, हेच खऱ्या शिक्षकत्वाचे कसब आहे.

- नासा येवतीकर, स्तंभलेखक

Thursday, 24 September 2026

दिनविशेष माहिती - 25 सप्टेंबर ( Pandit Dindayal Upadhyay )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात ? मजेत ना !

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनःपूर्वक स्वागत करतो.

आज २५ सप्टेंबर – पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती 
त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.

चला तर मग ऐकू या ......

भारताचे थोर विचारवंत, समाजसेवक आणि भारतीय जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा २५ सप्टेंबर १९१६ रोजी उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील नगला चंद्रभान या गावी जन्म झाला. 
त्यांच्या वडिलांचे नाव भगवती प्रसाद उपाध्याय आणि आईचे नाव रामप्यारी होते. 
लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचे छत्र हरपले. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच ते अभ्यासू, हुशार आणि कष्टाळू होते.
पंडित दीनदयाळ उपाध्याय हे एक उत्कृष्ट लेखक, पत्रकार, विचारवंत आणि कुशल संघटक होते. 
त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवा आणि समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले. 
डॉ. शामा प्रसाद मुखर्जी यांनी सन १९५१ मध्ये भारतीय जनसंघ पक्षाची स्थापना केली. भारतीय जनसंघ पक्षाच्या उभारणीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पुढे ते या पक्षाचे अध्यक्षही झाले.
पंडितजींनी ‘एकात्म मानववाद’ ही महत्त्वपूर्ण विचारसंकल्पना मांडली. 
माणसाचा केवळ आर्थिक विकास न होता त्याचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकासही झाला पाहिजे, असा या विचाराचा मुख्य आशय आहे.
त्यांनी ‘अंत्योदय’ या संकल्पनेवरही भर दिला. समाजातील शेवटच्या आणि गरजू व्यक्तीपर्यंत विकासाचा लाभ पोहोचला पाहिजे, हा त्यांचा विचार होता. 
समाजातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन सुखी आणि सन्मानपूर्ण व्हावे, यासाठी त्यांनी कार्य केले. त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात अंत्योदय दिवस म्हणून साजरा करण्यास 2014 पासून सुरुवात झाली.
पंडित दीनदयाळ उपाध्याय हे साधे राहणीमान, उच्च विचारसरणी आणि सेवाभाव यांसाठी ओळखले जातात. 
त्यांचे विचार आजही अनेकांना समाजसेवेची प्रेरणा देतात.
दुर्दैवाने, ११ फेब्रुवारी १९६८ रोजी त्यांचे निधन झाले. 
मात्र, त्यांनी मांडलेले विचार आणि समाजकल्याणाची प्रेरणा आजही स्मरणात आहे.
विद्यार्थी मित्रांनो, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनातून आपण परिश्रम, साधेपणा, सेवाभाव आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर बाळगण्याची शिकवण घेतली पाहिजे.

चला तर मग, या थोर विचारवंताच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घेऊन आपण सुद्धा एक चांगले, संवेदनशील नागरिक बनण्याचा संकल्प करूया.
अशा या थोर विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना विनम्र अभिवादन!

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. आमच्या माझी शाळा या यु ट्यूब चॅनेलला भेट द्या. 

चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा २५ सप्टेंबर १९१६ रोजी जन्म झाला.

दुसरा प्रश्न - पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?
बरोबर उत्तर आहे, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात अंत्योदय दिवस म्हणून साजरा केला जातो.

तिसरा प्रश्न -  भारतीय जनसंघ पक्षाची स्थापना कोणी केली ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. शामा प्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघ पक्षाची स्थापना केली. 

चौथा प्रश्न -  भारतीय जनसंघ पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
बरोबर उत्तर आहे, सन १९५१ मध्ये भारतीय जनसंघ पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - ११ फेब्रुवारी १९६८ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे निधन झाले.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

धन्यवाद! 🙏

Wednesday, 23 September 2026

पुढच्या वर्षी लवकर या.....! ( Coom Soon Next Year Bappa )


पुढच्या वर्षी लवकर या.......!
भक्ती, श्रद्धा, उत्साह आणि आनंदाचा अपूर्व संगम घडवणारा गणेशोत्सव आता निरोपाच्या वळणावर येऊन ठेपला आहे. दहा दिवस घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांत भक्तिभावाने विराजमान झालेल्या गणरायाला निरोप देताना प्रत्येक भक्ताच्या ओठांवर एकच आर्त स्वर उमटतो "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!"

हे केवळ गणरायाला निरोप देणारे शब्द नाहीत, तर त्यात भक्ताच्या मनातील प्रेम, ओढ, श्रद्धा आणि पुन्हा भेटण्याची आतुरता सामावलेली आहे. गणेशोत्सवाचे दिवस म्हणजे आनंदाची पर्वणी. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण बाप्पाच्या आगमनाने आनंदून जातो. आरतीचा गजर, मोदकांचा सुगंध, फुलांची सजावट, ढोल-ताशांचा निनाद आणि भक्तिमय वातावरण यामुळे अवघे जीवन चैतन्यमय होऊन जाते. बाप्पाच्या आगमनाने घरात केवळ मूर्ती येत नाही, तर आनंद, सकारात्मकता आणि एकोप्याची भावनाही प्रवेश करते.

मात्र, दहा दिवसांचा हा आनंदसोहळा संपताना मनात एक हुरहूर निर्माण होते. कालपर्यंत ज्या बाप्पाच्या दर्शनासाठी आपण आतुर होतो, त्याच बाप्पाला आज निरोप देण्याची वेळ येते. डोळ्यांत अश्रू, ओठांवर नामस्मरण आणि मनात पुढील वर्षाच्या आगमनाची आस घेऊन भक्त गणरायाला निरोप देतात. म्हणूनच "पुढच्या वर्षी लवकर या" या शब्दांना भावनिक अर्थ प्राप्त होतो.

पण या निरोपाच्या क्षणी आपण गणरायाकडून नेमके काय मागतो, याचाही विचार करायला हवा. केवळ पुढच्या वर्षी लवकर या, एवढीच आपली अपेक्षा असावी का? की पुढच्या वर्षी येताना आपल्या जीवनात काही सकारात्मक बदलही घडलेले असावेत? गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत आपण जी भक्ती, शिस्त, एकोपा आणि सेवाभाव अनुभवतो, तो वर्षभर आपल्या आचरणात उतरवण्याची गरज आहे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक एकतेचा, सांस्कृतिक जतनाचा आणि सामूहिक जबाबदारीचा उत्सव आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध घटक एकत्र येतात. मंडळे सामाजिक उपक्रम राबवतात, रक्तदान शिबिरे आयोजित करतात, गरजूंची मदत करतात आणि समाजप्रबोधनाचे कार्य करतात. हीच गणेशोत्सवाची खरी फलश्रुती आहे. उत्सव संपला तरी या कार्याचा उत्साह संपता कामा नये.

आज पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे ही काळाची गरज बनली आहे. निसर्गाचे रक्षण, जलप्रदूषण टाळणे, ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आणि सार्वजनिक स्वच्छता राखणे, हीदेखील गणरायाचीच सेवा आहे. गणपती आपल्याला बुद्धी, विवेक आणि सदाचाराची शिकवण देतो. त्यामुळे बाप्पाला निरोप देताना त्याच्या शिकवणीचे पालन करण्याचा संकल्प प्रत्येकाने करायला हवा.

गणरायाच्या विसर्जनाबरोबर उत्सवातील सजावट उतरते, मंडप रिकामे होतात, ढोल-ताशांचा आवाज शांत होतो; पण मनातील भक्तीचा दीप तेवत राहिला पाहिजे. बाप्पाच्या चरणी केलेली प्रार्थना केवळ दहा दिवसांपुरती मर्यादित न राहता ती आपल्या विचारांत आणि कृतीत प्रतिबिंबित झाली पाहिजे.

यंदाचा गणेशोत्सव आपल्याला आनंद, समाधान आणि एकोप्याच्या असंख्य आठवणी देऊन जात आहे. या आठवणींच्या शिदोरीवर आपण पुढील वर्षभर सकारात्मकतेने वाटचाल करूया. मनातील वाईट विचारांचे विसर्जन करूया, चांगल्या विचारांचे स्वागत करूया आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प करूया.

गणराया, तुझ्या आगमनाने आमची घरे उजळली, मने प्रसन्न झाली आणि आयुष्याला नवी उमेद मिळाली. आता निरोप घेताना एवढीच प्रार्थना आहे की, सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदो. शेतकऱ्यांच्या शिवारात हिरवाई फुलो, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यश लाभो आणि समाजात प्रेम, बंधुभाव व माणुसकी वृद्धिंगत होवो.

आज तुला निरोप देताना मन भरून आले आहे. पण हा निरोप कायमचा नाही, ही तर पुन्हा भेटण्याची नांदी आहे. तुझ्या पुढील आगमनाची आस मनात जपत, तुझ्या शिकवणीचा मार्ग स्वीकारत आम्ही नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होऊ.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! पुढच्या वर्षी लवकर या… पण येताना आमच्या जीवनात आनंदासोबत सद्बुद्धी, समृद्धीसोबत समाधान आणि भक्तीसोबत माणुसकीही घेऊन या

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

Tuesday, 25 August 2026

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. प्रत्येक समाजाचा सण वेगळा, त्याची परंपरा वेगळी; पण त्या प्रत्येक सणाच्या केंद्रस्थानी असतो माणूस आणि माणुसकीचा विचार. म्हणूनच सण हे केवळ आनंद साजरा करण्याचे दिवस नसून समाजाला जोडणारे संस्कारपर्व आहेत.
ईद-ए-मिलाद हा मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्माचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. त्यांच्या जीवनातून प्रेम, दया, सत्य, प्रामाणिकपणा, परोपकार, बंधुभाव आणि शांततेची प्रेरणा मिळते. गरजूंची मदत करणे, दुर्बलांशी प्रेमाने वागणे आणि समाजात सौहार्द निर्माण करणे हा या दिवसाचा महत्त्वाचा संदेश आहे.
दिवाळीचा प्रकाश अंधारावर विजय मिळवण्याची प्रेरणा देतो. आपल्या मनातील अज्ञान, अहंकार आणि नकारात्मकता दूर करून चांगुलपणाचा प्रकाश निर्माण करण्याची शिकवण तो देतो.
ईद आपल्याला वाटून घेण्याची, दानशीलतेची आणि बंधुभावाची भावना शिकवते. आपल्या आनंदात दुसऱ्यालाही सहभागी करून घेणे आणि गरजू व्यक्तीची काळजी घेणे, हा या सणामागील सुंदर विचार आहे.
ख्रिसमस प्रेम, करुणा आणि क्षमाशीलतेचा संदेश देतो. बुद्ध पौर्णिमा शांतता, संयम आणि करुणेची वाट दाखवते. महावीर जयंती अहिंसा आणि आत्मसंयमाचे महत्त्व सांगते. गुरुनानक जयंती सेवा, समानता आणि बंधुभावाची प्रेरणा देते. गुरुपौर्णिमा गुरूंच्या ज्ञानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते.
म्हणजेच सण वेगळे असले तरी मूल्ये समान आहेत.
आजच्या काळात या संदेशाची गरज अधिक आहे. तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे; पण कधी कधी मनामनांमध्ये दुरावा निर्माण होतो. सोशल मीडियावर अफवा, गैरसमज किंवा द्वेषपूर्ण संदेश पसरताना दिसतात. अशा वेळी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. कोणत्याही धर्माचा अपमान होईल असे बोलणे किंवा लिहिणे टाळले पाहिजे. मतभेद असतील तर संवाद साधला पाहिजे आणि गैरसमज असतील तर ते प्रेमाने दूर केले पाहिजेत.
सण जोडण्यासाठी असतात, तोडण्यासाठी नाहीत. शाळेतही या विचारांची सुरुवात झाली पाहिजे. वेगवेगळ्या धर्मांचे विद्यार्थी एकाच वर्गात शिकतात, एकत्र खेळतात, एकमेकांना मदत करतात. मित्राचा सण कोणताही असो, त्याला शुभेच्छा देणे आणि त्याच्या श्रद्धेचा आदर करणे, हीच खरी राष्ट्रीय एकात्मता आहे.
आपण एखाद्या सणाचा आनंद साजरा करताना त्यामागील मूल्यही आत्मसात केले पाहिजे. दिवाळीत प्रकाश, ईदमध्ये बंधुभाव, ख्रिसमसमध्ये प्रेम, बुद्ध पौर्णिमेत शांतता, महावीर जयंतीत अहिंसा आणि गुरुनानक जयंतीत सेवा ही मूल्ये जर आपल्या रोजच्या जीवनात उतरली, तर प्रत्येक दिवस सणासारखा सुंदर होईल.
आज गरज आहे ती धर्माच्या नावावर भिंती उभ्या करण्याची नव्हे, तर माणुसकीच्या नावावर पूल बांधण्याची.
चला, सणांच्या निमित्ताने एक संकल्प करूया, 
धर्म कोणताही असो, माणुसकी मोठी मानूया.
सण कोणताही असो, प्रेमाचा संदेश देऊया.
मतभेद असले तरी मनभेद होऊ देऊ नका.
द्वेषाला नाही, मैत्रीला स्थान देऊया.
आणि विविधतेतून एकतेचा सुंदर भारत घडवूया.
कारण शेवटी
“सण वेगळे, परंपरा वेगळ्या,
पण माणुसकीची भाषा एकच;
प्रार्थना वेगवेगळ्या असल्या,
तरी प्रेमाचा देव एकच!”

हीच आपल्या सर्व सणांची खरी शिकवण आणि भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे.

ईद-ए-मिलाद निमित्ताने शुभेच्छा .......!

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

Friday, 31 July 2026

लेखन प्रेरणा दिवस

मुलांनो, चला लिहू या...!


"वाचाल तर वाचाल... लिहाल तर घडाल!"

आपण रोज बोलतो, हसतो, खेळतो, शिकतो. आपल्या मनात अनेक विचार येतात. कधी आनंदाचे क्षण असतात, तर कधी दुःखाचे. कधी निसर्ग आपल्याला मोहून टाकतो, तर कधी एखादी घटना मनाला स्पर्श करून जाते. पण हे सारे विचार आपण शब्दांत मांडतो का ? जे शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतात ते लेखक आणि कवी बनतात. मग आपण ही लेखक आणि कवी बनू शकतो का ? यावर कधी विचार केला आहे काय ? नाही ना ? चला, आजपासून आपण लिहायला सुरुवात करू या !

लेखन म्हणजे फक्त परीक्षेतील उत्तरपत्रिका भरणे नाही. परीक्षेतील प्रश्नाच्या उत्तराचे लेखन करणे म्हणजे लेखन नव्हे. लेखन म्हणजे आपल्या मनातील भावना, कल्पना, अनुभव आणि स्वप्ने शब्दांत व्यक्त करण्याची सुंदर कला आहे. जो विद्यार्थी लिहितो, तो अधिक विचार करतो. जो विचार करतो, तो अधिक समजून घेतो. आणि जो समजून घेतो, तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो.

आपल्या हातात पेन किंवा पेन्सिल असते; पण त्या छोट्याशा लेखणीत आपल्या भविष्याचा प्रकाश दडलेला असतो. एक सुंदर शब्द, एक प्रभावी वाक्य, एक छोटी कविता किंवा एखादा अनुभव यातूनच मोठे लेखक, विचारवंत आणि समाजाला दिशा देणारी माणसे घडतात. 

आपण रोज खूप काही पाहतो, ऐकतो आणि आणि अनुभवतो. पावसाचे थेंब, पक्ष्यांचा किलबिलाट, शाळेतील गमती-जमती, आईची माया, मित्रांची साथ, शिक्षकांचे मार्गदर्शन, आपल्या गावातील माणसे, निसर्गाचे सौंदर्य हे सारे आपल्या मनात साठत असते. पण या अनुभवांना शब्द मिळाले, तर तेच साहित्य बनते. म्हणूनच लेखन म्हणजे मनातील विचारांना शब्दांचे सुंदर पंख देण्याची कला होय.

आपल्या मनात कायम एक प्रश्न पडतो चांगले लिहायचे कसे ? तर याचे उत्तर आहे वाचन !

जसा मजबूत पाया असेल तशी इमारत भक्कम उभी राहते, तसाच भरपूर वाचनाचा पाया असेल तर लेखन अधिक सुंदर, समृद्ध आणि प्रभावी होते. वाचनामुळे नवीन शब्द मिळतात, भाषेची समज वाढते, कल्पनाशक्ती विकसित होते, विचारांना दिशा मिळते आणि अभिव्यक्ती अधिक परिणामकारक बनते. म्हणूनच वाचन आणि लेखन ही एका रथाची दोन चाके आहेत. एकाशिवाय दुसरे अपूर्ण आहे. कोणताही महान व्यक्ती एका कवितेतून किंवा एका लेखातून घडला नाही. त्यासाठी सातत्यपणे वाचन आणि लेखन दोन्ही महत्वाचे आहेत. 

आपल्या मराठीतील अनेक थोर साहित्यिक याच मार्गाने घडले. साने गुरुजी यांनी प्रेम, करुणा आणि संस्कार शब्दबद्ध केले. कुसुमाग्रज यांच्या कवितांनी समाजाला नवी चेतना दिली. पु. ल. देशपांडे यांनी विनोदातून माणुसकीचा संदेश दिला. वि. स. खांडेकर, ग. दि. माडगूळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी तर फक्त दीड दिवस शाळेत गेले तरीही ते महान लेखक व लोकशाहीर झाले. कारण त्यांनी आपले अनुभव शब्दात मांडले. कष्टकरी लोकांच्या समस्या त्यांनी जसे पाहिले, जसे अनुभवले तसे ते शब्दात मांडले. म्हणूनच त्यांचे नाव साहित्य विश्वात जगभर पोहोचले. सर्व साहित्यिकांनी सातत्याने वाचन केले, जीवन अनुभवले आणि अखंड लेखन केले. म्हणूनच त्यांचे साहित्य आजही आपल्याला प्रेरणा देते.

जगातील महान लेखकही असेच घडले. त्यांनी भरपूर वाचन केले, जगाकडे जिज्ञासेने पाहिले आणि नियमित लिहित राहिले. लेखक जन्माला येत नाही; तो सातत्यपूर्ण वाचन, चिंतन आणि लेखनातून घडत असतो.

मुलांनो, लेखन केल्याने फक्त वही भरत नाही, तर मन समृद्ध होते. लिहिणारा विद्यार्थी निरीक्षक बनतो. तो प्रश्न विचारतो, विचार करतो, स्वतःचे मत मांडतो आणि आपल्या भावनांना योग्य शब्द देऊ लागतो. लेखन आत्मविश्वास वाढवते, भाषेवर प्रभुत्व मिळवून देते आणि व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनवते.

सुरुवातीला मोठे निबंध किंवा कविता लिहिण्याची गरज नाही. दररोज फक्त काही ओळी लिहा. आज शाळेत काय घडले ? पाऊस कसा वाटला ? आईबद्दल, मित्राबद्दल, झाडाबद्दल, शिक्षकांबद्दल किंवा आपल्या गावाबद्दल लिहा. एखादी छोटी कविता करा, गोष्ट लिहा किंवा एखादा सुंदर विचार वहीत नोंदवा. प्रत्येक दिवसाचे लेखन तुमच्या प्रगतीची साक्ष देईल. रोज काही ना काही नवीन लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला रोज काही तरी नवीन सुचत जाते. चुका झाल्या तरी घाबरू नका. चुका म्हणजे शिकण्याची पहिली पायरी असते. प्रत्येक नवीन लेखन तुम्हाला कालपेक्षा अधिक सक्षम बनवत असते. 

आज मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात अनेक जण फक्त पाहतात आणि वाचतात; पण स्वतः काही लिहित नाहीत. तुम्ही मात्र वेगळे बना. फक्त माहितीचे ग्राहक बनू नका, तर विचारांचे निर्माते बना. तुमच्या लेखणीत समाज बदलण्याची ताकद आहे.

चला, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लेखन प्रेरणा दिवस म्हणून साजरा होत आहे, त्यानिमित्ताने एक छोटा संकल्प करूया, "मी दररोज काहीतरी वाचेन, दररोज काहीतरी लिहीन, नवीन शब्द शिकेन, सुंदर विचार मांडेन, लेखणीला माझा मित्र बनवेन, आणि उत्तम लेखक होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीन."

तेव्हा मुलांनो, चला लिहू या...! कारण आज वहीत लिहिलेला प्रत्येक शब्द, उद्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया ठरणार आहे.

आजची छोटी लेखणी, उद्याचा मोठा लेखक घडवू शकते. वाचू या... विचार करू या... आणि मनापासून लिहू या ! कारण शब्द बदलतात मन, आणि मन बदलते जग.


- नासा येवतीकर, धर्माबाद

Tuesday, 28 July 2026

दिनविशेष माहिती - 29 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम

गुरुपौर्णिमा विशेष

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

कसे आहात? मजेत ना?

मी नासा येवतीकर. आपल्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनःपूर्वक स्वागत करतो.

आज आपण भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी अशा गुरुपौर्णिमा या दिवसाचे महत्त्व जाणून घेणार आहोत.

लक्षपूर्वक ऐका हं ! कारण या माहितीच्या आधारे शेवटी तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.

चला तर मग, सुरुवात करूया...


आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. हा दिवस महान ऋषी महर्षी वेदव्यास यांची जयंतीचा दिवस. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. महर्षी वेदव्यास यांनी वेदांचे संकलन केले, महाभारत या महान ग्रंथाची निर्मिती केली तसेच अठरा पुराणांच्या रचनेतही त्यांचे मोठे योगदान आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत त्यांना महान गुरु मानले जाते.

भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे. आई-वडील आपल्याला जन्म देतात; पण गुरु आपल्याला ज्ञान, संस्कार, शिस्त आणि योग्य जीवनमार्ग देतात. अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा तोच खरा गुरु.

संत कबीरांनी गुरुचे महत्त्व सांगताना म्हटले आहे—

"गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय ?
बलिहारी गुरु आपल्या, गोविंद दियो बताय."

याचा अर्थ असा की, गुरु आणि देव दोघेही समोर उभे असतील तर प्रथम गुरुंनाच वंदन करावे, कारण देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुरुच दाखवतात.

आपणास शिकविणारे शाळेतील शिक्षकही आपल्या जीवनातील खरे गुरु आहेत. ते आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर चांगले विचार, उत्तम संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा, परिश्रम, सहकार्य आणि देशप्रेम यांसारखी जीवनमूल्येही शिकवतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या गुरुजनांचा नेहमी आदर केला पाहिजे.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना वंदन करतात, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. ही परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीचे वैभव आहे.

प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी आपण एक संकल्प करूया—

• आपल्या गुरुजनांचा नेहमी आदर करू.
• नियमित अभ्यास करू.
• शिस्तीचे पालन करू.
• चांगले संस्कार अंगीकारू.
• आपल्या आई-वडिलांचे आणि शिक्षकांचे नाव उज्ज्वल करू.

शेवटी, एक सुंदर ओळ आठवूया—

"गुरुविण कोण दाखवील वाट,
ज्ञानदीप तेच लावितात."

चला, गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपल्या सर्व गुरुजनांना मनःपूर्वक वंदन करून त्यांच्या आशीर्वादाने ज्ञान, संस्कार आणि यशाचा मार्ग स्वीकारूया.

मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला नक्की कळवा.

आता या माहितीवर आधारित काही प्रश्न पाहूया.

प्रश्न १ : आषाढ महिन्यातील पौर्णिमेला कोणता सण साजरा केला जातो?
उत्तर : गुरुपौर्णिमा.

प्रश्न २ : गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणाची जयंती साजरी केली जाते?
उत्तर : महर्षी वेदव्यास यांची.

प्रश्न ३ : महाभारताची रचना कोणी केली?
उत्तर : महर्षी वेदव्यास यांनी.

प्रश्न ४ : गुरुपौर्णिमेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर : व्यासपौर्णिमा.

प्रश्न ५ : भारतीय संस्कृतीत कोणाचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे?
उत्तर : गुरुचे.

(ही माहिती विविध विश्वसनीय संदर्भांच्या आधारे संकलित करण्यात आली आहे.)

चला, पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार!

संकलन : नासा येवतीकर, धर्माबाद
मो. ९४२३६२५७६९

धन्यवाद!
जय हिंद! जय महाराष्ट्र!

Friday, 24 July 2026

दिनविशेष माहिती - 25 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम 

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 

कसे आहात तुम्ही ? मजेत ना !

 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनःपूर्वक स्वागत करतो.

आज 25 जुलै मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी, लेखक आणि प्रभावी वक्ते कवी वसंत बापट जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग ऐकू या ......


कवी वसंत पुरुषोत्तम बापट यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.

वसंत बापट हे मराठीतील प्रसिद्ध कवी, गीतकार, लेखक, प्राध्यापक आणि उत्कृष्ट वक्ते होते. त्यांच्या कवितांमध्ये देशप्रेम, समाजप्रेम, मानवता, निसर्गप्रेम आणि प्रेरणादायी विचारांचा सुंदर संगम आढळतो. त्यांनी महाराष्ट्रभर काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रम करून मराठी कवितेला लोकमान्यता मिळवून दिली.

त्यांनी अनेक गाजलेली देशभक्तिपर आणि प्रेरणादायी गीते लिहिली. त्यांपैकी "उत्तुंग आमुची उत्तर सीमा", "सैन्य चालले पुढे" आणि "राकट देशा, कणखर देशा" ही गीते विशेष प्रसिद्ध आहेत. आज सुद्धा ही गीते विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय उपक्रम आणि देशभक्तीपर प्रसंगी आवर्जून सादर केली जातात.

मुंबईतील महाविद्यालयात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले. त्यांच्या साहित्यसेवेबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले.

१७ सप्टेंबर २००२ रोजी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या कविता, गीते आणि साहित्य आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत.

विद्यार्थी मित्रांनो, कवी वसंत बापट यांचे जीवन आपल्याला देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, साहित्यप्रेम आणि सतत ज्ञानार्जन करण्याची प्रेरणा देते. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपणही चांगले नागरिक बनण्याचा संकल्प करूया.


मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 

चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 


पहिला प्रश्न - कवी वसंत बापट यांचा जन्म केव्हा झाला ?

बरोबर उत्तर आहे, कवी वसंत बापट यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला. 


दुसरा प्रश्न - भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले ?

बरोबर उत्तर आहे, सन 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन झाले.


तिसरा प्रश्न - राकट देशा, कणखर देशा" ही प्रसिद्ध गीत कोणी लिहिले ?

बरोबर उत्तर आहे, राकट देशा, कणखर देशा" ही प्रसिद्ध गीत कवी वसंत बापट यांनी लिहिले 


चौथा प्रश्न - वसंत बापट यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून कोठे कार्य केले. ?

बरोबर उत्तर आहे, मुंबईतील महाविद्यालयात वसंत बापट यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्य केले.


आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - वसंत बापट यांचे निधन केव्हा झाले ?

बरोबर उत्तर आहे - १७ सप्टेंबर २००२ रोजी वसंत बापट यांचे निधन झाले. 

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )


चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏


संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

धन्यवाद!

Wednesday, 22 July 2026

दिनविशेष माहिती - 23 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आज २३ जुलै लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती जाणून घेणार आहोत.

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग जाणून घेऊ या ......
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान राष्ट्रपुरुष, थोर समाजसुधारक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि प्रखर राष्ट्रवादी व्यक्तिमत्व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. लोकमान्य टिळक यांचे मूळ नाव 'केशव गंगाधर टिळक' होते. लहानपणापासून त्यांना 'बाळ' या टोपणनावाने ओळखले जात असे. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान, स्वाभिमानी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे होते. 
टिळकांनी शिक्षणाला राष्ट्रीय विकासाचे प्रभावी साधन मानले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह न्यू इंग्लिश स्कूल आणि पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. शिक्षणातून देशप्रेम, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, हा त्यांचा उद्देश होता.

लोकमान्य टिळक हे निर्भीड पत्रकारही होते. त्यांनी मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजी भाषेतून 'द मराठा' हे वृत्तपत्र सुरू केले. त्यात ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांवर कठोर टीका केली. त्यांच्या लेखणीतून जनतेमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण झाली.

टिळकांनी समाजात एकात्मता निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. या उत्सवांमुळे सामान्य जनतेमध्ये राष्ट्रप्रेम जागृत झाले आणि स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली.

त्यांची प्रसिद्ध गर्जना म्हणजे "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच." या एका वाक्याने संपूर्ण देशात स्वातंत्र्याची चळवळ अधिक जोमाने उभी राहिली.

लोकमान्य टिळकांनी 'गीतारहस्य' हा महत्त्वपूर्ण ग्रंथही लिहिला. कर्मयोग, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवा हा जीवनाचा खरा मार्ग असल्याचा संदेश त्यांनी या ग्रंथातून दिला.

दिनांक १ ऑगस्ट १९२० रोजी त्यांचे निधन झाले. परंतु त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि राष्ट्रप्रेम आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.

प्रिय विद्यार्थ्यांनो, लोकमान्य टिळकांचे जीवन आपल्याला सत्य, धैर्य, परिश्रम, शिक्षणाचे महत्त्व आणि देशभक्ती यांचा अमूल्य संदेश देते. आपणही प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन, शिस्तीचे पालन करून आणि आपल्या देशाचा जबाबदार नागरिक बनून त्यांना खरी आदरांजली वाहूया.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - लोकमान्य टिळक यांचा जन्म केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे, लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. 

दुसरा प्रश्न - लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या मराठी वृत्तपत्राचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, केसरी हे मराठी वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरु केले. 

तिसरा प्रश्न - लोकमान्य टिळकांची प्रसिद्ध गर्जना कोणती ?
बरोबर उत्तर आहे, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ही त्यांची प्रसिद्ध गर्जना आहे.

चौथा प्रश्न -  लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
बरोबर उत्तर आहे, लोकमान्य टिळकांनी 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला. 

शेवटचा पाचवा प्रश्न - लोकमान्य टिळकांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

धन्यवाद!
जय हिंद! जय महाराष्ट्र!

Tuesday, 21 July 2026

दिनविशेष माहिती - 22 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 22 जुलै महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांची जयंती त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्या कार्याविषयी जाणून घेऊ या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग जाणून घेऊ या ......
श्री. अजित अनंतराव पवार
(२२ जुलै १९५९ – २८ जानेवारी २०२६)

मा. अजित अनंतराव पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. आपल्या कर्तृत्व, निर्णयक्षमता, प्रशासनावरील मजबूत पकड आणि विकासाभिमुख दृष्टीकोनाच्या बळावर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावी, कणखर आणि लोकप्रिय नेता म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली. जनतेशी असलेला त्यांचा जिव्हाळ्याचा संपर्क, प्रभावी नेतृत्व आणि विकासकामांप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांना व्यापक लोकसमर्थन लाभले.
सन १९९१ मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रथमच खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचे सलग आठ वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सहा वेळा कार्यभार सांभाळला. तसेच वित्त व नियोजन, जलसंपदा, ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास तसेच क्रीडा व युवक कल्याण यांसारख्या अनेक महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले.
श्री. अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प ११ वेळा विधानमंडळात सादर करण्याचा मान मिळविला. तसेच जुलै २०२२ ते जून २०२३ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही जबाबदारी सांभाळली.
त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यांचा विकास, पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करणे, सिंचन प्रकल्पांना गती देणे, औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि विकासाभिमुख प्रशासकीय निर्णय राबविणे यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांना चालना मिळाली. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान झाले.
राजकीय क्षेत्रात तसेच जनसामान्यांमध्ये ते प्रेमाने "अजितदादा" या नावाने ओळखले जात. स्पष्टवक्तेपणा, शिस्तप्रिय स्वभाव, कठोर परिश्रम आणि विकासासाठीची अखंड तळमळ ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती.
श्री. अजित पवार यांची पत्नी श्रीमती सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री असून त्यांचे सुपुत्र पार्थ अजित पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत. कुटुंबाने सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील कार्याची परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.
दि. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती (जि. पुणे) येथे झालेल्या विमान अपघातात त्यांचे दुःखद निधन झाले.

आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 🌹

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 

चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - श्री अजित पवार यांचा जन्म केव्हा झाला ? 
बरोबर उत्तर आहे, श्री अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. 

दुसरा प्रश्न - अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रथमच खासदार म्हणून केव्हा निवडून आले ?
बरोबर उत्तर आहे, सन १९९१ मध्ये अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रथमच खासदार म्हणून निवडून आले. 

तिसरा प्रश्न -  श्री अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून किती वेळा कार्यभार सांभाळला ?
बरोबर उत्तर आहे, श्री अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सहा वेळा कार्यभार सांभाळला

चौथा प्रश्न - सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत ?
बरोबर उत्तर आहे, श्रीमती सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत.

शेवटचा पाचवा प्रश्न - श्री अजित पवार यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - दि. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती (जि. पुणे) येथे झालेल्या विमान अपघातात श्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Sunday, 19 July 2026

दिनविशेष माहिती - 20 जुलै


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आज २० जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस (International Moon Day) म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण ह्या दिवसा विषयी माहिती समजून घेऊ या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग ऐकू या ......


विद्यार्थी मित्रांनो, रात्रीच्या आकाशात चमकणारा चंद्र आपला सर्वात जवळचा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र आपल्याला प्रकाश देत नाही, तर तो सूर्यप्रकाश परावर्तित करतो. चंद्र पृथ्वीपासून सुमारे ३ लाख ८४ हजार ४०० किलोमीटर अंतरावर आहे.
२० जुलै १९६९ हा दिवस मानवजातीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला. याच दिवशी अमेरिकेच्या अपोलो-११ मोहिमेद्वारे मानवाने प्रथमच चंद्रावर पाऊल ठेवले. अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले. त्यांच्यासोबत बझ ऑल्ड्रिन यांनीही चंद्रावर भ्रमण केले, तर मायकेल कॉलिन्स हे अंतराळयानातच कक्षेत राहिले.
नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पाऊल ठेवताना म्हटलेले प्रसिद्ध वाक्य आजही जगभर प्रसिद्ध आहे – "हे एका माणसाचे छोटे पाऊल आहे; पण मानवजातीसाठी ही एक मोठी झेप आहे."
या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nations) २०२१ पासून २० जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली.
भारतानेही चंद्र संशोधनात मोठी कामगिरी केली आहे. चांद्रयान-१ मोहिमेद्वारे चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचा महत्त्वाचा शोध लागला. त्यानंतर चांद्रयान-३ मोहिमेद्वारे २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी सॉफ्ट लँडिंग करून इतिहास घडवला. त्यामुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीपणे उतरलेला जगातील पहिला देश ठरला.
आंतरराष्ट्रीय चंद्र दिवसाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, अंतराळ संशोधन आणि खगोलशास्त्राबद्दल आवड निर्माण करणे, तसेच शांततापूर्ण अंतराळ संशोधनाला प्रोत्साहन देणे हा आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आजचे विज्ञान हे उद्याचे भविष्य आहे. कदाचित तुमच्यापैकीच एखादा विद्यार्थी भविष्यात अंतराळ वैज्ञानिक किंवा अंतराळवीर बनेल. म्हणूनच विज्ञानाची आवड जोपासा, जिज्ञासा वाढवा आणि मोठी स्वप्ने पाहा.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस (International Moon Day) केव्हा साजरा केला जातो ?
बरोबर उत्तर आहे, २० जुलै रोजी आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस (International Moon Day) म्हणून साजरा केला जातो

दुसरा प्रश्न -  आपल्या सर्वात जवळचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे ?
बरोबर उत्तर आहे, चंद्र आपला सर्वात जवळचा नैसर्गिक उपग्रह आहे.

तिसरा प्रश्न - चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव कोण ?
बरोबर उत्तर आहे, अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव होय.

चौथा प्रश्न - अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल केव्हा ठेवले ?
बरोबर उत्तर आहे, २० जुलै १९६९ रोजी अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले.

शेवटचा पाचवा प्रश्न - कोणत्या मोहिमेद्वारे चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचा भारताने महत्त्वाचा शोध लागला. ?
बरोबर उत्तर आहे - चांद्रयान-१ मोहिमेद्वारे चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचा भारताने महत्त्वाचा शोध लागला.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

धन्यवाद! 🚀🌕

-----------------------------------------------
जागतिक बुद्धिबळ दिन – २० जुलै

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज २० जुलै हा दिवस जागतिक बुद्धिबळ दिन (World Chess Day) म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण  बुद्धिबळ या खेळाविषयी माहिती जाणून घेऊ या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग ऐकू या ......
विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिबळ हा जगातील सर्वात जुना आणि बुद्धीला चालना देणारा खेळ मानला जातो. या खेळाचा उगम भारतात झाला. प्राचीन काळात या खेळाला 'चतुरंग' असे म्हणत असत. नंतर हा खेळ पर्शिया, अरब देश आणि युरोपमार्गे संपूर्ण जगात पोहोचला.
२० जुलै १९२४ रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ची स्थापना झाली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रसंघाने २०१९ मध्ये २० जुलै हा दिवस 'जागतिक बुद्धिबळ दिन' म्हणून घोषित केला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जगभर साजरा केला जातो.
बुद्धिबळामध्ये ६४ चौकटी आणि ३२ मोहरे असतात. प्रत्येक खेळाडूकडे १६ मोहरे असतात. राजा, राणी, हत्ती, उंट, घोडा आणि प्यादी या मोहऱ्यांचा योग्य वापर करून प्रतिस्पर्ध्याच्या राजाला शह आणि मात देणे हे या खेळाचे उद्दिष्ट असते. राजा हा बुद्धिबळातील सर्वात महत्त्वाचा मोहरा आहे.
बुद्धिबळ हा केवळ मनोरंजनाचा खेळ नाही, तर तो एकाग्रता, स्मरणशक्ती, संयम, नियोजन, निर्णयक्षमता आणि तर्कशक्ती वाढविणारा खेळ आहे. म्हणूनच जगभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बुद्धिबळ शिकण्यास प्रोत्साहन दिले जाते.
भारताला बुद्धिबळाच्या क्षेत्रात मोठा अभिमान आहे. विश्वनाथन आनंद हे भारताचे पहिले विश्वविजेते बुद्धिबळपटू आहेत. त्यांच्या यशामुळे भारतात बुद्धिबळाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. आज भारतातील अनेक युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. त्यामध्ये डी. गुकेश, आर. प्रज्ञानानंद, अर्जुन एरिगैसी आणि कोनेरू हम्पी यांसारखे खेळाडू विशेष उल्लेखनीय आहेत.
विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिबळ आपल्याला प्रत्येक चाल विचारपूर्वक खेळायला शिकवते. जीवनातही कोणताही निर्णय घाईत न घेता विचारपूर्वक घेतला तर यश निश्चित मिळते.
चला, या जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त आपण बुद्धिबळ खेळण्याची सवय लावूया, आपली विचारशक्ती वाढवूया आणि आपल्या बुद्धीचा विकास करूया.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न -  बुद्धिबळ खेळाचा उगम कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, बुद्धिबळ खेळाचा उगम भारतात झाला. 

दुसरा प्रश्न - प्राचीन काळात बुद्धिबळ या खेळाला काय म्हणत असत ?
बरोबर उत्तर आहे, प्राचीन काळात बुद्धिबळ या खेळाला 'चतुरंग' असे म्हणत असत.

तिसरा प्रश्न - आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ची स्थापना कोठे झाली.  ?
बरोबर उत्तर आहे, फ्रान्स ची राजधानी पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ची स्थापना झाली. 

चौथा प्रश्न - बुद्धिबळातील सर्वात महत्त्वाचा मोहरा कोणता ?
बरोबर उत्तर आहे, राजा हा बुद्धिबळातील सर्वात महत्त्वाचा मोहरा आहे.

शेवटचा पाचवा प्रश्न - भारताचे पहिले विश्वविजेते बुद्धिबळपटू कोण आहेत. ?
बरोबर उत्तर आहे - विश्वनाथन आनंद हे भारताचे पहिले विश्वविजेते बुद्धिबळपटू आहेत.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
धन्यवाद! ♟️🌍

Friday, 17 July 2026

दिनविशेष माहिती - 18 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज  १८ जुलै  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन
 निमित्ताने त्यांच्या साहित्य आणि कार्याविषयी माहिती जाणून घेऊ या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग ऐकू या ......
आज १८ जुलै मराठी साहित्यविश्वातील थोर साहित्यिक, समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे त्यांना औपचारिक शिक्षण घेता आले नाही. पण त्यांनी जीवनालाच आपले विद्यापीठ मानले. आपल्या निरीक्षणशक्ती, अनुभव आणि वाचनाच्या बळावर ते एक महान साहित्यिक बनले.
अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नव्हते, तर ते लोकशाहीर, समाजसुधारक आणि जनतेचे कवी होते. त्यांनी आपल्या साहित्यातून गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि वंचित समाजाचे दुःख, संघर्ष आणि स्वाभिमान यांचे जिवंत चित्रण केले.
त्यांनी ३५ हून अधिक कादंबऱ्या, अनेक कथा, पोवाडे, लावण्या, लोकनाट्ये आणि प्रवासवर्णने लिहिली. त्यांची 'फकिरा' ही कादंबरी विशेष गाजली असून तिला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. अण्णाभाऊ साठे हे लोकशाहीर असल्यामुळे त्यांनी स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि शौर्य यांवर अनेक पोवाडे लिहिले. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे गौरवगान करणारे पोवाडे विशेष प्रसिद्ध आहेत.
अण्णाभाऊ साठे हे सोव्हिएत रशियाला भेट देणारे पहिले मराठी साहित्यिक मानले जातात. त्यांच्या साहित्यकृतींचे रशियनसह अनेक परदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले. त्यामुळे मराठी साहित्याचा गौरव जगभर पोहोचविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
त्यांचा एक प्रसिद्ध विचार आहे—
"ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हे, तर कष्टकरी कामगारांच्या तळहातावर पेलली आहे."
या विचारातून त्यांनी श्रमाचे महत्त्व आणि कष्टकरी माणसाचा सन्मान अधोरेखित केला.
१८ जुलै १९६९ रोजी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांचे विचार, साहित्य आणि समाजप्रबोधनाचे कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे.
विद्यार्थी मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातून आपण हे शिकले पाहिजे की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, कष्ट, आत्मविश्वास आणि शिक्षणाची ओढ असेल तर मोठे यश मिळवता येते. समाजातील प्रत्येक माणसाचा आदर करणे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.


मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? आम्हांला नक्की कळवा. 

चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

१) अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय होते ?
उत्तर: तुकाराम भाऊराव साठे.

२) अण्णाभाऊ साठे यांचा जन्म केव्हा व कुठे झाला ?
उत्तर: १ ऑगस्ट १९२० रोजी वाटेगाव, जि. सांगली येथे.

३) अण्णाभाऊ साठे यांची प्रसिद्ध कादंबरी कोणती आहे ?
उत्तर: फकिरा.

४) अण्णाभाऊ साठे हे कोणत्या देशाला भेट देणारे पहिले मराठी साहित्यिक मानले जातात ?
उत्तर: सोव्हिएत रशिया (USSR).

५) अण्णाभाऊ साठे यांचे निधन केव्हा झाले ?
उत्तर: अण्णाभाऊ साठे यांचे १८ जुलै १९६९ रोजी निधन झाले.


( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Wednesday, 15 July 2026

दिनविशेष माहिती - 16 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात? मजेत ना?

मी नासा येवतीकर. दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनःपूर्वक स्वागत करतो.

आज १६ जुलै. हा दिवस संपूर्ण जगभर "जागतिक सर्पदिन" (World Snake Day) म्हणून पाळला जातो. या दिवसानिमित्त आपण सापांविषयीचे गैरसमज दूर करून त्यांचे पर्यावरणातील महत्त्व जाणून घेणार आहोत.

लक्षपूर्वक ऐका हं ! कारण या माहितीच्या आधारे शेवटी तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.

चला तर मग, आजची माहिती ऐकूया...
दरवर्षी १६ जुलै रोजी जागतिक सर्पदिन साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे सापांबद्दल जनजागृती करणे, त्यांच्याविषयी असलेली भीती आणि अंधश्रद्धा दूर करणे तसेच त्यांचे संरक्षण करण्याचा संदेश देणे.
विद्यार्थी मित्रांनो, साप हा निसर्गातील अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे. तो उंदीर, घूस आणि पिकांचे नुकसान करणाऱ्या इतर प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा तो एक प्रकारे मित्रच आहे.
भारतात सापांच्या जवळपास 300 प्रजाती आढळतात. साप तीन प्रकारचे असतात एक विषारी साप, दुसरे निम विषारी साप आणि तिसरे बिन विषारी साप. त्यामुळे प्रत्येक साप विषारी असतो, हा समज चुकीचा आहे.
भारतात एकूण चार सर्वाधिक विषारी साप आहेत. त्यात नाग हा विषारी साप भारतात बहुतेक ठिकाणी आढळून येतो. 
आपल्याला एखादा साप दिसला तर त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि तात्काळ वनविभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांना माहिती द्यावी. साप पकडण्याचा किंवा त्याच्याशी खेळ करण्याचा प्रयत्न कधीही करू नये.
पावसाळ्यात साप बऱ्याचदा बिळांमधून बाहेर येतात. त्यामुळे घराच्या आसपास स्वच्छता ठेवणे, कचरा किंवा लाकडांचे ढीग साचू न देणे, रात्री टॉर्चचा वापर करणे आणि पायात चप्पल किंवा बूट घालणे या साध्या सवयी अपघात टाळण्यास मदत करतात. सर्प दंश झाल्यावर वेळ न दवडता दवाखान्यात जावे. मांत्रिक किंवा इतर झाडपालाची औषधं खाऊन आपला वेळ वाया घालवू नये.
मित्रांनो, निसर्गातील प्रत्येक सजीवाचे स्वतःचे महत्त्व असते. सापांचे संरक्षण म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण होय. म्हणून आपण सापांबद्दल भीती नव्हे तर योग्य माहिती आणि जागरूकता बाळगली पाहिजे.
चला, जागतिक सर्पदिनानिमित्त आपण असा संकल्प करूया—
"सापांबद्दल अंधश्रद्धा पसरवणार नाही, त्यांचे संरक्षण करू आणि निसर्गातील प्रत्येक सजीवाचा आदर करू."

मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला नक्की कळवा.
आता या माहितीवर आधारित पाच प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहूया.

प्रश्न १ : जागतिक सर्पदिन केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : जागतिक सर्पदिन दरवर्षी १६ जुलै रोजी साजरा केला जातो.

प्रश्न २ : शेतकऱ्यांचा खरा मित्र कोण ?
उत्तर : साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. 

प्रश्न ३ : सापाचे एकूण किती प्रकार आहेत ?
उत्तर : सापाचे एकूण तीन प्रकार आहेत, विषारी साप, निम विषारी साप आणि बिन विषारी साप.

प्रश्न ४ : भारतातील सर्वाधिक विषारी साप कोणता ?
उत्तर : नाग हा भारतातील सर्वाधिक विषारी साप आहे.

प्रश्न ५ : साप दिसल्यास आपण काय करावे?
उत्तर : साप दिसल्यास त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि वनविभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांना माहिती द्यावी.

वरील माहिती सर्पमित्र क्रांती बुद्धेवार यांनी संकलित केले आहे. 

चला, पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात.

तोपर्यंत नमस्कार! 🙏

निवेदन :
नासा येवतीकर, धर्माबाद
📞 ९४२३६२५७६९

Tuesday, 14 July 2026

दिनविशेष माहिती - 15 जुलै

सशक्त तरुण : सशक्त भारत

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त प्रासंगिक लेख
दरवर्षी १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन (World Youth Skills Day) म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने २०१४ मध्ये या दिवसाची घोषणा केली आणि 2015 पासून साजरा करण्यासाठी सुरुवात झाली. या दिवसामागील उद्देश म्हणजे तरुणांना रोजगारक्षम, स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक बनविण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित करणे. कारण कोणत्याही राष्ट्राचे भविष्य त्याच्या तरुणांच्या हातात असते. तरुण सक्षम असतील, कौशल्यसंपन्न असतील, तरच राष्ट्र प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचू शकते.
भारत हा जगातील सर्वांत तरुण देशांपैकी एक आहे. आपल्या देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही युवा आहे. हीच भारताची खरी ताकद आहे. मात्र केवळ मोठी युवा लोकसंख्या असणे पुरेसे नाही; त्या तरुणांमध्ये ज्ञान, कौशल्य, चारित्र्य, नवोपक्रमाची वृत्ती आणि राष्ट्रभक्ती असणे आवश्यक आहे. म्हणूनच "सशक्त तरुण : सशक्त भारत" ही केवळ घोषणा नसून देशाच्या विकासाचा मूलमंत्र आहे.
आजचे जग झपाट्याने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, डेटा सायन्स, डिजिटल तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, जैवतंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, संघभावना, समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशील विचार आणि डिजिटल साक्षरता ही आजच्या तरुणांसाठी तितकीच महत्त्वाची आहेत.
स्वामी विवेकानंदांनी तरुणांना उद्देशून म्हटले होते, "उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका." हा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनीही युवकांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि त्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा संदेश दिला. महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा तरुणांनी कृतीत उतरविला, तर भारताचा विकास अधिक वेगाने होईल.
आज अनेक तरुण स्टार्टअप उभारत आहेत, नवीन संशोधन करत आहेत, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, सामाजिक उपक्रम राबवत आहेत आणि जगभरात भारताचा झेंडा उंचावत आहेत. ऑलिम्पिक, विज्ञान, अवकाश संशोधन, उद्योग, कला, साहित्य आणि माहिती-तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत भारतीय युवकांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. ही यशोगाथा इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मात्र दुसरीकडे काही गंभीर आव्हानेही आहेत. बेरोजगारी, अपुरी कौशल्ये, व्यसनाधीनता, सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, मानसिक ताण, दिशाहीनता आणि पर्यावरणाविषयीची उदासीनता ही चिंतेची बाब आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी शासन, शैक्षणिक संस्था, पालक आणि समाज यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण, उद्योजकता, करिअर मार्गदर्शन आणि मूल्याधिष्ठित शिक्षण यावर अधिक भर दिला पाहिजे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्येही कौशल्याधारित शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेपुरते शिक्षण न घेता जीवनासाठी शिक्षण घ्यावे, स्वतःच्या आवडीची कौशल्ये विकसित करावीत आणि रोजगार निर्माण करणारे बनावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. "स्किल इंडिया", "स्टार्टअप इंडिया" आणि "डिजिटल इंडिया" यांसारखे उपक्रमही याच दिशेने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
कौशल्य म्हणजे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नाही; तर आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वावलंबनाचा पाया आहे. कौशल्यामुळे व्यक्ती स्वतःचे जीवन घडवते आणि समाजाच्या विकासातही मोलाचे योगदान देते. कौशल्यसंपन्न युवक हे राष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीचे आधारस्तंभ असतात.
आजच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच संगणक, भाषा, संवाद, कला, क्रीडा, विज्ञान, पर्यावरण संरक्षण, आर्थिक साक्षरता आणि जीवनकौशल्ये यांचाही अभ्यास केला पाहिजे. वेळेचे नियोजन, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सतत शिकण्याची वृत्ती हीच त्यांची खरी ओळख ठरली पाहिजे.
जागतिक युवा कौशल्य दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम साजरा करण्याचा दिवस नाही. हा प्रत्येक तरुणाने स्वतःच्या क्षमतेचा शोध घेण्याचा, नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचा आणि देशाच्या प्रगतीत आपले योगदान देण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे.
भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करायचे असेल, तर प्रत्येक तरुण सक्षम, कुशल, सुसंस्कृत आणि जबाबदार असणे आवश्यक आहे. कारण राष्ट्राची खरी ताकद त्याच्या युवकांमध्ये असते. म्हणूनच आजच्या या जागतिक युवा कौशल्य दिनी आपण सर्वांनी एकच निर्धार करूया, 
"कौशल्यसंपन्न तरुण घडवू, आत्मनिर्भर भारत उभारू; सशक्त तरुण घडला तरच सशक्त भारत घडेल."

नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

Sunday, 12 July 2026

दिनविशेष माहिती - 13 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज १३ जुलै  वीर बाजीप्रभू देशपांडे बलिदान दिन
 त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण बाजीप्रभू देशपांडे यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग ऐकू या ......
स्वराज्याचे महान शिलेदार, अद्वितीय पराक्रम, स्वामिनिष्ठा आणि बलिदानाचे प्रतीक असलेले वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा आज स्मृतिदिन 

बाजीप्रभू देशपांडे यांचा जन्म इतिहासकारांच्या मतानुसार सतराव्या शतकाच्या प्रारंभी साधारणपणे इ.स. १६१५ च्या सुमारास झाला. लहानपणापासूनच त्यांना व्यायाम, कुस्ती, घोडेस्वारी आणि शस्त्रविद्येची विशेष आवड होती. त्यांची शरीरयष्टी धिप्पाड, मजबूत आणि बलवान होती. तलवारबाजी, दांडपट्टा आणि रणकौशल्य यांत ते अत्यंत प्रवीण होते. त्यांच्यात धैर्य, शिस्त, निष्ठा आणि नेतृत्वगुण यांचा सुंदर संगम होता.

सुरुवातीला ते बांदल देशमुखांच्या फौजेत कार्यरत होते. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्ताराच्या मोहिमेत बांदल मावळ आपल्या बाजूने घेतला. त्या वेळी बाजीप्रभूंचे शौर्य, प्रामाणिकपणा आणि स्वराज्यावरील निष्ठा पाहून महाराजांनी त्यांना आपल्या विश्वासू सरदारांमध्ये स्थान दिले. त्यानंतर त्यांनी अनेक मोहिमांमध्ये पराक्रम गाजवत स्वराज्याच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले.

इ.स. १६६० मध्ये पन्हाळगडाला सिद्दी जौहरने वेढा दिला. त्या संकटातून छत्रपती शिवाजी महाराजांना सुरक्षितपणे विशाळगडावर पोहोचविण्याची जबाबदारी बाजीप्रभूंनी आपल्या खांद्यावर घेतली. महाराज पुढे निघाले आणि बाजीप्रभूंनी अवघ्या काहीशे मावळ्यांसह घोडखिंडीत हजारो शत्रूंना रोखून धरले.

"विशाळगडावर पोहोचल्याची तोफ ऐकू येईपर्यंत ही खिंड मी लढवीन!" अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. रणांगणात त्यांच्या शरीरावर असंख्य घाव झाले, तरीही त्यांनी तलवार हातातून सोडली नाही. अखेर विशाळगडावरून तोफेचा आवाज ऐकू आला. महाराज सुखरूप पोहोचल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर उमटले आणि स्वराज्यासाठी लढता लढता त्यांनी वीरमरण स्वीकारले.

बाजीप्रभूंच्या या अतुलनीय बलिदानामुळेच छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर सुरक्षित पोहोचले आणि स्वराज्याची ज्योत अधिक तेजाने प्रज्वलित झाली. त्यांच्या पवित्र बलिदानाच्या स्मरणार्थ घोडखिंडीला "पावनखिंड" हे नाव देण्यात आले. आजही ती भूमी प्रत्येक मराठी माणसाला शौर्य, त्याग आणि स्वामिनिष्ठेची प्रेरणा देते.

विद्यार्थी मित्रांनो, बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान हे स्वराज्यासाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागाचे प्रतीक आहे. त्यांचे शौर्य आणि राष्ट्रनिष्ठा आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत राहतात."

चला, त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून आपणही प्रामाणिकपणा, धैर्य, शिस्त आणि राष्ट्रप्रेम या गुणांचा स्वीकार करण्याचा संकल्प करूया.

जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय हिंद !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 

चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 


पहिला प्रश्न - लहानपणापासूनच बाजीप्रभू देशपांडे यांना कशाची आवड होती. ?

बरोबर उत्तर आहे, लहानपणापासूनच बाजीप्रभू देशपांडे यांना व्यायाम, कुस्ती, घोडेस्वारी आणि शस्त्रविद्येची विशेष आवड होती.


दुसरा प्रश्न - सुरुवातीला बाजीप्रभू देशपांडे कोणाच्या फौजेत कार्यरत होते. ?

बरोबर उत्तर आहे, सुरुवातीला बाजीप्रभू देशपांडे बांदल देशमुखांच्या फौजेत कार्यरत होते. 


तिसरा प्रश्न - १६६० मध्ये पन्हाळगडाला कोणी वेढा दिला होता ?

बरोबर उत्तर आहे, १६६० मध्ये पन्हाळगडाला सिद्दी जौहरने वेढा दिला. 


चौथा प्रश्न - कोणत्या गडावरून तोफेचा आवाज ऐकू आल्यावर बाजीप्रभू देशपांडे यांनी वीरमरण स्वीकारले ?

बरोबर उत्तर आहे, विशाळगडावरून तोफेचा आवाज ऐकू आल्यावर बाजीप्रभू देशपांडे यांनी वीरमरण स्वीकारले

शेवटचा पाचवा प्रश्न - बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ घोडखिंडीला कोणते नाव देण्यात आले. ?

बरोबर उत्तर आहे - बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ घोडखिंडीला "पावनखिंड" हे नाव देण्यात आले.


चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏


( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )


संकलन :- नासा येवतीकर, 9423625769


Friday, 10 July 2026

दिनविशेष माहिती - 11 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 

कसे आहात ? मजेत ना !

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आज ११ जुलै अर्थात जागतिक लोकसंख्या दिन त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण लोकसंख्या याविषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग ऐकू या ......


११ जुलै हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्याविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. ११ जुलै १९८७ रोजी जागतिक लोकसंख्या ५ अब्जांपर्यंत पोहोचली होती, ज्याला 'फाइव्ह बिलियन डे' म्हटले गेले. सन १९९० पासून हा दिवस अधिकृतपणे जगभरात साजरा करण्यास सुरुवात झाली

विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या म्हणजे एखाद्या देशात किंवा प्रदेशात राहणाऱ्या लोकांची एकूण संख्या. लोकसंख्या ही देशाची ताकद असली, तरी तिची वाढ योग्य प्रमाणात आणि नियोजनबद्ध असणे आवश्यक आहे. लोकसंख्या झपाट्याने वाढल्यास अन्न, पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवास, वाहतूक आणि पर्यावरण यांवर मोठा ताण येतो. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवरही अतिरिक्त दबाव निर्माण होतो.

आपला भारत देश हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. आज भारताची लोकसंख्या सुमारे १४८ कोटी (१.४७७ अब्ज) इतकी आहे तर चीनची लोकसंख्या सुमारे १४१.२ कोटी (१.४१२ अब्ज) आहे. भारताने २०२३ मध्ये चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला. भारताने २०२३ मध्ये चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला.

कुटुंब नियोजन कार्यक्रमाची आखणी सुरुवातीच्या काळापासून करत आली आहे. १९८० च्या दशकात "हम दो, हमारे दो" हा घोषवाक्य देशभर अत्यंत लोकप्रिय झाला.

लोकसंख्या वाढ ही देशासाठी फायदेशीर पण आहे आणि नुकसानदायक देखील आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदार व जागरूक राहणे गरजेचे आहे. शिक्षणाचा प्रसार, स्त्री-पुरुष समानता, मुलींचे शिक्षण, चांगले आरोग्य, स्वच्छता आणि लहान कुटुंबाचा स्वीकार हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

विद्यार्थी म्हणून आपणही या विषयात योगदान देऊ शकतो. पाणी व अन्नाची नासाडी टाळणे, झाडे लावणे, स्वच्छता राखणे, ऊर्जेची बचत करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि लोकसंख्या व संसाधनांचा योग्य वापर याबाबत समाजात जनजागृती करणे ही आपली जबाबदारी आहे.

चला, आजच्या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आपण सर्वजण "सुशिक्षित, सुदृढ, जागरूक आणि जबाबदार समाज घडवूया" असा संकल्प करूया.


मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 

चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 


पहिला प्रश्न - जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो ?

बरोबर उत्तर आहे, 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो


दुसरा प्रश्न - जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात केव्हा झाली ?

बरोबर उत्तर आहे, १९९० पासून ११ जुलै हा दिवस अधिकृतपणे जागतिक लोकसंख्या दिन म्हणून जगभरात साजरा करण्यास सुरुवात झाली.


तिसरा प्रश्न - आजच्या स्थितीत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता ?

बरोबर उत्तर आहे, भारत हा आजच्या स्थितीत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.


चौथा प्रश्न - भारताची आजची लोकसंख्या किती आहे ?

बरोबर उत्तर आहे, भारताची आजची लोकसंख्या 148 कोटी आहे


शेवटचा पाचवा प्रश्न - १९८० च्या दशकातील प्रसिद्ध घोषवाक्य कोणते ?

बरोबर उत्तर आहे - १९८० च्या दशकातील प्रसिद्ध घोषवाक्य म्हणजे "हम दो, हमारे दो".


ही सर्व माहिती Chat GPT च्या साहाय्याने तयार करण्यात आली आहे. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏


( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )


संकलन :- नासा येवतीकर, 9423625769


पायगुण कथा ( Story Paygun )

विशाल आणि गीता यांच्या संघर्षमय जीवनाची भावस्पर्शी दीर्घकथा                    " पायगुण " कथेचे दहा भाग आणि त्यांचे शी...