Wednesday, 15 July 2026

दिनविशेष माहिती - 16 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात? मजेत ना?

मी नासा येवतीकर. दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनःपूर्वक स्वागत करतो.

आज १६ जुलै. हा दिवस संपूर्ण जगभर "जागतिक सर्पदिन" (World Snake Day) म्हणून पाळला जातो. या दिवसानिमित्त आपण सापांविषयीचे गैरसमज दूर करून त्यांचे पर्यावरणातील महत्त्व जाणून घेणार आहोत.

लक्षपूर्वक ऐका हं ! कारण या माहितीच्या आधारे शेवटी तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.

चला तर मग, आजची माहिती ऐकूया...
दरवर्षी १६ जुलै रोजी जागतिक सर्पदिन साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे सापांबद्दल जनजागृती करणे, त्यांच्याविषयी असलेली भीती आणि अंधश्रद्धा दूर करणे तसेच त्यांचे संरक्षण करण्याचा संदेश देणे.
विद्यार्थी मित्रांनो, साप हा निसर्गातील अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे. तो उंदीर, घूस आणि पिकांचे नुकसान करणाऱ्या इतर प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा तो एक प्रकारे मित्रच आहे.
भारतात सापांच्या जवळपास 300 प्रजाती आढळतात. साप तीन प्रकारचे असतात एक विषारी साप, दुसरे निम विषारी साप आणि तिसरे बिन विषारी साप. त्यामुळे प्रत्येक साप विषारी असतो, हा समज चुकीचा आहे.
भारतात एकूण चार सर्वाधिक विषारी साप आहेत. त्यात नाग हा विषारी साप भारतात बहुतेक ठिकाणी आढळून येतो. 
आपल्याला एखादा साप दिसला तर त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि तात्काळ वनविभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांना माहिती द्यावी. साप पकडण्याचा किंवा त्याच्याशी खेळ करण्याचा प्रयत्न कधीही करू नये.
पावसाळ्यात साप बऱ्याचदा बिळांमधून बाहेर येतात. त्यामुळे घराच्या आसपास स्वच्छता ठेवणे, कचरा किंवा लाकडांचे ढीग साचू न देणे, रात्री टॉर्चचा वापर करणे आणि पायात चप्पल किंवा बूट घालणे या साध्या सवयी अपघात टाळण्यास मदत करतात. सर्प दंश झाल्यावर वेळ न दवडता दवाखान्यात जावे. मांत्रिक किंवा इतर झाडपालाची औषधं खाऊन आपला वेळ वाया घालवू नये.
मित्रांनो, निसर्गातील प्रत्येक सजीवाचे स्वतःचे महत्त्व असते. सापांचे संरक्षण म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण होय. म्हणून आपण सापांबद्दल भीती नव्हे तर योग्य माहिती आणि जागरूकता बाळगली पाहिजे.
चला, जागतिक सर्पदिनानिमित्त आपण असा संकल्प करूया—
"सापांबद्दल अंधश्रद्धा पसरवणार नाही, त्यांचे संरक्षण करू आणि निसर्गातील प्रत्येक सजीवाचा आदर करू."

मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला नक्की कळवा.
आता या माहितीवर आधारित पाच प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहूया.

प्रश्न १ : जागतिक सर्पदिन केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : जागतिक सर्पदिन दरवर्षी १६ जुलै रोजी साजरा केला जातो.

प्रश्न २ : शेतकऱ्यांचा खरा मित्र कोण ?
उत्तर : साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. 

प्रश्न ३ : सापाचे एकूण किती प्रकार आहेत ?
उत्तर : सापाचे एकूण तीन प्रकार आहेत, विषारी साप, निम विषारी साप आणि बिन विषारी साप.

प्रश्न ४ : भारतातील सर्वाधिक विषारी साप कोणता ?
उत्तर : नाग हा भारतातील सर्वाधिक विषारी साप आहे.

प्रश्न ५ : साप दिसल्यास आपण काय करावे?
उत्तर : साप दिसल्यास त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि वनविभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांना माहिती द्यावी.

वरील माहिती सर्पमित्र क्रांती बुद्धेवार यांनी संकलित केले आहे. 

चला, पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात.

तोपर्यंत नमस्कार! 🙏

निवेदन :
नासा येवतीकर, धर्माबाद
📞 ९४२३६२५७६९

No comments:

Post a Comment

दिनविशेष माहिती - 16 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर. दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनःपूर्वक स्वाग...