Wednesday, 4 March 2026

राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस - 6 मार्च ( National Dentist Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस याविषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

🦷 National Dentist Day - राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस
दरवर्षी 6 मार्च रोजी राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस साजरा केला जातो. हा दिवस दंतचिकित्सकांच्या मेहनतीला आणि योगदानाला सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो. दंतचिकित्सक केवळ दातांची देखभालच करत नाहीत, तर तोंडाच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतात. तोंडाचे आरोग्य हे संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
दात हे केवळ अन्न चावण्यासाठी नसून, बोलताना उच्चार स्पष्ट होण्यासाठी, चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी, पचन क्रिया सुलभ करण्यासाठी आणि एकूण आरोग्यासाठीही दातांची महत्त्वाची भूमिका असते. लहान मुलांमध्ये साधारणपणे 20 दात असतात, ज्याला दुधाचे दात म्हटले जाते. तर प्रौढ माणसाला 32 दात असतात. 
दातांची योग्य काळजी न घेतल्यास दातांना किड लागणे, हिरड्यांचे आजार, दुर्गंधी आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. 
दंतचिकित्सक (Dentist) म्हणजे दाताचे डॉक्टर हे दात आणि तोंडाच्या आजारांचे निदान, उपचार आणि प्रतिबंध करतात.
दातांची तपासणी व स्वच्छता करतात. 
किडलेले दात भरणे, दात उपटणे किंवा रूट कॅनल उपचार, दात सरळ करण्यासाठी ब्रेसेस लावणे, तोंडाच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करणे, दाताच्या डॉक्टरांचे कार्य आरोग्यसेवेतील अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. 
मुलांनो, आपण आपल्या दातांची काळजी कशी घ्यावी ?
दिवसातून किमान दोन वेळा दात स्वच्छ केले पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी. गोड पदार्थ खाल्याने आपले दात किडके होऊ शकतात. म्हणून गोड पदार्थ कमी प्रमाणात खावेत. दर सहा महिन्यांनी दाताच्या डॉक्टरांकडे तपासणी करावी. स्वच्छतेची सवय लहानपणापासून लावावी. दात निरोगी असतील तर शरीरही निरोगी राहते. त्यामुळे दातांची योग्य काळजी घेणे आणि दंत चिकित्सकांच्या सल्ल्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
राष्ट्रीय दंत चिकित्सक दिनानिमित्त दंतचिकित्सकांच्या सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त केली जाते तसेच तोंडाच्या स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाते. “स्वच्छ दात, निरोगी जीवन” हा संदेश या दिवसातून दिला जातो. हा दिवस लोकांना दातांचे आरोग्य जपण्यासाठी प्रेरणा देतो. दंतचिकित्सक हे केवळ वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ नसतात, तर लोकांच्या आत्मविश्वासाचे आणि सुंदर हास्याचे शिल्पकार असतात.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 
पहिला प्रश्न - दरवर्षी 6 मार्च रोजी कोणता दिवस साजरा केला जातो ?
बरोबर उत्तर आहे, दरवर्षी 6 मार्च रोजी राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस साजरा केला जातो.

दुसरा प्रश्न - लहान मुलांच्या दाताला काय म्हणतात ?
बरोबर उत्तर आहे, लहान मुलांच्या दाताला दुधाचे दात म्हणतात.

तिसरा प्रश्न - प्रौढ माणसाला किती दात असतात ?
बरोबर उत्तर आहे, प्रौढ माणसाला 32 दात असतात. 

चौथा प्रश्न - दिवसातून किमान किती वेळा दात स्वच्छ केले पाहिजे ?
बरोबर उत्तर आहे, दिवसातून किमान दोन वेळा दात स्वच्छ केले पाहिजे.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - गोड पदार्थ कमी प्रमाणात का खावे त्याचे कारण सांगा. 
बरोबर उत्तर आहे - गोड पदार्थ खाल्याने आपले दात किडके होऊ शकतात. म्हणून गोड पदार्थ कमी प्रमाणात खावेत.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

No comments:

Post a Comment

राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस - 6 मार्च ( National Dentist Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !   मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण ...