नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण जागतिक महिला दिन याविषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
🌸 International Women's Day - जागतिक महिला दिन (८ मार्च)
दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन जगभरात साजरा केला जातो. हा दिवस स्त्रियांच्या अधिकारांचे, कर्तृत्वाचे आणि समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे स्मरण करून देणारा आहे. स्त्री-पुरुष समानता, महिलांचे हक्क आणि त्यांचे सशक्तीकरण याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
जागतिक महिला दिनाची सुरुवात १९०८ साली अमेरिकेत झाली. त्या वेळी महिलांनी कामाचे तास कमी करावेत, चांगला पगार मिळावा आणि मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी आंदोलन केले. त्यानंतर १९१० साली डेन्मार्कमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत दरवर्षी महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. पुढे १९७५ साली संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृतपणे ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून मान्यता दिली.
समाजाच्या प्रगतीत महिलांचा मोठा वाटा आहे. शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा, कला, उद्योग इत्यादी अनेक क्षेत्रांत महिलांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. तरीही अनेक ठिकाणी महिलांना भेदभाव, अन्याय आणि असमानतेला सामोरे जावे लागते. त्यामुळे महिला दिन हा स्त्रियांच्या अधिकारांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा आणि समानतेचा संदेश देण्याचा दिवस आहे.
भारतातील अनेक महिलांनी समाजासाठी प्रेरणादायी व महान कार्य केले आहे.
छोटे बाळ पाठीशी बांधून इंग्रजाच्या विरुद्ध लढा देणारी झांशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री व प्रेरणादायी व्यक्तिमत्व राजमाता जिजाऊ, ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून मुलींच्या शिक्षणाची चळवळ उभी केली अशी
भारतातील पहिली महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, हिंदू मंदिरांची बांधणी आणि जीर्णोद्धार करणारी न्यायप्रिय राज्यकर्ती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, अंतराळात जाणारी पहिली भारतीय वंशाची महिला अंतराळवीर, ज्यांनी अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल करणारी कल्पना चावला, जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदके जिंकून भारताचा गौरव वाढविणारी भारतीय महिला बॉक्सर मेरी कोम, भारतातील पहिली महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून भारताला अनेक पदके मिळवून देणारी भारताची प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा, ज्यांनी हजारो गाणी गाऊन भारतीय संगीताला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली अशी भारताची गानकोकिळा लता मंगेशकर, ज्यांनी शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा क्षेत्रात मोठे कार्य केले असे प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला बछेंद्री पाल आणि भारतातील पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू
यांसारख्या अनेक महिलांनी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करून मोठे यश मिळवले आणि देशाचा गौरव वाढवला आहे. यासोबतच घरोघरी दिवसरात्र राबणाऱ्या गृहिणीचे योगदान विसरता येणार नाही. त्यांच्या महान कार्यामुळे आजच्या पिढीला नक्कीच प्रेरणा मिळते.
जागतिक महिला दिन हा केवळ साजरा करण्याचा दिवस नसून महिलांना समान हक्क, सन्मान आणि संधी देण्याची आठवण करून देणारा दिवस आहे. समाजाच्या विकासासाठी स्त्री-पुरुष समानता आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने महिलांचा आदर करावा, त्यांना शिक्षण व संधी द्याव्यात आणि त्यांचे सशक्तीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
✅ “जिथे स्त्रीचा सन्मान होतो, तिथेच समाजाची खरी प्रगती होते.”
“स्त्रीशक्ती हीच राष्ट्रशक्ती” हे या दिवसाचे खरे सार आहे. समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचा सन्मान आणि सहभाग आवश्यक आहे. 🌷
जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनीना खूप खूप शुभेच्छा .......!
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - जागतिक महिला दिनाची सुरुवात कोठे झाली ?
बरोबर उत्तर आहे, जागतिक महिला दिनाची सुरुवात अमेरिकेत झाली.
दुसरा प्रश्न - भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून कोणास ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, आनंदीबाई जोशी यांना भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळखले जाते ,
तिसरा प्रश्न - अंतराळात जाणारी पहिली भारतीय वंशाची महिला अंतराळवीर कोण ?
बरोबर उत्तर आहे, कल्पना चावला अंतराळात जाणारी पहिली भारतीय वंशाची महिला अंतराळवीर होय.
चौथा प्रश्न - भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या ?
बरोबर उत्तर आहे, सरोजिनी नायडू हे भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या.
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - मेरी कोम ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
बरोबर उत्तर आहे - मेरी कोम ही खेळाडू बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment