नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण कवी यशवंत यांच्या विषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढारकर)
कवी यशवंत हे मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी होते. त्यांनी “यशवंत” या टोपणनावाने कविता लिहिल्या आणि मराठी कवितेला नवे सौंदर्य व भावस्पर्शी शैली दिली. त्यांच्या कवितांमध्ये प्रेम, देशभक्ती, सामाजिक जाणीव आणि मानवी भावना यांचे सुंदर चित्रण आढळते. त्यामुळे ते मराठी साहित्यातील महत्त्वाचे कवी मानले जातात.
कवी यशवंत यांचे पूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढारकर असे होते. त्यांचा जन्म ९ मार्च १८९९ रोजी सातारा जिल्ह्यातील तारळे (किंवा चाफळ परिसर) येथे झाला. सांगलीतील सिटी हायस्कूलमधून डिपार्टमेंट स्कूल फायनलच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. पुढे ते पुणे येथे नोकरीसाठी गेले. नोकरी करत असताना त्यांनी मराठी साहित्याचा अभ्यास केला. कवी माधव ज्यूलियन यांच्या सहवासात त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. पुण्यात राहात असताना ते ‘रविकिरण मंडळ’ या कवींच्या गटाशी जोडले गेले. या मंडळातील कवींनी महाराष्ट्रात काव्यवाचन कार्यक्रमांद्वारे मराठी कवितेचा प्रसार केला. यशवंत यांचा आवाज मधुर असल्यामुळे त्यांच्या काव्यवाचनाला मोठी लोकप्रियता मिळाली. कवी यशवंत यांना महाराष्ट्र कवी म्हणून गौरवाने उल्लेखले जाते. ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते. काव्य ही एक उपासना आहे, ते एक व्रत आहे, अशी त्यांच्या मनाची धारणा होती.
त्यांच्या कवितांमध्ये भावनांची तीव्रता, ओजस्वीपणा आणि साधी-सोप्या भाषेचा वापर दिसतो. त्यामुळे सामान्य लोकांनाही त्यांची कविता सहज समजते.
कवी यशवंत यांनी अनेक काव्यसंग्रह लिहिले. याशिवाय त्यांनी मुलांसाठीही काही कविता लिहिल्या. त्यांची घायाळ ही अनुवादीत कादंबरी खूप प्रसिद्ध झाली. सन १९२२ मध्ये लिहिलेल्या "आई' या कवितेतील गोडवा आजही कायम आहे. ते म्हणतात,
आई म्हणोनि कोणी
आईस हाक मारी,
ती हाक येई कानी
मज होय शोककारी.
स्वामी तिन्ही जगांचा
आईविना भिकारी
या ओळींमध्ये कवी यशवंत यांनी आईचे प्रेम, माया आणि तिचे महत्त्व अतिशय भावपूर्ण पद्धतीने व्यक्त केले आहे.
कवी यशवंत यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक सन्मान मिळाले. त्यांना ‘राजकवी’ हा किताब देण्यात आला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा सन्मान दिला. सन १९५० मध्ये मुंबईत भरलेल्या ३३ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
कवी यशवंत यांचे २६ नोव्हेंबर १९८५ रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांनी आपल्या कवितांद्वारे मराठी साहित्य समृद्ध केले.
कवी यशवंत हे मराठी काव्यविश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी कवी होते. त्यांच्या कवितेत मानवी भावना, राष्ट्रप्रेम आणि समाजजीवनाचे वास्तव दिसते. साधी, गेय आणि भावस्पर्शी शैली ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे मराठी साहित्यात त्यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे.
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - कवी यशवंत यांचे पूर्ण नाव सांगा.
बरोबर उत्तर आहे, कवी यशवंत यांचे पूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढारकर असे होते.
दुसरा प्रश्न - कवी यशवंत कोणत्या संस्थानाचे राजकवी होते ?
बरोबर उत्तर आहे, कवी यशवंत बडोदा संस्थानाचे राजकवी होते.
तिसरा प्रश्न - खूप प्रसिद्ध झालेली कवी यशवंत यांनी अनुवादीत केलेल्या कादंबरीचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, घायाळ ही कवी यशवंत यांनी अनुवादीत केलेली कादंबरी खूप प्रसिद्ध झाली.
चौथा प्रश्न - सन १९५० मध्ये ३३ वे मराठी साहित्य संमेलन कोठे भरले होते ?
बरोबर उत्तर आहे, सन १९५० मध्ये ३३ वे मराठी साहित्य संमेलन मुंबई येथे भरले होते.
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - कवी यशवंत यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे - कवी यशवंत यांचा जन्म ९ मार्च १८९९ रोजी सातारा जिल्ह्यातील तारळे (किंवा चाफळ परिसर) येथे झाला.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment