Saturday, 7 February 2026

दिनविशेष माहिती - 01 जानेवारी

डॉ. शांती स्वरूप भटनागर पुण्यतिथी 

डॉ. शांती स्वरूप भटनागर (21 फेब्रुवारी 1894 – 1 जानेवारी 1955) हे भारतातील थोर वैज्ञानिक, संशोधन संघटक आणि आधुनिक भारतीय विज्ञानाचे शिल्पकार मानले जातात. त्यांनी देशात वैज्ञानिक संशोधनाची भक्कम पायाभरणी केली आणि औद्योगिक विकासासाठी विज्ञानाचा प्रभावी वापर घडवून आणला.
भटनागर यांचा जन्म पंजाबमधील भेरा (आताचे पाकिस्तानातील सरगोधा जिल्हा) येथे झाला. बालपणापासूनच त्यांना विज्ञानाची आवड होती. त्यांनी लाहोर येथील डी.ए.व्ही. कॉलेज आणि नंतर लंडन विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले. परदेशात शिक्षण पूर्ण करून ते भारतात परतले आणि विज्ञान संशोधनाला राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी स्वतःला वाहून घेतले.
त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठ आणि नंतर पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या संशोधन कार्यामुळे औद्योगिक समस्या सोडविण्यात विज्ञानाचा वापर वाढला. विशेषतः तेल उद्योग, रंगनिर्मिती, काच उद्योग आणि धातुकर्म क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले.
डॉ. भटनागर हे भारतातील ‘वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद’ (CSIR) चे संस्थापक महासंचालक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरात अनेक राष्ट्रीय प्रयोगशाळा स्थापन झाल्या. त्यामुळे भारतात संघटित वैज्ञानिक संशोधनाला दिशा व गती मिळाली.
त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना 1954 साली ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या स्मरणार्थ ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार’ सुरू करण्यात आला असून तो भारतातील तरुण वैज्ञानिकांसाठी अत्यंत प्रतिष्ठित मानला जातो.
डॉ. शांती स्वरूप भटनागर यांचे जीवन हे विज्ञानसेवेचे, राष्ट्रनिर्मितीचे आणि संशोधनसंस्कृतीच्या विकासाचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या कार्यामुळे भारत आधुनिक विज्ञानाच्या मार्गावर भक्कमपणे उभा राहिला.

दिनविशेष माहिती - 16 जानेवारी

*न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे*

महादेव गोविंद रानडे हे आधुनिक महाराष्ट्राचेअत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. समाजसुधारक, न्यायमूर्ती, अर्थतज्ज्ञ, इतिहासकार, लेखक आणि विवेकवादी विचारवंत अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय समाजाच्या परिवर्तनासाठी आयुष्यभर कार्य केले.
महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जानेवारी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांच्यावर संस्कृत, धर्मग्रंथ व भारतीय परंपरांचा प्रभाव होता. पुढे त्यांनी पुणे व मुंबई येथे उच्च शिक्षण घेतले. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय होते. पाश्चात्त्य शिक्षणामुळे त्यांना विवेकवाद, लोकशाही व मानवतावादी विचारांची ओळख झाली.
रानडे यांची १८९३ साली मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. न्यायमूर्ती म्हणून त्यांनी कायद्याची अंमलबजावणी करताना सामाजिक न्याय, नैतिकता व मानवतावाद यांना विशेष महत्त्व दिले. त्यांनी कायद्याकडे केवळ नियम म्हणून नव्हे, तर समाजहिताचे साधन म्हणून पाहिले.
महादेव गोविंद रानडे यांनी मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. त्यांनी एकेश्वरवाद, नैतिकता, विवेक व सामाजिक समतेचा पुरस्कार केला. भारतीय समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, अस्पृश्यता, बालविवाह आणि स्त्रियांचे दुय्यम स्थान यांविरुद्ध ठामपणे आवाज उठवला.
विधवाविवाहाचा पुरस्कार करणे हे त्या काळात धाडसाचे मानले जात होते; तरीही रानडे यांनी या विषयावर लेखन, व्याख्याने व संघटनात्मक कार्य केले. स्त्रीशिक्षणाशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता.
रानडे यांच्या सामाजिक कार्यात त्यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांचा मोलाचा वाटा होता. बालविवाहामुळे त्यांचे शिक्षण थांबले होते; मात्र रानडे यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी शिक्षण घेतले व पुढे त्या स्त्रीशिक्षण, विधवा पुनर्वसन व महिला संघटनांच्या कार्यात अग्रणी ठरल्या.
महादेव गोविंद रानडे हे एक प्रखर अर्थचिंतक होते. स्वदेशी उद्योग, सहकार, औद्योगिकीकरण व शिक्षण यांद्वारे देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो, असे ते मानत.
रानडे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेशी संबंधित होते. ते मवाळ राजकारणाचे समर्थक होते. ब्रिटिश सत्तेशी संघर्षाऐवजी चर्चा, सुधारणा व घटनात्मक मार्गाने स्वराज्य मिळवावे, असा त्यांचा दृष्टिकोन होता. गोपाळ कृष्ण गोखले यांसारख्या नेत्यांवर त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव पडला.
रानडे यांचे लेखन इतिहास, धर्म, अर्थशास्त्र व समाजसुधारणा या विषयांवर आधारित होते.
त्यांच्या लेखनात भारतीय परंपरा व पाश्चात्त्य विचारसरणी यांचा समन्वय दिसून येतो. समाजात बदल हळूहळू, पण मूलभूत पातळीवर घडवून आणला पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता.
इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्षही होते. 
महादेव गोविंद रानडे हे केवळ एका व्यक्तीचे नाव नसून, ते आधुनिक महाराष्ट्राच्या विवेकवादी परंपरेचे प्रतीक आहेत. समाज सुधारण्यासाठी धैर्य, संयम, ज्ञान व करुणा आवश्यक असते, हे त्यांनी आपल्या जीवनकार्याने सिद्ध केले. त्यामुळेच भारतीय समाजप्रबोधनाच्या इतिहासात त्यांचे स्थान अढळ आहे.
दिनांक १६ जानेवारी १९०१ रोजी पुणे येथे महादेव गोविंद रानडे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक दूरदर्शी विचारवंत गमावला. तथापि, त्यांच्या विचारांचा वारसा आजही समाजसुधारणा, स्त्रीशिक्षण, आर्थिक नियोजन व विवेकवादाच्या क्षेत्रात मार्गदर्शक ठरतो.
आज त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन 
*संकलन*

दिनविशेष माहिती - 15 जानेवारी

खाशाबा जाधव – भारतीय कुस्तीचा तेजस्वी तारा

खाशाबा दादासाहेब जाधव हे भारताच्या क्रीडाक्षेत्रातील एक महान कुस्तीगीर होते. त्यांनी भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले आणि देशाच्या क्रीडा ईतिहासात अजरामर स्थान प्राप्त केले. 
खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वर या छोट्याशा गावात झाला. लहानपणापासूनच खाशाबा जाधव यांना कुस्तीची आवड होती. त्याचे वडील दादासाहेब जाधव हे कुस्ती खेळाचे वस्ताद होते. ते त्यांना वयाच्या ५ व्या वर्षापासून मार्गदर्शन करीत होते. ग्रामीण वातावरणात मातीच्या आखाड्यात त्यांनी कुस्तीचे प्राथमिक धडे घेतले. आर्थिक अडचणी, अपुरी साधने आणि मर्यादित सुविधा असूनही त्यांनी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपले कौशल्य विकसित केले. त्यांच्या कुटुंबाने आणि गुरूंनी त्यांना सतत प्रोत्साहन दिले.
१९५२ साली हेलसिंकी (फिनलंड) येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी कुस्तीच्या फ्री-स्टाईल प्रकारात कांस्य पदक ( ब्रांझ मेडल ) पटकावले. हे भारतासाठी ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक पदक होते. या ऐतिहासिक यशामुळे त्यांनी संपूर्ण देशाचे नाव उज्ज्वल केले. त्या काळात परदेशी खेळाडूंशी सामना करणे अत्यंत कठीण होते, तरीही खाशाबा जाधव यांनी आपल्या ताकदीने आणि तंत्राने जागतिक स्तरावर आपली छाप उमटवली.
ऑलिम्पिकनंतर त्यांनी काही काळ पोलीस सेवेत काम केले आणि तरुण पिढीला कुस्तीचे प्रशिक्षण देण्याचे कार्यही केले. मात्र, त्यांच्या आयुष्यातील उत्तरार्धात त्यांना अपेक्षित असा सन्मान मिळाला नाही. तरीही त्यांचे योगदान भारतीय क्रीडाजगतात अमूल्य आहे.
खाशाबा जाधव यांचे निधन १४ ऑगस्ट १९८४ रोजी झाले. सन २००१ मध्ये त्यांना अतिशय प्रसिद्ध असा अर्जुन आवार्ड देण्यात आला. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने विविध उपक्रम सुरू केले असून, त्यांच्या नावाने पुरस्कार आणि क्रीडांगणे उभारण्यात आली आहेत.
खाशाबा जाधव यांचे जीवन हे संघर्ष, चिकाटी आणि देशभक्तीचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी दाखवून दिले की कठीण परिस्थितीतूनही कठोर परिश्रम आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर महान यश मिळवता येते. त्यामुळेच ते भारतीय कुस्तीचे आणि क्रीडाक्षेत्राचे अभिमानस्तंभ मानले जातात.
*संकलन*

दिनविशेष माहिती - 14 जानेवारी

भूगोल दिन 
भूगोल हा पृथ्वीचा तसेच पृथ्वीवरील नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारा महत्त्वाचा विषय आहे. पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा, हवामान, वनस्पती, प्राणी तसेच मानव व त्याच्या क्रियाकलापांचा परस्पर संबंध भूगोलामध्ये अभ्यासला जातो. या विषयाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि भौगोलिक जाणीव वाढवण्यासाठी भूगोल दिन साजरा केला जातो.
14 जानेवारीपासून दिवस तिळा तिळाने मोठा होतो याच दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. हा दिवस आपण  मकरसंक्रात म्हणून उत्साहाने साजरा करत असतो. तसेच संपूर्ण भारतात 14 जानेवारी हा दिवस महर्षि डॉ. सी. डी. देशपांडे यांचा जन्मदिवस राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो.
 डॉ. सी. डी. देशपांडे यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात १४ जानेवारी १९१२ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर धुंडिराज देशपांडे. डॉ. देशपांडे हे शिक्षक, शिक्षणतज्ञ, लेखक, भूगोलतज्ञ, भूगालाचे गाढे अभ्यासक म्हणून  प्रसिद्ध होते. भूगोल विषयाच्या विकासात त्यांचे महत्वाचे योगदान आहे. या विषयास शास्त्राचा दर्जा प्राप्तीमध्ये अनेक प्रकारे उद्बोधन करण्याचे कार्य त्यांनी केले. शाळा व कॉलेज मध्ये भूगोल विकासासाठी प्रयत्न केले. मुंबई विद्यापीठात स्वतंत्र भूगोल विभागाच्या स्थापनेत त्यांचा महत्वाचा वाटा आहे. National Association of Geographers, India ची स्थापना केली. डॉ. सी. डी. देशपांडे हे भूगोल विषयातील अत्यंत जाणकार व्यक्ती मानले जातात. त्यांचे भूगोलाचे ज्ञान अफलातून होते, त्यामुळे त्यांना भूगोल महर्षी असे म्हटले जाते. 
भूगोल महर्षी डॉ. सी. डी. देशपांडे यांनी भूगोल विषयात केलेले अतुलनीय कार्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि भूगोलाची सर्वांना ओळख व्हावी या हेतूने भूगोल तज्ञ डॉ. सुरेश गरसोळी यांनी १४ जानेवारी १९९० रोजी महाराष्ट्रात सर्वप्रथम भूगोल दिन साजरा करण्यास सुरुवात केली. तर भारत सरकारने 1996 पासून 14 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
भूगोल दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक नागरिकांत पृथ्वीविषयी जागरूकता निर्माण करणे. आजच्या काळात वाढते प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल, जागतिक तापमानवाढ यांसारख्या समस्या गंभीर बनत चालल्या आहेत. या समस्यांचे कारण व परिणाम समजून घेण्यासाठी भूगोलाचे ज्ञान अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे भूगोल दिनाचे महत्त्व अधिक वाढले आहे.
भूगोल विषयामुळे आपल्याला नैसर्गिक साधनसंपत्तीची माहिती मिळते. पाणी, माती, खनिजे, वनसंपत्ती यांचा योग्य व शाश्वत वापर कसा करावा हे भूगोल शिकवतो. तसेच पूर, दुष्काळ, भूकंप, ज्वालामुखी, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास करून त्यांच्या परिणामांपासून संरक्षण कसे करावे याचीही माहिती मिळते.
भूगोल हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो जीवनाशी निगडित आहे. मानवाचे जीवनमान, शेती, उद्योग, वाहतूक, लोकसंख्या वितरण आणि आर्थिक विकास या सर्वांवर भौगोलिक घटकांचा मोठा प्रभाव असतो. म्हणूनच भूगोलाचे ज्ञान प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आहे.
एकूणच, भूगोल दिन आपल्याला पृथ्वीचे महत्त्व ओळखून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची प्रेरणा देतो. पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरण निर्माण करण्यासाठी भूगोलाचे ज्ञान उपयोगी पडते. म्हणूनच भूगोल दिन साजरा करणे हे काळाची गरज आहे.
*संकलन*

दिनविशेष माहिती 13 जानेवारी


राकेश शर्मा - भारतीय अंतराळवीर

राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर असून त्यांनी भारताचा झेंडा अंतराळात फडकावण्याचा ऐतिहासिक मान मिळवला. त्यांचा जन्म १३ जानेवारी १९४९ रोजी पाटणा (बिहार) येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना विज्ञान, आकाश आणि उड्डाण याविषयी विशेष आकर्षण होते.
राकेश शर्मा यांनी भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून सेवा बजावली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची निवड अंतराळ मोहिमेसाठी करण्यात आली. ३ एप्रिल १९८४ रोजी ते सोयुझ टी-११ (Soyuz T-11) या रशियन अंतराळयानातून अंतराळात गेले. ही मोहीम भारत व सोव्हिएत रशिया यांच्यातील सहकार्याचे प्रतीक होती.
राकेश शर्मा यांनी जवळपास ८ दिवस अंतराळात वास्तव्य केले. या काळात त्यांनी पृथ्वीचे निरीक्षण, वैज्ञानिक प्रयोग तसेच भारताशी संबंधित छायाचित्रण केले. जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना “अंतराळातून भारत कसा दिसतो?” असा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर –
“सारे जहाँ से अच्छा” – हे उत्तर आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाने कोरले गेले आहे.
अंतराळ मोहिमेनंतर राकेश शर्मा यांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल अशोक चक्र या भारताच्या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते एकमेव अंतराळवीर आहेत. नंतर त्यांनी भारतीय हवाई दलातून निवृत्ती घेतली आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) येथे चाचणी वैमानिक म्हणून काम केले.
राकेश शर्मा यांचे जीवन धैर्य, कष्ट, देशभक्ती आणि विज्ञाननिष्ठेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांनी भारताला जागतिक स्तरावर अंतराळ क्षेत्रात ओळख मिळवून दिली. त्यामुळेच ते भारतीय तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत.

Friday, 6 February 2026

दिनविशेष माहिती - 07 फेब्रुवारी ( 07 February )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण माता रमाई आंबेडकर यांच्या विषयी माहिती पाहू या.

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी 
   माता रमाई आंबेडकर येथे clik करावे.

रमाबाई भीमराव आंबेडकर अर्थात रमाई आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्‍नी होत्या. रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1897 रोजी एका गरीब कुटुंबात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे झाला. त्यांच्या वडीलांचे नाव भिकू धुत्रे (वलंगकर) तर आईचे नाव रुक्मिणी होते. रमाई लहान असतानाच त्यांच्या आईचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाईच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडिलांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा यांनी त्यांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी यांना रमाई पसंत पडली. रमाई व डॉ. बाबासाहेबांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १५ वर्षे तर रमाईचे वय अवघे ९ वर्षे होते. 
माता रमाई यांनी जीवनात फार दुःख सहन करावे लागले. स्वाभिमानी पतीची ते स्वाभिमानी पत्‍नी होत्या. जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती. मृत्युसत्र, दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईने प्रत्यक्ष डोळ्यांनी अनेक मरणे पाहिली. 
परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दुःखाची झळ पोहचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकट्या पडल्या. घर चालवण्यासाठी त्यांनी शेण गोवऱ्या वेचल्या,  सरपणासाठी वणवण फिरल्या. बॅरिस्टराची पत्‍नी शेण वेचते म्हणून लोकं नावे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री लोकं झोपी गेल्यानंतर गोवऱ्या थापायला जात असत.
रमाईने आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना रामू या नावाने हाक मारत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या.
आजारपणामुळे दिनांक 27 मे 1935 रोजी मुंबईत रमाईची प्राणज्योत मावळली म्हणजे निधन झाले.
रमाई आंबेडकर यांचे जीवन त्याग, सहनशीलता आणि सेवाभावाचे प्रतीक आहे. आज या महान माता रमाई यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांना कोटी कोटी प्रणाम 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - माता रमाई यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, माता रमाई यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे झाला.

पहिला प्रश्न - माता रमाई यांच्या पतीचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माता रमाई यांचे पती होते. 

तिसरा प्रश्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचे लग्न कोठे झाले ?
बरोबर उत्तर आहे, मुंबईच्या भायखळा भाजी मार्केटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईयांचे लग्न झाले.


चौथा प्रश्न - डॉ. बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांना कोणत्या नावाने हाक मारत असत ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांना रामू या नावाने हाक मारत असत ?

शेवटचा पाचवा प्रश्न - माता रमाईचे निधन केव्हा झाले ? 
बरोबर उत्तर आहे - 27 मे 1935 रोजी मुंबई येथे माता रमाईचे निधन झाले.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 07 जानेवारी ( 07 Januuary )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 

मी नासा येवतीकर, आपल्यासाठी घेऊन आलोय दिनविशेष माहिती. आजच्या कार्यक्रमात आपण स्वातंत्र्यसैनिक जानकी देवी बजाज यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
स्वातंत्र्यसैनिक जानकी देवी बजाज
जानकी देवी बजाज या एक थोर गांधीवादी समाजसेविका, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती जमनालाल बजाज यांच्या पत्नी होत्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला, अस्पृश्यता निवारण, महिला शिक्षण आणि ग्रामसेवेसाठी काम केले
जानकी देवी यांचा जन्म ७ जानेवारी १८९३ रोजी मध्य प्रदेशातील जोरा येथे एका वैष्णव-मारवाडी कुटुंबात झाला 
वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी त्यांचा विवाह जमनालाल बजाज यांच्याशी झाला. बजाज उद्योगसमूह हा एक भारतीय बहुराष्ट्रीय समूह आहे ज्याची स्थापना जमनालाल बजाज यांनी १९२६ मध्ये मुंबईत केली होती. प्रमुख कंपनी बजाज ऑटो ही जगातील चौथी सर्वात मोठी दुचाकी आणि तीन-चाकी वाहन उत्पादक कंपनी आहे. लग्नानंतर त्या महाराष्ट्रातील वर्धा येथे आल्या आणि बजाज कुटुंबाच्या श्रीमंत वातावरणात राहू लागल्या, परंतु म. गांधीजींच्या प्रभावामुळे त्यांनी साधे जीवन स्वीकारले. त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय भाग घेतला, ज्यासाठी त्यांना १९३२ मध्ये तुरुंगवासही भोगावा लागला १९२१ मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी होणाऱ्या त्या मोजक्या महिलांपैकी एक होत्या. त्यांनी चरख्यावर खादी कातणे, अस्पृश्यता नष्ट करणे आणि गोसेवेसाठी मोठे योगदान दिले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी विनोबा भावे यांच्यासोबत भूदान चळवळीत काम केले. महिलांच्या शिक्षणाला आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या मुलाचे नाव कमलनयन बजाज असे होते.
सन १९५६ मध्ये भारत सरकारने त्यांना त्यांच्या समाजसेवेबद्दल प्रतिष्ठित 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित केले.
त्यांनी १९६५ मध्ये 'मेरी जीवन यात्रा' नावाचे आत्मचरित्र प्रकाशित केले. ज्यात त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टीचा उलगडा केलेला आहे. 
दिनांक २१ मे १९७९ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ ग्रामीण विकासातील योगदानासाठी महिला उद्योजकांना 'जानकीदेवी बजाज पुरस्कार' दिला जातो.
आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने कोटी कोटी प्रणाम 🙏

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - जानकी देवी बजाज यांचा जन्म कोणत्या कुटुंबात झाला 
बरोबर उत्तर आहे, जानकी देवी बजाज यांचा जन्म वैष्णव-मारवाडी कुटुंबात झाला.

दुसरा प्रश्न - जानकी देवी बजाज यांचा विवाह कोणाशी झाला ?
बरोबर उत्तर आहे, जानकी देवी बजाज यांचा विवाह जमनालाल बजाज यांच्याशी झाला.

तिसरा प्रश्न - जानकी देवी यांनी लिहिलेल्या आत्मचरित्र पुस्तकाचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, 'मेरी जीवन यात्रा' जानकी देवी यांनी लिहिलेल्या आत्मचरित्र पुस्तकाचे नाव होते.

चौथा प्रश्न - जानकी देवी यांच्या मुलाचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, जानकी देवी यांच्या मुलाचे नाव कमलनयन बजाज असे होते.

शेवटचा पाचवा प्रश्न - भारत सरकारने जानकी देवी यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले ?
बरोबर उत्तर आहे - भारत सरकारने जानकी देवी यांना 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित केले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 29 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम गुरुपौर्णिमा विशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर. आपल्या दिनविशेष माहिती का...