Sunday, 15 January 2023

शृंगार मनाचे काव्यसंग्रह ( Shrungar Manache )

[ मंगळवारी 17 जानेवारी रोजी थोर विचारवंत व साहित्यिक मा. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने नासा येवतीकर यांनी करून दिलेला पुस्तक परिचय ]

मानवी मनाचा वेध घेणारा काव्यसंग्रह शृंगार मनाचे


कवी पांडुरंग आडबलवाड हे धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे हायस्कूलमध्ये गेल्या 32 वर्षांपासून मराठी विषयाचे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले आणि वसतिगृहात राहून 'कमवा व शिका' या तत्वानुसार त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. कुटुंबाचे दारिद्र्य संपविण्यासाठी त्यांनी शिक्षकाची नोकरी मिळविली. 
मराठी विषयाचा गाढा अभ्यास असल्याने त्यांच्याकडे भरपूर शब्दसंपत्ती आहे. त्याच बळावर त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक, आध्यात्मिक धार्मिक, नैसर्गिक व चालू घडामोडीवर आशयघन, यमकबद्ध , समाजाभिमुख कविता लिहिल्या आहेत. आजपर्यंत त्यांच्या विविधाऺगी अनेक कविता महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रातून प्रकाशित झाल्या असून अनेक कवितांना राज्यस्तरीय पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. त्यातील सर्वोत्कृष्ट तारा॑कित बक्षीस प्राप्त कविता " शृंगार मनाचे " काव्यसंग्रह स्वरुपात वाचकांसमोर विस्तृत स्वरूपात ठेवली आहे. 
या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्रातील थोर विचारवंत, लेखक, साहित्यिक, 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी प्रस्तावना देऊन काव्यसंग्रहाची उंची वाढविली आहे तर सुप्रसिध्द काद॑बरीकार आणि साहित्यिक देवीदास फुलारी या॑नी त्यांच्या काव्यसंग्रहाची पाठराखण केली आहे. या संग्रहात विजेत्या 85 उत्कृष्ट रचनेचा समावेश करण्यात आला आहे.
प्रत्येकाच्या जीवनात आईचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. फुलात फूल जाईचे, जगात प्रेम आईचे असे म्हटले जाते. कवी पांडुरंग आडबलवाड यांच्या कविता वाचतांना पूज्य साने गुरुजी यांची प्रकर्षाने आठवण येते. कवी सहा महिन्यांचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे त्यांना आईचे सुख-दुःख, आईची तगमग आणि मेहनत जवळून पाहता आले, आईशिवाय त्यांना कुणाचा आधार नव्हता म्हणूनच ते पहिलीच कविता माय माझी मध्ये म्हणतात,

माय माझी वृक्ष । वृक्षांची सावली
एकच माऊली । जगामधी ।।

कवींनी उभ्या आयुष्यात अनेक दुःखाचा सामना केला. अश्या कठीण प्रसंगात आपली जोडीदार भक्कमपणे सोबत उभी होती. म्हणूनच ते ही भक्कम उभे राहू शकले. त्यास्तव ते वाचकांना आयुष्याचा जोडीदार कसा असावा ? याची माहिती सांगताना म्हणतात, 

सुख दुःख आजारात
हवा साथी जोडीदार
वेळ येता आणीबाणी
जीव अर्पिण्या उदार

अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांच्या जाण्याने कवी खूप उदास होतो आणि अशा प्रसंगी कवीच्या मनात ' पोरका पुष्प भुंग्याचा दरबार ' ही रचना जन्मास येते. कवीच्या मनात एक शंका निर्माण होते, 

दीनदुबळ्या पामरा नाही सृष्टीत कुठेही आसरा
स्वामी होऊन कुणी हातात धरली का कासरा

तसेच भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या जाण्याने देखील कवी भावूक होऊन 'हरपले सप्तसुर' कवितेत कवी म्हणतो, 

कंठेश्वर हा जिवात्मा ! जगी जनात अद्भूत!
स्वर्ग भूवरी थाटण्या ! आल्या लता देवदूत!

कवीला शालेय जीवनापासून कविता लिहिण्याचा छंद होता. मध्यंतरीच्या काळात कविता लिहिणे सोडले होते मात्र कोरोना काळात पुन्हा एकदा त्यांची काव्यलेखन प्रतिभा जागी झाली. कविता लेखन करण्यासाठी कोरोना काळात खूप रिकामा वेळ मिळाला. हीच संधी समजून त्यांनी काव्यलेखनास परत एकदा सुरुवात केली आणि सोशल मीडियातील विविध समूहात सहभागी होऊन त्यांना विविध वाड्मय प्रकारात कविता सादरीकरण करण्याची संधी मिळाली. म्हणून ते पुन्हा एकदा कविता करण्याकडे वळले. म्हणूनच ते म्हणतात, 

सुख शांती समाधान
मोद साहित्यात दिसे
देह मना लेखनाचा
छंद जिवा लावी पिसे

कोरोना काळात लोकांना अनेक कडू अनुभव आले. या काळात डॉक्टर जसे देव म्हणून धावून आले तसे पोलीस देखील लोकांच्या मदतीसाठी पांडुरंग म्हणून उभे राहिले. याची प्रचिती कोरोना काळात अनेकांना आली म्हणूनच 'पोलीस' कवितेतून कवी म्हणतो, 

माय बाप लेकरे त्यागुनी
प्रजेप्रती घाळतात घाम
कर्तव्य तत्पर पांडुरंगाला
करू सर्व शतशः प्रणाम !

मुलांवर संस्कार टाकण्याचे महत्वाचे कार्य आई-बाबा करत असतात. लहानपणी त्यांचे बोट धरून चालणारे मूल त्यांनी दाखविलेल्या वाटेवर चालतात. खाण तशी माती या म्हणीनुसार जसे आई-वडील असतात तसेच मुले तयार होतात. अश्याच अर्थाचा जन्मदाता कवितेतून गर्भित असा संदेश देतात.

आई बाबा खरे दाते
शील संस्कार नीतिचे
बोट धरुनी सामर्थ्य
देती संसार मतीचे

त्याहीपुढे चालून संस्कार म्हणजे काय असते ? याचे महत्व सांगताना कवी म्हणतो, 

संस्काराची धनलक्ष्मी
नित्य नांदते ज्या घरी
जन्मा येती हिरे मोती
माता भगीनी  उदरी

बहिणाबाई चौधरी यांची अरे संसार संसार ह्या कवितेची जराशी झलक त्यांच्या कवितेत जाणवते. कवी देखील संसाराची गाऱ्हाणे सांगताना म्हणतो,

अरे संसार संसार
जना द्यावा आधार
होवो किती दुःख पर
दुजा वंदावे साभार

श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री सर्वश्रुत आहे. जीवनात जिवाभावाचे मित्र खूप महत्वाचे आहे. दुःखांच्या प्रसंगी फक्त मित्रच धीर देऊ शकतो, 'भाव मैत्रीचा' या कवितेत कवी म्हणतो,

सुख दुःखी प्रसंगात
मित्र देती जिवाजीव
भाव मैत्रीचा अपार
नसे कशाची उणीव

माणसाचे मन हे खूप चंचल आणि अस्थिर आहे. वाऱ्याप्रमाणे तो सैरभैर धावत असतो. याविषयी कवी म्हणतो,

मन उधाण वाऱ्याचे
स्तब्ध बसेना घरात
सदा धावे बाहेरच
जणू खगांची वरात

काव्यसंग्रहाचे शीर्षक रचना "शृंगार मनाचे" या कवितेतून कवी मानवी मनाचा वेध घेताना आपणांस मुक्ती मिळवायची असेल तर कर्णासारखे दानशूर होण्याचा सल्ला देतात. 

लाभो मुक्ती स्वर्गस्थान
हेच शृंगार मनाचे
कर्ण बळी परी दाता
व्हावे उदात्त गुणांचे

आंतरजातीय विवाह पद्धतीला आजही समाजात मानाचे स्थान नाही. कवीची स्वतःची एकुलती एक मुलगी आंतरजातीय विवाह करून घराबाहेर पडल्यावर कवी मनाला काय दुःख झाले असेल याची प्रचिती 'सुख लाभो तुला' ही कविता वाचतांना येते सोबतच आपल्या लेकीला आशीर्वाद देऊन संकटात सोबत असल्याची देखील ते ग्वाही देतात. 
काव्यसंग्रहातील सर्वच कविता वाचनीय आणि चिंतनीय आहेत. जास्तीत जास्त कविता अष्टाक्षरी काव्यप्रकारात लिहिलेल्या असून आशयघन आणि चिंतनीय आहेत. काव्यसंग्रहातील विठोबा, कौलारू घर, विश्वकर्मा, गुढीपाडवा, शेतकरी, महिला, भ्रूण हत्या, जन्म-मृत्यू, सैनिक,  मराठी राजभाषा, प्रतीकात्मक कविता घड्याळ, बैलगाडी, रेल्वे, पुस्तक, धावते निवास, काठी असे अनमोल, प्रेम काव्य वेड्या मनाचा फकिर, सखे तुझ्या हसण्याने व कोरोना या विषयासह राजे शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, लहुजी साळवे, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, हुतात्मा पानसरे यांच्यावर आधारित प्रासंगिक कविता देखील उत्तम आहेत. संगत प्रकाशनने संग्रहाची बांधणी उत्तम केली असून उच्च दर्जाचे कागद वापरले आहे. संतोष घोंगडे यांनी नावाला अनुसरून सुंदर मुखपृष्ठ सजविले आहे. कवीच्या मनातील काव्य शृंगार अजून असेच फुलत राहो आणि अनेक चांगल्या चांगल्या कविता वाचकांना वाचण्यास मिळो अशी यानिमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा .......!

काव्यसंग्रहाचे नाव - शृंगार मनाचे
कवी - पांडुरंग आडबलवाड
प्रकाशक - संगत प्रकाशन, नांदेड
एकूण पृष्ठे - 136
किंमत 220 ₹

पुस्तक परिचय - 
नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Wednesday, 14 December 2022

World Tea Day ( चहा दिवस )

जगभरातील काही देशात 15 डिसेंबर हा दिवस जागतिक चहा ( World Tea Day ) दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो. चहा विषयी वाचू या मनातील भाव

जागतिक चहा दिवस निमित्ताने

एक कप चहा

प्रिय चहा
चहा या दोन अक्षरी शब्दांत खूप मोठी ताकत आहे. कारण या चहामुळे दोन मनाचे मिलन होते, थोडावेळ एकमेकांना बोलता येते, कितीही घाईत असलो तरी चहा घेण्यासाठी थोडा वेळ विश्रांती नक्की मिळते. चहाला इंग्रजीत एकाक्षरी शब्द म्हणजे टी असे म्हणतात तर हिंदीत चाय म्हटले जाते. तसे राजेश खन्नावर चित्रित केलेलं एक गाणं सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, शायद मेरी शादी का खयाल दिल में आया है, इसिलिए मम्मीने मेरे तुमहें चाय पे बुलाया है। आज ही प्रथा कायम आहे की, मुलगी बघायच्या कार्यक्रमात पोहे खाणे झाल्यानंतर नवरी मुलगी हातात चहाचा ट्रे घेऊन येते आणि आपला परिचय देते. बऱ्याच कामासाठी चहा हे एक निमित्त म्हणून त्याचा वापर केला जातो. एखाद्या ठिकाणी काही सौदा किंवा व्यापार झाला म्हणजे लगेच तोंड गोड करण्याची प्रथा असते. चहा हे एक गोड पेय, त्यामुळे सर्वजण चहा घेतात. दोन मित्र बाजारात खूप दिवसांनी असो वा काही तासानंतर असो त्यांची भेट झाली की, पहिलं वाक्य, चल एक कप चहा घेऊ. चहा पिता पिता मग खूप गप्पाटप्पा, अनेक विषयांवर चर्चा होते. याच दरम्यान गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गप्पा रंगतात. म्हणून काहीजण खास करून टी पार्टी आयोजित करतात, चाय पे चर्चा करण्यासाठी. म्हणजे येथे ही चहा हे एक निमित्त असते. तेच जर मित्राने चहा पिऊ असं म्हटलं नाही तर तो चारचौघात सांगतो त्याने मला साधं चहा सुद्धा विचारलं नाही. घरी नातलग किंवा पाहुणे आले की चहा विचारावं लागते आणि चहा पाजवावे लागते. नाहीतर समाजात साधी चहा देखील दिली नाही म्हणून आपली खूप बदनामी होते. घरी आलेल्या नातलगांची सरबराई करण्याचे प्रमुख साधन म्हणजे चहा. सकाळ व सायंकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात चहानेच होते. लहानपणी कपबशीचा आवाज आला की जाग यायची, कधीकधी चहाचा वास देखील नाकात जायचं आणि मग जाग यायचं. पावसात भिजून आल्यावर आणि हिवाळ्याच्या थंडीत गरम चहा खूप चांगले वाटायचे. चहामुळे तरतरी येते, सर्व काही योग्य होते, असे मनाला वाटते. 
दुधाची चहा आणि काळी चहा असे चहाचे प्रामुख्याने दोन प्रकार मोडतात. दुधाच्या चहात साखर, चहापत्ती आणि दूध एकत्रित गरम केल्या जाते तर काळी चहा म्हणजे डिकाशन चहा यात दूध नसते. पण ही चहा दुधाच्या चहापेक्षा चांगली असते. या डिकाशन चहात आद्रक, दालचिनी आणि तुळशीची पाने टाकल्यास ते खूप चांगले वाटतेे. लहान मुलांनी शक्यतो चहा पिणे टाळावे असे घरातील वडील मंडळी म्हणतात मात्र लहान मुलांना दुधापेक्षा चहा पिणे खूप आवडते. सकाळचा चहा आणि पेपर याचे अतूट नाते आहे. चहाविना पेपर वाचावे वाटत नाही आणि पेपरविना चहा प्यावे वाटत नाही. चहा आणि बिस्कीट याचे नाते देखील असेच आहे. काही मंडळी चहासोबत पाव म्हणजे ब्रेड किंवा खारी असे पदार्थ देखील खातात. जेव्हा खूप काम करून जरासा थकवा जाणवायला होते त्यावेळी चहा पिण्याची ईच्छा निर्माण होते. माणसाला स्वयंपाकातले कोणते पदार्थ तयार करता येवो किंवा न येवो चहा मात्र करता आले पाहिजे. नाही तर मित्रांमध्ये आपले हसे होते आणि मित्र म्हणतात, तुला, साधी चहा करता येत नाही. चहा करता आली तर त्याचे अनेक फायदे होतात. स्वयंपाक शिकण्याची पहिली पायरी म्हणजे चहा करता येणे. 
चहाचा शोध कसा लागला असेल ? हे एक संशोधन करण्याची बाब आहे. एक व्यक्ती झाडाखाली पाणी उकळत ठेवला होता तेव्हा वरून झाडाचे एक पान त्या उकळत्या पानात पडले तेव्हा त्या पाण्याला त्या पानाचा वास आला. त्याने ते पिऊन बघितले तर त्याचा थकवा दूर झाल्याचे जाणवले. अश्याप्रकारे चहाची सुरुवात झाली. भारतातल्या लोकांना हे चहा वगैरे काही माहीत नव्हते. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. अगदी सुरुवातीला सकाळी सकाळी इंग्रज लोकं भारतीय लोकांच्या घरापुढे या पानांची पुडी अगदी मोफत टाकू लागले. भारतीयांना त्या पानांची चव कळाली आणि जरा गोडी लागली. मग तेच पाने फुकट ऐवजी काही पैसे देऊन घ्यावे लागू लागली. यापद्धतीने चहाचा प्रचार व प्रसार वाढला. आज चहा पत्तीचे अनेक कंपनी चहा विक्री करतात. पूर्वी चहा पत्ती म्हणजे सुपर डस्ट एवढंच माहीत होतं. पण आज चहाचे अनेक कंपन्यामार्फत विक्री होत असून मोठ्या प्रमाणावर उत्पादन देखील करण्यात येत आहे. यातून भरपूर पैसा देखील मिळत आहे. साध्या चहाच्या दुकानावरून अनेक लोकांची प्रगती झाली आहे. यात देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. महाराष्ट्रात येवले अमृततुल्य चहा प्रत्येक जिल्ह्यात स्थान मिळविले आहे. कमी भांडवलावर चहाची विक्री कोठेही करता येणे अगदी सोपे आहे. रेल्वेत अनेक मंडळी सकाळी सकाळी चहा विकून आपल्या संसाराला चांगल्याप्रगती पथावर नेले आहेत. बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारातील मुख्य ठिकाण, थिएटर, मार्केट, शाळा, विद्यालये, महाविद्यालयाच्या परिसरात चहाची विक्री करून आर्थिक स्थिती मजबूत करता येऊ शकते. म्हणूनच वर म्हटले आहे, साधी चहा करता येत नाही, तुला. ते जर जमलं तर आपण सुखी जीवन जगू शकतो. चहाच्या व्यवसायावर आज लाखो लोकं जगत आहेत, कोणी चहाची पत्ती विकून तर कोणी गरमागरम चहा विकून. काहीजण म्हणतात चहा शरीरासाठी घातक आहे पण लाखो बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आपला एक कप चहा काही विघ्नसंतोषी ठरणार नाही. म्हणून जास्त विचार करू नका, चला एक कप चहा घेऊ या ....!

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

Monday, 5 December 2022

अस्ट्रोनॉमी ( Astronomy )

सूर्यमाला व त्यातील विविध ग्रहांची माहिती फोटोसह

                      सूर्यमाला 
सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह आहेत. सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस (हर्षल) व नेपच्यून (वरुण). प्लूटो हा त्याच्या शोधापासून (म्हणजेच १९३० पासून) सूर्यमालेतील नववा ग्रह मानला जातो.


                सूर्य


सूर्य दर सेकंदाला चार कोटी टन हायड्रोजन अणुइंधन वापरतो. सूर्य सतत जळत राहतो. सूर्याचे तापमान हजारो अंश सेल्सिअस आहे. सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. पृथ्वी व सूर्यमालेतील इतर ग्रह हे सर्व सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. हा सूर्यमालेतील एक तप्त गोळा आहे. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी ९९% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे.सूर्यापासून पृथ्वीचे सरासरी अंतर जवळजवळ १५ कोटी किलोमीटर किंवा ९ कोटी ३० लाख मैल आहे. सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर पोचायला ८.३ मिनिटे लागतात. या प्रकाशाच्या ऊर्जेमुळे प्रकाश-संश्लेषण नावाची एक जैव-रासायनिक अभिक्रिया होते. ही अभिक्रिया पृथ्वीवरील जीवनाचा आधार आहे. सूर्याचा पृष्ठभाग हायड्रोजन, हेलियम, लोह, निकेल, ऑक्सिजन, सिलिकॉन, सल्फर, मॅग्निशिअम, कार्बन, नियॉन, कॅलशियम, क्रोमियम आदी घटकांपासून झाला आहे. यापैकी हायड्रोजनचे प्रमाण ७४% आणि हेलियमचे २४% आहे.
                 
               01) बुध ग्रह

बुध हा सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला ग्रह आहे. त्याचे सूर्यापासूनचे अंतर ५७, ९०९१७५ किलोमीटर आहे. बुध त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ८८ दिवसात पूर्ण करतो. आकाराने हा एक छोटा ग्रह आहे. सूर्याच्या फारच जवळ असल्याने दुर्बिणीतून फार क्वचित दिसतो. त्याला कोणतेही नैसर्गिक उपग्रह नाहीत.


                 02) शुक्र ग्रह

सूर्यमालेमध्ये शुक्र हा सूर्यापासून बुधानंतर, आणि पृथ्वीअगोदर येणारा क्रमाने दुसरा ग्रह आहे. जरी सर्व ग्रहांच्या भ्रमणकक्षा लंबगोलाकार असल्यातरी शुक्राची भ्रमणकक्षा जवळजवळ वर्तुळाकार आहे. याचा व्यास १२,१०४ कि. मी. एवढा आहे. शुक्र देखील अंतर्वर्ती ग्रह आहे. यामुळेच शुक्रदेखील आपल्याला आकाशात फक्त सकाळी किंवा संध्याकाळीच दिसतो. या ग्रहावर वातावरण अतिशय दाट असल्यामुळे सूर्याचा शुक्रावर पडलेला प्रकाश मोठ्याप्रमाणात परावर्तित होतो. म्हणून शुक्र आपल्याला इतर ग्रहांपेक्षा अधिक तेजस्वी दिसतो.

                  03) पृथ्वी ग्रह


पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीला 'निळा ग्रह' असेही म्हणतात. जिथे जीवन आहे, अशी पूर्ण विश्वात ही एकमेव ज्ञात जागा आहे . आपण याच पृथ्वीवर राहतो. पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झालीअसावी आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी पासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा व्यास १२,७५६ कि.मी. एवढा आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर साधारणपणे १४,९५,९७,८९० कि.मी. एवढे आहे.



                  04) मंगळ ग्रह


मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असे सुद्धा म्हटले जाते. तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साइडमुळे मिळाला आहे. हा एक खडकाळ ग्रह (terrestrial planet) असून त्यावरील वातावरण विरळ आहे. ऑलिम्पस मॉन्स ही मंगळावर असलेली ज्वालामुखी आपल्या सूर्यमालेतील सर्वात उंच ज्वालामुखी आहे.



                05) गुरू ग्रह
             
गुरू (Jupiter) हा अंतरानुसार सूर्यापासून पाचव्या स्थानावर असलेला सूर्यमालेमधील आकाराने सर्वांत मोठा ग्रह आहे. गुरू ग्रह हा मुख्यत्वेकरून हायड्रोजन व थोड्या प्रमाणात हेलियमचा बनला आहे. गुरूला कमीतकमी ६३ उपग्रह आहेत. यापैकी चार मोठ्या उपग्रहांचा शोध गॅलिलियोने १६१० मध्ये लावला होता.




               06) शनी ग्रह
             
सूर्यमालेतील ग्रहांमध्ये शनी (Saturn) हा सूर्यापासून सहाव्या स्थानावर आहे. त्याचे बरेचसे वस्तुमान वायूंमुळे असून हा सूर्यमालेतील आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. शनीभोवती बर्फ व आंतरिक्ष कचऱ्यापासून बनलेली कडी आहेत. गुरू ग्रहापेक्षा लहान असला तरी हा त्याच्या भोवताली असलेल्या देखण्या कड्यांमुळे अधिक प्रसिद्ध आहे. शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: २९ वर्ष लागतात.


                  07) युरेनस ग्रह

युरेनस हा सूर्यमालेमध्ये सूर्यापासून सातव्या क्रमांकावर असलेला ग्रह आहे. हर्शल पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. तो बराचसा वायूंचा बनलेला आहे. तो व्यासानुसार तिसरा आणि वस्तुमानानुसार चौथा ग्रह आहे. युरेनस ग्रह पृथ्वीच्या तुलनेत अनेक पटींनी मोठा आहे. पृथ्वीपासून त्याचे अंतर २.८ अब्ज कि.मी. आहे. युरेनसला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पुरी करण्यास ८४ वर्ष लागतात. नासाच्या "व्हॉयेजर २" या यानाने युरेनस ग्रहाला भेट दिली आहे. आधुनिक काळात शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे. सर विल्यम हर्शल यांनी हा ग्रह १३ मार्च १७८१ला शोधल्याची घोषणा केली. युरेनसला हिंदी-मराठीत अरुण म्हणतात.

              08) नेपच्यून ग्रह


नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून आठवा व सूर्यमालेतील सर्वांत बाहेरचा ग्रह आहे. या ग्रहाला हिंदीत व मराठीत वरुण असे म्हणतात. नेपच्यूनचा शोध ४ ऑगस्ट १९६४ रोजी लागला. हा ग्रह दुर्बिणीनेच पाहता येतो.स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास यास साधारणतः १९ दिवस लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास 
 १६५ वर्षे लागतात.




                    चंद्र उपग्रह   
             
चंद्र पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वी व चंद्रामधील अंतर ३,८४,४०३ कि.मी. असून, हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे ३० पट आहे.  चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घालण्याकरीता २७.३ दिवसांचा कालावधी लागतो. तसेच चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्यातील भौमितिक स्थानांमुळे दर २९.५ दिवसांनी चंद्राच्या कलांचे एक आवर्तन पूर्ण होते. चंद्राने बऱ्याच वर्षांपासून पृथ्वीला लघुग्रहांपासून संरक्षण केले आहे. 
चांद्र मास हा तीस दिवसांचा असतो, तर चांद्र वर्ष ३६० दिवसांचे. हे सूर्याधारित सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान असते. सूर्यवर्षाच्या बरोबर येण्यासाठी साधारणपणे सुमारे दर ३३ महिन्यांनी अधिक चांद्रमास येतो. त्यातूनही राहिलेली तफावत दूर करण्यासाठी सुमारे १९ किंवा १४१ वर्षांनी क्षयमास येतो.

संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, जि. नांदेड
9423625769

भारतीय शास्त्रज्ञ ( Indian Scientist )

भारतातील काही महान गणिततज्ञ आणि शास्त्रज्ञ

      भारतीय गणितज्ञ - आर्यभट्ट

जगाला सर्वात आधी शून्याची ओळख देणारे महान भारतीय खगोलशास्त्री आणि गणितज्ञ म्हणजे आर्यभट्ट. त्यांना खागोलशास्त्रात आणि गणितामध्ये एक विशेष आवड होती, त्यांनी गणितामध्ये सुद्धा बरेचसे सूत्र शोधून काढले आहेत. १५ एप्रिल १९७५ साली आर्यभट्ट यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त भारताने “आर्यभट्ट” नावाचा पहिला उपग्रह अवकाशात सोडला.
 
                
            भारतीय शास्त्रज्ञ - सर सी. व्ही. रामन
( जन्म :-  7 नोव्हेंबर1988 मृत्यू :- 21 नोव्हेंबर 1970 )

सी.व्ही.रमण हे आधुनिक भारतातील एक महान वैज्ञानिक होते.. ‘रमण प्रभाव’ (Raman Effect) हा त्यांच्या संशोधनांला 1930 साली नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आलं. 28 फेब्रुवारी 1928 साली सी.व्ही.रमण यांनी ‘रमण इफेक्ट‘ चा शोध लावला होता. म्हणून या दिवसाला भारत सरकारने दरवर्षी ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यांना 1954 साली भारताच्या सर्वोच्च अश्या ‘भारतरत्न’ देऊन गौरव करण्यात आला.
                 
             भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. हरगोविंद खुराना
( जन्म :- 19 ऑक्टोबर 1910  मृत्यू :- 09 नोव्हेंबर 2011 )

डॉ. हरगोविंद खुराना यांना सन १९६८ साली अनुवांशिक संहिताची भाषा समजण्यासाठी आणि प्रथिने संश्लेषणातील भूमिका याबद्दल नोबेल पारितोषिक देण्यात आले. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते भारतीय वंशाचे तिसरे व्यक्ती होते. सन १९६९ साली भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

                       
           भारतीय शास्त्रज्ञ - सुब्रह्मण्यम चंद्रशेखर
( जन्म :-  9 जानेवारी 1922 मृत्यू :- 21 ऑगस्ट1995  )
सन १९६८ साली भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यांना एस. चंद्रशेखर म्हणून सुद्धा ओळखले जाते. 
त्यांना ‘ताऱ्यांची रचना आणि उत्पत्ती’च्या शोधासाठी १९८३ साली नोबेल पारितोषिक मिळालेले आहे.


                   
         भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. होमी भाभा
( जन्म :-  30 ऑक्टोबर 1909 मृत्यू :- 24 जानेवारी 1966  )

यांना भारतीय अनुशास्त्राचे जनक म्हटल्या जाते. यांच्याद्वारे भारतात अणु उर्जेच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे.
सन १९५४ साली भारत सरकार तर्फे पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


                        
भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
( जन्म :-  15 ऑक्टोबर 1931 मृत्यू :- 27 जुलै 2015  )

भारतीय क्षेपणास्त्राचे जनक,  पहिल्या स्वदेशी क्षेपणास्त्राचे श्रेय डॉ. कलाम यांना जाते.
वर्ष 1997 मध्ये भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देऊन गौरविण्यात आले.
सन 2001 मध्ये भारताच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. 


                   
        भारतीय गणितज्ञ - श्रीनिवास रामानुजन
( जन्म :-  22 डिसेंबर 1887  मृत्यू :- 26 एप्रिल 1920  )

रामानुजन यांना गणित आणि इंग्रजी या दोन विषयांची विशेष आवड होती. रामानुजन यांनी ३५०० पेक्षाही जास्त गणिताची प्रमेय लिहिलेली होती. 



                
             भारतीय शास्त्रज्ञ - विक्रम साराभाई
( जन्म :-  12 ऑगस्ट1919  मृत्यू :- 30 डिसेंबर 1971  )

भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेचे जनक आणि भारतातील अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. विकर्म साराभाई यांनी अहमदाबाद येथे साकारलेल्या रिसर्च सेंटर मधून सन १९७५ साली आपल्या देशांतील पहिला अंतरीक्ष उपग्रह ‘आर्यभट्ट’  अवकाशात सोडण्यात आला. सन १९६६ साली पद्मभूषण पुरस्कार आणि सन १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार

                    
      भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ - डॉ. जगदीशचंद्र बोस
( जन्म :-  30 नोव्हेंबर 1858  मृत्यू :- 23 नोव्हेंबर 1937  )

डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली. या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली तसेच वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. ते एक भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते. 

                               
              
      भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. शंकर आबाजी भिसे 
(जन्म :- 29 एप्रिल 1867  मृत्यू :- 07 एप्रिल 1935 ) 

हे एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक होते. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जाते. सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती. आगगाडीच्या स्वयंचलित दरवाजाचा शोध त्यांनीच लावला. अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ 


                       
 भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. वसंत गोवारीकर
(जन्म :- 25 मार्च 1933  मृत्यू :- 03 जानेवारी 2015 ) 

भारतात विज्ञानाचा पाया रचणारे, पहिला भारतीय अग्निबाण बनवणारे, इस्रो संस्था प्रमुख महान शास्त्रज्ञ, खतांचा जागतिक ज्ञानकोश निर्मिती करणारे व पंतप्रधान विज्ञाम सल्लागार म्हणून कार्य केले. 


                            
भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. जयंत नारळीकर
                (जन्म :- 19 जुलै 1938 ) 

सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.



       रघुनाथ अनंत माशेलकर

रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्म १ जानेवारी १९४३मध्ये गोवा या राज्यातील माशेल गावात झाला. त्यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते.. ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत. ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) या संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. बासमती तांदूळ आणि हळदीचे पेटंट मिळविले. भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार मिळाले आहेत. 

संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

सौजन्य :- इंटरनेट

धन्यवाद .........!

Sunday, 4 December 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. B R Ambedkar )

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी लिहिलेले कविता व वैचारिक लेख. 

निळ्या अक्षरावर क्लीक करून वाचावे. 

शिका, संघटित व्हा ....



।। विनम्र अभिवादन ।।

Sunday, 27 November 2022

एका वोटची शक्ती ( power of one vote )

एका वोटची शक्ती


ज्या ज्या वेळी आपण मतदार म्हणून निवडणुकीला तोंड द्यावे लागते त्या त्यावेळी आपल्या समोर एकच प्रश्न पडतो की, मतदार म्हणून मी काय करावे ? कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या पक्षाला मतदान करावे ? आपण एक जागरूक मतदार असाल तर नक्कीच या प्रश्नाचे निराकरण स्वतःच्या मनाशी विचारून नक्की करू शकता. त्यासाठी स्वतः मतदार यांनी सर्वप्रथम कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. छोट्या छोट्या आमिषाचा स्विकार करू नये. खाण्या-पिण्याच्या पार्टीला हजेरी लावू नये. बहुतांश वेळा निवडणुकीच्या काळात हे चित्र हमखास बघायला मिळते. शे-पाचशे रुपयांच्या लालसेपोटी आपण आपले अमूल्य असे वोट वाया घालवतो. सुज्ञ मतदार म्हणून आपण सर्वांनी मतदानाला जाण्यापूर्वी सर्व पक्ष, पॅनल व त्यांचे उमेदवार यांची एकदा तरी चाचपणी करावी. ज्या पक्षाची किंवा पॅनलची विचारधारा चांगली आहे, त्याचा नेता विचारी आणि दूरदृष्टी असलेला नेता असेल, त्यात काम करणारी मंडळी चांगली, अभ्यासू आणि विश्वासू आहेत, अश्याची निवड करून त्यांना मतदान करण्यात आपले खरे हित लपलेले आहे. हा माझा जवळचा, तो माझा मित्र, सखा, नातलग, सोयरा असे नातेसंबंध जोडून मतदान करणे कोणत्याही मतदाराला भविष्यात धोक्याचे ठरू शकते. मतदान करतांना जेव्हा आपणाला अनेक उमेदवार निवडायचे असते त्यावेळी एक इकडे आणि एक तिकडे मतदान करून आपण स्वतः संकटात सापडत असतो. असे केल्याने येणारी सत्ता ही कोणा एकट्याची येत नाही. संमिश्र सत्ता असलेल्या शासनाची प्रगती कशी होते हे आजपर्यंत आपण पाहत आलोत आणि अनुभवत आलो आहोत. म्हणून मतदान करायचे असेल तर पॅनल टू पॅनल मतदान करावे. यात आपलेच हित आहे, हे सर्वप्रथम आपण जाणून घ्यावे. आपण ज्या पॅनल किंवा पक्षात काम करता त्यातील व्यक्ती स्वार्थी, मतलबी व अविश्वासू आहेत हे माहीत असून देखील आपण त्यांच्या इच्छेखातर त्यांनाच मतदान करत असाल तर सरळ सरळ ते आपल्याच पायावर आपणच दगड टाकल्यासारखे होईल. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे व्यक्ती आपली भेट घेते आणि पुढील पाच वर्षे आपणाला साधे विचारत देखील नाही अश्या व्यक्तीपासून दूर राहिलेले बरे. संकट काळात जो मदत करतो तो खरा मित्र आणि संकटाच्या वेळी जो आपल्या पाठीशी उभा राहतो तोच खरा पक्ष किंवा पॅनल हे लक्षात असू द्यावे. माझ्या एका मतदानाने काय फरक पडणार आहे ? हा विचार आपल्या मनातून काढून टाकून योग्य उमेदवारांना आपले मत करावे. मतदानाला जातांना आपल्या जवळ आपली ओळख पटविणारे निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड, वाहन परवाना यापैकी कोणताही एक पुरावा जवळ ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा ऐनवेळी आपली पंचायत होऊ शकते. आपल्या भारतीय राज्यघटनेने आपल्या मतदानाला गोपनीयता दिलेली आहे. म्हणून कोणाच्या दबावाखाली किंवा कुणी दाखविलेल्या प्रलोभनाला बळी न पडता जरा सद्सद्विविवेक बुद्धी जागृत करून मतदान करू या, आपले अमूल्य वोट असेच वाया जाणार नाही याची काळजी घेऊ या. निवडणुकीत एका - एका मतदानाला किंमत असते याचे भान ठेवू या आणि स्वतःची प्रगती साधू या. शेवटी मतदार बंधू भगिनींना एवढंच सांगावे वाटते,

*मतदान करतांना विचार करा जरा नीट*
*एका-एका मताने मिळे विजयाची शीट*


- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

( प्रस्तुत लेखात व्हायरल होत असताना काहीजण बदल करू शकतात. अश्या वेळी वाचकांना काही शंका येत असेल तर मूळ लेख वाचण्यासाठी माझ्या nasayeotikar या blog ला अवश्य भेट द्यावे. धन्यवाद .....! )

Thursday, 24 November 2022

यशवंतराव चव्हाण ( Yashwantrao Chavhan )

यशवंतराव बळवंतराव चव्हाण 

यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म हेन्द्रे पाटील मराठा समाजात १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी १ मे १९५८ रोजी धुम्या गडावर जाऊन तिथे पांडुरंगाची मूर्ती स्थापन केली व राष्ट्रसंत भगवानबाबांच्या समोर धूम्या गडास भगवानगड नाव दिले. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.
त्यांनी महाराष्ट्रात विविध योजना राबविल्या आहेत 

 पंचायत राज या त्रिस्तरीय ( जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात केली.

- राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ.

कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती.

- १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना

मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठ यांची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना.

- राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग

- मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना

- नागपूर येथे दीक्षा भूमीवर डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय तसेच त्यांच्या आदरापोटी डॉ. आंबेडकर जयंतीची सुट्टी (१४ एप्रिल) देण्याची प्रथा यशवंतरावांनी महाराष्ट्रात सुरू केली

- यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने काही संस्था देखील निर्माण करण्यात आले आहेत.

  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
  • यशवंतराव चव्हाण मेमोरियल (म्युनिसिपल) हॉस्पिटल (YCM), पिंपरी(पुणे)
  • यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे
- 25 नोव्हेंबर 1984 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन .......!

संकलन :- नासा येवतीकर

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...