शिक्षा न करता शिस्त कशी घडवावी ?
" शाळेतील प्रत्येक शिक्षकासमोर उभा असलेला एक गंभीर प्रश्न "
शाळा म्हणजे केवळ ज्ञान देण्याचे केंद्र नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी कार्यशाळा होय. येथे विद्यार्थी पुस्तकी ज्ञानासोबत सहजीवन, जबाबदारी, आत्मसंयम, परस्पर आदर आणि योग्य-अयोग्य यांतील फरक शिकत असतात. या प्रक्रियेत शिस्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करताना त्यांना शिक्षा करावी का, हा प्रश्न आज अनेक शिक्षकांसमोर उभा आहे. वर्गात गोंधळ घालणारे विद्यार्थी, वारंवार सूचना देऊनही न ऐकणारी मुले, गृहपाठ न करणारे विद्यार्थी, एकमेकांची चेष्टा करणारे किंवा शिक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणारे विद्यार्थी, ही परिस्थिती अनेक शिक्षकांसाठी आव्हानात्मक ठरते. अशा वेळी रागावणे, कठोर शब्द वापरणे किंवा शिक्षा करणे हा सोपा मार्ग वाटू शकतो. परंतु, या मार्गाने विद्यार्थ्यांच्या वर्तनात खरोखरच सकारात्मक बदल घडतो का ? की केवळ शिक्षकांसमोर शांत राहण्याची सवय निर्माण होते?
आजच्या शिक्षणव्यवस्थेला या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कारण शिस्त लावणे आणि शिस्त घडवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पहिल्या प्रक्रियेत बाह्य दबाव महत्त्वाचा असतो, तर दुसऱ्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या मनात योग्य वर्तनाची जाणीव निर्माण केली जाते. शिस्त म्हणजे शिक्षक वर्गात आले की शांत बसणे आणि शिक्षक बाहेर गेले की गोंधळ घालणे नव्हे. शिक्षकांच्या अनुपस्थितीतही नियमांचे पालन करणे, स्वतःच्या कृतींची जबाबदारी स्वीकारणे आणि इतरांच्या अधिकारांचा आदर करणे, ही खऱ्या शिस्तीची लक्षणे आहेत. भीतीमुळे विद्यार्थी काही काळ आज्ञाधारक राहू शकतो; मात्र त्यातून आत्मनियंत्रण विकसित होईलच असे नाही. सतत शिक्षा होण्याची भीती असलेल्या विद्यार्थ्याला आपली चूक मान्य करण्याऐवजी ती लपवावीशी वाटू शकते. याउलट, शिक्षकांशी विश्वासाचे नाते असलेला विद्यार्थी आपली अडचण सांगण्यास आणि चूक सुधारण्यास अधिक तयार होतो. म्हणूनच शिस्तीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना नियंत्रणात ठेवणे नसून, त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकवणे हे असले पाहिजे.
एखादा विद्यार्थी वारंवार वर्गात बोलतो, अभ्यासात लक्ष देत नाही किंवा इतरांना त्रास देतो, तेव्हा त्याला लगेच बेशिस्त ठरवणे योग्य नाही. त्याच्या वर्तनामागे कोणते कारण आहे, याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे आहे. कदाचित त्याला शिकवलेला विषय समजत नसेल, घरात काही तणाव असेल, त्याला पुरेसे भावनिक पाठबळ मिळत नसेल किंवा स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी तो असे वागत असेल. काही वेळा विद्यार्थ्यांना आपल्या भावना योग्य शब्दांत व्यक्त करता येत नाहीत आणि त्याचा परिणाम त्यांच्या वर्तनातून दिसून येतो. अशा प्रसंगी संपूर्ण वर्गासमोर विद्यार्थ्याला सुनावण्याऐवजी त्याच्याशी एकांतात संवाद साधावा. त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे आणि समस्या सोडविण्यासाठी त्याला सहभागी करून घ्यावे. प्रत्येक चुकीचे समर्थन करणे आवश्यक नाही; मात्र, चूक करणाऱ्या विद्यार्थ्याला समजून घेणे आवश्यक आहे. वर्गातील शिस्त टिकवण्यासाठी नियम आवश्यक आहेत. परंतु हे नियम केवळ शिक्षकांनी सांगितलेले आदेश न राहता विद्यार्थ्यांनी स्वीकारलेली सामूहिक जबाबदारी बनली पाहिजेत. वर्गाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांशी चर्चा करून एकमेकांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे, अपमानास्पद भाषा न वापरणे, वर्ग स्वच्छ ठेवणे, वेळेचे पालन करणे आणि स्वतःच्या कृतींची जबाबदारी स्वीकारणे, असे काही मूलभूत नियम ठरवता येतील. विद्यार्थ्यांना नियम का आवश्यक आहेत, त्यांचे उल्लंघन झाल्यास इतरांवर काय परिणाम होतात आणि प्रत्येकाने कोणती जबाबदारी पार पाडली पाहिजे, हे समजावून सांगावे. नियम स्पष्ट, मर्यादित आणि सर्वांसाठी समान असतील, तर त्यांचे पालन करणे सोपे जाते.
चूक झाल्यावर विद्यार्थ्याला त्रास देणे आणि त्या चुकीची जाणीव करून देणे यात मूलभूत फरक आहे. शिक्षेमुळे विद्यार्थ्याला आपल्यावर अन्याय झाला असे वाटू शकते; पण योग्य परिणामांमुळे त्याला आपल्या कृतीची जबाबदारी समजण्यास मदत होते. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याने वर्गात कचरा टाकला, तर त्याला अपमानित करण्याऐवजी तो कचरा योग्य ठिकाणी टाकण्यास सांगावे. एखाद्याने मित्राचे साहित्य खराब केले, तर नुकसान भरून काढण्यासाठी त्याने काय करावे, यावर चर्चा करावी. एखाद्या विद्यार्थ्याने दुसऱ्याला दुखावले असेल, तर त्या कृतीचा परिणाम समजावून सांगून परिस्थिती सुधारण्यास मदत करावी. अशा पद्धतीचा उद्देश विद्यार्थ्याला अपराधी ठरवणे नसून, चूक ओळखणे, तिचे परिणाम समजणे आणि सुधारणा करणे हा असतो. मात्र, या प्रक्रियेत अपमान, धमकी किंवा जबरदस्तीला स्थान असू नये. शिक्षकांचे लक्ष अनेकदा विद्यार्थ्यांच्या चुकांकडे अधिक जाते. मात्र, योग्य वर्तनाची दखल घेतली तर विद्यार्थ्यांना ते वर्तन पुन्हा करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. वेळेवर काम पूर्ण करणे, मित्राला मदत करणे, शांतपणे आपली बाजू मांडणे, स्वतःची चूक मान्य करणे किंवा वर्गाची जबाबदारी मनापासून पार पाडणे, अशा कृतींचे मनापासून कौतुक करावे. “आज तू मित्राचे म्हणणे शांतपणे ऐकलेस, हे चांगले केलेस,” किंवा “तू स्वतःची चूक मान्य केलीस, यासाठी तुझे कौतुक,” अशा शब्दांतून विद्यार्थ्याला त्याच्या वर्तनाचे महत्त्व समजते. प्रत्येक वेळी बक्षीस देण्याची गरज नसते. शिक्षकांचे प्रामाणिक कौतुक, विश्वासाने दिलेली जबाबदारी आणि प्रगतीची दखल हेही प्रभावी प्रेरणास्रोत ठरतात. मात्र, विद्यार्थ्यांची परस्पर तुलना करण्याऐवजी प्रत्येकाच्या वैयक्तिक प्रगतीवर भर द्यावा.
विद्यार्थ्यांनी आदराने बोलावे, अशी अपेक्षा करणारा शिक्षक त्यांच्याशी सन्मानाने संवाद साधतो का ? विद्यार्थ्यांनी चुका मान्य कराव्यात, असे सांगणारा शिक्षक स्वतःची चूक स्वीकारतो का ? हे प्रश्न प्रत्येक शिक्षकाने स्वतःला विचारायला हवेत. विद्यार्थी शिक्षकांच्या शब्दांइतकेच त्यांच्या कृतींचेही निरीक्षण करतात. त्यामुळे शिक्षकांचे वर्तन हेच विद्यार्थ्यांसाठी जिवंत पाठ्यपुस्तक असते. शिक्षकांनी रागाच्या क्षणी संयम राखला, सर्व विद्यार्थ्यांशी न्याय्य वर्तन केले, नियमांचे पालन केले आणि मतभेद संवादातून सोडवले, तर विद्यार्थ्यांना शिस्तीचा प्रत्यक्ष आदर्श अनुभवायला मिळतो. विद्यार्थ्यांचे मन एखाद्या टिपकागदाप्रमाणे असते. शिक्षकांची प्रत्येक कृती ते बारीक लक्ष देऊन पाहत असतात आणि त्याचे अनुकरण देखील करत असतात. म्हणून शिक्षकांनी आपले शाळेतील वर्तन योग्य ठेवायला हवे.
अधिकाराचा वापर आवश्यक असला, तरी त्याला न्याय, संवेदनशीलता आणि विश्वासाची जोड मिळाली पाहिजे. काही वेळा वर्गातील बेशिस्तपणामागे कंटाळा, निष्क्रियता किंवा शिकण्यात रस न वाटणे ही कारणे असू शकतात. सतत ऐकत बसण्यापेक्षा विद्यार्थ्यांना कृतीतून शिकण्याची संधी मिळाली, तर त्यांचा सहभाग वाढतो. गटचर्चा, शैक्षणिक खेळ, प्रश्नमंजुषा, प्रकल्प, भूमिकानाट्य आणि सहकार्याने पूर्ण करायची कामे यांचा वापर करता येतो. वर्गाची स्वच्छता, पुस्तकांचे व्यवस्थापन आणि शैक्षणिक साहित्याची काळजी अशा जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्यास त्यांच्यात मालकीची भावना निर्माण होते. प्रत्येक विद्यार्थ्याचे वय, क्षमता आणि गरजा वेगळ्या असतात. त्यामुळे सर्वांना एकाच पद्धतीने हाताळण्याऐवजी परिस्थितीनुसार अध्यापन आणि शिस्तीच्या पद्धतींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. ज्या वर्गात प्रश्न विचारल्यावर हसले जाते, चुका झाल्यावर अपमान केला जातो किंवा प्रत्येक वेळी ओरडण्याचा अनुभव येतो, त्या वर्गात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. अशा वातावरणात ते चुका लपवण्याचा किंवा सहभाग टाळण्याचा प्रयत्न करतात. याउलट, प्रत्येक विद्यार्थ्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणारा आणि मतभेदांचा आदर केला जाणारा वर्ग अधिक सकारात्मक ठरतो. शिक्षकांनी शांततेसाठी पूर्वनिश्चित संकेत वापरावेत, सूचना स्पष्ट द्याव्यात आणि वर्गात काय अपेक्षित आहे, याची विद्यार्थ्यांना जाणीव करून द्यावी. शिस्तीतील सातत्यही तितकेच महत्त्वाचे आहे. एकाच चुकीकडे एका विद्यार्थ्याच्या बाबतीत दुर्लक्ष करणे आणि दुसऱ्याला कठोर शिक्षा देणे, यामुळे अन्यायाची भावना निर्माण होते. नियमांची अंमलबजावणी न्याय्य, सुसंगत आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करणारी असावी.
विद्यार्थ्यांच्या वर्तनाची जबाबदारी केवळ शाळेची किंवा शिक्षकांची नसते. घरातील वातावरण, पालकांचे वर्तन, मित्रपरिवार आणि सामाजिक परिस्थिती यांचाही मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो. एखाद्या विद्यार्थ्याच्या वर्तनात वारंवार अडचणी दिसत असल्यास पालकांशी संवाद साधावा. केवळ तक्रार करण्याऐवजी विद्यार्थ्याच्या चांगल्या गुणांचा उल्लेख करून त्याच्या सुधारणेसाठी संयुक्त प्रयत्न करावेत. गरजेनुसार मुख्याध्यापक, समुपदेशक किंवा संबंधित तज्ज्ञांची मदत घ्यावी. शारीरिक शिक्षा, धमकी, अपमान आणि मानसिक छळ यांना शिस्तीची साधने मानता कामा नये. भारतातील बालकांच्या शिक्षणाच्या हक्कासंबंधी कायद्यात शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळास प्रतिबंध आहे. गंभीर किंवा वारंवार घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता शाळेच्या नियमानुसार योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे.
शिक्षा न करता शिस्त घडवणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक चुकीकडे दुर्लक्ष करणे नव्हे. शिक्षकांनी स्पष्ट मर्यादा आखल्या पाहिजेत, नियमांचे उल्लंघन झाल्यास योग्य ती प्रतिक्रिया दिली पाहिजे आणि आवश्यकतेनुसार ठाम भूमिका घेतली पाहिजे. फरक एवढाच की, ही भूमिका रागातून नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून घेतली पाहिजे. वारंवार घडणाऱ्या घटनांची नोंद ठेवणे, विद्यार्थ्याशी स्वतंत्रपणे चर्चा करणे, त्याच्या वर्तनातील बदलांचे निरीक्षण करणे आणि गरजेनुसार पुढील मदत उपलब्ध करून देणे, ही जबाबदारी शिक्षकांनी पार पाडली पाहिजे. प्रेमळ असणे म्हणजे शिस्तीबाबत तडजोड करणे नव्हे आणि कठोर असणे म्हणजे विद्यार्थ्याला दुखावणे नव्हे. प्रेम आणि ठामपणा यांचा समतोल साधण्यातच प्रभावी शिक्षकत्वाचे सामर्थ्य आहे. शिक्षणाचे अंतिम ध्येय केवळ आज्ञाधारक विद्यार्थी निर्माण करणे नाही, तर विचारशील, संवेदनशील, स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक घडवणे हे आहे. यासाठी विद्यार्थ्यांना नियमांची भीती वाटण्यापेक्षा त्यांच्या आवश्यकतेची जाणीव झाली पाहिजे. शिक्षकांनी सांगितले म्हणून नव्हे, तर ते योग्य आहे म्हणून विद्यार्थ्यांनी एखादी कृती केली, तरच शिस्तीचे खरे उद्दिष्ट साध्य झाले असे म्हणता येईल.
शिक्षा काही वेळा तात्पुरती शांतता निर्माण करू शकते; परंतु संवाद, विश्वास, सकारात्मक प्रोत्साहन, स्पष्ट मर्यादा आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या वर्तनात अधिक टिकाऊ बदल घडवता येतात. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. त्यामुळे त्याला समजून घेण्यासाठी संयम, संवेदनशीलता आणि योग्य दृष्टिकोन आवश्यक असतो. शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा मार्गदर्शक असतो. त्याच्या एका प्रेमळ शब्दातून आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो, एका योग्य कृतीतून जबाबदारीची जाणीव होऊ शकते आणि एका समजूतदार संवादातून विद्यार्थ्याच्या वर्तनाला नवी दिशा मिळू शकते.
खरी शिस्त तीच, जी शिक्षक समोर नसतानाही टिकून राहते. खरे शिक्षण तेच, जे विद्यार्थ्याला स्वतःची चूक ओळखून ती सुधारण्याची प्रेरणा देते. चला, आपण अशी शाळा घडवूया जिथे शिस्त असेल, पण दहशत नसेल; नियम असतील, पण अन्याय नसेल; शिक्षकांचा अधिकार असेल, पण विद्यार्थ्यांच्या आत्मसन्मानाशी तडजोड नसेल. कारण विद्यार्थ्यांना शिक्षा करून काही काळ शांत ठेवणे सोपे असते; पण त्यांना समजून घेऊन स्वतःहून शिस्त पाळणारे बनवणे, हेच खऱ्या शिक्षकत्वाचे कसब आहे.
- नासा येवतीकर, स्तंभलेखक
छान लेख
ReplyDelete