नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 08 जुलै जागतिक ॲलर्जी प्रतिबंधक दिन त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण ॲलर्जी याविषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.
चला तर मग ऐकू या ......
"जागतिक ॲलर्जी प्रतिबंधक दिन" साजरा करण्याचा उद्देश म्हणजे ॲलर्जीबाबत जनजागृती करणे आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय सर्वांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
ॲलर्जी म्हणजे आपल्या शरीराची एखाद्या पदार्थावर होणारी अतिसंवेदनशील प्रतिक्रिया. काही लोकांना धूळ, परागकण, धूर, बुरशी, विशिष्ट अन्नपदार्थ, औषधे किंवा पाळीव प्राण्यांच्या केसांमुळे ॲलर्जी होऊ शकते.
ॲलर्जी झाल्यास शिंक येणे, नाक वाहणे, डोळे लाल होणे किंवा खाज येणे, त्वचेवर पुरळ उठणे, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही वेळा ती गंभीर स्वरूपाचीही असू शकते. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास पालकांना किंवा शिक्षकांना सांगून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
आपण काही सोप्या चांगल्या सवयी लावून ॲलर्जीपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो. घर आणि शाळा स्वच्छ ठेवणे, धुळीपासून दूर राहणे, हात नियमित धुणे, पौष्टिक आहार घेणे, भरपूर पाणी पिणे, धूर व प्रदूषणापासून शक्य तितके दूर राहणे आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घेणे हे महत्त्वाचे आहे.
विद्यार्थी म्हणून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. स्वच्छता, योग्य आहार आणि नियमित व्यायाम यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.
चला, आजच्या या जागतिक ॲलर्जी प्रतिबंधक दिनानिमित्त आपण सर्वजण स्वच्छतेची सवय लावूया, आरोग्याची काळजी घेऊया आणि ॲलर्जीबाबत स्वतःही जागरूक राहूया तसेच इतरांनाही जागरूक करूया.
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - जागतिक ॲलर्जी प्रतिबंधक दिन कधी साजरा केला जातो ?
बरोबर उत्तर आहे, दरवर्षी ०८ जुलै रोजी जागतिक ॲलर्जी प्रतिबंधक दिन साजरा केला जातो
दुसरा प्रश्न - ॲलर्जीची शंका आल्यास कोणाचा सल्ला घ्यावा ?
बरोबर उत्तर आहे, ॲलर्जीची शंका आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तिसरा प्रश्न - ॲलर्जी होण्याची दोन कारणे सांगा ?
बरोबर उत्तर आहे, धूळ, परागकण, धूर, काही अन्नपदार्थ किंवा औषधे यामुळे ॲलर्जी होऊ शकते.
चौथा प्रश्न - ॲलर्जी कसे ओळखणार दोन लक्षणे सांगा.
बरोबर उत्तर आहे, शिंक येणे, नाक वाहणे, डोळ्यांना खाज येणे, त्वचेवर पुरळ उठणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही ॲलर्जीची लक्षणे आहेत.
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - ॲलर्जीपासून बचाव करण्यासाठी कोणत्या सवयी महत्त्वाच्या आहेत ?
बरोबर उत्तर आहे - स्वच्छता राखणे, धुळीपासून दूर राहणे, हात धुणे, पौष्टिक आहार घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment