Saturday 1 May 2021

02/05/2021 Dogs story

राजू आणि कुत्र्याचे पिल्लू
शाळेतून येता येता राजूला रस्त्यावर एक छोटंसं कुत्र्याचे पिल्लू दिसलं. त्याच्या आसपास कोणीच नव्हतं. तो एकटाच होता, त्याची आईपण जवळ नव्हती, त्याला भूक लागली असेल असे राजूला वाटले म्हणून त्याने आपल्या बॅगमधील खाऊचा डबा काढला. त्यात एक दोन बिस्कीट होते. दुपारच्या सुट्टीत खाल्ले नव्हते म्हणून ते शिल्लक होते. डब्यातून दोन बिस्कीट काढला आणि त्या छोट्या कुत्र्याच्या पिल्लूला खायला दिला. ते खाल्यावर त्याला जरा बरे वाटले म्हणून तो रस्त्याच्या एका बाजूला जाऊन बसला. ते कुत्र्याचं पिल्लू खूपच सुंदर होतं, त्यांचा रंग गव्हाच्या रंगासारखं होतं आणि नाकावर काळा रंग होता, दिसायला गुबगुबीत होता म्हणून तर राजूला तो खूपच आवडला होता. त्याला बाय बाय करून तो आपल्या घरी आला. त्यादिवशी त्याच्या मनात तो कुत्रा घर करून राहिला होता म्हणून त्याचे मन कुठेही लागत नव्हते. रात्रीला देखील त्याला झोप लागली नाही. सकाळ कधी होते आणि त्या कुत्र्याच्या पिल्लूला कधी एकदा भेटतो असे त्याला झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तो लवकरच तयार झाला. आज खाऊच्या डब्यात चार बिस्किटे जास्तच घेतली तेव्हा आई त्याला ओरडली " राजू, नुसते बिस्किटे खाऊन राहणार आहेस का ? पोळी-भाजी काही खाणार आहेस की नाही " 
यावर राजू म्हणाला " हो आई, सर्वच खातो, काळजी नको, बाय" असे म्हणून तो बॅग खांद्याला लटकावला आणि शाळेला निघाला. राजू चौथ्या वर्गात शिकणारा एक हुशार आणि अभ्यासू मुलगा. एकुलता एक होता पण त्याने कधी हट्ट करून आपल्या आई-बाबांना त्रास दिला नाही. त्याचे वडील एका खाजगी कंपनीत कामावर होते. सकाळी लवकर जात असत आणि रात्रीला उशिरा येत असत. राजुची आई मात्र खूपच प्रेमळ होती. शाळेतून घरी आली की ती त्याचा अभ्यास करवून घेई आणि छान छान गोष्टी सांगत गप्पा मारत असे.
घरापासून काही अंतर चालून गेल्यावर काल त्याला ते कुत्र्याचे पिल्लू दिसले होते म्हणून तो त्याला शोधू लागला. पण त्याला कुठेच दिसत नव्हतं. कुत्र्याचे पिल्लू दिसत नाही हे पाहून त्याला दुःख वाटू लागले. तो नाराज झाला होता पण तेवढ्यात काही अंतरावर ते कुत्र्याचे पिल्लू शेपूट हलवत हलवत राजूकडे येत असल्याचे त्याने पाहिले. तेव्हा राजू खूप आनंदी झाला. बॅगमधील खाऊच्या डब्यातून दोन बिस्किटे त्याला खाण्यास दिली आणि आनंदाने शाळेला गेला. शाळेत आज त्याला खूपच वेगळं वाटत होतं. आपण काहीतरी मोठं काम केलोय असे त्याला मनोमन वाटत होतं. 
मोरे सर वर्गात आले आणि त्यांनी शिकवायला सुरुवात केली. मुक्या प्राण्यांवर प्रेम करा असे आपल्या संतांनी सांगून गेले आहेत. असे मोरे सर बोलत होते आणि राजू मनोमन खूप खुश झाला होता. सायंकाळी शाळेतून घरी जाताना परत त्या कुत्र्याच्या पिल्लूला त्याने आपल्या खाऊच्या डब्यातील दोन बिस्किटे दिली. राजूने बिस्किट खाणे बंद केले आणि आपले बिस्किटे त्या कुत्र्याच्या पिल्लाला देऊ लागला. राजूची आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाची छान मैत्री जमली. शाळेतून येता जाता राजू त्याला बिस्किट खायला द्यायचा आणि ते पिल्लू राजूजवळ येऊन घुटमळत बसायचा. कुत्र्याच्या पिल्लाला राजुची ओळख झाली होती. तो दूरवर येताना पाहून त्याच्याकडे तोंड करून शेपूट हलवत उभा राहायचा.
त्या दिवशी रविवार होता. राजूने आपल्या आईला त्या रस्त्यावरील कुत्र्याच्या पिल्लूबद्दल पूर्ण माहिती सांगितली आणि म्हणाला, " आई, त्या कुत्र्याच्या पिल्लाला आपण घरी आणू या ना, प्लिज" यावर आई म्हणाली, " नको बाळा, आपल्या बाबांना हे मुळीच आवडत नाही" हे ऐकून तो खूप नाराज झाला. राजुचे बाबा जरा कडक शिस्तीचे होते. त्या दिवशी रविवारची सुट्टी होती. त्यामुळे राजूला देखील सुट्टी होती. पण त्या कुत्र्याच्या पिल्लूला काय माहीत ? आज रविवारची सुट्टी असते. तो राजू ज्या रस्त्याने येतो त्या रस्त्यावर डोळे लावून बसला पण तो काही आलाच नाही. ते पिल्लू खूप नाराज झाले. त्याला भूक लागली होती. काही तरी खायला मिळते का म्हणून तो रस्त्यावर इकडे तिकडे भटकू लागला. पण त्याला काहीच भेटले नाही. तेवढ्यात त्याला रस्त्याच्या मधोमध काहीतरी पडल्याचे दिसले आणि तो ते खाण्यासाठी तो पळत सुटला. तेवढ्यात दुसरीकडून खूप वेगात आलेल्या कारने त्या कुत्र्याच्या पिल्लाला उडवले. ते कुत्र्याचे पिल्लू जागेवरच गतप्राण झाले. कुणी तरी त्या कुत्र्याच्या पिल्लाला उचलून रस्त्याच्या एका बाजूला केलं. 
राजूला त्या दिवशी दिवसभर चैन पडले नाही. ते पिल्लू आज काय खाल्ले असेल ? उपाशीच झोपला असेल का ? असे नाना विचार त्याच्या डोक्यात घोळत होते. त्याला घरी आणलं असतं तर बरं झालं असतं असा विचार करतच तो झोपी गेला. सकाळ झाली. तो नेहमीप्रमाणे आपली बॅग घेऊन शाळेला निघाला. त्याठिकाणी आल्यावर तो इकडे तिकडे पाहू लागला. पण त्याला कुठेच कुत्र्याचे पिल्लू दिसत नव्हते. राजूला पाहताच ते पिल्लू धावत त्याच्याकडे येत होतं. पण आज तसे काही घडत नव्हते. काही तरी विपरीत घडलं असणार अशी शंकेची पाल राजुच्या मनात चुकचुकली. बराच वेळ वाट पाहून देखील ते पिल्लू आले नाही तेव्हा राजूने तेथील एका माणसाला त्या पिल्लू विषयी विचारलं, " अहो काका, येथे एक छोटं कुत्र्याचं पिल्लू होतं, ते कुठं गेलंय, दिसत नाही" यावर त्या माणसाने काल रस्त्यावर घडलेली घटना राजूला सांगितली. ते पिल्लू आता या जगात नाही हे ऐकून तो खूप नाराज झाला. शाळेत गेल्यावर देखील त्याचे कुठेही मन लागत नव्हते. दिवसभर तो त्या पिल्लाच्या विचारात मग्न होता. घरात देखील त्याचे मन लागत नव्हते, यावर त्याची आई म्हणाली, " काय झालं राजू, बरं वाटत नाही का ? एवढा उदास का आहेस ? " यावर राजू काही बोलला नाही डोळ्यातून अश्रू गाळत राहिला. तेव्हा आईने त्याला जवळ घेतले आणि प्रेमाने विचारल्यावर तो म्हणाला, " आई, ते कुत्र्याचे पिल्लू मेलंय गं ! " हे ऐकून आईला देखील खूप दुःख झालंय. राजुची इच्छा आपण पूर्ण केली असती तर ते कुत्र्याचं पिल्लू देखील वाचलं असतं आणि राजू देखील आनंदी राहिला असता असे आईला वाटू लागले. 

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

कथा आवडली तर comment मध्ये लिहा

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...