Monday 26 April 2021

akbar birbal marathi katha

बादशाह अकबर आणि बिरबलची कहाणी

मेणाचा वाघ

हिवाळ्याचा महिना चालू होता. अकबराचा दरबार पूर्ण भरला होता. त्या दरबारामध्ये शेजारच्याच राजाने पाठवलेला एक सेवकही उपस्थित होता.
त्या राजाने स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी त्या सेवकाजवळ एक मेना पासून बनवलेला वाघ एका पिंजरा मध्ये बंद करून पाठवला होता आणि असे सांगण्यात आले होते की पिंजरा न खोलता या वाघाला बाहेर काढून दाखवा.
दरबारामध्ये बीरबल नसल्यामुळे अकबर विचारात गुंतला होता की या समस्यांमधून मार्ग कसा काढावा. जर आपण या वाघाला बाहेर काढले नाही तर सर्व लोक आपल्यावर हसतील. एवढ्यात बुद्धिमान चतुर आणि हुशार बिरबल दरबारामध्ये येऊन सर्व सूत्रे आपल्या हाती घेतो.
तेव्हा बिरबलाने एक गरम सळई मागवली आणि ती पिंजऱ्यामध्ये घालून तो मेना पासून बनवलेला वाघ वितळविला. बघता बघता मेन वितळून बाहेर येऊ लागले. अकबर-बिरबलाच्या कल्पनेवर खूप प्रसन्न झाला आणि पुन्हा त्या राजाने अकबराला आव्हान दिले नाही.

तात्पर्य बुद्धीच्या जोरावर कितीही मोठ्या समस्येवर मात केली जाऊ शकते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विहिरीतल्या पाण्याची मालकी कोणाची

एकदा एका माणसाने आपली विहीर गावातील एका शेतकऱ्याला विकली. दुसऱ्या दिवशी तो शेतकरी विहिरीतील पाणी काढण्यासाठी विहिरीजवळ आला तेव्हा त्या माणसाने शेतकऱ्याला विहिरीतील पाणी काढण्यासाठी मनाई केली आणि म्हणाला मी तुला हि विहीर विकली आहे त्यातील पाणी नाही, हे ऐकून तो शेतकरी दुःखी झाला आणि मदत मागण्यासाठी अकबराकडे गेला
बादशहा अकबराने थोडा विचार करून बिरबलाला दरबारात बोलावले आणि या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सांगितले. सर्व हकीकत ऐकल्यानंतर बिरबलाने त्या माणसाला बोलावले ज्याने शेतकऱ्याला विहीर विकली होती. नंतर त्या माणसाला विचारण्यात आले की तू शेतकऱ्याला या विहीरीतून पाणी का काढून देत नाहीस तू तर ही विहीर शेतकऱ्याला विकली आहेस ना? तेव्हा तो म्हणाला मी शेतकऱ्याला फक्त विहीर विकली आहे त्यातील पाणी नाही.
तेव्हा बिरबल हसत म्हणाला की तू फक्त विहीरच शेतकऱ्याला विकली आहेस आणि पाणी नाही तेव्हा तुला या विहिरींमध्ये पाणी ठेवण्याचा काहीही अधिकार नाही तेव्हा तू लगेच या विहिरीतील पाणी काढून ने नाहीतर त्याचे व्याज शेतकऱ्याला दे. एवढे ऐकून तो माणूस समजला की आपले या महाचतुर माणसासमोर काहीही चालणार नाही तेव्हा त्याने आपली चूक कबूल केली आणि त्या शेतकऱ्याला व्याजही दिले. बिरबलाच्या या न्यायावर अकबर ही खुश झाला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
डोळे असूनही आंधळे माणसे

राजाचा दरबार भरलेला असताना राजाने आपल्या सर्व मंत्र्यांना विचारले की आपल्या राज्यांमध्ये डोळे असलेल्या आंधळ्या लोकांची संख्या किती आहे. त्यावर सर्व मंत्री एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले आणि कोणालाही याचे उत्तर सांगता येत नव्हते. त्याच दरबारामध्ये बिरबल ही उपस्थित होता. बिरबलाला ही हा प्रश्न विचारण्यात येतो.
तेव्हा बिरबल म्हणतो राजे मला याचे उत्तर देता येणार नाही परंतु आपल्या राज्यात डोळे असलेल्या आंधळ्याची संख्या भरपूर आहे. राजाने विचारले, असे तु ठामपणे कसे सांगू शकतो? त्यावर बिरबल म्हणतो, राजा मला दोन दिवसाची मुदत द्या मी तुम्हाला या दोन दिवसांमध्ये अशा लोकांची नावे आणून देतो.
दुसऱ्या दिवशी बिरबलाने आपला बिछाना अंगणात आणला आणि त्याचे राहिलेले अर्धे काम पूर्ण करू लागला. बिरबलाने रस्त्यावरून चाललेल्या एका माणसाला बोलावले आणि कागद-लेखणी घेऊन बसण्यास सांगितले.
रस्त्यावरून जाणारी सर्व लोक बिरबलाला येऊन विचारत होती की, हे काय चालले आहे?. बिरबलाने त्या सर्व लोकांची नावे लिहून घेण्यास सांगितले. बघता बघता ही माहिती संपूर्ण गावामध्ये पसरली. त्यामुळे गावातील सर्व लोक येऊन पाहू लागले की बिरबल हे काय करत आहे. 
या गोष्टीची राजाला ही उत्सुकता होती त्यामुळे राजाही येऊन बिरबलाला विचारू लागला की बीरबल हे काय चालू आहे. तेव्हा बिरबलाने राजाचे नाव त्या कागदावर सर्वात वर लिहिण्यास सांगितले. दोन दिवसानंतर बिरबल तो कागद घेऊन दरबारात पोहोचला.
तेव्हा राजाने विचारले या कागदावर माझे नाव सर्वप्रथम का आहे? बिरबल म्हणाला मी माझ्या बिछान्याचे काम करत होतो हे पाहत असूनही लोक मला विचारत होते आणि तुम्हालाही उत्सुकता असल्यामुळे तुम्हीही माझ्या घरी आलात, तुम्ही राजा असल्यामुळे तुमचे नाव सर्वप्रथम असावे अशी माझी इच्छा होती. 
राजा हसून म्हणाला की तू खूप हुशार आणि बुद्धिमान आहे शेवटी तू अशा लोकांची नावे शोधून काढली ज्यांना डोळे असूनही ती आंधळी आहेत.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कावळ्यांची संख्या

एके दिवशी अकबर बादशहा सर्वांच्या आधी दरबारामध्ये पोचले. आणि मागून येणाऱ्या सर्व मंत्र्यांना विचारू लागले की आग्रा मध्ये कावळ्यांची संख्या किती आहे?. हे ऐकून सर्व मंत्री शांत झाले. कोणालाही याचे उत्तर देता येत नव्हते. चुकीचे किंवा बरोबर कोणीही उत्तर देत नव्हते. तेव्हा बिरबल दरबारामध्ये हजर होतो.
त्यालाही हाच प्रश्न विचारण्यात येतो. बिरबलाने पटकन उत्तर दिले ही मागच्याच वर्षे कावळ्यांची जनगणना करण्यात आली होते. आग्रा मध्ये एकूण पंधराशे कावळे आहेत. 
अकबर बादशहा कावळ्यांचे स्पष्ट संख्या ऐकून चकित झाला आणि म्हणाला तू कावळ्यांची संख्या केव्हा मोजली? मला त्याचा संदर्भ दे. तुझ्यापाशी दोन दिवसाचा वेळ आहे या दोन दिवसांमध्ये तू पूर्ण विचार करून मला त्यांची संख्या सांग नाहीतर तुला दहा हजार सुवर्णमुद्रांचा दंड भरावा लागेल.
हे ऐकून बिरबल म्हणाला मी मोजलेल्या संख्या बरोबरच आहे त्यामध्ये तेव्हाच तफावत असेल जेव्हा आग्रा मधून काही कावळे बाहेर गेले असतील किंवा काही बाहेरचे पाहुणे कावळे आग्रा मध्ये आले असतील.
बिरबलाचे हे बोलणे ऐकून राजा खूष झाला आणि त्याला दहा हजार रुपये सुवर्णमुद्रा बक्षीस म्हणून दिल्या.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पृथ्वीचा मध्य

अकबर बादशहाचा एक मंत्री अकबर बादशहाचे बिरबल विरुद्ध कान भरत होता. तो म्हणाला बादशाह तुम्ही बिरबलाला उगाचच ठेवले आहे त्याचे काही कामच नाही. त्यावर बादशहा म्हणाला बिरबल ! बिरबल तर फार हुशार व्यक्ती आहे. तो प्रत्येक प्रश्नाची उत्तरे इतकी सहजपणे आणि उत्कृष्ट पद्धतीने देतो.
त्यावर तो मंत्री म्हणाला महाराज जर बिरबलाने मी केलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित दिली तर आपण त्याला मानू.
प्रश्न १ पृथ्वीचा मध्य कोठे आहे? प्रश्न २ आकाशात तारे किती आहेत? प्रश्न ३ पृथ्वीवर स्त्री-पुरुषांची संख्या किती आहे?
लगेच बादशहाने बिरबलाला आमंत्रण पाठविले. बिरबल लगेच दरबारामध्ये उपस्थित झाला. झालेली हकीकत बिरबलाला व्यवस्थित रित्या सांगण्यात आली.
बिरबल विचार करू लागला नंतर त्याने एक लाकडाची काठी आणली आणि ती दरबारामध्ये रोवली आणि म्हणाला हा आहे पृथ्वीचा मध्य विश्वास बसत नसेल तर मोजून पहा.
आकाशामध्ये तारे किती आहेत याचे उत्तर देताना बिरबलाने एक बकरी आणली आणि ती दरबारामध्ये ठेवली आणि म्हणाला महाराज या बकरीच्या अंगावर जेवढे केस आहेत तेवढेच आकाशामध्ये तारे आहेत विश्वास बसत नसेल तर मोजून पहावे.
तिसऱ्या प्रश्नाची म्हणजे स्त्री व पुरुषांची संख्या किती आहे याचे उत्तर देताना बिरबल म्हणाला स्त्री-पुरुषांची संख्या तेव्हाच समान होईल जेव्हा ह्या मंत्र्याला आपण ठार मारू कारण हा ना तर स्त्री आहे ना तर पुरुष.
हे ऐकताच तो मंत्री दरबार सोडून पळून गेला व अकबराने बिरबलाच्या सत्कार केला आणि प्रशंसा करत राहिला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बैलाचे दूध

दरबार भरला होता आणि दरबाराचे काम चालू होते. दरबार संपल्यानंतर अकबराने बिरबलाला सांगितले बिरबल मला बैलाचे दूध पाहिजे आहे. तू मला ते आणून दे. एका वैद्यांनी मला एक औषध सांगितले आहे त्यासाठी बैलाचे दूध लागणार आहे तू काहीही करून मला बैलाचे दूध आणून दे. यावर थोडा विचार करून म्हणाला महाराज मला दोन चार दिवस द्या मी त्यामध्ये तुम्हाला बैलाचे दूध आणून देण्याचा प्रयत्न करीन.
यावर अकबर म्हणाला सात-आठ दिवस घे पण मला बैलाचे दूध आणून दे. हे झाल्यानंतर बिरबल त्याच्या घरी गेला. काही वेळाने तो त्याच्या मुलीला म्हणाला मी सांगेन तसे करायचे. महाराज अकबर यांच्या महालाच्या बाजुलाच एक नदी आहे त्या नदीवर मध्यरात्री जाऊन जोरात कपडे धुवायचे त्याचा आवाज अकबर यांच्यापर्यंत गेला पाहिजे.
वडिलांचे बोलणे ऐकून दुसर्या दिवशी मध्यरात्री बिरबलाच्या मुलीने तसेच केले. ती मध्यरात्री त्या नदीवर गेली आणि तिथे जोरात कपडे आपटून लागली. या होणाऱ्या जोरदार आवाजामुळे अकबराची झोप मोड झाली आणि तो क्रोधित झाला. त्याने शिपायांना आदेश दिला जो कोणी मध्यरात्री जोरात आपटून कपडे धूत आहे त्याला तात्काळ माझ्याकडे घेऊन या.
शिपायांनी त्यांच्या महाराजांचा आदेश पाळला आणि त्या मुलीला घेऊन ते महालात आले. महालात आल्यानंतर अकबराने विचारपूस केली एवढी गरजच काय एवढ्या रात्री कपडे धुवायची?
त्यावर त्या मुलीने घाबरत घाबरत उत्तर दिले काल मला खूप काम होते कारण माझ्या वडिलांना मूळ झाले. त्यामुळे माझा सर्व दिवस याच कारणामुळे व्यक्त केला. म्हणून माझी इतर कामे झाली नाहीत त्यामुळे मी एवढ्या रात्री माझी कामे करण्याचा निर्णय घेतला म्हणून मी मध्यरात्री कपडे घेऊन नदीवर धुण्यासाठी आले.
यावर अकबर बोलला काय बोलतेस!!! पुरुषाला मूल कसे होईल?
त्यावर त्या मुलीने उत्तर दिले 'हो महाराज तुमचे बरोबर आहे जसे बैल दूध देऊ शकतो तसेच पुरुष देखील मुले देऊ शकतोस ना?'
यावर लगेच अकबराला कळाले की व्यक्ती बहुदा बिरबलाने पाठवली असावी. नंतर त्या मुलीने अकबराला संपूर्ण गोष्ट सांगितली आणि अकबराने आपली चूक मान्य केली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हा नोकर चोर आहे

एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलाकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली आहे. माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी दहा नोकर आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले पण त्यातील एकजणही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.
बिरबल त्या व्यापार्‍याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठ्या आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व काठ्या समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उद्या मला परत करा. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.
दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो. त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसर्‍या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या.
त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, 'हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले.' शेवटी त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापार्‍याचे दागिने परत केले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मोठा माणूस होशील

 गावात असलेल्या नातेवाइकांकडे आठ-दहा वर्षांचा महेशप्रसाद आपल्या ‍वडिलांसोबत जायला निघाला, म्हणून आई त्याला म्हणाली, बाळा जेवण करून जा. तेव्हा तो आईला म्हणाला, ''आई, मला बिलकुल भूक नाही आहे, तर जेवणात वेळ फुकट कशाला घालवू?'' नंतर महेश व त्याचे वडील परगावच्या रस्त्याला लागले. काही अंतर चालून गेल्यानंतर भुकेने महेशच्या पोटात कावळे ओरडायला लागले. इतक्यात रस्त्याच्या एक कडेला ब्रह्मदेवाचे मंदिर दिसले, म्हणून महेशचे वडील त्याला घेऊन मंदिरात गेले.
मंदिराच्या गाभार्‍यातील ब्रह्मदेवाच्या चतुर्मखी म्हणजे चार मुखे असलेल्या मूर्तीला वडील भक्तिभावाने नमस्कार करू लागले, तेव्हा भुकेने कासावीस झालेला महेश रडू लागला. हे बघून वडिलांनी त्याला विचारले, ''महेश, का रे बाळा असा का बर रडतोस आहे ?''
आई आपल्याला जेवण करून जा, असे सांगत असूनही आपण तिचे ऐकले नाही. आणि आता जर वडिलांना सांगितले, तर ते आपल्यास रागवतील, अशी भीती वाटून हजर जबाबी महेश वडिलांना म्हणाला, ''बाबा, मला एकच नाक आहे व सर्दी झाल्यानंतर ते वाहू लागले की, पुसून-पुसून नाकी नऊ येतात, तर मग या चार मुखे असलेल्या ब्रह्मदेवाला सर्दी झाली आणि याची चारही नाके एकाच वेळी वाहू लागली, तर याचे कसे हाल होत असतील ? त्याच्या त्या वेळी होणार्‍या फक्त कल्पनेनेच मला रडायला येत आहे.''
आपला मुलगा का रडत आहे, हे माहीत असल्यामुळे त्याने सांगितलेली सबब ऐकताच वडील आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, ''बाळा, तू पुढे फार मोठा माणूस होशील.''
तसेच एकदा महेश सोळा वर्षांचा असताना एकटाच रानातील रस्त्याने परगावी चालला होता. इतक्यात एका झाडीतून एक वाघ बाहेर आला आणि त्याच्या अंगावर धावला. तेव्हा त्याच्याशी महेशने कडवी झुंज देऊन त्याला पळून जाण्‍यास भाग पाडले. तेव्हापासून अंगात वीराचे असलेल्या महेशला लोक मोठ्या प्रेमाने 'वीरबल' असे म्हणू लागले, आणि पुढे वीरबल म्हणता-म्हणता त्याचे नाव बिरबल झाले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बिरबलची खिचडी


दिल्लीची जबरदस्त थंडी चराचराला गोठवुन टाकत होती. अशा त्या भयंकर थंडीच्या मोसमात अकबरानं बिरबलाला विचारलं, 'बिरबल, या थंडीच्या दिवसात एखादा एखादा माणूस शंभर मोहोरांसाठी त्या समोरच्या तलावात स्वत:ला गळ्यापर्यंत बुडवून घेऊन, रात्र काढील काय रे?'
'कुणी सांगाव ? परिस्थितीनं गांजलेला पण प्रकृत्तीनं ठणठणीत असलेला एखादा माणूस हे दिव्य करायला तयार होईलसुध्दा.' बिरबल बोलून गेला. दुसऱ्याच दिवशी बिरबलाला असा मनुष्य आढळला. तो त्याला बादशहाकडे घेऊन गेला. बादशहा त्याला म्हणाला, 'कुठल्याही तऱ्हेची ऊब न घेता, उघड्या अंगान सबंध रात्र त्या तलावात, गळ्यापर्यंत बुडलेल्या स्थितीत काढायची, ही अट तुला मान्य आहे ना ?' त्या गरजू माणसान ती अट मान्य केली आणि बादशहाने ठेवलेल्या शिपायांच्या जागत्या पहाऱ्यात, त्या तलावातील बर्फ़ागार पाण्यात त्याने ती सबंध रात्र घालवली.
मग शंभर सुवर्ण मोहोरांचे इनाम घेण्याच्या आशेने तो माणूस राजवाड्यावर गेला असता, बादशहानं त्याला विचारलं 'काय रे ? थंडी एवढी जबरदस्त पडली असताना, तू तलावाच्या गार गार पाण्यात सबंध रात्र कशी काय काढलीस ?'
तो मनुष्य म्हणाला, 'आपल्या वाड्याच्या सर्वात वरच्या मजल्यावरचा दिवा मला दिसत होता. त्याच्यावर दृष्टी खिळवून, मी गेली रात्र कशीतरी घालवली' त्याच हे विधान ऎकून बादशहाचा हुजऱ्या म्हणाला, ' खाविंद, आपला वाडा त्या तलावापासून अर्धा मैल असला, तरी त्याच्या वरच्या मजल्यावर जळत असलेल्या दिव्याकडे हा टक लावून बघत राहिल्याने, त्याची ऊब याला थोड्याफ़ार प्रमाणात का होईना-मिळाली. म्हणजे याने 'कुठल्याही तऱ्हेची ऊब न घेता तलावाच्या पाण्यात रात्र काढण्याची अट मोडलेली आहे. तेव्हा याला कसल्या शंभर सुवर्ण मोहोरा द्यायच्या ?' हुजऱ्याच्या या म्हणण्याला बादशहांनी दुजोरा दिला आणि तो गरीब मनुष्य हिरमुसल्या मनानं परत गेला.
मात्र त्याच दिवशी त्याने बिरबलाची भेट घेतली आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाची त्याला माहिती दिली. बिरबलाने त्याला थोडा धीर धरायला सांगून, घरी जायला सांगितले. दुसऱ्या दिवशी बराच उशीर झाला, तरी बिरबल दरबारात आला नसल्याचे पाहून, बादशहानं दरबारी मंडळीकडे त्याची चौकशी केली; तेव्हा एकजण हसत हसत म्हणाला, 'खाविंद, आपल्या लाडक्या बिरबलाचं डोकं फ़िरलयं ! यमुनेकाठी २० हात उंचीचे तीन खांब अगदी एकमेकांजवळ पूरुन त्यावर त्याने खिचडीसाठी धान्याची एक हंडी ठेवलीय, आणि खाली जमीनीवर त्याने गवताची एक बारीकशी शेकोटी पेटवलीय !'
हा अजब प्रकार ऎकून आश्चर्यचकीत झालेला बादशहा स्वत: बिरबलाकडे गेला व त्याला म्हणाला, 'बिरबल, अरे, एरवी तू एवढी चतूर असताना, आज तुझ्या डोक्यात हे वेडकसं काय शिरलं ? अरे, जमिनीवर पेटवलेल्या या गवताच्या छोट्या शेकोटीची धग त्या वीस हात उंचीवर ठेवलेल्या खिचडीच्या भांड्याला लागणं शक्य आहे का ?'
बिरबल म्हणाला, 'का नाही लागणार ? आपल्या वाड्याच्या वरच्या मजल्यावरील दिव्याच्या ज्योतीची धग जर अर्ध्या मैलावर असलेल्या त्या तलावातील माणसाला लागते, तर या शेकोटीची धग अवघ्या वीस हात उंचीवर ठेवलेल्या माझ्या खिचडीच्या हंडीला का लागू नये ?'
बिरबलाच्या या उत्तरानं बादशहाच्या डोक्यात 'प्रकाश' पडला, आणि त्याने त्या तलावात रात्र काढलेल्या माणसाला बोलवून, त्याला शंभरऎवजी दोनशे सुवर्ण मोहरा दिल्या.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मूर्ख प्रश्न

एकदा दरबार चालू असताना बादशहाच्या मनात एक विचार आला. त्याने दरबालातील सर्व कामे बाजूला ठेऊन बिरबलला विचारले, बिरबल एखाद्या नालायक माणसाशी गाठ पडली तर काय करावे? बिरबल खूप कामात होता. कामाच्या वेळी बादशाहाने असा विचित्र प्रश्न विचारलेले बिरबलला आवडले नाही. परंतु काहीही न बोलता त्याला गप्प बसून आपले कामही करता येण्या सारखे नव्हते. “महाराज आपल्या या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ह्याच वेळी मिळेल.
बिरबल दरबारातील आपल काम उरकून घरी गेला आणि आपल्या एका मित्राला घरी बोलवलं. तो म्हणाला उद्या तू माझ्या बरोबर बादशहाच्या दरबारात ये. बादशहा तुला प्रश्न विचारतील तू काही बोलू नकोस. बादशहाने कितीही प्रयत्न केले तरी तू तोंड उघडू नकोस. घरी आल्यावर मी तुला इनाम देईन.
दुसऱ्या दिवशी मित्राला घेऊन बिरबल बादशहाच्या दरबारात गेला. बादशहाला मुजरा करून तो म्हणाला महाराज आपल्या कालच्या प्रश्नाच उत्तर माझा हा मित्र देईन. विचारा त्याला प्रश्न.
बादशाहने त्याला प्रश्न विचारला एखादया नालायक माणसाशी गाठ पडली तर शहाण्या माणसाने काय करावे? बिरबलचा मित्र काही न बोलता चुळबुळ करत राहिला. बादशहाने आपला प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला. परंतु बिरबलचा मित्र गप्पच.
शेवटी बादशहा चिडला तो बिरबलाला म्हणाला, काय मूर्ख पणा चालवला आहे. तुझा मित्र तर काहीच बोलत नाही. बिरबल नम्र पणे म्हणाला महाराज , माझ्या मित्राने आपल उत्तर दिले आहे. नालायक माणसाबरोबर गाठ पडली तर गप्प राहावे. बादशहाला उत्तर मिळाले. परंतु बिरबलने आपलयाला नालायक ठरविल्या मुळे तो मनातून खजील झाला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विचित्र परीक्षा

बऱ्याच दिवसानंतर बादशाहाला आपल्या सरदारांची विचित्र परीक्षा घेण्याची लहर आली. त्याने आपल्या सरदारांना मांजरीची गोजिरवाणी पिल्ल दिली. तो म्हणाला आज पासून बरोबर सहा महिन्यांनी हि पिल्ल घेऊन दरबारात यायच आहे. ज्याचे मांजर श्रेष्ठ ठरेल त्याला बादशाह कडून मोठ बक्षीस दिल जाईल.
प्रत्येक सरदार आपलयाला मिळालेल्या मांजराचे पिल्लू घेऊन घरी गेले. घरातल्या माणसांना त्यांनी बादशाहाने ठेवलेल्या बक्षीसाबद्दल सांगितले. मांजराला चांगली मिठाई व दुध खाऊ पिऊ घाला अशी घरतल्या माणसांना सूचना दिली.
प्रत्येक सरदाराच्या घरी मांजरांचा खुराक चालू झाला. हळू हळू मांजराच्या अंगावर तेज येऊ लागल. ती चांगली गुबगुबीत दिसू लागली. मात्र बिरबलान आपलयाला मिळालेल्या मांजराला असा खुराक दिला नाही. घरातल्या साध्या अन्नावर त्याला वाढववील. उंदीर पकडायला शिकवलं. बिरबलाचे मांजर उंदीर पकडण्यात तरबेज झाले. मात्र ते हडकुळे राहिले.
अकबर बादशहाने एक चांगला दिवस ठरवून सर्व सरदारांना आपआपली मांजर दरबारात घेऊन यायला सांगितले. प्रत्येक जन आपआपली मांजर घेऊन दरबारात आला. अकबरान सर्व मांजरा वरून नजर फिरवली. बिरबलाच्या हातातील हडकुळे मांजर पाहून बादशाहाला हसू आले. आपले हसू दाबीत बादशहा म्हणाला “बिरबल सर्व सरदारांची मांजर गुबगुबीत दिसत असताना तुझे मांजर हडकुळे का?”
बिरबल आपल्या मांजरी वरून हात फिरवत म्हणाला, “खाविंद आपण मांजराची परीक्षा तर घ्या.” उंदीर पकडन हे मांजराचे काम आहे. त्यात ते पटाईत असायला हवे. बादशाहने मान हलवली आणि नोकराला दरबारात उंदीर सोडायला सांगितले. पंधरा वीस उंदीर दरबारात धाऊ लागले. प्रत्येक सरदाराने त्या दिशेने आपली मांजर सोडली. बिरबलाच्या मांजराने तर बिरबलाच्या हातातून उडी मारली. ते उंदराच्या मागे सुसाट धावत सुटले. त्याने दोन तीन उंदीर मारले देखील. इतर गलेलठ्ठ मांजरे फक्त आपल्या गोंडेदार शेपट्या फुगवून तशाच जागेवर बसून पाहून लागली. त्यांनी फक्त आपल्या मिशा फेंदारल्या होत्या आणि अंग फुगविले होते. सरदार त्यांना पुढे ढकलत होते. परंतु जागेवरून हलण्याची त्यांची तयारी नव्हती.
बादशहाने बिरबलच्या मांजराला श्रेष्ठ ठरवून बिरबलाला भल मोठ बक्षीस दिल.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विहिरीचे लग्न

एकदा बादशहा आणि बिरबल मध्ये खूप कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात बादशहा बिरबलाला म्हणाला तू राजधानी सोडून चालता हो. तुझी मला मुळीच गरज नाही.
बिरबल अतिशय स्वाभिमानी होता. तो ताबडतोब राजधानी सोडून निघून गेला आणि एका गावात वेश बदलून राहू लागला.
बरेच दिवस उलटून गेले तरी बिरबल राजधानी मध्ये परतला नाही. बादशाहला मात्र सारखी त्याची उणीव भासे, त्याची कामे अडून राहू लागली आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे बादशाहला त्याच्या शिवाय करमत नव्हते. अन्न गोड लागत नव्हते. बादशाहाने अनेक प्रकारे बिरबलाचा शोध घेतला. परंतु बिरबल सापडत नव्हता.
बिरबलाला कसे शोधून काढावे यावर बादशाहने खूप विचार केला. बादशाहने बिरबलाच्या सहवासात बरेच दिवस घालवले होते. त्यामुळे बादशाहालाही त्याला शोधून काढण्याची युक्ती सुचली. त्याने प्रत्येक गावात दवंडी पिटली. राजवाड्यातील विहिरीचे लग्न करावयाचे आहे.
लग्न समारंभ थाटात होणार आहे. तरी प्रत्येक गावाच्या लोकांनी आपआपल्या विहिरीसह उपस्थित रहावे. जे उपस्थित राहणार नाही त्यांना जबरदस्त दंड केला जाईल. सर्व लोक चिंतेत पडले कुणालाच काही सुचेना.
बिरबल ज्या गावात राहत होता त्या गावातले लोकहि चिंतेत पडले होते. गावच्या पुढारींना या समस्येला कसे तोंड द्यावे समजत नव्हते. ठिकठिकाणी चर्चा सुरु झाल्या लोकांची मते घेतली जाऊ लागली. अशाच एका सभेला शेतकऱ्याचा वेश घेतलेला बिरबल हजर होता. त्याने गावकरींना जाण्याची युक्ती सांगितली.
गावकरी खुश झाले. एक दिवस गावातील पाच-सहा प्रमुख पुढारी उंची वस्त्रे घालून दिल्लीला गेले. दरबारात बादशहा पुढे हात जोडून ते म्हणाले, “खाविंद आपल्या आज्ञेप्रमाणे आणि निमंत्रण स्वीकारून आपल्या राजवाड्यातील विहिरीच्या लग्नाला आमच्या गावाच्या झाडून सर्व विहिरींना घेवून आम्ही हजर झालो आहोत.”
आमच्या गावच्या विहिरी वेशी बाहेर थांबल्या आहेत. तेव्हा आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे राजधानीतील काही प्रमुख विहिरींना त्यांचे स्वागत करण्यासाठी वेशी पर्यंत पाठवावे. त्याचे बोलणे ऐकून बादशहा जोरात हसला आणि ओरडला, बिरबल सापडला!
बादशहा म्हणाला, अजून पर्यंत एकही गावाचे लोक राजधानीत आले नाही. तुम्हीच प्रथम हजर झाला. तुम्हाला हि युक्ती कोणी सांगितली?
“एका शेतकऱ्याने महाराज!”, गावकऱ्यांनी नम्रपणे उत्तर दिले. तो शेतकरीच माझा बिरबल आहे. बादशाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ताबडतोब त्याने माणसांबरोबर लवाजम्यासहित काझीला पाठवले. बिरबलला राजधानीत सन्मानाने आणण्याचा हुकुम दिला.
बिरबल बादशाच्या महालात आला आणि त्याने बिरबलाला मिठी मारली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पाच मूर्ख

अकबर बिरबल सभेत बसून गोष्टी करत होते. तेव्हाचं अकबर म्हणाला मला या राज्यातील 5 मूर्ख शोधून दाखवं. राजाचा आदेश ऐकून बिरबलाने शोध सुरू केला. एका महिन्यानंतर बिरबल दोन लोकांना घेऊन परतला तर अकबर म्हणाला, मी तर तुला 5 मूर्ख आण्यासाठी सांगितले होते आणि तू फक्त दोनचं घेऊन आला.
पहिला मूर्ख: यावर बिरबल म्हणाला, सम्राट! हा पहिला मूर्ख आहे. मी याला बैलगाडीवर बसून जड बॅगचं ओझं डोक्यावर घेताना पाहिले. कारण विचारल्यावर हा म्हणाला की बैलाला जास्त ओझं नको म्हणून मी ते डोक्यावर घेतलं आहे. या प्रकारे हा पहिला मूर्ख आहे.
दुसरा मूर्ख: हा दुसरा मूर्ख जो आपल्या म्हशीला गवत खिलवण्यासाठी गच्चीवर घेऊन जातो. कारण विचारल्यावर म्हणाला की गच्चीवर गवत उगते म्हणून मी म्हशीला वरती नेतो. हा माणूस गच्चीवरील गवत कापून फेकू शकत नाही आणि म्हशीला वर घेऊन जातो म्हणजेच की हा दुसरा मूर्ख आहेत.
तिसरा मूर्ख: सम्राट! आपल्या राज्यात इतके काम आहे, पूर्ण राज्याची नीती मला संभालायची आहे. असे असूनही मी या मूर्खांना शोधण्यासाठी एक महिना वाया घालवला म्हणून तिसरा मूर्ख मीच आहे.
चौथा मूर्ख: सम्राट! पूर्ण राज्याची जबाबदारी आपल्यावर आहे. सुपीक डोके असणार्‍यांकडून आपण कामाची अपेक्षा ठेवू शकतो आणि मूर्ख लोकं आमच्यासाठी मुळीच कामाचे नाही तरीही आपण मूर्खांच्या शोधात आहे या अर्थी आपण चौथे मूर्ख आहात.
पाचवा मूर्ख: सम्राट! आता मी सांगू इच्छित आहोत की सगळ्यांना इतके काम आहेत. आपआपल्या नोकरी-धंध्यातील इतके महत्त्वाचे काम सोडून जो हा किस्सा वाचत आहे आणि पाचवा मूर्ख कोण हे माहीत करण्यासाठी अजून ही वाचतोय तोच पाचवा मूर्ख आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जे होते ते चांगल्यासाठीच

एकदा अकबर आणि बिरबल शिकरीला जात असतात, तलवार काढताना अकबर चा अंगठा कापला जातो… अकबरला खूप त्रास होतो, तो ओरडायला लागतो… तो शिपायांना वैद्य घेऊन या म्हणून म्हणून… शहरात पाठवतो… तेवढ्यात बिरबल त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, ”महाराज…शांत व्हा…जे होतं ते चांगल्यासाठीच होतं…”
अकबर ला राग येतो…तो जास्तच चिडतो…आणि शिकयांना सांगतो ” जा बिरबल ला घेऊन जा…रात्रभर उलटं टांगून ठेवा….आणि सकाळी-सकाळी फाशी द्या ” सर्व शिपाई तिथून निघून जातात….अकबर एकटाच जंगलात असतो….तो एकटाच पुढे शिकार करायला जातो…!!
पुढे काही आदिवासी त्याला पकडून घेऊन जातात, आणि त्याला डांबून ठेवतात.. अकबर ची बळी ते देणार असतात…त्यासाठीची विधी करण्यात आदिवासी मग्न होतात…तितक्यात एका आदिवासी ची नजर अकबर च्या तुटलेल्या अंगठ्याकडे जातो व तो ओरडून सर्वांना सांगतो ,” हा अशुद्ध आहे…आपण याची बळी नाही देऊशकत… याचा अंगठा तुटलेला आहे…
आदिवासी अकबर ला सोडून देतात…आणि त्याला बिरबल चं बोलणं आठवतं,’ जे होतं ते चांगल्यासाठीच होतं..’ तो धावत पळत त्याच्या महलात येतो, बिरबल ला फाशी होणारच असते तितक्यात तो तिथे जाऊन बिरबलला घट्ट मिठी मरतो आणि सर्व हकीकत सांगतो….आणि म्हणतो, ” मला माफ कर….तुझ्यामुळे मी वाचलो…आणि बघ माझ्यामुळे तुझी काय हालत झाली….”
” बिरबल हसतो आणि म्हणतो, ”नाही महाराज….जे होते ते चांगल्यासाठीच होता…” अकबर स्तब्ध होतो आणी विचारतो असं कसं…तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला…चांगलं कसं झालं??? त्यावर बिरबल म्हणतो, ” महाराज…मी जर तुमच्यासोबत शिकरीला आलो आसतो तर त्यांनी माझा बळी दिला असता…..म्हणून म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं….

तात्पर्य: मित्रांनो, आयुष्यात असे क्षण येतील जेंव्हा तुम्ही खचून जाणार, पण लक्षात ठेवा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं….कदाचित पुढे त्याचा ऊपयोग तुमच्या चांगल्यासाठी होईल…!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बोलून चालून गाढवच

बिरबलाला तंबाखू खाण्याचा नाद होता. हुक्की आली, ती तो मधूनच तंबाखूची चिमूट तोंडात टाकून बराच वेळ ती चघळत असे.
एकदा तो आणि बादशहा परप्रांतात गेले होते. सांयकाळच्या वेळेस ते फिरायला म्हणून गावाबाहेर गेले तेव्हा त्यांना वाटेत एक तंबाखूचे शेत दिसले. त्यात तंबाखूची रोपटी चांगलीच तरारून उठली होती. अशातच एक गाढव तेथून चालले असता मधूनच ते गाढव तंबाखूच्या झाडाचा वास घेई आणि न खाताच पुढे निघून जाई. असे त्याने दोन-चार वेळा केले, बिरबलाला टोमणा देण्याच्या हेतूने बादशहा म्हणाला, ”बिरबल, बघितलंस ना? तो गाढवसुद्धा तंबाखूला तोंड लावीत नाही.”
तेव्हा बिरबल म्हणाला, ”महाराज, अहो ते बोलून-चालून गाढवच. त्याला तंबाखू खाण्याची मजा काय कळणार?”
बिरबलाने आपल्याला फिरवून टोमणा मारल्याचे पाहून बादशहा फारच केविलवाणा झाला

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
स्वप्न

एकदा अकबर बादशहाचा दरबार भरलेला असतो. तेथे बिरबल सुद्द्धा असतो. तेव्हा अकबर बादशहा सर्व दरबारातील लोकांना त्याला पडलेले स्वप्न सांगतो.
अकबर बादशहा म्हणतो : मला आज रात्री स्वप्न पडले की, ” मी एका मधाच्या डबक्यात पडलेलो, आणि बिरबल एका चिखलाच्या डबक्यात पडलेला होता. ”
त्यावर बिरबल म्हणतो : ”बादशहा मला हि असेच स्वप्न पडलेले होते, पण त्यात तुम्ही मला आणि मी तुम्हाला चाटत होतो.”
त्या नंतर कधी बादशहाने बिरबलची थट्टा-मस्करी केली नाही.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कंजूष माणूस

एकदा एक कवी श्रीमंत माणसाकडे गेला .त्याने आपल्या सर्व कविता गावून दाखविल्या कवीला वाटले आपलेला काही तरी बक्षिस मिळणार परंतु तो श्रीमंत माणूस अतिशय चिकू होता .तो कवीला खुश करण्यासाठी म्हणाला तुमच्या कविता एकूण मी फारच खुश झालो आहे .उद्या तुम्ही परत माझ्या घरी या म्हणजे मी हि तुम्हाला खुश करून टाकेन बक्षीस मिळाले नाही म्हणून कवीला वाईट वाटले परंतु परंतु उद्या बक्षीस भेटेल या आशेवर कवी घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी न चुकता तो त्या श्रीमंत माणसाच्या घरी हजर झाला .परंतु बराच वेळ झाला तरी श्रीमंत त्याला बक्षीस देण्याच नाव काढीना अखेर कवी घरी जाण्यासाठी उठला तेव्हा श्रीमंत म्हणाला कविराज आपण मला काल कविता ऐकवून खुश केलत तस तुम्ही उद्या माझ्या घरी या मी तुम्हाला खुश करून टाकेन अस म्हणून खुश केल प्रत्यक्षात तुम्ही मला काही दिल नाही .मी हि तुम्हाला काही दिल नाही आपला व्यवहार संपला या आता परत केव्हातरी बिचारा निराश होऊन निघून गेला एकदा संधी साधून घडलेली हगिगत बिरबलाला सांगितली बिरबलाने त्या श्रीमंत माणसाशी ओळख करून घेतली मैत्री वाढवली आणि एक दिवस त्याला आपल्या घरी जेवायला बोलवले कवीलाही त्याने आमंत्रण दिले सर्व मंडळी बिरबलाच्या घरी जमा झाली .तो कंजूष घरी येण्यापूर्वी सर्वांनी जेवून घेतले आणि ते गप्पा मारू लागले थोड्या वेळाने तो श्रीमंत हि घरी आला व त्या गप्पात सामील झाला.
परंतु बराच वेळ झाला तरी बिरबल जेवनाच नाव घेईना न राहवून श्रीमंत म्हणाला जेवायचं नाही का? त्यावर बिरबल म्हणाला आपलेला फक्त खुश करण्यासाठी म्हणालो उद्या माझ्या घरी जेवायला या कंजूष श्रीमंत जे समजायचे ते समजला आणि काही न बोलता निघून गेला

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जे होते ते चांगल्यासाठी

एकदा अकबर आणि बिरबल शिकरीला जात असतात, तलवार काढताना अकबर चा अंगठा कापला जातो… अकबरला खूप त्रास होतो, तो ओरडायला लागतो… तो शिपायांना वैद्य घेऊन या म्हणून म्हणून… शहरात पाठवतो… तेवढ्यात बिरबल त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, ”महाराज…शांत व्हा…जे होतं ते चांगल्यासाठीच होतं…” अकबर ला राग येतो…तो जास्तच चिडतो…आणि शिकयांना सांगतो ” जा बिरबल ला घेऊन जा…रात्रभर उलटं टांगून ठेवा….आणि सकाळी-सकाळी फाशी द्या ” सर्व शिपाई तिथून निघून जातात….अकबर एकटाच जंगलात असतो….तो एकटाच पुढे शिकार करायला जातो…!! पुढे काही आदिवासी त्याला पकडून घेऊन जातात, आणि त्याला डांबून ठेवतात.. अकबर ची बळी ते देणार असतात…त्यासाठीची विधी करण्यात आदिवासी मग्न होतात…तितक्यात एका आदिवासी ची नजर अकबर च्या तुटलेल्या अंगठ्याकडे जातो व तो ओरडून सर्वांना सांगतो ,” हा अशुद्ध आहे…आपण याची बळी नाही देऊशकत… याचा अंगठा तुटलेला आहे…” आदिवासी अकबर ला सोडून देतात…आणि त्याला बिरबल चं बोलणं आठवतं,’ जे होतं ते चांगल्यासाठीच होतं..’ तो धावत पळत त्याच्या महलात येतो, बिरबल ला फाशी होणारच असते तितक्यात तो तिथे जाऊन बिरबलला घट्ट मिठी मरतो आणि सर्व हकीकत सांगतो….आणि म्हणतो, ” मला माफ कर….तुझ्यामुळे मी वाचलो…आणि बघ माझ्यामुळे तुझी काय हालत झाली….” बिरबल हसतो आणि म्हणतो, ”नाही महाराज….जे होते ते चांगल्यासाठीच होता…” अकबर स्तब्ध होतो आणी विचारतो असं कसं…तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला…चांगलं कसं झालं??? त्यावर बिरबल म्हणतो, ” महाराज…मी जर तुमच्यासोबत शिकरीला आलो आसतो तर त्यांनी माझा बळी दिला असता…..म्हणून म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं…. ”
तात्पर्य-
मित्रांनो, आयुष्यात असे क्षण येतील जेंव्हा तुम्ही खचून जाणार, पण लक्षात ठेवा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं….कदाचित पुढे त्याचा ऊपयोग तुमच्या चांगल्यासाठी होईल…!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
राजाचा पानवाला

अकबर बादशहाला रोज विडा खाल्ल्याशिवाय चैन पडत नसे. विशेषतः शौकतअलीने तयार केलेले पान त्याला खूपच आवडायचे. तो नेहमी शौकतअलीचे या गोष्टीसाठी कौतुक करी. त्यावेळीं जाड्या शौकतअली बादशहाला अगदी वांकून सलाम करीत असे. 
तो म्हणाचा, ‘‘मी या कलेत पारंगत झालो, कारण माझ्या वडिलांनी ही विद्या मला शिकवली. वयाच्या आठव्या वर्षापासून मी पान लावतो आहे. ते आपल्या पसंतीला उतरते, हे माझे परमभाग्य आहे. माझ्या अंगांगात ही कला भिनली आहे. आणि आपल्याकडून तिचे कौतुक झाल्याने मी धन्य झालो आहे.’’
बादशहा अकबर कुठेही जाताना शौकतअलीला आपल्याबरोबर घेऊन जायचे. जेवणानंतर ते हमखास पान खात असत. अशीच तीन वर्षे गेली.
एके दिवशी शौकतअलीच्या हातून पानांत चुना थोडा जास्त पडला. बादशहाने ते पान खाल्ल्यावर त्याची जीभ भाजली. 
त्यामुळे पान थुंकून देत तो म्हणाला, ‘‘तुझे पान खाल्ल्याने माझी जीभ भाजली. विडा करण्यात माझा हात कोणीही धरू शकणार नाही, असे म्हणत असतोस. त्यावेळी तुला लाज वाटली नाही?’’
शौकतअली भीतीने थरथर कांपू लागला.
आपली भाजलेली जीभ सारखी बघत बादशहा म्हणाला, ‘‘शौकतअली, आत्ताच्या आत्ता जाऊन तुझी पिशवी भरून चुना आण. समजलं?’’
या अपराधासाठी बादशहा आपल्याला तुरूंगात टाकतील कीं आपला शिरच्छेद करतील, असा विचार करीत शौकत दुकानांत गेला.
पिशवी चुन्याने भरल्यानंतर दुकानदाराने विचारले, ‘‘एवढा चुना कां नेतोस?’’
‘‘मलाही माहित नाही. बादशहाने मागवला आहे.’’ नेमका त्याच वेळी महेशदास तिथे आला. त्याने विचारले, ‘‘बादशहांनी इतका चुना कां मागवला आहे?’’
पिशवी चुन्याने भरल्यानंतर दुकानदाराने विचारले, ‘‘एवढा चुना कां नेतोस?’’
‘‘मलाही माहित नाही. बादशहाने मागवला आहे.’’ नेमका त्याच वेळी महेशदास तिथे आला. त्याने विचारले, ‘‘बादशहांनी इतका चुना कां मागवला आहे?’’
‘‘बादशहांनी अशी आज्ञा कां केली, ते मलाही समजत नाही’’ शौकतअली दीनवाण्या स्वरांत म्हणाला.
‘‘बादशहांनी यापूर्वीं कधी अशी आज्ञा केली होती कां?’’ महेशदासने विचारले.
शौकतअली म्हणाला, ‘‘कधीच नाही.’’
‘‘मग एक काम कर. भरपेट तूप पिऊन जा.’’ महेशने उपाय सांगितला.
‘‘आधीच मी जाड्य़ा, त्यांत माझे पोट सुटलेले आहे. तूप पिऊन जायला सांगून माझी खिल्ली उडवता कीं काय?’’ शौकतने विचारले.
‘‘मी तुझी खिल्ली उडवत नाही. तुझ्या चांगल्यासाठी सांगतो आहे. बादशहांच्या समोर जाण्यापूर्वी पोटभर तूप अवश्य पी. असे केल्यानेच तुझा प्राण वाचेल. मला आता लवकर निघायला हवे’’ असे म्हणून महेशदास तेथून निघाला.
शौकतअली विचारांत पडला. चुन्याची पिशवी घेऊन घरी आला आणि बायकोकडून तूप मागवले. मग ते पोटभर प्यायला.
‘‘हे काय करताहात? असे बायकोने विचारले. तो कांही न बोलताच घाईने बाहेर पडला आणि बादशहांसमोर हजर झाला.
त्याच्याकडे न पहाताच ‘‘आलास?’’ असे म्हणून बादशहाने एका दरबार्‍याला सांगितले, ‘‘याला बाहेर घेऊन जा व तो चुना खायला घाल.’’
‘जहापन्हां, सगळा चुना खाल्ला तर मी मरेन. चुना पोट जाळतो’’ असे म्हणून शौकत रडू लागला.
‘‘हीच तुझी शिक्षा आहे’’ अकबर बादशहा गंभीरपणे म्हणाला. दरबारी त्याला बाहेर घेऊन आला व त्याला चुना खाण्याची आज्ञा केली.
राजाज्ञेचे उल्लंघन कसे करणार? म्हणून दोन्ही मुठी भरून चुना त्याने खाल्ला. आणि तेवढा चुना खाऊनच तो बेशुद्ध पडला. इतक्यांत, बादशहा तेथे आले व शौकतला पाहून म्हणाले, ‘‘अजून हा जिवंत आहे?’’
महत्प्रयासाने अली उठला व म्हणाला, ‘‘तूप प्यायल्यामुळे वाचलो, खाविंद.’’
‘‘तूप कां प्यायलास?’’ बादशहाने विचारले.
‘‘मी चुना खरेदी करत असताना महेशदास नांवाचा एक तरुण तेथे आला व त्याने सल्ला दिला कीं, तूप पिऊन महाराजांसमोर जा. बरे झाले, मी त्याचे ऐकले’’ शौकत म्हणाला.
‘‘तो महेशदास कोठे आहे? लवकर जा आणि त्याला माझ्याकडे घेऊन ये’’ अकबराने हुकूम केला.
थोड्य़ाच वेळांत शौकतअली महेशदासला घेऊन तेथे आला. त्याला पहाताच बादशहा म्हणाला, ‘‘छान बिरबल, तर हे तुझे काम आहे. शौकतअलीला तूप प्यायला कां सांगितलेस?’’
‘‘शौकतअलीने तूप पिऊन येऊ नये, अशी कांही आपली आज्ञा नव्हती. खाविंद, माफ करा. आपण अलीला पिशवीभर चुना आणण्याची आज्ञा केलीत. तेव्हांच मला अंदाज आला कीं, आपण त्याला शिक्षा देण्यासाठीच ही आज्ञा केली आहे. म्हणूनच मी त्याला तूप पिऊन येण्याचा सल्ला दिला. नाहीतर तो लगेचच मरण पावला असता’’ बिरबल म्हणाला.
‘‘तो मेला असता तर तुझे काय बिघडले? जास्त चुना घालून याने माझ्या जिभेला चटका दिला. त्याला शिक्षा झालीच पाहिजे.’’ अकबर म्हणाला.
‘‘शौकतअलीच्या मृत्यूने माझे कांहीच बिघडले नसते. त्यामुळे आपलेच नुकसान झाले असते. गेली तीन वर्षे तो आपल्या सेवेत आहे. आपण मला कित्येक वेळा सांगितले आहे कीं, त्याने तयार केलेले पान उत्तम असते. अशी व्यक्ती मरण पावली तर सर्वोत्तम पानवाला कसा मिळेल? तो आपल्यावर अवलंबून आहे. माणसाच्या हातून सहज चूक घडूं शकते. अनवधानाने झालेली चूक माफ करणे, हेच आपल्यासारख्या बादशहालाच शोभते’’ बिरबल म्हणाला. शौकत अलीने वांकून पुन्हां मुजरा केला.
ते पाहून बादशहा म्हणाला, ‘‘वांकून जमिनीला डोके टेकवायला सांगितले असते, तर बरे झाले असते. तीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा ठरली असती.’’
नंतर क्षणार्धाने बादशहा अकबर हंसून अलीला म्हणाला, ‘‘ठीक आहे. जे झाले, ते झाले. ताबडतोब आम्हा दोघांसाठी उत्तम पान तयार करून दे.’’

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बिरबलाचा मृत्यू कसा झाला ? 

तुम्ही, मी आपण सर्वजण अकबर बिरबलाच्या गोष्टी ऐकतच लहानाचे मोठे झालो. यातील बिरबल ही व्यक्ती अतिशय हुशार,चतुर,कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली. आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीच्या गळी उतरवायचं असं कौशल्य बिरबलाकडे होतं की समोरची व्यक्ती कुणी सर्वसामान्य असो किंवा खुद्द अकबर बादशाह असो, बिरबलाच्या बुद्धीचातुर्यापूढे सपशेल दंडवत घालायचाच अशा या विद्वान व चतुर बिरबलाचा मृत्यू कसा झाला हे जाणून घ्यायचय ? असं म्हणतात की बिरबलाला अकबर फक्त प्रधानच नव्हे तर राजा बनवू इच्छित होता. ही गोष्ट तेंव्हाची आहे जेंव्हा हिमाचल प्रदेशातील कांगडावर राजा जयचंद्र चे राज्य होते. इसवी सन १५७० ला राजा जयचंद्राने दिल्ली व आग्रा शहरात हवेली बांधून घेतली होती. मुघल व कांगडा राज्यात विस्तव सुद्धा अडवा जात नसे व काही ऐकीव गोष्टींनुसार हेच कारण होते अकबराने राजा जयचंद्रला कैद करण्याचे राजा जयचंद्रास कैद करण्यामुळे जयचंद्राचा मुलगा बिथरला. त्याने स्वतःला राजा घोषित केले व अकबराविरुद्ध उठाव केला. अकबराने राजा जयचंद्राचा मुलाचा बीमोड करण्यासाठी आपल्या आधिपत्याखाली असलेल्या पंजाब प्रांतातील सुभेदार हुसेन कुली खान यांस कांगडा वर हल्ला करण्याचे आदेश दिले.

अकबराच्या आदेशानुसार सुभेदार कुली खान सैन्य व युद्ध सामग्री घेवून कांगडा कडे निघाला. कांगडा ला हादरा देण्यासाठी कुली खानने एक योजना आखली. प्रथम त्याने दिल्ली प्रांतातील कोटलाच्या किल्ल्यावर हल्ला चढवला कारण कांगडावर हल्ला करताना कुलीखानला या कोटला नजीकच्या किल्यावर तैनात असलेल्या कांगडाच्या सैन्यतुकडीचा व्यत्यय नको होता. या युद्धात मुघलांची सरशी झाली व दोन दिवसांनंतर मुघलांचा सैन्याने कुलीखानच्या नेतृत्वाखाली कांगडावर हल्ला केला व तेथील एका किल्ल्यास वेढा दिला. कांगडाचे सैन्यबल तोकडे होते व त्यांचा मुघलांसमोर टिकाव मुश्किल होता. मुघलांचा कांगडावर विजय जवळजवळ निश्चित होता तोच एक बातमी अकबराला मिळाली की पंजाब प्रांतात मुघलांविरुद्ध उठाव झाला त्यामुळे नाइलाजाने अकबराने कुलीखानला हे बंड मोडून काढण्याचे आदेश दिले. पण अकबराला एक बाब सलत होती ती म्हणजे, जवळजवळ काबिज केलेले कांगडा त्याला पूर्णपने जिंकता आले नव्हते. काहीही करून त्याला हाती आलेले कांगडा गमवायचे नव्हते. त्याने राजा जयचंद्र व त्याचा मुळाशी बोलणी सुरू केली व या चर्चेदरम्यान अनेक तह व अटी ठरवल्या गेल्या.ठरल्याप्रमाणे बिरबलास किल्ल्याचा प्रवेश द्वाराजवळ एक मस्जिद बांधून देण्यात आली आणि मुबलक प्रमाणात सोने-नाणे देण्यात आले अर्थात बिरबल आता राजा झाला होता. अनेक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख राजा असा केलेला तुम्हाला पाहायला मिळेल. पण बिरबलास आपण संपूर्ण राज्य देवू शकलो नाही ही खंत अकबराच्या मनात होती म्हणून त्याने बिरबलाला आपल्या विशेष सैन्यातील एक तुकडी उपहारस्वरूप दिली. सर्व काही सुरळीत चालू असतांना एके दिवशी अकबराला एक वार्ता समजली की अफगाणिस्तानातील बाजौर या प्रांतात काही दरोडेखोर व लुटारू सामान्य नागरिकांचा साधन संपत्तीची लूट करत आहेत. लोकांना त्या भागात राहणे मुश्किल बनले असून अनेक नागरिकांनी लुटारू व दरोडेखोरांच्या भीतीने स्थलांतर केले असून बाजौर जवळजवळ उजाड झाले आहे. ही बातमी समजताच अकबरने आपल्या एका सरदारास ज्याचे नाव जेनखान कुका असे होते त्यास लुटारूंचा बीमोड करावयास पाठवले सोबत सैन्य व युद्धासाठी आवश्यक सामग्री ही दिली. जेन खान मजल दरमजल करत अफगाणीस्तानच्या दिशेने जात होता. प्रचंड जंगल व दुर्गम भाग पार करत करत तो अखेर अफगाणला पोहोचला तिथे पोहोचल्यावर सर्वप्रथम मुघलांचा सामना अफगाणी यूसुफझाई कबिल्याशी झाला.

मित्रांनो, अफगाण हे शूर व लढवय्ये असतात. ते अतिशय चिवट झुंज देतात पण जेन खान व मुघलांना याची कल्पना नव्हती. अफगाणी लोकांची युद्धनीती वेगळी होती. ते समोरासमोर युद्ध न लढता गोरीला युद्धतंत्राचा अवलंब करत होते. आधीच झाडांवर चढण्यात माहिर असणारे अफगाणी अशा युद्धाचा अजिबात अनुभव नसलेल्या मुघलांवर भारी पडत होते. जेनखानने कल्पना ही केली नव्हती की ही मोहीम इतकी अवघड असेल. मुघल सैनिक अफगाणी योद्ध्यांसमोर हतबल झाले होते. मुघल पराभवाच्या छायेत होते. जेन खानला काहीच कळेना की यातून मार्ग कसा काढावा. अखेर त्याला एक युक्ती सुचली. त्याने अकबर बादशाहास पत्र पाठवले व खोटा संदेश दिला की आपण जवळजवळ युद्ध जिंकत आलो आहोत व आणखीन थोड्याशा सैन्याचा मदतीने आपण ही मोहीम फत्ते करू. अकबराने हे सारे खरे मानले व तो जेनखानाच्या मदतीसाठी आणखीन सैन्य पाठवण्याबाबत विचार करू लागला. त्याला जेंव्हा जेनखानचा संदेश मिळाला तेंव्हा दरबारात अबूल फजल व बिरबल हे दोघेच हजर होते. अबूल फजलने जेनखानचा मदतीस जाण्याची इच्छा व्यक्त केली पण अकबराने त्यास मनाई केली. पण जेंव्हा बिरबलने जेनखानच्या मदतीस जायची इच्छा व्यक्त केली तेंव्हा तो बिरबलास नकार देवू शकला नाही व बिरबलास काही सैन्य देवून अफगाणिस्तानास रवाना केले. बिरबल हा महान राजनीतिज्ञ जरूर होता पण तो युद्धनीतीमध्ये तितकासा पारंगत नव्हता. तरीही बिरबलची फौज जिद्दीने लढली व त्या दिवशी मुघल अफगाणांवर भारी पडले. संध्याकाळ झाली व नियमानुसार युद्ध विराम जाहीर करण्यात आला रात्र झाली, बिरबल दुसर्‍या दिवशीच्या युद्धाची रणनीती ठरवू लागला. इकडे अकबराने अबूल फतेह या सरदरास बिरबलाच्या मदतीसाठी ससैन्य अफगाणीसतनाला रवाना केले. अकबराने अबूल फतेहास बिरबला च्या सहाय्यासाठी रवाना केले खरे पण अबूल फतेहसुद्धा युद्धनीतीत फारसा पारंगत नव्हता तसेच मुघल व अकबरासाठी चिंतेची आणखीन एक बाब म्हणजे अबूल फतेह,बिरबल व जेनखान यांचे आपआपसात फारसे जमत नव्हते. मुद्दा कुठलाही असो, या तिघांचे कधीच एकमत होत नसे

अफगाणिस्तानात तिघे जेंव्हा एकत्र भेटले तेंव्हा बिरबलने एक रणनीती ठरवली पण नेहमीप्रमाणे या तिघांचे एकमत होऊ शकले नाही व ते तिघेही वेगवेगळ्या वाटेने निघाले. बिरबल आपल्या वाटेने निघाला व ३-४ कोस प्रवास करून रात्री मुक्कामी आपल्या सैन्यासाह एका ठिकाणी त्याने डेरा टाकला. आणि इथेच घात झाला. पुढे जे होणार होते ते बिरबलच्या ध्यानीमनीही नव्हते.

कारण….. ती रात्र बिरबलच्या आयुष्यातली अखेरची रात्र होती. कारण बिरबलाने ससैन्य जिथे डेरा टाकला तिथे अफगाणी आधीच दबा धरून बसले होते. अफगाण्यांनी मुघल सैन्यास चहूबाजूंनी घेरले व बाण आणि दगडांचा वर्षाव केला. मुघल सैन्यामध्ये अफरातफरी माजली मुघल सैरावैरा पळू लागले, घोडे बिथरले होते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मुघल छावणीत हल्लकल्लोळ माजला होता. तीर आणि दगडांनी अनेक मुघल सैनिक घायाळ झाले व काही सैनिक तर जागीच ठार झाले होते. त्यातच एका बाणाने बिरबलाचा वेध घेतला. त्या काळोख्या रात्रीत बिरबलाने स्वतःला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला पण बिरबलाचा काळ जवळ आला होता व त्या रात्री एका महान राजनीतीज्ञ, कुशल व कर्तव्यनिष्ठ अशा महान बिरबलाचा मृत्यू झाला.

मित्रांनो अकबराने घेतलेल्या या एका निर्णयामुळे महान बिरबलाचा मृत्यू झाला. अर्थात अकबराला तरी याची कुठे कल्पना होती की आपण आपल्या दरबारातील रत्नास मृत्युचा दाढेत पाठवतोय. अकबर बिरबलाच्या अनेक कथा अतिशय प्रसिद्ध आहेत पण बिरबलचा मृत्यू नेमका कसा झाला याविषयी फारशी माहिती कुणाला नाही. आम्ही या लेखातून तुम्हाला ही माहिती देण्याचा केलेला हा प्रयत्न

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संकलन :- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...