वाचन प्रेरणा दिवस
ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे आणि ज्ञान हे वाचनातून मिळते. ज्याचे वाचन अधिक त्याचे ज्ञान सुध्दा अधिक. आपणाला ज्ञान हे वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या मार्गाने मिळविता येतो. मात्र वाचनातून जे ज्ञान मिळते ते चिरकाल टिकणारे असते. प्रसिध्द विचारवंत ऑझक टेलर म्हणतात की, मनुष्याची वाढ ही अवयवानी होत नाही, तर विचारांनीच होते आणि विचारांना वाचनांनी सहज सहकार्य मिळते. जीवनातील अंधकार नाहीसे करण्यासाठी प्रत्येकाना वाचन करता आलेच पाहिजे. याचमुळे तर आपण आपल्या मुलांना वयाच्या सहाव्या वर्षी वाचन-लेखन शिकण्यासाठी शाळेत प्रवेश देतो. त्या ठिकाणी मुलांवर वाचनाचे संस्कार केले जातात. वाचन काय करावे आणि कसे करावे याची प्राथमिक माहिती ज्याला असते तोच उत्तम प्रकारे वाचन करू शकतो. आपल्या मनात चांगले विचार यावेत असे जर आपणास वाटत असेल तर त्यासाठी प्रथम चांगले वाचन करणे आवश्यक आहे. प्रसिध्द विचारवंत टॉलस्टॉय यांनी म्हटल्याप्रमाणे अश्लील पुस्तके वाचणे म्हणजे विष प्यायल्याप्रमाणे असते. यामुळे स्वतःचे नुकसान तर होतेच शिवाय समाजाचे आणि देशाचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात की, पुस्तके वाचन करणे म्हणजे आपले मन निर्मळ करणे होय. पुस्तकातल्या विविध बाबीचा थेट परिणाम वाचकांच्या मेंदूत जाऊन भिडतो. जी व्यक्ती वाचन करते तीच व्यक्ती विचार करू शकते. आजच्या संगणक आणि सोशल मीडियाच्या जगात वाचन संस्कृती कमी व्ह्ययला लागली त्यामुळे नैतिकता सुध्दा लयाला जात आहे. सर्व काही वाईट बाबी त्यांच्या डोळ्यासमोर येत असल्यामुळे त्याला चांगले काही सुचत नाही. जीवनात वाचनाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. वाचनामुळे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यासारखी महान व्यक्ती आपणास लाभली. आज वाचन प्रेरणा दिवसा निमित्त आपण रोज एक तास तरी वाचन करण्याचा संकल्प करू या तेच डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त खरी आदरांजली ठरेल.
-नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
No comments:
Post a Comment