पाऊलवाट भाग 15
हम सब एक है
भारतातील कुटुंबात आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकू आदी सदस्य एकत्र नांदण्याची पद्धत आहे. एकत्रित कुटुंब पद्धत हे भारतीय संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे. परंतु ही पद्धत गेल्या काही वर्षांपासून इतिहास जमा झाली असून हम दो हमारे दो अशी विभक्त कुटुंबपद्धत अस्तित्वात आली आहे. त्याचा सर्वात मोठा फटका लहान मुलांना बसत आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत आजी-आजोबा यांचेकडून श्लोक, स्तोत्र, गोष्टी सांगणे विविध बौद्धिक खेळ आधी क्रिया सहज घडतात. सर्वांसोबत राहताना समानतेची जाणीव सहज निर्माण होते. इतरांना सहकार्य करण्याचे व प्रेम, माया करण्याची भावना मनात तयार होण्यास मदत मिळते. त्याचसोबत एकटा जीव सदाशिव ही भावना मनात राहत नाही. भरपूर पैसा कमावण्याच्या नादात आई-वडील दोघेही नोकरीसाठी घराबाहेर पडल्यानंतर मुलांची काळजी किंवा चिंता करण्याची गरज राहत नाही. परंतु आजच्या काळातील राजा-राणीला एकत्र कुटुंबपद्धती पेक्षा विभक्त राहणे हेच जास्त आवडत आहे. आपल्या स्वातंत्र्यावर गदा येऊ नये म्हणून ते विभक्त राहताना दिसत आहेत. मात्र यामुळे पती-पत्नी यांच्यातील वाद विकोपाला जाऊन त्याचे परिवर्तन फार मोठ्या परिणामात होत आहे. तेच जर एकत्रित कुटुंबात राहत असतील तर त्यांची वाद फार कमी प्रमाणात होतात आणि यदाकदाचित वाद झालेच तर वडील मंडळी मध्यस्थी करून ते वाद मिटवितात. त्यामुळे पुढील अनर्थ टळतो. दोघेही नोकरी करून भरपूर पैसा कमवितात. त्यामुळे ते आपल्या मुलांना हवी ती आणि मागेल ती वस्तू विकत घेऊन देऊ शकतात. त्यामुळे आपण मुलांना खुष ठेवू शकतो असा भ्रम होतो. कारण दिवसभर एकटे राहिल्याने मुले एकांगी विचार करणारे एकलकोंडी होतात आणि मागेल ती वस्तू मिळत गेल्याने त्याचा स्वभाव हट्टी बनत जातो. जे की भविष्यासाठी धोकादायक आहे. नोकरीच्या निमित्ताने दूर गावी वास्तव्य करून राहणाऱ्या जोडप्यांनी आपल्या मुलांना आजी-आजोबांचे स्नेह, प्रेम व माया मिळवून देण्यासाठी काही सणानिमित्त खासकरून सुट्टी काढावे व चार दिवस त्यांच्यासोबत घालविण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे विभक्त कुटुंब पद्धतीत राहून सुद्धा आपणाला एकत्रित कुटुंब पद्धतीचा आनंद मिळविता येऊ शकतो. त्यास्तव हम दो हमारे दो ही विचारधारा बाजूला ठेवून हम सब एक है लक्षात ठेवावे.
- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
No comments:
Post a Comment