पाऊलवाट भाग 16
पाप आणि पुण्य
मुलांनो वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी कसा झाला हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. जंगलातून जाणाऱ्या प्रत्येक माणसाचे तो धड व शिर वेगळे करीत असे आणि त्याबदल्यात एक खडा रांजणात टाकीत असे. किती तरी रांजणे त्याच्या घरी भरून होती म्हणजे त्याने किती लोकांना ठार केले होते याचा अंदाज आपणाला येऊ शकतो. त्याच जंगलातून एकदा नारदमुनी पायी चालले होते. त्यांच्यावर सुद्धा त्यांनी हात उगारला. त्यावेळी त्यांनी एक प्रश्न विचारला होता की, या पापात किती जण भागीदार आहेत ? यावर घरी जाऊन वाल्या कोळी प्रत्येकाला तो प्रश्न विचारला. पण सर्वांनी या पापात भागीदार होण्यास नकार दिला. त्यावेळी वाल्या कोळींचे डोळे उघडले. त्यांनी नारदमुनीचे पाय धरले व यावर पश्चातापाचा मार्ग विचारला असता, त्यांनी राम राम नावाचा जप करण्यास सांगितले. पण वाल्या कोळीला ते म्हणता येत नव्हते, तेव्हा मरा मरा असे म्हणत म्हणत वाल्या कोळी रामायणाचे रचियेता बनून वाल्मिकी ऋषी बनले. अशीही ही आख्यायिका. यातून आपणास पाप व पुण्य दोन्ही गोष्टी कळतात. मात्र घरात व समाजात वावरताना हे करू नको अन्यथा पाप होते आणि असे कर म्हणजे पुण्य मिळते ही वाक्ये पदोपदी आपणाला ऐकण्यास मिळतात. तेव्हा आपण बुचकळ्यात पडतो आणि पाप म्हणजे काय ? पुण्य म्हणजे काय ? याचा विचार करतो. आपणाला समजेल, रुचेल व पटेल अशा भाषेत वेदव्यास ऋषींनी पुण्य व पापाचे विवेचन करताना म्हटले आहे की इतरांचे कल्याण करणे म्हणजे पुण्य आहे तर दुसऱ्यांना दुःख देणे पापकर्म आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे इतरांना आपल्या वागण्याने, बोलण्याने, कृतीने दुःख होणार नसेल तेच पुण्य आहे. दररोज देवळात जावून देवाला नमस्कार करणे, एवढ्यानेच पुण्य प्राप्त नाही. घरात आई-वडील, भाऊ-बहीण शाळेत मित्र-मैत्रिणी यांच्यासोबत प्रेमाने वागणे, चांगले बोलणे इत्यादी क्रियांमधून आपणाला पुण्य मिळविता येऊ शकते. प्राणीमात्रावर दया दाखविणे, लुळे, पांगळे, आंधळे, असहाय्य लोकांना मदत करणे यातून सुद्धा पुण्य मिळविता येऊ शकेल. संत तुकाराम महाराज म्हणतात की, परपीडा परनिंदा हे खरे पाप तयाचे । पुण्य ते जाणा रे भाईनो परउपकाराचे ।। इतरांना दुःख देणे किंवा निंदा करणे हेच खरे पाप आहे आणि इतरांवर उपकार करणे हेच खरे पुण्य आहे. आपल्या मनात सदोदित पुण्याचा विचार येण्यासाठी ज्ञानाचा वापर करावा कारण ज्ञानाच्या प्रकाशाने पापरूपी अंधकार नाहीसा होतो असे प्रख्यात कवी कालिदास यांनी म्हटले आहे. त्यामुळे खूप ज्ञान मिळवा आणि आपले घर कुटुंब समाज गाव राज्य आणि देशाला विकासाकडे न्या, हेच खरे पुण्य आहे
- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
No comments:
Post a Comment