Thursday 15 February 2018

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे

मुलांनो, काम केल्यानेच मनुष्य मोठा होत असतो. रिकामा बसून किंवा फक्त बोलल्याने जीवनात काही प्राप्ती होत नाही. पंचतंत्रात असे म्हटले आहे की, मनुष्याच्या रूपामुळे किंवा कुळामुळे त्याचा गौरव वाढत नाही. तर माणसाच्या कर्तृत्वामुळे, त्याच्या कार्यामुळे त्याचा गौरव वाढतो. आपण जसे बोलतो त्याप्रमाणे वागले पाहिजे. अन्यथा कुणी आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत. शब्दाला कृतीचे तारण नसेल तर शब्द वांझ ठरतात असे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. म्हणूनच दलितांच्या कल्याणासाठी त्यांनी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर नागपूरच्या पावन दीक्षा भूमीत हजारो अनुयायासोबत बौध्द धर्माची दीक्षा घेतली. त्यांच्या प्रत्येक शब्दाला कृतीची जोड होती म्हणून तर ते दलितांसाठी ईश्वरासमान झाले आहेत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीमुळे मानवी जीवन आनंदी होते असे म्हणताना राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आयुष्यभर साधेपणाने राहिले. देशातील अनेक लोकांना अंगभर कपडे मिळत नाहीत तेंव्हा मी पूर्ण कपड्यानिशी कसा राहू म्हणून त्यांनी कपड्याचा त्याग करून पंचा स्वीकारला आणि देशातील लोकांसाठी चरख्यावर सुत कातण्यास सुरुवात केली. गरीबातल्या गरीब व्यक्तीचा त्यांनी विचार केला. याचा अर्थ जे लोक फक्त बोलत नाहीत तर त्या नुसार कृती करतात आणि वागतात ते खरोखरच महान होतात. केवळ गडगडाट करणारे मेघ कधी पाऊस देत नाहीत म्हणूनच गर्जेल ते बरसेल काय ? असे म्हटले जाते ते काही चूक नाही. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी जसे बोलले तसे वागले आणि चालले म्हणून समाजात आज त्यांचे स्थान सर्वांच्या हृदयात आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले असे संतानी सांगून ठेवले आहे. अस्पृश्यता पाळू नका असा संदेश देणारे संत एकनाथ महाराजानी तप्त तापलेल्या वाळूवरील हरिजन बालकांस कडेवर उचलून घेतले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्य लोकांसाठी घरातील पाण्याचा हौद मोकळा केला. त्याचा परिणाम त्यांना भोगावे लागले परंतु त्याची त्यांना फिकीर नव्हती, कारण ते क्रियाना महत्त्व देणारे होते. विचाराला आचाराची जोड असली की आपल्या हातून चांगले कार्य होते. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात की, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे अर्थात काही ही न करता नुसते बोलणे काही कामाचे नाही.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...