Wednesday, 13 August 2025

भारतीय स्वातंत्र्य दिन ( Independence Day )

     विचार बदला, देश बदलेल

आज भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन. ह्या सोनेरी दिवसाची पहाट पाहण्यासाठी कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. आजच्या दिवशी आपण ह्या सर्व थोर क्रांतिकारक आणि महात्मा मंडळीची आठवण करतो.
" भारतमाता की जय " असा नारा देतांना त्या छोट्याशा शिरीषकुमारची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तो शाळकरी वयाचा म्हणजे जेमतेम 10 वर्षाचा होता. इंग्रजांचा विरोधात नारे दिल्यामुळे आणि भारतमातेची सेवा केल्यामुळे त्याला इंग्रजांनी ठार केले. परदेशी कपड्यांच्या गाडीसमोर स्वतःचे बलिदान करणारे बाबू गेनूला आपण कसे विसरू. शिरीषकुमार व बाबू गेनू आज आपल्यात नाहीत परंतु त्याच्या आठवणी, त्याचे कार्य अजूनही स्मरणात आहे. आपण ते कधीच विसरु शकत नाही. 
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी अनेक जणांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ उभी केली व देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. त्यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांनी पुणे येथील भिडेच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. समाजातील रुढ, परंपरा व सनातन पद्धतीच्या काळात फुले दाम्पत्याना खूप हालअपेष्टा सोसावे लागले. तरीही त्या॑नी न डगमगता शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्याचे महान काम केले त्यास्तव शैक्षणिक क्षेत्रातील त्याचे कार्य विसरून चालणार नाही. हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले हे तर लक्षात राहतेच शिवाय त्यांना घडविणारी राजमाता जिजाऊ यांची आठवण पदोपदी येत राहते. सहा महिन्यांचे तान्हे बाळ पाठीशी बांधून इंग्रज लोकांशी दोन हात करणारी आणि मेरी झाँसी नहीँ दूँगी अशी ठणकावून सांगणारी राणी लक्ष्मीबाईचे शौर्य आमच्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहील. गरीब व अनाथांची आई मदर तेरेसा हे त्यांच्या अविरत सेवेमुळे कायम स्मरणात राहतात. या सर्वच लोकाना जाऊन इतकी वर्षे झाली तरी त्यांचे नाव आपण स्मरणात ठेवतो, आठवण करतो, त्यांना विसरत नाही. कारण त्या॑नी कामच असे केले आहे की त्यास कोणीच विसरू शकत नाही यालाच म्हणतात मरावे परी कीर्तिरूपे उरावे. 
आपणाला सुद्धा असेच काही लोकांच्या आठवणीत, स्मरणात रहावे असे कार्य करणे गरजेचे आहे. तसा निर्धार आपण करायला हवे. प्रसिद्ध विचारवंत साईरस म्हणतो की, ' कीर्ती मिळविण्यासाठी चांगल्या प्रकारची पुष्कळ कामे करावी लागतात ; मात्र अपकिर्ती होण्यासाठी एक वाईट काम पुरेसे असते'. अनेक लोक जन्मतात आणि किती तरी लोक रोज मरण पावतात. परंतु ज्यांनी समाजाच्या उपयोगी पडेल असे काम केले आहे त्यांचीच समाजामध्ये कीर्ती आणि नाव शिल्लक राहते. स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या व धडपडणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबातील सदस्यच तेवढे लक्षात ठेवू शकतात. त्यामुळे हेन्नी एस. सटन यांनी म्हटल्याप्रमाणे ' कीर्ती मिळवायचे असेल तर दुसऱ्याचे अश्रू पुसण्यचे प्रयत्न करा'. आपण जेंव्हा इतरांचे दुःख समजून घेऊन त्याना हातभार किंवा दिलासा देतो तेंव्हा त्याच्या मनात आपल्याविषयी करुणा, प्रेम, माया आणि ममतेची भावना निर्माण होते आणि नक्कीच आपली कीर्ती होते. या जगात आपण रिकाम्या हाताने आलोत आणि रिकाम्या हातानेच परत जाणार आहोत ही जगज्जेता सिकंदराची शिकवण विसरून चालणार नाही. 
आपण खुप नशीबवान आहोत की स्वातंत्र्य उत्तर काळात आपला जन्म झाला. गुलामगिरी म्हणजे काय असते याची जरा सुध्दा आपणास जाणीव झाली नाही. आपण स्वातंत्र्यलढाचा इतिहास फक्त पुस्तकातुन वाचन करतो आणि तेच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी तर अमुक तारीख आणि अमुक व्यक्ती माझ्या लक्षात राहतच नाही असे ही बोलून जातो. जुलमी इंग्रजांच्या गुलामगिरीत लोकांनी काय हालअपेष्टा सहन केल्या असतील ? त्यांचा इतिहास वाचूनच अंगावर काटा उभा राहतो. सुखदेव, राजगुरु आणि भगतसिंग यांची नावे ऐकली की मनात स्फूर्ती निर्माण होते. भारतमाता की जय म्हटल्यामुळे शाळकरी शिरीषकुमारला इंग्रजांनी गोळ्या झाडल्या आणि आज आमच्या तोंडातुन भारतमाता की जय बारीक आवाजात निघतो. कारण आपणाला स्वातंत्र्य फुकटात मिळालेले आहे. त्यामुळे त्याचे आपणास काही एक किमत नाही. म्हणतात की फुकटच्या वस्तूची किंमत विकत घेतल्याशिवाय कळत नाही.
आज आपणास प्रत्येक गोष्टीचे स्वातंत्र्य आहे. इंग्रज लोक भारतातुन निघून जाऊन 79 वर्षाचा काळ गेला. या 79 वर्षात भारताने लक्षणीय प्रगती केली नाही हे जरी सत्य असले, तरी संपूर्ण जग भारत देशाकडे विकसनशील देश या नजरेतून पाहते. आज भारतात मनुष्यबळ तर आहेच शिवाय बुद्धिमान लोकांची संख्या सुध्दा भरपूर आहे. त्यामुळे जग आपल्याकडे बुद्धिमान व हुशार युवकांचा पुरवठा करणारा देश म्हणून पाहतो. आपल्या देशात युवकासाठी रोजगार नाहीत म्हणून होणारी ओरड सर्वत्र आहे. विदेशात काय रोजगार मोठ्या प्रमाणावर आहेत काय ? अर्थात या प्रश्नाचे उत्तर सुध्दा नाही, असेच मिळणार. सर्वाना रोजगार मिळत नाही जो यासाठी पात्र असेल ज्याच्या जवळ बुद्धिमत्ता आहे त्याला जगात कोठेही रोजगार मिळेल यात शंका नाही. परंतु स्वातंत्र्य जसे फुकट मिळाले तसे सर्व काही फुकट मिळाल्यास जीवन सुखी होईल, असे स्वप्न रंगविणारे युवक देशाच्या प्रगतीत काय हातभार लावतील ? ते फक्त रडण्याचे काम करतील. कारण त्यांना आयती खायची सवय लागली. युवकांच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. तसा युवकांनी देखील स्वतः प्रयत्न करणे गरजेचे. देशाने आपणास खुप काही दिले याची एकदा जाणीव निर्माण करा. आपल्या देशाची प्रगती करणे आपल्या हातात आहे. कधी तरी आपल्या स्वतः पुरता विचार करणे बाजूला ठेवून, कोण आपणास काय दिले यापेक्षा मी देशासाठी काय केलो याची एकदा तरी गोळा बेरीज आपण केली आहे काय ? ज्याप्रकारे मिसाइल मैन तथा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे की, देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे काय ? हा प्रश्न सर्वानी आपल्या स्वतःच्या मनाला दिवसातुन एकदा तरी विचारावे. देशाच्या सेवेसाठी माझे योगदान काय आहे ? याचा विचार आपण करणे आवश्यक आहे. जन्म देणारी आई आणि ज्या भूमीवर आपण जन्म घेतला ती भारतमाता अश्या दोन माता प्रत्येकाच्या जीवनात असतात. म्हणूनच प्रसिद्ध गझलकार सुरेश भट म्हणतात की गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला, चंद्र सूर्य तारे. या प्रकारे आपण जन्मदात्री आईची सेवा मनापासून करतो तसे भारत मातेची सुद्धा सेवा करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहेत. सीमारेषेवर डोळ्यात तेल घालून देशाचे संरक्षण करणारे सैनिकच फक्त देश सेवा करीत नाहीत, तर आपण सुद्धा आपापल्या परीने देशाची सेवा करू शकतो. सैनिक लोकांमध्ये ज्याप्रकारे देशभक्ती निर्माण केल्या जाते तसे इतर नागरिकांमध्ये सुद्धा निर्माण होणे अत्यावश्यक आहे. आपण ज्या देशात राहतो त्या देशाने तयार केलेल्या घटनेनुसार आपणास वागावे लागते. त्याविरुद्ध वागलो तर निश्चितपणे आपण काहीतरी चूक करीत आहोत किंवा गुन्हा घडत आहे असे वाटते. नियमाचे उल्लंघन न करता प्रामाणिकपणे वागणे यातून एक प्रकारे देशसेवाच घडते. आपले कर्तव्य आपण न विसरता काम करीत राहिलो तर त्यातून देशाची सेवा घडते. प्रत्येकांनी आपल्या देशाचे नाव उज्ज्वल व्हावे म्हणून प्रामाणिकपणे कार्य करायला हवे. सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात कुचराई न करता काम करणे गरजेचे आहे. राजकारणी लोकांनी जनतेचे कल्याण आणि विकास होईल असे काम केल्यास ती खरी देशसेवा ठरेल. व्यापारी मंडळींनी आपल्या व्यवहारात शुद्ध व्यवहार ठेवल्यास आपल्या व्यापाराची कीर्ती होईल आणि देशाचे नाव होईल. खेळाडू तर आपल्या खेळाद्वारे देशाचे नाव जगभर पोहोचवत देशाची सेवा करत असतात. आज देशामध्ये सर्वत्र भ्रष्टाचार फोफावला आहे. अमुक ठिकाणी लाच घेताना कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली, अश्या बातम्या रोज निदान एक तरी वाचायला मिळते. जे लोक अधिक पैसा मिळविण्याच्या दृष्टीने किंवा लवकरात लवकर श्रीमंत व्हावे या उद्देशाने सामान्य नागरिकांना पैशाचा तगादा लावतात. लाच दिल्याशिवाय काम पूर्ण करीत नाहीत, अशी मंडळी देश सेवा करतात काय ? जेव्हा त्यांना अटक झाल्याची बातमी बाहेर येते तेव्हा त्यांच्या संपूर्ण परिवाराची बदनामी होते. ते ज्या विभागात काम करतात त्या विभागाची सुद्धा नाचक्की होते. ज्या गावात किंवा तालुक्यात ते काम करतात त्या गावाचे वा तालुक्याचे नाव देखील खराब होते. ज्या ठिकाणी आपल्यावर डाग लागतो त्या ठिकाणी आपण आपल्याशी जोडलेल्या सर्वच घटकावर डाग लागतोच लागतो. याद्वारे आपली देशसेवा होते का ? भ्रष्टाचार करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने याविषयी एकदा तरी विचार करावा. प्रत्येकजण या दृष्टिकोनातून विचार केल्यास भारतात भ्रष्टाचार संपवायला वेळ लागणार नाही. जगात भारताला घोटाळ्याचा देश असे म्हटले जाते. प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपले कर्तव्य पूर्ण करीत जनतेचे काम केल्यास ते एक प्रकारे देशसेवाच ठरेल असे वाटते. आपण जर एका वेगळ्या दिशेने विचार केलो तर आपणास पुढील तीस वर्षात नक्कीच वेगळा भारत दिसेल ज्यावेळी आपण सर्व आपल्या भारतीय स्वातंत्र्याची शतकी साजरी करू. आपले विचार बदला देश आपोआप बदलेल. देशाला बदलण्याच्या काळजीत आम्हीच बदलायला तयार नाही.

- नासा येवतीकर
( लेखक नांदेड जिल्हा परिषदमध्ये पदवीधर शिक्षक आहेत.)
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Saturday, 28 June 2025

वेळेला महत्व देणारे श्री बाबुराव भोजराज सर ( Baburao Bhojraj Sir )

वेळेला महत्व देणारे बाबुराव भोजराज सर

समाजात शिक्षकांचे स्थान खूप मोठे आहे. शिक्षकांविषयी म्हटले आहे की, "शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तो आयुष्य घडवतो." शिक्षक हे पुस्तकी ज्ञानासोबत त्यांच्यावर उत्तम संस्कार करण्याचे काम करतात. शिक्षक म्हणजे अंधारात प्रकाश दाखवणारा दिवा होय. शिक्षकांच्या सहवासामुळे अनेकांचे जीवन सुधारले जाते. शिक्षक मुलांना स्वतःवर विश्वास ठेवायला आणि धैर्याने संकटाला तोंड द्यायला शिकवतात. असेच एक शिक्षक म्हणजे बाबुराव हणगोजी भोजराज सर होय. आज त्यांची सेवानिवृत्ती त्यानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक कार्याचा घेतलेला आढावा. 
बाबुराव हणगोजी भोजराज यांचा जन्म धर्माबाद तालुक्यातील जारीकोट या गावी 29 जून 1967 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई. त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण जारीकोट येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयमध्ये त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम म्हणजे डी. एड. ला देगलूर येथे प्रवेश घेतला. पण काही कारणाने येथील कॉलेज बंद झाल्याने त्यांनी आपले द्वितीय वर्षाचे शिक्षण शासकीय अध्यापक विद्यालय धर्माबाद येथून पूर्ण केले. 
डी.एड.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिलोली तालुक्यातील पिंपळगाव (कु.) येथील संत कबीर विद्यालय संस्थेवर दोन वर्षे सेवा केल्यानंतर त्यांची नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. हदगाव तालुक्यातील आष्टी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव ( ता. ) याठिकाणी दिनांक 08 जुलै 1992 रोजी रुजू झाले. ही त्यांची आपल्या सेवेतील पहिली शाळा होती. बोरगाव हे अतिशय लहान खेडे होते, त्या गावाला जाण्यासाठी रस्ता नव्हता. आष्टीपासून दोन किलोमीटर पायी चालत जावं लागायचं, त्यातच रस्त्यावर मोठा नाला होता. पावसाळ्यात पूर आला की नाला ओलांडून जाता येते नव्हते. कधी शाळेला उशिरा व्हायचा तर कधी शाळेच्या गावी थांबावे लागायचे. दळणवळणाची कोणतीच सुविधा नसल्याने त्या गावात मुक्कामी राहण्याशिवाय त्यांच्या समोर पर्याय नव्हता. या त्रासाला कंटाळून त्यांनी त्याच गावात राहण्याचा निश्चय केला. गावात मुक्कामी राहू लागल्यामूळे प्रत्येक कुटुंबाशी व व्यक्तीशी माणुसकीचे नाते जुळले यातूनच साक्षरता अभियान मोहीम यशस्वी करण्यासाठी त्यांना खूप मदत झाली. त्यामुळे याठिकाणी सहा वर्षे त्यांनी गावात राहून सेवा केली. तीस वर्षांपूर्वी जुळलेली नाती आजतागायत कायम आहेत प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगी सर्वजण सोबत असतात. गावातील लोकांसोबत त्यांचे त्यावेळेसचे प्रेम आणि स्नेह आजही कायम आहे. या शाळेवर त्यांना सतिश भुरे नावाचे शिक्षक उत्तम सहकारी म्हणून लाभले. या शाळेतून त्यांची बदली जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा जारीकोट येथे झाली. याठिकाणी ते 16 जुलै 1998 रोजी रुजू झाले. येथील शाळेवर त्यांनी अनेक उपक्रम राबवून विद्यार्थांना ज्ञानार्जन करण्याचे काम केले. या शाळेवर काम करताना सतिश बोधनकर, राम चिलकेवार, गोविंद मोरे आणि इतर शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.  येथे देखील सहा वर्षाची सेवा केल्यानंतर त्यांची बदली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायखेड येथे झाली. येथे दिनांक 05 जुलै 2004 रोजी रुजू झाले. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करून येथील शाळा त्यांनी आकर्षक केली होती. शिष्यवृत्ती आणि विविध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. या शाळेतील अनेक विद्यार्थी आज विविध पदावर काम करत आहेत. या शाळेवर काम करताना देविदास नारमोड आणि इतर शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. याठिकाणी नऊ वर्षाची सेवा केल्यानंतर दिनांक 01 जून 2013 रोजी त्यांची बदली बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली येथे प्रशासकीय बदली झाली. या शाळेत कार्यरत असताना त्यांनी मुख्याध्यापक म्हणून यशस्वीपणे कार्यभार सांभाळले व विविध उपक्रमाचे आयोजन करून विद्यार्थांना गुणवंत करण्याचा प्रयत्न केला होता. याठिकाणी 05 वर्षाच्या सेवाकाळात त्यांना जगन्नाथ दिंडे, इरेश्याम झंपलकर, नासा येवतीकर आणि सौ. निता दमकोंडवार या शिक्षकांची उत्तम साथ मिळाली. 
चिरली शाळेतील सहकारी सोबत

त्यानंतर त्यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोंडी येथे ऑनलाईन पोर्टलद्वारे बदली झाली. दिनांक 29 मे 2018 रोजी या शाळेवर रुजू झाले. याठिकाणी देखील त्यांनी आपल्या स्वभावानुसार उत्तम प्रकारे शाळा सांभाळली. याठिकाणी त्यांना मिठू लोणे नावाचे उत्तम सहकारी मिळाले. सात वर्षाच्या सेवेनंतर ते आज 30 जून रोजी नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण करीत असल्याने ते याठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत.  
नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून हदगाव, धर्माबाद व बिलोली तालुक्यात 32 वर्षे 11 महिने 22 दिवस अशी प्रदीर्घ सेवा केलेली आहे. या संपूर्ण कालावधीत त्यांनी विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे उत्तम कार्य केले. म्हणून त्यांना तालुकास्तरीय गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचसोबत त्यांनी शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठविण्यासाठी ibta संघटनेच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. संघटनेच्या चळवळीत काम करताना अनेक शिक्षक आणि अधिकारी यांचा संपर्क झाला होता. संघटनेसोबत त्यांचे सहकार क्षेत्रातील कार्य देखील उल्लेखनीय आहे. शिक्षकांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या भास्कर पतसंस्था नायगाव ( बा.) या पतसंस्थेवर त्यांनी काही काळ संचालक म्हणून काम पाहिले तर दोन वर्षे सचिव पदावर काम केले. या काळात त्यांनी पतसंस्थेत जास्तीत जास्त सभासद करण्याचे व शिक्षकांना आर्थिक मदत करण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. पतसंस्थेत काम करत असताना सभासदाच्या हितासाठी व पतसंस्थेच्या भरभराटीसाठी अनेक खर्चात काटकसर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. 
चिरली येथे आपल्या 50 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप 

त्यांचे कौटुंबिक जीवन देखील सुखी समाधानाचे आहे. त्यांच्या परिवारात एकूण पाच भावंडे होती. ते घरात सर्वात जेष्ठ होते. त्यांना चार बहिणी होत्या. सर्व बहिणी व त्यांच्या मुलं-मुली यांनाही घरच्यासारखे प्रेम व वेळप्रसंगी आर्थिक मदत देखील केली आहे. त्यांच्या सौभाग्यवतीच्या अमूल्य अश्या सहकार्यामुळे ते शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करू शकले. त्यांना दोन मुली रामेश्वरी व रश्मी व एक मुलगा राहुलकुमार अशी तीन अपत्य असून मुलगी रश्मी महसूल विभागात तलाठी या पदावर कार्यरत आहे. 
मला माध्यमिक शाळेत शिकविलेले शिक्षक श्री विलासराव आग्रे आणि श्री जांबुवंतराव धुप्पे यांच्यामुळे मी एक उत्तम व यशस्वी जीवन जगू शकलो आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली म्हणून माझ्यासाठी ते नेहमी आदर्श व्यक्ती आहेत, असे ते म्हणतात. 
एकूण 33 वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी आपल्या कर्तव्यात कधीही कसूर केला नाही. वेळेच्या बाबतीत ते अत्यंत शिस्तीचे होते. त्यांनी स्वतः वेळेचे पालन केले आणि विद्यार्थ्यांना वक्तशीरपणाचे महत्व आपल्या वर्तनातून दाखवून दिले. आजपर्यंतच्या सर्वच शाळेत त्यांना उत्तम सहकारी शिक्षक लाभले. ज्यांच्या सहकार्यामुळे ते उत्तम कार्य करू शकले. ते सर्वच शिक्षक माझ्या स्मरणात कायम मित्र म्हणून राहतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 
सेवानिवृत्तीनंतरचे त्यांचे जीवन सुखदायी, आरोग्यदायी आणि यशस्वी होवो हीच या मंगल प्रसंगी शुभकामना व पुढील भावी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा .....!

- नासा येवतीकर, मुख्याध्यापक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Tuesday, 29 April 2025

अक्षय्य तृतीया ( Akshayya Trutiya )

      अक्षय तृतीया : शुभ मुहूर्त

हिंदू संस्कृतीत मुहूर्ताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य करायचे म्हणजे त्यासाठी चांगला मुहूर्त असावा लागतो. चांगल्या मुहूर्तावर सुरू केलेल्या कार्यात हमखास यश मिळणारच असा विश्वास असतो. वैशाख महिन्यातील शुध्द तृतीयेला येणाऱ्या अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून समजल्या जाते. संपूर्ण दिवसभर हा दिवस चांगल्या समजल्या जातो. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला व्यापारीवर्गात व समाजात अनेक विशेष करून शेतकरी वर्गात महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गुंजभर तरी सोने खरेदी करण्याची फार पूर्वीपासूनची परंपरा आजतागायत चालू आहे. या दिवशी खरेदी केलेल्या सोन्याने घरात लक्ष्मीचा वास होतो आणि वर्षभर संपत्तीत वृद्धी होते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे राज्यात या दिवशी अनेक लोकाकडून सोने खरेदी केल्या जाते. व्यापाराच्या दृष्टीने हा दिवस शुभ मानला जातो. 
कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हणले जाते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.
या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. नर-नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते. परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते. वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक आणि समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांचा जन्म याच अक्षय तृतीयेला सन 1105 मध्ये झाला होता. वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे.
कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हणले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते'.
या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे.
भारतीय पंचांगानुसार दिवाळी व दसरा या सणानंतर अक्षय तृतीया तिथीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. शेतकरी वर्गासाठी तर हा दिवस आपल्या नवीन कामाचा शुभारंभ करण्याचा दिवस असतो. या दिवशी शेतकरी आपल्या घरातील सर्व सदस्यांसह शेतात जातात. त्याठिकाणी शेती कामासाठी उपयोगी पडणारे नांगर, फाळ, वखर इत्यादी अवजारांची यथायोग्य पूजा करून शेतातील कामाची सुरुवात करतात. जमिनीची भाजणी, ढेकळे फोडून वाफे तयार करणे, शेतातील तण वेचणे व कचरा जाळून नष्ट करणे इत्यादी कामे केल्या जातात. पूजाअर्चा विधी संपल्यानंतर शेताला शिजवलेला भात, हरबर्‍याची भाजी, दही व आंबील याचा नैवेद्य दाखविला जातो. शेतात बसून शेतकरी व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य वनभोजन करतात. बायका-पोरं शेतातील झाडाला दोरी बांधून संपूर्ण दिवसभर झोका खेळण्याचा आनंद घेतात. याच दिवसापासून शेतकरी आपल्या शेतीसाठी सालगडीचा करार करतात. 
या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्‍त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे. त्यास्तव हा दिवस प्रत्येकाने व्यापाराने शेतकऱ्यांनी आणि आपण सर्वजण मोठ्या आनंदाने साजरा करावे तसेच नवीन वर्षात काहीतरी चांगले काम करण्याचा संकल्प या दिवशी केल्यास त्यात आपणास नक्कीच यश मिळेल.

- नासा येवतीकर, धर्माबाद,
9423625769
 

Sunday, 27 April 2025

आधार ( Aadhar )

आधार जीवनाचा सौंदर्य
संस्कृत भाषेत एक श्लोक आहे 
आधारो हि जीवनस्य,
संकटे दीपकः स्मृतः।
साहाय्यं कुरु सर्वेषां,
भव जीवनसंगतः॥
आधार हा जीवनाचा दीप आहे; संकटात तो प्रकाश देतो. सर्वांना मदत करा, कारण त्यानेच जीवन सुंदर होते असा त्याचा अर्थ आहे.
"आधार" हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. आधार म्हणजे सहाय्य, मदत, पाठिंबा व स्थैर्य देणारी गोष्ट किंवा व्यक्ती. आधाराशिवाय कोणीही राहू शकत नाही. एकमेकांचा आधार हाच सुखी जीवनाचा मंत्र आहे. लहानपणापासूनच आपण आधाराच्या गरजेत असतो. लहानपणी आई-वडिलांचा आधार, शिक्षण घेताना शिक्षकांचा आधार, समाजात वावरताना मित्रांचा आधार आणि हेच आधार आपल्याला उभं राहायला शिकवतात. नवरा-बायको यांना एकमेकांचा भक्कम आधार असेल तरच ते जीवनातील कोणत्याही संकटाचा सामना यशस्वीपणे करू शकतात. ज्याप्रकारे रथाचे दोन चाक एका लयीत चालतात. एकाला ही मागेपुढे होऊन चालणार नाही. तसेच काही आपल्या जीवनाचे देखील आहे. आपण एकटे काहीच करू शकत नाही. काही लोकांना वाटते की, मला कुणाच्या आधाराची गरज नाही. मी एकटा काहीही करू शकतो. हा त्याचा एक भ्रम असतो किंवा गर्व असतो. पण कालांतराने जेव्हा त्याला जाणीव झालेली असते की, खरंच माझ्या एकट्याने काही होऊ शकत नाही. त्यासाठी मला कुणाची ना कुणाची मदत घ्यावी लागते. जसे क्रिकेट, कबड्डी, हॉकी आणि फुटबॉल हे सांघिक खेळ आहेत. या खेळात सर्व खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावून खेळले तरच त्यांचा संघ जिंकतो. नाही तर एक दोघांच्या चुका मुळे संघाला हार मिळू शकतो. आपले ही जीवन असेच आहे. आपले जीवन देखील सांघिक खेळाप्रमाणे आहे. वरील खेळात खेळाडूची संख्या नक्की केलेली असते पण आपल्या जीवनातील खेळामध्ये जे साथीदार असतात त्यांची संख्या नक्की केलेली नसते. म्हणून आपण आहे त्या संख्येत आपला संघ मजबूत आणि यशस्वी बनविण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. सर्वांनी मिळून सकारात्मक विचार केल्यास आपल्या कुटुंबाची प्रगती होते. आधारामुळे माणसाला धीर येतो. सुखदुःखात एकमेकांना मदत करणे हीच खरी जीवनशैली आहे. सुखात तर कोणीही आपणाला आधार देतो. पण दुःखाच्या काळात जो आपणाला आधार देतो किंवा मदत करतो तोच आपला खरा सखा व सोबती असतो. खऱ्या माणसाची ओळख होण्यासाठी कधी दुःखाचा प्रसंग देखील जीवनात यायला हवं. संकटाच्या वेळेला जर कुणी थोडा आधार दिला, तर तो माणूस परत उभा राहू शकतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती अपयशामुळे खचते, तेव्हा जर एखाद्याने तिची थोडी हिम्मत वाढवली, तर ती परत प्रयत्न करून यश मिळवू शकते. म्हणूनच म्हणतात, "बुडत्याला काठीचा आधार" त्याचा अर्थ जेव्हा एखादी व्यक्ती संकटात किंवा अडचणीत असते, तेव्हा अगदी लहानशी मदत सुद्धा तिला फार मोठी वाटते आणि उपयोगी ठरते. माझ्या लहानपणी सांगितलेली एक गोष्ट मला आठवते, एकदा काही व्यापारी समुद्रातून प्रवास करत होते. अचानक वादळ उठलं. त्यांची नौका भरकटली आणि बुडायला लागली. व्यापाऱ्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. तेवढ्यात समोरून त्यांना एक छोटी नौका येताना दिसली. ती नौका फार मोठी नव्हती, पण तिने व्यापाऱ्यांना एक एक करून वाचवलं. सर्व व्यापारी सुखरूप किनाऱ्यावर पोचले. त्या दिवशी सर्वांनी मनापासून कबूल केलं की, संकटात एखादी छोटी नौका देखील "बुडत्याला काठीचा आधार" ठरते. म्हणजे माझ्या छोट्या मदतीने काय होणार ? हा विचार मनात आणायचं नाही. आपली छोटी मदत देखील इतरांना संकटातून वाचवू शकते. 
केवळ आर्थिक किंवा शारीरिक आधारच नाही, तर मानसिक आधारही तितकाच महत्त्वाचा आहे. सध्या आत्महत्या करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अश्या लोकांना खरी गरज असते मानसिक आधाराची. चांगल्या शब्दांनी, प्रेमाने आणि विश्वासाने एखाद्याला दिलेला आधार जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकतो. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे मन या मानसिक आधाराने वळविता येऊ शकते. 
यः समर्थो हि दुःखेषु,
स्नेहपूर्वं करोति सहायम्।
स एव जीवनमार्गे,
सत्यं धारयति तेजः॥
अर्थात जो दु:खातही प्रेमाने आधार देतो, तोच जीवनमार्गावर खरे तेज धारण करतो. 
समाजात अनेक सामाजिक संस्था आणि व्यक्ती आहेत जे की गरजू लोकांना अन्न, शिक्षण, आरोग्यसेवा यांच्या माध्यमातून आधार देतात. त्यामुळे आधार देणं ही एक मोठी सामाजिक जबाबदारी आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्यालाही इतरांसाठी आधार बनता आलं पाहिजे. कारण आधार देणं म्हणजेच माणुसकी जपणं होय. आधार ही माणसाच्या जीवनातील एक अमूल्य गोष्ट आहे. आधाराशिवाय जीवन अपूर्ण वाटते. त्यामुळे आपण स्वतः आधार घ्यावा आणि गरजूंना आधार द्यावा हेच खरे जीवनाचे सौंदर्य आहे. 
नाश्यति पीडाः सर्वाः,
यत्र स्नेहाधारः स्थितः।
सुखं तत्र सदा वसति,
भवतु ते जीवनं शुभम्॥
अर्थात जिथे प्रेमाचा आधार असतो, तिथे सगळ्या वेदना नाहीशा होतात आणि कायम आनंद नांदतो.
संतांनी सांगून ठेवलेले आहे " एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ " त्यामुळे चला आपण सर्वजण एकमेकांना चांगला आधार देऊ या, निस्वार्थ भावनेने मदत करू या आणि सुखी जीवन जगू या. 

नासा येवतीकर, स्तंभलेखक, 9423625769


Friday, 21 March 2025

जागतिक जल दिन ( World Water Day )

22 मार्च - जागतिक जल दिन त्यानिमित्ताने लेख 

               जल है तो कल है 
पाणी म्हणजे जल किंवा नीर असे ही म्हटले जाते. सजीवांना त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. त्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहूच शकत नाही. पशु-पक्षी, वेली, वनस्पती, झाडे, आणि मानवाना पदोपदी पाण्याची गरज भासते. अश्मयुगीन काळातील लोकं पाण्याचे ठिकाण पाहून आपली वस्ती तयार करत होते. कारण त्याशिवाय त्यांचे जगणे अशक्य होते. आज ही आपली तीच परिस्थिती आहे. शहरात किंवा खेड्यात कोठेही घर बांधण्यापूर्वी पाण्याची व्यवस्था कशी आहे ? याबाबी लक्षात घेतले जाते. त्यानंतरच घर बांधणीचा विचार केला जातो. एखाद्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही म्हटल्यावर तेथे सहसा कोणी घर बांधकाम करत नाहीत, त्या भागातील जमिनीचे दर देखील खूप कमी असतात. वाढती लोकसंख्या आणि वाढते घरं यामुळे प्रत्येकजण पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जमिनीला चारशे ते पाचशे फूट खाली पर्यंत छिद्र करत आहेत. त्यामुळे जमिनीचे अक्षरशः चाळणी झाल्यासारखी अवस्था झाली आहे. पूर्वीच्या काळी पन्नास फूट खोलीवर असणारे पाणी आज दहापट खाली उतरले आहे. काहीजणांना पाणीच लागत नाही तेव्हा ते अजून एक दोन छिद्र करून पाणी मिळवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे पृथ्वीवरील जमिनीचे संतुलन बिघडत चालले आहे. गावात आणि शहरात नळ योजना असताना देखील लोकं खाजगीमध्ये बोअरवेल करतात. यावर मर्यादा आणणे गरजेचे आहे. सध्या तर पाणी हा एक मोठा व्यवसाय झाला आहे. दहा वर्षांपूर्वी जर कोणी म्हटलं असतं की, पिण्याच्या पाण्यासाठी भविष्यात पैसे मोजावे लागतील तर त्याच्यावर आपण मोठ्याने हसलो असतो आणि त्याला मूर्खात काढलं असतं. पण आज परिस्थिती तीच आहे. फिल्टर पाणी पिण्यासाठी योग्य असते म्हणून गेल्या चार पाच वर्षात आपण साधे पाणी पिणेच बंद करून टाकले आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी जे की फुकट मिळत होते त्यास आज आपण मासिक सरासरी तीनशे रु. खर्च करत आहोत तर वार्षिक तीन हजार सहाशे रु खर्च करत आहोत. एका कुटुंबाचा वार्षिक खर्चावरून जर गाव आणि शहरातील लोकांची एकत्रित खर्च काढला तर लक्षात येईल की आपण पिण्याच्या पाण्यासाठी किती खर्च करत आहोत. परंतु ही सेवा स्थानिक प्रशासनाने दिल्यास योग्य राहील असे वाटते. 
पाण्याच्या दुनियेत जे काही संघर्ष चालू आहे ते थांबेल. कुणीतरी सांगून ठेवलं आहे की यापुढील तिसरे महायुद्ध हे पाण्यावरून होणार आहे. असेच जर चालू राहिले तर भविष्यात नक्कीच होऊ शकते, यात काही नवल नाही.
भारतात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते त्यामुळे त्याचा अपव्यय देखील मोठ्या प्रमाणावर होते. पावसाळ्यात पाण्याची दिवाळी आणि उन्हाळ्यात पाण्यासाठी शिमगा असतो. ग्रामीण भागात आजही अनेक खेडी असे आहेत की ज्यांना कोस दोन कोसवरून डोक्यावर पाणी वाहून आणावे लागते. अश्या लोकांना या पाण्याचे महत्व कळते. घरात बसून बटन मारले की हजार लिटरची टाकी भरून घेणाऱ्यांना या पाण्याचे महत्व कधीच कळणार नाही. आज जागतिक जलदिन आहे. तसेच उन्हाची तीव्रता देखील वाढत आहे. त्यानिमित्ताने पशु-पक्षी यांना पिण्यासाठी पाण्याची जमेल तशी व्यवस्था करू या, एखादा वाटसरूला तहान लागली असेल आणि आपल्याजवळ महागडे पाण्याचे बॉटल असेल म्हणून दुर्लक्ष न करता त्याला पाणी पाजवा, दारावर येणाऱ्या कामकरी कष्टकरी माणसांना पिण्यासाठी पाणी द्यावे. एखादेवेळी जेवण नाही दिलं तरी चालेल पण तहानलेल्या लोकांना नक्की पाणी द्या, हीच यानिमित्ताने आपणा सर्वांना विनंती. 

- नासा येवतीकर, येवती
ता. धर्माबाद जि. नांदेड, 9423625769


*💧 जलसाक्षरता : काळाची गरज💧*

मानवी जीवनच नव्हे तर प्रत्येक सजीवांसाठी पाणी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जीवन जगण्यासाठी ज्याप्रकारे अन्न आणि हवा याची गरज असते अगदी त्याचप्रमाणे पाण्याचीही गरज असते. पाणी कसे तयार होते ?
 याविषयीच्या जलचक्रची माहिती आपणा सर्वांना ज्ञात आहेच. वास्तविक पाहता प्रयोगशाळेतून पाणी म्हणजे H2O हायड्रोजन डाय-ऑक्साइड तयार करणे फार खर्चिक आणि जिकरीचे काम आहे. त्याद्वारे तयार करण्यात आलेले पाणी आपण वापरू ही शकत नाही, त्यास्तव आपण त्या भानगडीत सुद्धा पडत नाही. कारण पृथ्वीवर जमीन कमी म्हणजे 29% तर पाण्याचा भाग जास्त म्हणजे 71% हे आहे. पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे पृथ्वीला निलग्रह असेसुद्धा म्हटले जाते. त्यामुळे आपल्याकडे निसर्गतःच पाणी भरपूर आहे अशी समाजाची धारणा होती. त्याचा परिणाम असा झाला की, उपलब्ध पाणीसाठा किती आहे व ते किती महत्त्वाचे आहे याचा विचार करणे माणसाने सोडून दिले.

 पाण्यापासून पैसा तयार करण्याच्या मानवाच्या अति स्वार्थी स्वभावामुळे, स्वतःच्या स्वार्थासाठी व विकासासाठी पाण्याचा पुरेपूर किंवा त्यापेक्षा जास्त वापर करून आज पाणीटंचाई सारख्या भीषण समस्येच्या गर्तेत अडकून पडला आहे. 
आदिमानव किंवा आपले पूर्वज पाण्याचे महत्व ओळखून होते. म्हणूनच त्यांच्या वस्त्या ह्या नदीच्या काठावर किंवा ज्या ठिकाणी पाणी आहे त्याच ठिकाणी आढळून आल्या आहेत. पाण्याचा वापर करून शेती करता येते याची जाणीव सुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. पाण्यामुळे अन्न मिळू लागले याची जाणीव त्यांच्या मनात निर्माण झाल्यावर त्यांनी पाण्याला पंचमहाभूतात समाविष्ट केले. पाणी पावसाच्या रूपाने जमिनीवर येतो हे समजल्यावर पाऊस व त्या पावसाची निर्मिती करणारा समुद्र यांना त्यांनी देवत्व बहाल केले. संगणक युगातील पिढी या लोकांना अशा वागण्यामुळे मूर्खात काढतील कदाचित परंतु त्यांच्या मनात भीती होती आपण निसर्गाचे नियम तोडले तर तो कदाचित आपणाला शिक्षा देऊ शकतो. भीतीपोटी तो निसर्गाने तयार केलेले नियम तोडत नव्हता आणि पर्यावरण संतुलित राहून त्याचा समतोल कधी बिघडत नव्हता. परंतु आज आपण सजग, जागरूक, सज्ञान झालो आहोत म्हणून वरील गोष्टी काही मानत नाही. मात्र आपण जलसाक्षर झालो नाही. लिहिता वाचता यावे म्हणून साक्षर झालो खरे परंतु पाण्याची चणचण तुटवडा यावर मात करण्यासाठी जलसाक्षरता निर्माण होणे ही काळाची गरज आहे.

एका वर्षातून पावसाचे चार महिने ठरलेले असतात. त्या पर्जन्याच्या काळात योग्य प्रमाणात पाऊस झाला तर त्यावर्षी कोणत्याच बाबींची चणचण भासत नाही. मात्र तसे होत नाही. पावसाची वेळ, त्याचा वेग आणि त्याचे प्रमाण याबद्दल काही अंदाज व्यक्त करणे फारच कठीण आहे. हवामान तज्ज्ञ दरवर्षी पावसाचा आपला अंदाज व्यक्त करतात. मात्र त्या प्रमाणात पाऊस पडतोच असे नाही.

 त्याच्याबाबतीत वाट पाहणे एवढेच आपल्या हातात आहे. कधीकधी वर्षभराचा पाऊस एका महिन्यात तर कधीकधी एका महिन्याचा पाऊस एका दिवसात पडतो. पाऊस जास्त पडला तर अतिवृष्टी आणि कमी पडला तर अनावृष्टी यासारखी नैसर्गिक संकट ओढावू शकतात. पावसाचे पडलेले पाणी वाहून जाणे आणि पाण्याचा वाटेल तसा वापर करणे यामुळे पाण्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. म्हणूनच निसर्गतः आपणास प्राप्त झालेले पाण्याचे स्तोत्र जपून वापरणे, पावसाचे पडलेले पाणी साठवून ठेवणे, दैनंदिन जीवनात पाण्याचा योग्य व जपून वापर करणे या गोष्टीबाबत सजगता निर्माण करण्यासाठी जलसाक्षरतेची अत्यंत आवश्यकता आहे.
जलसाक्षरता म्हणजे फार मोठे काम नाही. परंतु लहान-सहान गोष्टीकडे सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष देऊन पाणी कसे वाचविता येईल किंवा बचत करता येईल ? याचा विचार करणे म्हणजे जलसाक्षरता म्हणता येईल. घरात असलेले नळ तर आपण वेळोवेळी तपासणी करतो परंतु नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीमार्फत जे पाणी आपण नळाद्वारे घेतो त्याची वेळोवेळी तपासणी करावी. बहुतांशी ठिकाणी हे नळ उघडेच राहतात. त्याला चालू बंद करायची तोटी नसते त्यामुळे आपण जेव्हा एखाद्या गावाला जातो त्यावेळी या नळाद्वारे भरपूर पाणी वाया जाते. ते पाणी तोटी लावून वाचविता येऊ शकते याचा प्रत्येकाने जरूर विचार करावा. सार्वजनिक ठिकाणी असलेले नळ चालू असेल तर लगेच ते बंद करण्याची काळजी आपण घ्यावी. दररोज सकाळी दात घासताना, दाढी करताना, हात-पाय धुते वेळेस नळ चालू करून भरपूर पाणी वापरण्याची प्रथा आपण बंद करावी व कमीत कमी पाण्यात उपरोक्त क्रिया करावी. यामुळे पाण्याची बचत होईल. मोटार चालू करून वाहने धुण्याची बऱ्याच लोकांची सवय असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्याऐवजी बकेटभर पाणी घेऊन स्पंजद्वारे गाडी पुसल्यास पाणी कमी लागेल आणि गाडी साफ ही होईल. पाण्याची टाकी पूर्ण भरल्यानंतर ओवरलोड साठी एक पाइप बाहेर काढल्या जाते. त्याद्वारे जास्त पाणी बाहेर येणार नाही याची काळजी नेहमी घेणे गरजेचे आहे. बहुतांश वेळा आपण पाण्याची टाकी भरण्यासाठी मोटार चालू करतो आणि टाकी भरून पाणी उलटून जाते तरी आपले लक्ष राहत नाही. त्यामुळे बरेच पाणी वाया जाऊ शकते. या सर्व बाबीसाठी घरातील महिलांना सजग करणे गरजेचे आहे. पाण्याची अत्यंत आवश्यकता त्यांनाच असते व त्याची काळजी सुद्धा सर्वात जास्त त्यांनीच घेणे आवश्यक आहे.
घरात पाहुणे मंडळी आली असता त्यांना ग्लास भरून पाणी न देता अर्धा ग्लास भरलेले पाणी द्यावे. ज्यामुळे त्यांना आवश्यक असल्यास पाहुणे अजून पाणी मागतील किंवा कमी पाणी दिल्यास तेवढे संपवतील. परंतु आपण या छोट्या बाबीचा विचार ही सहसा करत नाही. पाहुणे मंडळी सुद्धा आपली तहान लक्षात घेऊन विचार करावा अन्यथा " नको " म्हटलेले केव्हाही चांगले. त्यामुळे पाण्याची नक्कीच बचत होईल. आपल्या घरात पिण्यासाठी किती पाणी लागते याचा अंदाज घेऊन भाडे भरून घ्यावे. पाणी कधीही शिळे होत नसते याची जाणीव सर्वप्रथम महिलांनी करून घेऊन पाण्याची भांडी रोज ओतून देऊ नये. भाजी किंवा फळे धुण्यासाठी वापरलेले पाणी परसबागेतील किंवा कुंडीतील झाडाना टाकणे आवश्यक आहे. घरातील सांडपाणी सुद्धा बागेसाठी वापरावे यामुळे बागेला स्वतंत्रपणे पाणी देण्याची आवश्यकता रहात नाही. झाडांना किंवा शेतात पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर द्यावा. ज्यामुळे कमी पाण्यावर उत्तम शेती होईलच शिवाय त्या पिकांना मुळापर्यंत पाणी जाऊन त्याची योग्य वाढ होईल. याउपर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसाचे पडणारे पाणी साठवणे व त्याचा वापर करणे. आपण या पावसाच्या पाण्याचा शेती वगळता त्याचा काहीही उपयोग करून घेत नाही. दरवर्षी पावसाचे पडणारे कितीतरी पाणी वाहून जाते. त्याची साठवणूक कशी व कोठे करावे आणि त्याचा वापर नंतर कसा करावा याचे ज्ञान नसल्यामुळे आपणास ते पाणी साठविता येत नाही. राज्यातील राळेगणसिद्धी येथे मा. अण्णा हजारे यांनी पावसाचे पाणी वापरून त्या गावाला कसे नंदनवन केले हे प्रत्यक्षात या गावाला भेट दिल्याशिवाय कळणार नाही.
 व्यक्ती अनुभवातून बरेच काही शिकतो त्यासाठी हिवरेबाजारचे आदर्श सरपंच श्री पोपटराव पवार यांना भेटून ही माहिती मिळवू शकतो. रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टिमद्वारे आपण पावसाचे पाणी जमिनीत मुरवू शकतो किंवा भांड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा करून त्याचा वापर करू शकतो. अशाप्रकारे फार लहान लहान घटनांमधून पाणी वाचविता येऊ शकते. थेंबे थेंबे तळे साचे म्हणीप्रमाणे एखादी क्रिया करताना ती लहान वाटते परंतु काही काळानंतर मोठ्या स्वरूपात दिसून येते. त्याच तो प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून उद्यासाठी पाणी।हवे असेल तर आज आणि आजच ते पाणी वाचवावे लागेल हे घोषवाक्य नेहमी लक्षात ठेवावे. संत रामदास महाराजांनी म्हटल्याप्रमाणे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या उक्तीनुसार आपण सर्वांनी पाण्यासाठी हे काम केले पाहिजे. सध्या राज्यात पाणीदार गावासाठी वॉटरकप स्पर्धा चालू आहे. राजीव तिडके नावाच्या एका शिक्षकाने यासाठी आपला एक महिन्याचा पगार देऊ केलाय हे खरोखरच अभिनंदनीय आणि स्तुत्य आहे. अश्या कार्यासाठी प्रत्येकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन कार्य करणे आवश्यक आहे. जलयुक्त शिवार योजनेमधून देखील पाण्याचे बचत आणि वापर करता येऊ शकतो. या योजनेमुळे अनेक गावे टँकरमुक्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. आत्ता खरी गरज आहे हे होऊ शकते असे  प्रत्येकाच्या इच्छा शक्तीची. 

*! जागतिक जल दिनाच्या शुभेच्छा !*
__ ना.सा.येवतीकर__

💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧

Wednesday, 12 March 2025

होळी व धुलीवंदन ( Holi & Dhulivandan )

*🔫 होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा 🔫*
फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळी हा सण आपल्या आयुष्यात अनेक रंग घेऊन येतो. होळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंदात आणि उत्साहाने साजरा केला जातो. पण कृत्रिम रासायनिक रंगांचा, अंड्याचा, पिशव्यांचा बेशिस्तपणे वापर केला जातो. या कारणामुळे पर्यावरणाला व माणसाला त्रास होतो. म्हणून स्वत:ची काळजी घेऊन इको फ्रेंडली होळी खेळली पाहिजे.

 नासा येवतीकर, स्तंभलेखक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आमची होळी आणि धूलिवंदन

झजरी दादा, झजरी दादा
फाल्गुन महीना सुरु झाला की आमच्या बच्चे कंपनी ला खुप आनंद व्हायचा कारण सर्वात आवडणारा आमचा होळी चा सण जवळ आलेला असायचा. होळी च्या पंधरा दिवासपूर्वीच आम्हाला वेध लागायाचे. तीन चार मित्र मिळून एक गट केल्या जायचे. सुताराजवळ जाऊन दोन छान लाकडे तासुन घ्यायचे, ज्यास आज टिपरी म्हणतात हे कळले. ते दोन लाकडे एकमेकावर आपटून प्रत्येकाच्या घरा समोर जाऊन *झजरी दादा, झजरी दादा* हे गीत म्हणत असू. हे गीत मराठी व तेलगू मिश्रित होती. 

आम्ही लहान असतांना हे गीत म्हणत घरोघरी ज्वारी मागत असू. आपल्यासाठी सदरील गीत येथे देत आहे.

*होळीची एक आठवण*

झजरी दादा, झजरी दादा
आल्यान गोफण, पल्यान डोळा
डोळ्याचं राखण काय रे दादा
रुंगरुंग पिला रुपया दंडा
दंडा कादू रा दमेली मोंगा
मोंगा कादू रा मोतका निडा
निडा कादु रा निमला बाई
बाई कादु रा पोराडू जुट्टू
जुट्टू कादू रा मिशाला पोट्टू
हडेल पडेल जिंका पिला
पट्टा पेई ते पाम पिला
मुसलदो तसलदो
मुडू कोत्तलं रोयल तेच्या
अचल पचल कारम नूऱ्या
आकिटल्या पेटते आईक मन्या
गुटल्या पेटते गुटूक मन्या

हे गीत म्हणून खांद्यावर असलेल्या झोळीमध्ये घरातील माई, ताई, अक्का वाटीभर ज्वारी टाकायचे. हे दिवस म्हणजे प्रत्येकांच्या घरी शेतातून ज्वारी आलेली असायची त्यामुळे ज्वारी देताना कोणी कुरकुर करायचे नाही. जर कोणी दान दिले नाही तर त्यांच्या नावाने बोंबा मारुन पुढे जायचो. असे आम्ही रोज पंधरा दिवसात पूर्ण गाव पिंजुन काढायचो. जवळपास एक-दीड पायली ज्वारी जमा व्हायची. ते सर्व ज्वारी दुकानात विकून मिळालेल्या पैश्यात खोबऱ्याचे व साखरचे प्रत्येकाला एक-एक मिळेल असे घ्यायचो आणि उरलेल्या पैश्यात रंग घेत असू. होळी च्या सायंकाळी आम्ही सर्व मित्र मारोतीच्या पारा जवळ जेथे होळी तयार केलेली असायची तेथे जमा व्हायचो. वेगवेगळ्या नावाने मग बोंबा मारायचो. गावातील मानकरी वाजत गाजत येऊन होळी पेटवायचा. आम्ही होळी तील जाळ घरी नेऊन छोटी होळी करायचे आणि त्यात खोबरा व हरभरा भाजून खायचो. मग रात्री जेवताना पूरणपोळी आणि कढ़ी ची मजा काही औरच असायची. दुसऱ्या दिवशी सकाळ होण्याची वाटच पाहत असू. सकाळपासून मग मित्रा मध्ये रंग खेळण्याची मजा यायची. कोणी कोणास ओळखू येणार नाही एवढा रंग लावले जायचे. दुपारपर्यंत रंग खेळून झाल्यावर स्नान करून मग घरातच बसायचो. आज परत ते सर्व दिवस आठवू लागले. ते मित्र परत दिसू लागले. परत एकदा छोटे व्हावे आणि खुप मजा करावे असे वाटते. 

आपली आठवण अशीच येत राहो, मित्रांनो आपणा सर्वाना होळी आणि धूलिवंदनच्या रंगबिरंगी शुभेच्छा.
- नासा येवतीकर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कविता - विविध रंगाची होळी

आली आली बघा हो होळी
खाऊ चला पुरणाची पोळी
अवगुण सारे दहन करून
करु या त्याची राखरांगोळी

आज होळीचे करून पूजन
देऊ पुरणपोळीचा नेवैद्य
खायला कुणा कमी न पडो
मिळत राहो गोडगोड खाद्य

फाल्गुन महिन्याचा चंद्र
आकाशी दिसतो कसा शुभ्र
वसंत ऋतूला होते प्रारंभ
हवामान कोरडे नि निरभ्र

होळीच्या दुसऱ्या दिवशी 
असतो विविध रंगाचा खेळ
विविध रंगात विभागलेल्या
लोकांना एकत्र येण्याची वेळ

लाल पिवळा निळा हिरवा
रंगाने एकमेकांना रंगू या
एकमेकांच्या सुखदुःखात
एकत्रित साजरी करू या

पाण्याचा अपव्यय टाळा
अंडे फेकून मारू नका
कोरड्या रंगाने होळी खेळा
रंगपंचमी बेरंग करू नका

- नासा येवतीकर, 9423625769

होळी आणि धुलीवंदनाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कविता - होळी करू या ....

होळी करू या दुर्गुणाची
होळी करू या संशयाची
होळी करू या कुविचारांची
होळी करू या दुराचाराची
होळी करू या द्वेषाची
होळी करू या आळसाची
होळी करू या कपट बुद्धीची
होळी करू या वासनेची
होळी करू या लालसेची
होळी करू या मत्सरेची
होळी करू या व्यसनाची
होळी करू या भ्रष्टाचाराची
होळी करू या वाईट संगतीची
होळी करू या वाईट बाबींची
चला होळी करू या .....

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
...... होळी रे होळी .....

होळी आली रे बघ होळी आली
नाना रंगाची झोळी घेऊन आली

मनातला राग द्वेष काढून टाक
सांगत आला आहे लाल रंग
सकारात्मक विचार करून वाग
बोलतो आहे हिरवा हिरवा रंग
विचारात क्रांती करण्या आली
होळी आली रे बघ होळी आली

सर्वाना आपल्यात सामावून घे 
संदेश देत आहे बघ रंग निळा
इतरांच्या दुःखाचे निवारण कर
आदेशाने सांगतोय रंग काळा
वागण्यात बदल करण्या आली
होळी आली रे बघ होळी आली

धैर्याने संकटाला तोंड देत राहा
प्रेरणा देत आहे तुला केसरी रंग
प्रगतीसाठी अविरत चालत राहा
प्रोत्साहित करतोय पिवळा रंग
जगण्याची उर्मी देण्या आली
होळी आली रे बघ होळी आली

जीवनातील दुःख विसरायला लावी
आठवण करून देती बालमित्रांची
जात-पात धर्म-पंथ बाजूला सारी
सर्वधर्मसमभावची ओळख ही देती
होळी आली रे बघ होळी आली

आबालापासून वृद्धापर्यत सर्वाना आवडणारी
रंगात न्हाऊन निघती अवघी सृष्टी ही सारी
सर्व सणात आहे ही आगळी वेगळी
होळी आली रे बघ होळी आली

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ही माहिती आपणास आवडली असेल तर 9423625769 या क्रमांकावर whatsapp करावे.

Tuesday, 11 March 2025

जीवन गाणे (Jeevan Gaane )

जीवन गाणे - आनंदी तराणे
चित्रपटातील गाणे असो वा इतर कोणतेही गाणे कुणाला आवडत नाहीत. लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनाच गाणे खूप आवडतात. मुळात मनुष्य लहानाचा मोठा होता ते गाणे ऐकतच. गाण्याचा आणि माणसाच्या आयुष्याचा फार जवळचा संबंध आहे. बाळाला छान झोप लागावी म्हणून आई छानशी अंगाई गीत गात असते जसे की निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई ...... त्या गुणगुण्याचा आवाज कानी पडताच बाळ अलगद आपले डोळे मिटतो आणि झोपी जातो. थोडं मोठा झाल्यावर जेव्हा तो चालू आणि पळू लागतो त्यावेळी त्याला बडबड गाणे एकविले जाते आणि बोबड्या बोलीतून बोलाविले जाते. तो आपल्या बोबड्या बोलीत जेव्हा एखादे गाणे म्हणतो तेव्हा आई-वडिलांना किती आनंद होतो. अर्थात गाणे सुरात म्हटले पाहिजे असा आपला अट्टाहास कधीच नसतो आणि तो नसायला ही नको हवे. त्यानंतर मूल ज्यावेळी शाळेत प्रवेश करतो त्यावेळी त्याला अनेक कविता व गाण्याची ओळख होत जाते. पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात त्या मुलांचा आवडता भाग म्हणजे गाणे. जे शिक्षक या वर्गातील मुलांना जास्तीत जास्त गाणे ऐकू घालतात ते त्या मुलांचे सर्वात प्रिय बाई किंवा गुरुजी म्हणून ओळखल्या जातात. गाण्यात काय ताकद आहे ? हे त्या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांना चांगलेच ठाऊक असायला हवे. शाळेच्या प्राथमिक वर्गात मुले जे काही काही शिकतात ते त्यांच्या चिरकाल स्मरणात राहतात, त्यात गाण्याची खूप मोठी भूमिका असते. आज पन्नाशी ओलांडलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या बालपणाविषयी विचारले तर ती व्यक्ती बालपणीची स्मरणात असलेली एखादी कविता गाऊन दाखवितो. यावरून गाण्याची ताकद आपणाला समजून येईल.
माणसाचे वय जसजसे वाढत जाते तसतसे गाण्याची आवड देखील बदलत जाते. पूर्वीच्या काळी गाणे ऐकण्यासाठी रेडिओ हे एकच माध्यम होते. आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणारे गाणी ऐकण्यासाठी कान आसुसलेले असायचे. बऱ्याच आकाशवाणी केंद्रावरून त्याकाळी पत्रव्यवहारावर आधारित आपली आवड किंवा आपकी पसंद अश्या कार्यक्रमात तून गाणी ऐकविले जात असे. आपले आवडते गीत ऐकावे म्हणून बरेच रसिक मंडळी पत्राद्वारे आपल्या आवडीचे गाणे लिहून पाठवत असत यासाठी आजही सिलोन व विविधभारती या आकाशवाणी केंद्राची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मध्यंतरीच्या काळात टेपरेकॉर्डर आल्याने आपल्या मनावर गाणे ऐकण्याची सोय झाली. कॅसेटच्या माध्यमातून अनेकजण आपल्या आवडीचे गाणे ऐकू लागले. गुलशन कुमार यांची टी सिरीज नावाची कंपनी याच काळात भरभराटीस आली होती. अश्याच काळात फक्त गाण्याचा शो म्हणून ऑर्केस्ट्रा खूप चालला होता. अनेक कलाकारांना यामुळे स्टेज शो करण्याची संधी ही मिळाली होती. अनेक जणांनी यातून आपले करिअर देखील घडविले. पण गाण्याच्या या स्टेज शोला देखील गळती लागली. त्यानंतर टीव्हीचा जमाना सुरू झाल्यावर लोकांना गाणे ऐकण्यासोबत बघण्याची संधी उपलब्ध झाली. ज्यावेळी दूरदर्शन ही एकच वाहिनी देशभरात बघितले जायचे त्यावेळी येथे प्रसारित होणारी हिंदी सुमधुर गाण्याची रंगोली कोणी ही विसरू शकत नाही. ह्या कार्यक्रमाने प्रत्येकाच्या रविवारची सकाळ प्रसन्नतेने सुरुवात व्हायची. एका तासाभराच्या कार्यक्रमात एखादे गाणे दिवसभर मनात रुंजी घालायचं. याच टीव्हीमुळे टेपरेकॉर्डर मागे पडून व्हीसीआर पुढे आलं. त्यातून रसिक मंडळी आपले आवडते गाणे वाट्टेल तेव्हा टीव्हीवर पाहू लागले. मग डीव्हीडीचा जन्म झाला. मग श्रोते खूप गाणे एका डीव्हीडी मध्ये पाहू लागले. असे करता करता मोबाईलची क्रांती झाली आणि रेडिओ, टेपरेकॉर्डर, व्हीसीआर, डीव्हीडी हे सर्व एका अडगळीत कोपऱ्यात जाऊन बसले. आज एका क्लीकवर आपणाला आवडणारी गाणी ऐकू शकतो आणि पाहू शकतो. त्याला ना वेळेचे बंधन आहे ना काळाचे. पण अर्थातच जुन्या काळात ठराविक वेळेत मिळणारी मजा या मोबाईलच्या जमान्यात नक्कीच नाही. 
तरी देखील गाणे हे मनाला आनंद व समाधान देणारी एक बाब आहे. म्हणून प्रत्येकाने आपले आवडते गाणे ऐकायला व पाहायलाच पाहिजे. अजून त्यापुढील संतोष मिळविणारी बाब म्हणजे आपला आवाज कसे ही का असेना ते गुणगुण करायला पाहिजे. जसे की एक मराठी गीत आहे, मनाच्या धुंदीत लहरीत ये ना, सखे गं साजनी ये ना. तसे आपण ही गाण्याच्या धुंदीत लहरीत जगायला शिकले पाहिजे. मनावरील ताणतणाव, चिंता, काळजी आणि नैराश्य दूर करण्यासाठी आपल्या मनपसंत गायक गायिका यांच्या आवाजातील सुमधुर आणि कर्णमधुर गाणे ऐकायला पाहिजे. घरात निवांत क्षणी अगदी बारीक आवाजात किशोरदा, रफी साहेब आणि लता दीदी यांचे गाणे घरातील वातावरण अजून प्रसन्न केल्यासारखे वाटते. मित्रांनो, आपल्या जीवनात समाधान मिळविण्यासाठी गाणे ऐकणे हा एक सुंदर पर्याय तुम्हांला कसा वाटतो ? यावर एकवेळ जरूर विचार करावा. 

- नासा येवतीकर, स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769

दिनविशेष माहिती - 29 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम गुरुपौर्णिमा विशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर. आपल्या दिनविशेष माहिती का...