Friday, 25 May 2018

खेड्याकडे चला

खेड्याकडे चला

भारत हा कृषिप्रधान देश असून अनेक छोट्या-छोट्या खेड्याने बनलेला आहे. भारतातील बहुतांश लोक खेड्यात राहून शेतीचा व्यवसाय करतात. भारतात इंग्रजांचे आगमन होण्यापूर्वी सर्व खेडी स्वयंपूर्ण होती. गावात असलेल्या बारा बलुतेदार लोकांवर संपूर्ण लोकांचे जीवन चालत होते. कामाच्या मोबदल्यात धान्य ही पद्धत प्रत्येक खेड्यात दिसून येत होती. त्यामुळे सर्व लोकांच्या हातांना काम होते व रोजगाराची जरासुद्धा चणचण भासत नव्हती. भारतात इंग्रज लोक आले आणि येथूनच खेड्यातील स्वयंपूर्णता नष्ट होऊन ते परावलंबी होण्यास सुरुवात झाली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आपल्या देशातील पक्क्या मालाची विक्री करण्यासाठी इंग्रजांना भारत हे एक महत्त्वाचे बाजारपेठ मिळाले होते. त्यांनी खेड्यातील अनेक लघुउद्योगांवर कुऱ्हाड चालविण्यात प्रारंभ केली. गावातल्या गावात खेळणारा धान्य आणि पैसा जसा गावाबाहेर जाण्यास पसुरुवात झाली तसे खेड्यातील लोक दरिद्री व कंगाल होऊ लागले.
स्वातंत्र्यापूर्वी भारतातील खेड्यांची जी अवस्था होती त्यापेक्षाही वाईट स्थिती स्वातंत्र्यानंतर निर्माण झाली. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी खेड्यांच्या विकासाबाबत सर्वांनी सहजपणे व जागरूक राहून विचार करावा म्हणून देशवासीयांना त्यांनी खेड्याकडे चला असा संदेश दिला. परंतु स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर सुद्धा एखादा व्यक्ती खेड्याकडे आला असेल असे तर निदर्शनास येत नाही, याउलट येथील बहुतांश लोक विविध कारणामुळे शहराकडे आकर्षिले जाऊन खेड्यातून काढता पाय घेऊ लागले. त्यामुळे ही खेडी स्वयंपूर्ण तर झाली नाहीच उलट ओस पडू लागले. खेड्यातील घरे रीते होताना शहरात मात्र लोकांची भाऊगर्दी वाढू लागली. हे असे का होत आहे ? खेड्यातील लोकांचा लोंढा शहराकडे का वाहू लागला ? या कारणांचा विचारविमर्श करण्यास कोणी तयारच नाहीत. खेड्यातील लोकांच्या समस्या कोणत्या ? त्यांना सुविधा कोणत्या कमी आहेत ? खेड्यातील जनता जगली तरच आपला भारत देश जगेल याचा जणू सर्वांना विसर पडलेला आहे. त्यांच्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे कोणताच व्यक्ती आज खेड्यात राहण्यास तयार नाही.
खेड्यात राहणारे बहुतांश लोकांचे जीवन शेती या व्यवसायावर अवलंबून असते. वारंवार होत असलेल्या अनियमित पावसामुळे शेती व त्यावर अवलंबून असलेल्या कोट्यावधी लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. गावात कोणताच लघुउद्योग नाही व जोडधंदा नाही त्यामुळे लोकांच्या हाताला कामच नाही. मग पैशाशिवाय घर कसे चालणार ? या काळजीत असलेला प्रत्येक व्यक्ती शहरातील झगमगाट पाहून हुरळून जातो. कधी एकदा खेडी सोडून शहरात येतो अशी त्याची मानसिक स्थिती होते. एवढेच नाही तर खेड्यातील लोकांना रस्ता, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या पाच महत्त्वाच्या सुविधा दर्जेदार मिळत नाहीत. त्यामुळे या गरजा पूर्ण करताना हे सर्व जण हैराण होऊन जातात. त्यापेक्षा मोठ्या गावात किंवा शहरात राहिल्यास वरील सर्व गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण होतात असा बऱ्याच जणांचा अनुभव एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचत जातो त्यामुळे वरचेवर शहराकडे येणाऱ्याचा लोंढा वाढतच जातो.
राज्यातील मराठवाडा व विदर्भात नापिकी किंवा कर्जामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बातम्या अजून सुद्धा थांबलेले नाहीत. अनियमित पाऊस व जोडधंद्याचा अभाव यामुळे शेतकर्‍यांचे जीवन फारच हलाकीचे बनलेले आहे. शासन मालाला योग्य भाव देत नाही आणि सावकार योग्य भावात माल विकत घेत नाही त्यामुळे वर्षभर राबराब राबून शेतकऱ्यांच्या पदरात धोंडाच पडत असल्यामुळे तो हवालदिल झाला आहे. त्याचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्यामुळे वर्षानुवर्षे तो आहे त्या ठिकाणी स्थिर आहे. वास्तविक पाहता त्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होतो. त्यांना शेती व्यवसायसोबत शेळीपालन, पशुपालन किंवा कुक्कुटपालन सारखे जोडधंदे करण्यास उद्युक्त केल्यास एखाद्या वर्षी शेतात जरी नुकसान झाले तरी या जोडधंद्यातून बुडत्याला काडीचा आधार मिळवून देऊ शकतो. शासनाने याविषयी जागृत पणे विचार करून आजच जर योग्य पाऊल उचलले नाही तर येणारा काळ खडतर राहणारच आहे. शेतकऱ्यांच्या जीवन विकासासाठी आता तरी सर्वांनी खेड्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागातील खेड्यात राहणाऱ्या लोकांना रस्ता, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या पाच महत्त्वाच्या मूलभूत सुविधा दर्जेदार मिळत नाहीत. त्यास्तव दिवसेंदिवस खेड्याचा विकास होण्याच्या ऐवजी खेडे अधोगतीला जात आहेत आणि माणसे खेडी सोडून शहरांकडे स्थलांतरीत होत आहेत.
कोणत्याही गावाला दळणवळण करण्यासाठी चांगल्या रस्त्याची गरज भासते. दळणवळणाची साधने वाढल्याशिवाय गावाचा विकास होत नाही. आज देशातल्या कित्येक गावांना डांबरी रस्ता तर सोडाच कच्चा रस्ताही नाही, त्यामुळे ही गावे संपर्कापासून दूर राहतात. पर्यायाने त्यांचा विकास साधणे शक्य नाही. पंतप्रधान ग्राम सडक योजना याची आकर्षक जाहिरात दाखवली जाते परंतु काम मात्र काहीच होत नाही. गावात रस्ता नसल्यामुळे किंवा असलेला रस्ता नादुरुस्त असल्यामुळे येथील लोकांना ये-जा करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पर्यायाने गावाच्या विकासाला खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. खेड्यांचा विकास साधायचा असेल तर सर्वप्रथम या गावांना जोडणारे सर्व छोटे-मोठे रस्ते वाहतूक करण्यास सुलभ होतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रस्ते चांगले असतील तर लोकांची वर्दळ वाढेल आणि विकासाच्या अनेक संधी पर्यायाने मिळू शकतात.
शहरातील असो वा खेड्यातील सर्व लोकांची जीवन आज विजेवर म्हणजे विद्युतवर अवलंबून आहे. वीजेशिवाय जीवन जगण्याचा विचार अशक्य आहे. संपूर्ण देशासह महाराष्ट्रालाही विजेचा त्रास सहन करावा लागत असून लोडशेडिंग नावाचा राक्षस अधूनमधून डोकावत असतो. खेड्यातील लोकांना यांचा विशेष त्रास जाणवतो. खेड्यातील लोकांना सापत्न वागणूक देऊन दिवसाचे 12 तास वीज गुल केल्या जाते. त्याचा सरळ परिणाम शेतीच्या उद्योगावर आणि लोकांच्या आरोग्यावर होत आहे. या लोडशेडिंगमुळे चिकनगुण्या आणि डेंग्यूसारख्या रोगाची लागण फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात वाढत आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. त्यामुळे शहरात ज्याप्रकारे वीज पुरवठा केला जातो तसेच शहर वा खेडे असा दुजाभाव वीज मंडळाने समाप्त करावे आणि सर्वांना समान विद्युत वितरित करावे.
पाणी आणि आरोग्य यांचा निकटचा संबंध आहे. शुद्ध पाणी पिण्यास मिळाले तर अनेक रोगांवर प्रतिबंध करता येऊ शकतो. ग्रामीण भागातील लोकांना भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते तेव्हा उन्हाळ्याची गोष्टच वेगळी. येथील लोकांना पाणी हे नदी-नाला, विहीर किंवा कूपनलिकांच्या स्त्रोतातून मिळते. गावातील पाणी पिण्यायोग्य नसून फ्लोराईडयुक्त असल्यामुळे त्यांची हाडे ठिसूळ होणे, दात पिवळे होणे, भूक न लागणे इत्यादी विकार जडत आहेत. शुद्ध पाणी पिण्यास न मिळाल्यामुळे कॉलरा, हगवण, टाइफाइड यासारख्या आजारांची साथ पसरू शकते. वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नाही.  त्यामुळे येथील लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत नेहमीच कुरबुर चालूच असते. आरोग्याच्या बाबतीत असे म्हटले जाते की Sound in body is Sound in Mind अर्थात शरीर चांगले असेल तर बुद्धीचे आरोग्य सुद्धा तेवढेच चांगले असते. येथील लोकांना तात्काळ आरोग्य सुविधा मिळवून दिल्यास उपचाराविना मृत्यू पावणाऱ्याच्या संख्येत निश्चित घट होईल. त्यामुळे लोकांना खेड्यात राहण्याचा विश्वास निर्माण होईल.
सर्वात महत्वाचे सुविधा म्हणजे शिक्षणाची सुविधा. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. महात्मा फुले यांनी म्हटले आहे की लोकांचा विकास साधायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. त्यास्तव खेड्यातील लोकांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सर्वांनीच जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. खेड्यातील शाळा म्हटले की अनेक जण नाक मुरडतात कारणही तसेच आहे. शहरातील शाळेत ज्याप्रकारे शिकवले जाते अगदी त्याच प्रकारे ग्रामीण भागातून शिकवले गेले तर शहराकडे जाणारे पालक नक्कीच गावातील शाळेकडे ओढले जातील. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांसोबत गावातील स्थानिक शिक्षणप्रेमी व्यक्ती, युवक-युवती यांनी गांभीर्याने लक्ष देऊन काम केल्यास त्यात निश्चित सुधारणा होईल.
महात्मा गांधीजींचा संदेश मनात ठेवून खेड्यांचा विकास साधून देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण सर्वांनी मिळून आता खेड्याकडे चला हा संदेश लक्षात घेणे आवश्यक आहे. शासनाने जसे स्मार्ट करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे तसे स्मार्ट व्हिलेज करण्याचा उपक्रम हाती घेतल्यास अनेक खेड्यांचा चेहरामोहरा बदलून जाण्यास वेळ लागणार नाही.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड

लेख क्रमांक 40 उद्याची काळजी ...

उद्याची काळजी आज कशाला ?

आपल्या जीवनाचा काही भरवसा नाही हे प्रत्येकाला ठाऊक असते. मरण कधी व कोणत्या रूपाने येणार आहे ? हे कुणालाही सांगता येत नाही. त्याच्यापासून दूर पळता सुद्धा येत नाही. मानव सोडल्यास कोणतीच सजिव आपल्या जीवाची एवढी काळजी करीत नाहीत. परमेश्वराने मानवाला विचार करण्यासाठी मेंदूची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे फक्त तेच आपल्या जीवनातील भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करू शकतात. या विचार प्रक्रियेमुळे मानव विनाकारण आपल्या आयुष्यातील काही आनंदी क्षण घालवित असतो. भविष्यकाळाविषयी खूप विचार करून हातात असलेला वर्तमानकाळ बिघडवून टाकतात. जो काळ आनंदाचा आहे त्या काळात तो आनंद उपभोगला नाही तर त्या जीवनाला काही अर्थ आहे काय ? बालपणीचा काळ खेळण्यात, मौजमजेत, खोड्या करण्यात घालवला तरच ते बालपण चिरकाल स्मरणात राहील. परंतु आज पूर्वीप्रमाणे बालपण राहिलेले नाही. धावपळीच्या युगात मुलांची अतिसंरक्षणातून घेण्यात येणारी काळजी आणि त्यांच्या भविष्याविषयी विचार करून मुलांचे बालपण हिरावून घेण्याचे काम पालक करीत आहेत. अगदी लहान वयातच शाळेत पाठविणे, जेवण व झोप एवढा वेळ सोडला तर बाकी असलेला सर्व वेळ मुलांना शाळा, ट्युशन कोचिंग, होमवर्क या शैक्षणिक बाबीत गुंतवून ठेवले जात आहे. त्यास्तव आजच्या मुलांचे बालपण त्यांच्यापासून दुरावले जात आहे. तारुण्यात पदार्पण करताना जर तो लहानपणीचे खेळ खेळू लागला तर लगेच टोमणे तयार असतात, तू काय आता लहान आहेस ! पालकांच्या अशा वागण्यामुळे मुलांमध्ये बालपणापासूनच द्वेष व राग उत्पन्न होत आहे. त्यामुळे मुले कळती सवरती झाली की ती पालकांनाच उलटे बोलत आहेत. लहानपणापासून त्यांच्या मनात असलेला रागाचा हा विस्फोट असू शकतो. त्या लहान मुलांची काळजी आपणच करावी लागते. परंतु पंधरा वीस वर्षानंतर दिसणारे किंवा जाणवणारे भविष्याची काळजी करून आपण त्यांचा आजचा वर्तमान काळातील आनंद का हिरावून घ्यावा ? देशात आज एका पेक्षा एक हुशार तरुण-तरुणी आहेत, मात्र त्यांच्यात जीवन जगण्याची थोडीसुद्धा नैतिकता शिल्लक नाही. शिक्षणाबरोबर नैतिकतेचे संस्कार दिले असते तर त्यांच्या उद्याच्या भविष्याची काळजी करायची गरजच राहिली नसती.
तारुण्यातील काळ हा मौजमजेचा तसेच जबाबदारीची जाणीव देणारा ही असतो. या काळात जो आपली कर्तव्य आणि जबाबदारी योग्य प्रकारे ओळखून काम करतो तो भविष्याची काळजी न करता यशस्वी होतो. ज्याच्या हातात बळ आहे आणि दंडात शक्ती आहे त्याला उद्याची काळजी करण्याची काहीही गरज नाही. भिकारी लोकांना असते उद्याची काळजी. जत्रेत खूप जनता आली आणि त्यांना खूप भीक ही  मिळाली. परंतु जत्रा संपल्यावर काय? अशी काळजी त्यांना लागते. आळशी लोकांना वाटते उद्याची काळजी. कारण दे रे हरी पलंगावरी याची त्यांना सवय जडलेली असते. रोज जेवण तयार करून वाढणारी आई किंवा बायको कुठे गावाला गेली की या जेवण तयार करता न येणाऱ्या आळशी लोकांना उद्याच्या जेवनाची काळजी लागते. असेच काही सर्व प्रकारच्या कामात लागू पडते. त्यास्तव आपण जर सर्व बाबतीत कार्यक्षम, तत्पर व तयार राहू तर आपणाला उद्याची काळजी करण्याची आवश्यकता राहणार नाही.
कमावत्या व्यक्ती आपला संसार खूप चांगला चालावा, कुटुंबातील कोणत्याच सदस्याला कसल्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी रात्रंदिवस काम करतात आणि संपत्ती जमा करून ठेवतात. म्हणजे एक प्रकारे मुलांच्या भविष्याचे प्रश्न आधीच सोडवून ठेवतात. पण मुलांना आयती संपत्ती मिळवून देणे म्हणजे आपल्या मुलांना आळशी करणे नव्हे का ? याचा ही विचार व्हायला हवे.  काही महाभाग  आपल्या नंतरची मंडळी नुसती सुखातच नव्हे तर ऐषोआरामात राहावी म्हणून गैरमार्गाचा अवलंब करून खूप संपत्ती जमा करून ठेवतात. भविष्याची काळजी करताना वर्तमानाचा विचार न करता केलेले हे कार्य एके दिवशी उघडे पडते आणि भविष्यासोबत वर्तमानात सुद्धा सर्वत्र अंधकार पसरतो. विविध प्रकारचे भ्रष्टाचार उघडे होताना त्यांच्याजवळची संपत्ती पाहून सामान्य लोकांचे डोळे विस्फारले नसतील तर नवलच ! भविष्याची काळजी करताना रात्रीची झोप कधी उडाली हे कळतच नाही. भुकेला कोंडा अन निजेला धोंडा असणारी माणसे जेवढी काळजी करीत नाहीत त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मखमलीवर झोपणारी व तूप खाणारी माणसे काळजी करतात. यासाठी उद्याच्या काळजीवर चिंता करण्यापेक्षा आजच्या वर्तमानाकडे लक्ष देऊन गीतेतील याओळी नेहमी स्मरणात ठेवाव्यात, जे झाले ते चांगलेच झाले, जे होत ते चांगल्यासाठी होत आहे आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे. तेंव्हा उद्याची काळजी आज कशाला ?

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

वाढदिवसाची मेणबत्ती विझवण्यापूर्वी

वाढदिवसाची मेणबत्ती विझविण्यापूर्वी

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात जन्मलेला दिवस अत्यंत महत्वाचा असतो. सुंदर अश्या पृथ्वीतलावर जन्म घेतलेला तो जन्म दिवस विसरणे कोणासाठीही अशक्य अशीच ही गोष्ट आहे. दरवर्षी आपण आपल्या स्वतःचा वाढदिवस साजरा करतोच त्याच सोबत कुटुंबातील लहान-मोठया सदस्यांचा, जवळच्या नातलगांचा, जिवलग मित्राचा वाढदिवस सुद्धा मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतो. वाढदिवस साजरा करण्याचीही पद्धत कोणी चालू केली असेल ? असा एक प्रश्न राहून राहून मनात येतो. त्याचे उत्तर अद्यापपर्यंत मिळाले नाही.  परंतु परंपरेनुसार, घराघरातून वाढदिवस साजरे केले जातात वाढदिवस साजरा करण्याची प्रथा व पद्धत बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे ही वाढदिवस साजरा करण्याची प्रथा पाश्चिमात्य देशातील आहे. तेथील लोकांना पार्टी देण्याचा व करण्याचा एक बहाना पाहिजे असतो. म्हणून त्यांनी ही पद्धत सुरू केली असावी. कदाचित इंग्रज आपल्या देशात आलेच नसते तर आपणाला वाढदिवस साजरे करण्याची पद्धतच माहीत झाली नसती. तसे पाहिले तर वाढदिवस साजरा करणे ही काही वाईट बाब नाही. त्याद्वारे आपले वय किती झाले व आपण वयाने किती मोठे झालो ? याची माहिती होते. त्याचसोबत मागील वर्षी आपण काय चुकलं होतं किंवा कुठे प्रगती केली याचे सिंहावलोकन या वाढदिवसामुळे होते. त्याचबरोबर येणाऱ्या वर्षात मला काय साध्य करायचे आहे हे ठरविले तर दरवर्षी वाढदिवस साजरा करताना अजून जास्त आनंद होईल. परंतु सद्यस्थितीत वाढदिवस साजरा करण्याचे ध्येय मात्र काही वेगळेच दिसते. श्रीमंत वर्गातील लोकांना पैशांची काही कमतरता नसते. त्यामुळे ते आपला वाढदिवस धूमधडाक्यात मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र त्यांचे बघून गरीब वर्गातील मंडळीसुद्धा पोटाला चिमटा देऊन आपल्या लाडक्या लेकरांची हौस पूर्ण करण्यासाठी त्याच पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करीत असतात. दरवर्षी वाढदिवस साजरा करताना आपली वैचारिक पातळी व आपली दृष्टी यात थोडा बदल केल्यास आपल्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना वाढदिवस साजरा करण्यात आनंद वाटेल. आपल्या जीवनात तसेच कुटुंबातील सदस्य मंडळींच्या जीवनात काही वयोगटाचे प्रसंग येतात. त्यावेळी न विसरता व न चुकता त्यांचे वाढदिवस साजरे केल्यास आपोआपच त्यांना त्यांची ध्येय व कर्तव्याची जाणीव होत राहील.
कुटुंबात असलेली वयस्कर मंडळी जसे की, आजी-आजोबा, आई-वडील यांची अष्टचंद्रदर्शन, पंचाहत्तरी, षष्ठी,  पन्नाशी साजरी केल्याने कुटुंबात प्रेमाचे वातावरण बघायला मिळते. त्यानिमित्ताने नातलग व मित्रांच्या गाठीभेटी होऊन ओळखी वाढतात. आपल्या पाल्याचा पहिला वाढदिवस हा प्रत्येकासाठी एक आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे हा वाढदिवस सर्वांनी अगदी आनंदात साजरे करावेत याची शंकाच नाही. यापुढील सहावा वाढदिवस आपल्या पाल्याला शाळेत पाठवायचे आहे या जबाबदारीची जाणीव ठेवून साजरा केल्यास पाल्याचा प्राथमिक शिक्षणाच्या प्रारंभाची जाणीव सर्वांना होईल. यानंतर पंधरावा वाढदिवस साजरा करताना दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविण्याचे धोरण आखावे. तशी जाणीव त्यांच्यात निर्माण व्हावी या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्यास पाल्यांच्या मनात आनंद, उत्साह येईल आणि ते जोमाने अभ्यास करून नक्कीच यश मिळवतील. आपल्या पाल्याचा अठरावा वाढदिवस साजरा करून यापुढे भारतीय नागरिक म्हणून मतदान करण्यासाठी सक्षम झाले आहेत याची माहिती त्यांना देता येते. त्याचसोबत वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर त्याच्यावर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या येतात याची सुद्धा ह्या निमित्ताने आठवण त्यांना देता येऊ शकते. भारतातील विवाह कायद्यानुसार मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचा विवाह करणे गुन्हा आहे. त्यास तो मुलींचा अठरावा वाढदिवस साजरा करताना प्रत्येकालाच आपापल्या कर्तव्याची व जबाबदारीची जाणीव देऊन जाते तसेच मुलांचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणे गुन्हा आहे तेव्हा मुलांचा 21 वा वाढदिवस साजरा करून विवाहयोग्य वय झाल्याची ओळख त्याला देता येऊ शकेल.
भारतात बालविवाह मध्ये सर्वात जास्त विवाह मुलींचे होतात. त्यास्तव पालकवर्गात जागृती निर्माण होणे व बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी यात पुढाकार घेणे आवश्यक आहे. सनातन पद्धतीने वाढदिवस साजरा न करता मोजकीच वाढदिवस साजरी केल्यास आपणाला कर्तव्याची जाणीव तर होईलच शिवाय कुटुंबातील आनंद सुद्धा टिकून राहील असे वाटते. म्हणून वाढदिवसाची मेणबत्ती विझविण्यापूर्वी जरूर विचार करावा. वाढदिवसाच्या शुभेच्छा नेहमी आपल्या सोबत आहेतच.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

जसे चारित्र्य तसे जीवन

जसे चारित्र्य तसे जीवन

पावित्र्य म्हणजे पवित्रता, शुद्धता व सच्चरित्र. मनुष्याची सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणजे त्याची उत्तम चारित्र्य होईल असे स्माईल्स यांनी म्हटले आहे. भारताच्या संपूर्ण इतिहासाचे सिंहावलोकन केल्यास भारतीय संस्कृतीत या पावित्र्याचे व चारित्र्याचे किती महत्व आहे हे समजून येते. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना आराध्य देवदेवतांची पूजा करणे ही आपल्या मनाची शुद्धता आहे. घराची वास्तुशांती असो किंवा नवीन व्यवसायाचा प्रारंभ त्यात देवतांना स्मरण केल्याशिवाय ते कार्य पूर्ण होत नाही, अशी आपल्या मनाची धारणा असते. भारतीय संस्कृतीत हिंदू धर्माची व्यक्ती स्नान केल्याशिवाय मंदिरात पाऊल टाकत नाही. यात तनाची म्हणजे शरीराची पवित्रता दिसून येते. त्याशिवाय मंदिरात प्रवेश केलेल्या व्यक्तीच्या मनात शंकेची पाल चुकचुकत असते, अस्वस्थता वाटते. कारण स्नान न केल्यामुळे तो स्वतःला अपवित्र समजतो. याचप्रमाणे व्यक्ती मग ती स्त्री असो वा पुरुष तिचे वर्तन सुद्धा शुद्ध व पवित्र असायलाच पाहिजे, त्याच सच्चरित्र म्हणतात. प्रसिद्ध विचारवंत एनन म्हणतात की, जेव्हा मनुष्याकडील धन नष्ठ होते, तेव्हा त्याचे वास्तविक काहीच नष्ट होत नाही. जेव्हा मनुष्याची चारित्र्य बिघडते, तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ठ होत असते. चारित्र्याच्या बाबतीत पुरुषांपेक्षा स्त्रियांना फारच जपून राहावे लागते. श्रीरामाच्या पत्नीला पवित्रता सिद्ध करून दाखविण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. परंतु आज कालच्या स्त्रियांना अशी दिव्य परीक्षा देणे अशक्य आहे. त्यासाठी स्त्रियांनी फारच काळजीपूर्वक वागावे लागते. समाज त्यांना अपवित्र म्हणणार नाही असे वर्तन ठेवावे लागते. उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरून शील समजते असे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले आहे. भारतात सध्या पाश्चिमात्य संस्कृतीची घुसखोरी वाढीस लागली आहे. भारतात असलेली प्राचीन व पवित्र संस्कृती हळूहळू लोप पावते की काय ? अशी शंका मनात येत आहे. सुंदर चारित्र्य ही सर्व कलांमध्ये सुंदर कला आहे. ही विचारधारा आजच्या युगातील व्यक्ती विसरत चालल्या आहेत. एकीकडे शहरी भागातून ही पवित्रता व चारित्र्य हद्दपार होत असताना ग्रामीण भागात ते आजही जपली जात आहे. ज्या भागातून संस्कृतीचा उगम झाला या भागात तरी नष्ट होऊ नये एवढे तरी प्रयत्न करायलाच पाहिजे. फेडरिक सॅडरिस यांनी म्हटल्याप्रमाणे तुमच्या जीवनावर तुमच्या चारित्र्याचे शासन चालत असते, जसे चारित्र्य तसे जीवन.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...