खेड्याकडे चला
भारत हा कृषिप्रधान देश असून अनेक छोट्या-छोट्या खेड्याने बनलेला आहे. भारतातील बहुतांश लोक खेड्यात राहून शेतीचा व्यवसाय करतात. भारतात इंग्रजांचे आगमन होण्यापूर्वी सर्व खेडी स्वयंपूर्ण होती. गावात असलेल्या बारा बलुतेदार लोकांवर संपूर्ण लोकांचे जीवन चालत होते. कामाच्या मोबदल्यात धान्य ही पद्धत प्रत्येक खेड्यात दिसून येत होती. त्यामुळे सर्व लोकांच्या हातांना काम होते व रोजगाराची जरासुद्धा चणचण भासत नव्हती. भारतात इंग्रज लोक आले आणि येथूनच खेड्यातील स्वयंपूर्णता नष्ट होऊन ते परावलंबी होण्यास सुरुवात झाली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आपल्या देशातील पक्क्या मालाची विक्री करण्यासाठी इंग्रजांना भारत हे एक महत्त्वाचे बाजारपेठ मिळाले होते. त्यांनी खेड्यातील अनेक लघुउद्योगांवर कुऱ्हाड चालविण्यात प्रारंभ केली. गावातल्या गावात खेळणारा धान्य आणि पैसा जसा गावाबाहेर जाण्यास पसुरुवात झाली तसे खेड्यातील लोक दरिद्री व कंगाल होऊ लागले.
स्वातंत्र्यापूर्वी भारतातील खेड्यांची जी अवस्था होती त्यापेक्षाही वाईट स्थिती स्वातंत्र्यानंतर निर्माण झाली. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी खेड्यांच्या विकासाबाबत सर्वांनी सहजपणे व जागरूक राहून विचार करावा म्हणून देशवासीयांना त्यांनी खेड्याकडे चला असा संदेश दिला. परंतु स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर सुद्धा एखादा व्यक्ती खेड्याकडे आला असेल असे तर निदर्शनास येत नाही, याउलट येथील बहुतांश लोक विविध कारणामुळे शहराकडे आकर्षिले जाऊन खेड्यातून काढता पाय घेऊ लागले. त्यामुळे ही खेडी स्वयंपूर्ण तर झाली नाहीच उलट ओस पडू लागले. खेड्यातील घरे रीते होताना शहरात मात्र लोकांची भाऊगर्दी वाढू लागली. हे असे का होत आहे ? खेड्यातील लोकांचा लोंढा शहराकडे का वाहू लागला ? या कारणांचा विचारविमर्श करण्यास कोणी तयारच नाहीत. खेड्यातील लोकांच्या समस्या कोणत्या ? त्यांना सुविधा कोणत्या कमी आहेत ? खेड्यातील जनता जगली तरच आपला भारत देश जगेल याचा जणू सर्वांना विसर पडलेला आहे. त्यांच्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे कोणताच व्यक्ती आज खेड्यात राहण्यास तयार नाही.
खेड्यात राहणारे बहुतांश लोकांचे जीवन शेती या व्यवसायावर अवलंबून असते. वारंवार होत असलेल्या अनियमित पावसामुळे शेती व त्यावर अवलंबून असलेल्या कोट्यावधी लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. गावात कोणताच लघुउद्योग नाही व जोडधंदा नाही त्यामुळे लोकांच्या हाताला कामच नाही. मग पैशाशिवाय घर कसे चालणार ? या काळजीत असलेला प्रत्येक व्यक्ती शहरातील झगमगाट पाहून हुरळून जातो. कधी एकदा खेडी सोडून शहरात येतो अशी त्याची मानसिक स्थिती होते. एवढेच नाही तर खेड्यातील लोकांना रस्ता, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या पाच महत्त्वाच्या सुविधा दर्जेदार मिळत नाहीत. त्यामुळे या गरजा पूर्ण करताना हे सर्व जण हैराण होऊन जातात. त्यापेक्षा मोठ्या गावात किंवा शहरात राहिल्यास वरील सर्व गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण होतात असा बऱ्याच जणांचा अनुभव एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचत जातो त्यामुळे वरचेवर शहराकडे येणाऱ्याचा लोंढा वाढतच जातो.
राज्यातील मराठवाडा व विदर्भात नापिकी किंवा कर्जामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बातम्या अजून सुद्धा थांबलेले नाहीत. अनियमित पाऊस व जोडधंद्याचा अभाव यामुळे शेतकर्यांचे जीवन फारच हलाकीचे बनलेले आहे. शासन मालाला योग्य भाव देत नाही आणि सावकार योग्य भावात माल विकत घेत नाही त्यामुळे वर्षभर राबराब राबून शेतकऱ्यांच्या पदरात धोंडाच पडत असल्यामुळे तो हवालदिल झाला आहे. त्याचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्यामुळे वर्षानुवर्षे तो आहे त्या ठिकाणी स्थिर आहे. वास्तविक पाहता त्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होतो. त्यांना शेती व्यवसायसोबत शेळीपालन, पशुपालन किंवा कुक्कुटपालन सारखे जोडधंदे करण्यास उद्युक्त केल्यास एखाद्या वर्षी शेतात जरी नुकसान झाले तरी या जोडधंद्यातून बुडत्याला काडीचा आधार मिळवून देऊ शकतो. शासनाने याविषयी जागृत पणे विचार करून आजच जर योग्य पाऊल उचलले नाही तर येणारा काळ खडतर राहणारच आहे. शेतकऱ्यांच्या जीवन विकासासाठी आता तरी सर्वांनी खेड्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागातील खेड्यात राहणाऱ्या लोकांना रस्ता, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या पाच महत्त्वाच्या मूलभूत सुविधा दर्जेदार मिळत नाहीत. त्यास्तव दिवसेंदिवस खेड्याचा विकास होण्याच्या ऐवजी खेडे अधोगतीला जात आहेत आणि माणसे खेडी सोडून शहरांकडे स्थलांतरीत होत आहेत.
कोणत्याही गावाला दळणवळण करण्यासाठी चांगल्या रस्त्याची गरज भासते. दळणवळणाची साधने वाढल्याशिवाय गावाचा विकास होत नाही. आज देशातल्या कित्येक गावांना डांबरी रस्ता तर सोडाच कच्चा रस्ताही नाही, त्यामुळे ही गावे संपर्कापासून दूर राहतात. पर्यायाने त्यांचा विकास साधणे शक्य नाही. पंतप्रधान ग्राम सडक योजना याची आकर्षक जाहिरात दाखवली जाते परंतु काम मात्र काहीच होत नाही. गावात रस्ता नसल्यामुळे किंवा असलेला रस्ता नादुरुस्त असल्यामुळे येथील लोकांना ये-जा करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पर्यायाने गावाच्या विकासाला खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. खेड्यांचा विकास साधायचा असेल तर सर्वप्रथम या गावांना जोडणारे सर्व छोटे-मोठे रस्ते वाहतूक करण्यास सुलभ होतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रस्ते चांगले असतील तर लोकांची वर्दळ वाढेल आणि विकासाच्या अनेक संधी पर्यायाने मिळू शकतात.
शहरातील असो वा खेड्यातील सर्व लोकांची जीवन आज विजेवर म्हणजे विद्युतवर अवलंबून आहे. वीजेशिवाय जीवन जगण्याचा विचार अशक्य आहे. संपूर्ण देशासह महाराष्ट्रालाही विजेचा त्रास सहन करावा लागत असून लोडशेडिंग नावाचा राक्षस अधूनमधून डोकावत असतो. खेड्यातील लोकांना यांचा विशेष त्रास जाणवतो. खेड्यातील लोकांना सापत्न वागणूक देऊन दिवसाचे 12 तास वीज गुल केल्या जाते. त्याचा सरळ परिणाम शेतीच्या उद्योगावर आणि लोकांच्या आरोग्यावर होत आहे. या लोडशेडिंगमुळे चिकनगुण्या आणि डेंग्यूसारख्या रोगाची लागण फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात वाढत आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. त्यामुळे शहरात ज्याप्रकारे वीज पुरवठा केला जातो तसेच शहर वा खेडे असा दुजाभाव वीज मंडळाने समाप्त करावे आणि सर्वांना समान विद्युत वितरित करावे.
पाणी आणि आरोग्य यांचा निकटचा संबंध आहे. शुद्ध पाणी पिण्यास मिळाले तर अनेक रोगांवर प्रतिबंध करता येऊ शकतो. ग्रामीण भागातील लोकांना भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते तेव्हा उन्हाळ्याची गोष्टच वेगळी. येथील लोकांना पाणी हे नदी-नाला, विहीर किंवा कूपनलिकांच्या स्त्रोतातून मिळते. गावातील पाणी पिण्यायोग्य नसून फ्लोराईडयुक्त असल्यामुळे त्यांची हाडे ठिसूळ होणे, दात पिवळे होणे, भूक न लागणे इत्यादी विकार जडत आहेत. शुद्ध पाणी पिण्यास न मिळाल्यामुळे कॉलरा, हगवण, टाइफाइड यासारख्या आजारांची साथ पसरू शकते. वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नाही. त्यामुळे येथील लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत नेहमीच कुरबुर चालूच असते. आरोग्याच्या बाबतीत असे म्हटले जाते की Sound in body is Sound in Mind अर्थात शरीर चांगले असेल तर बुद्धीचे आरोग्य सुद्धा तेवढेच चांगले असते. येथील लोकांना तात्काळ आरोग्य सुविधा मिळवून दिल्यास उपचाराविना मृत्यू पावणाऱ्याच्या संख्येत निश्चित घट होईल. त्यामुळे लोकांना खेड्यात राहण्याचा विश्वास निर्माण होईल.
सर्वात महत्वाचे सुविधा म्हणजे शिक्षणाची सुविधा. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. महात्मा फुले यांनी म्हटले आहे की लोकांचा विकास साधायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. त्यास्तव खेड्यातील लोकांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सर्वांनीच जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. खेड्यातील शाळा म्हटले की अनेक जण नाक मुरडतात कारणही तसेच आहे. शहरातील शाळेत ज्याप्रकारे शिकवले जाते अगदी त्याच प्रकारे ग्रामीण भागातून शिकवले गेले तर शहराकडे जाणारे पालक नक्कीच गावातील शाळेकडे ओढले जातील. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांसोबत गावातील स्थानिक शिक्षणप्रेमी व्यक्ती, युवक-युवती यांनी गांभीर्याने लक्ष देऊन काम केल्यास त्यात निश्चित सुधारणा होईल.
महात्मा गांधीजींचा संदेश मनात ठेवून खेड्यांचा विकास साधून देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण सर्वांनी मिळून आता खेड्याकडे चला हा संदेश लक्षात घेणे आवश्यक आहे. शासनाने जसे स्मार्ट करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे तसे स्मार्ट व्हिलेज करण्याचा उपक्रम हाती घेतल्यास अनेक खेड्यांचा चेहरामोहरा बदलून जाण्यास वेळ लागणार नाही.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
Very true
ReplyDeletegood job
ReplyDelete