माणुसकी हाच खरा धर्म
आपला देश विविध जातींचा व पंथाचा आहे. येथे सगळ्याच लोकांना जगण्याचा समान हक्क प्रदान करण्यात आला आहे. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. अर्थात येथे सर्वच धर्माना समान महत्त्व देण्यात आले आहे. हिंदू धर्म हा सर्वात प्राचीन असून त्याची स्थापना आपले पूर्वज ऋषीमुनींनी केली आहे. मोहम्मद पैगंबर यांनी मुस्लीम धर्माची, गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची, गुरुनानक यांनी शीख धर्माची तर ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्ताने केली आहे. धर्म स्थापनेमागे प्रत्येक संत महात्म्यांचा एकच विचार होता तो म्हणजे माणुसकी. आपण सारे एक आहोत आणि प्रत्येक माणसाचा एकच माणूसकी धर्म आहे. परंतु याच गोष्टीचा विसर समाजात व राज्यकर्त्यास पडला आहे म्हणूनच आज धर्माच्या नावाखाली अराजकता माजलेली दिसून येत आहे.
वास्तविक धर्माची संकल्पना आपणच तयार केली आहे. धर्म म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून कर्तव्य हा मूळ अर्थ आपण पार विसरून गेलो आहोत. वृद्धांचे पालनपोषण करणे हा प्रत्येक मुलाचा धर्म आहे. शिष्यांना जीवन उत्तम प्रकारे जगता यावे असे शिक्षण देणे हा गुरुचा धर्म आहे. मुलांना प्रत्येक बाब मिळवून देणे हा प्रत्येक आई-वडिलांचा धर्म आहे. समाजात जगताना प्रत्येकाला प्रेम देणे हा प्रत्येक मानवाचा धर्म आहे. याविषयी सानेगुरुजी अगदी मार्मिक भाषेत म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. या उक्तीचा अर्थ सर्वांनी समजून घेऊन जीवन जगल्यास धर्मावरून होणारी वादळे नक्कीच थांबतील यात शंका नाही.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
No comments:
Post a Comment