Friday, 25 May 2018

लेख क्रमांक 40 उद्याची काळजी ...

उद्याची काळजी आज कशाला ?

आपल्या जीवनाचा काही भरवसा नाही हे प्रत्येकाला ठाऊक असते. मरण कधी व कोणत्या रूपाने येणार आहे ? हे कुणालाही सांगता येत नाही. त्याच्यापासून दूर पळता सुद्धा येत नाही. मानव सोडल्यास कोणतीच सजिव आपल्या जीवाची एवढी काळजी करीत नाहीत. परमेश्वराने मानवाला विचार करण्यासाठी मेंदूची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे फक्त तेच आपल्या जीवनातील भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करू शकतात. या विचार प्रक्रियेमुळे मानव विनाकारण आपल्या आयुष्यातील काही आनंदी क्षण घालवित असतो. भविष्यकाळाविषयी खूप विचार करून हातात असलेला वर्तमानकाळ बिघडवून टाकतात. जो काळ आनंदाचा आहे त्या काळात तो आनंद उपभोगला नाही तर त्या जीवनाला काही अर्थ आहे काय ? बालपणीचा काळ खेळण्यात, मौजमजेत, खोड्या करण्यात घालवला तरच ते बालपण चिरकाल स्मरणात राहील. परंतु आज पूर्वीप्रमाणे बालपण राहिलेले नाही. धावपळीच्या युगात मुलांची अतिसंरक्षणातून घेण्यात येणारी काळजी आणि त्यांच्या भविष्याविषयी विचार करून मुलांचे बालपण हिरावून घेण्याचे काम पालक करीत आहेत. अगदी लहान वयातच शाळेत पाठविणे, जेवण व झोप एवढा वेळ सोडला तर बाकी असलेला सर्व वेळ मुलांना शाळा, ट्युशन कोचिंग, होमवर्क या शैक्षणिक बाबीत गुंतवून ठेवले जात आहे. त्यास्तव आजच्या मुलांचे बालपण त्यांच्यापासून दुरावले जात आहे. तारुण्यात पदार्पण करताना जर तो लहानपणीचे खेळ खेळू लागला तर लगेच टोमणे तयार असतात, तू काय आता लहान आहेस ! पालकांच्या अशा वागण्यामुळे मुलांमध्ये बालपणापासूनच द्वेष व राग उत्पन्न होत आहे. त्यामुळे मुले कळती सवरती झाली की ती पालकांनाच उलटे बोलत आहेत. लहानपणापासून त्यांच्या मनात असलेला रागाचा हा विस्फोट असू शकतो. त्या लहान मुलांची काळजी आपणच करावी लागते. परंतु पंधरा वीस वर्षानंतर दिसणारे किंवा जाणवणारे भविष्याची काळजी करून आपण त्यांचा आजचा वर्तमान काळातील आनंद का हिरावून घ्यावा ? देशात आज एका पेक्षा एक हुशार तरुण-तरुणी आहेत, मात्र त्यांच्यात जीवन जगण्याची थोडीसुद्धा नैतिकता शिल्लक नाही. शिक्षणाबरोबर नैतिकतेचे संस्कार दिले असते तर त्यांच्या उद्याच्या भविष्याची काळजी करायची गरजच राहिली नसती.
तारुण्यातील काळ हा मौजमजेचा तसेच जबाबदारीची जाणीव देणारा ही असतो. या काळात जो आपली कर्तव्य आणि जबाबदारी योग्य प्रकारे ओळखून काम करतो तो भविष्याची काळजी न करता यशस्वी होतो. ज्याच्या हातात बळ आहे आणि दंडात शक्ती आहे त्याला उद्याची काळजी करण्याची काहीही गरज नाही. भिकारी लोकांना असते उद्याची काळजी. जत्रेत खूप जनता आली आणि त्यांना खूप भीक ही  मिळाली. परंतु जत्रा संपल्यावर काय? अशी काळजी त्यांना लागते. आळशी लोकांना वाटते उद्याची काळजी. कारण दे रे हरी पलंगावरी याची त्यांना सवय जडलेली असते. रोज जेवण तयार करून वाढणारी आई किंवा बायको कुठे गावाला गेली की या जेवण तयार करता न येणाऱ्या आळशी लोकांना उद्याच्या जेवनाची काळजी लागते. असेच काही सर्व प्रकारच्या कामात लागू पडते. त्यास्तव आपण जर सर्व बाबतीत कार्यक्षम, तत्पर व तयार राहू तर आपणाला उद्याची काळजी करण्याची आवश्यकता राहणार नाही.
कमावत्या व्यक्ती आपला संसार खूप चांगला चालावा, कुटुंबातील कोणत्याच सदस्याला कसल्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी रात्रंदिवस काम करतात आणि संपत्ती जमा करून ठेवतात. म्हणजे एक प्रकारे मुलांच्या भविष्याचे प्रश्न आधीच सोडवून ठेवतात. पण मुलांना आयती संपत्ती मिळवून देणे म्हणजे आपल्या मुलांना आळशी करणे नव्हे का ? याचा ही विचार व्हायला हवे.  काही महाभाग  आपल्या नंतरची मंडळी नुसती सुखातच नव्हे तर ऐषोआरामात राहावी म्हणून गैरमार्गाचा अवलंब करून खूप संपत्ती जमा करून ठेवतात. भविष्याची काळजी करताना वर्तमानाचा विचार न करता केलेले हे कार्य एके दिवशी उघडे पडते आणि भविष्यासोबत वर्तमानात सुद्धा सर्वत्र अंधकार पसरतो. विविध प्रकारचे भ्रष्टाचार उघडे होताना त्यांच्याजवळची संपत्ती पाहून सामान्य लोकांचे डोळे विस्फारले नसतील तर नवलच ! भविष्याची काळजी करताना रात्रीची झोप कधी उडाली हे कळतच नाही. भुकेला कोंडा अन निजेला धोंडा असणारी माणसे जेवढी काळजी करीत नाहीत त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मखमलीवर झोपणारी व तूप खाणारी माणसे काळजी करतात. यासाठी उद्याच्या काळजीवर चिंता करण्यापेक्षा आजच्या वर्तमानाकडे लक्ष देऊन गीतेतील याओळी नेहमी स्मरणात ठेवाव्यात, जे झाले ते चांगलेच झाले, जे होत ते चांगल्यासाठी होत आहे आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे. तेंव्हा उद्याची काळजी आज कशाला ?

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...