Thursday, 24 May 2018

लेख क्रमांक 34 सुख

सुख पाहता जवापाडे

सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येकाच्या जीवनात सुख आणि दुःख एकानंतर एक येतात. परंतु प्रत्येकाला वाटते की माझ्या जीवनात दुःख येऊच नये. नेहमी मी सुखातच राहावे. रात्र झाली तरच दिवस उगवत असतो. रात्र झाली नसती तर दिवसाला ही किंमत राहिले नसते. त्याचप्रमाणे जेथे सुख असेल तेथे दुःखाचा वास हा राहणारच. दुःखानंतर येणाऱ्या सुखाला आपल्या जीवनात फार मोठे महत्त्व आहे. यावरूनच संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटले आहे की " सुख पाहता जवापाडे,  दुःख पर्वताएवढे. "
बरेच लोक सुखाच्या मागे असे धावतात की सुख केव्हा आले अन केव्हा गेले याचा त्यांना पत्ताही नसतो. परिसाच्या गोष्टीप्रमाणे बर्‍याच जणांची अवस्था होते. हे सांगताना संत रामदास स्वामी म्हणतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे ? विचारी मना तुच शोधूनी पाहे । आपली सद्सद्विवेकबुध्दी जागे करून विचार केल्यास कळते की, जगात कोणीही सुखी नाही. सर्वांना थोडाफार तरी दुःख आहेच आहे. कोणी भूक लागल्यावर अन्नाच्या काळजीने दुःखी आहे तर कोणी खाल्लेले अन्न कसे पचणार ? याच्या काळजीत दु:खी आहे. जर खरोखरच आपणाला जीवनात सुखी व्हायचे असेल तर काही गोष्टी व नियम पाळावे लागतात.
आपल्या मनात कोणतीही कसल्याही प्रकारची शंका येऊ देऊ नये. शंकेची पाल चुकचुकली की, दु:खाला सुरुवात होते. इतरांच्या बाबतीत आपल्या मनात इर्षा, मत्सर, द्वेष वा कूटनीती आणू नये. त्यामुळे सुखात असलेला जीव दुःखात बुडून जातो. कशाचाही बाबतीत असंतुष्ट वा नाराज राहू नये, जे आहे त्यात समाधानी राहावे. जे नाही त्याच्याविषयी दुःख करण्यात काय अर्थ ? दुसर्‍याचे दुःख वाटून घेतल्याने त्याचे दुःख कमी होते आणि त्यांच्यासोबत आपणासही समाधान मिळते. असे म्हटले जाते की दुःख वाटल्याने कमी होते तर सुख वाटल्याने ते वाढत जाते. म्हणून आपल्या सुखात सर्वांना सामावून घ्यावे व जगाला सुखी करावे. दुःख पर्वताएवढे आहे असे कधीच न मानता दुःखात कोठे सुख मिळते का ? याचा शोध घ्यावा

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि.नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...