Wednesday, 14 February 2024

पुस्तक परिचय - कुलदीपक कथासंग्रह ( Kuldipak )

जीवनातील नैतिक मूल्ये सांगणारा कथासंग्रह कुलदीप

नासा येवतीकर हे धर्माबाद येथील कन्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. त्यांनी यापूर्वी काव्यांगण या नवोपक्रमात शाळेच्या फळ्यावर वेगवेगळ्या कवींच्या ' रोज एक कविता ' हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवला होता. हा उपक्रम मुलांमध्ये  कवितेची आवड निर्माण करणारा आहे. आमचे भावी वाचक, भावी साहित्यिक ,भावी रसिक हे  आजचे बालवाचक आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कथा, कवितांची गोडी निर्माण करणे अत्यावश्यक आहे, असे त्यांचे मत आहे.
ना.सा. येवतीकर हे स्वतः स्तंभलेखक असून बर्‍याच वर्तमानपत्रात त्यांचे लेखन प्रकाशित होत असते. त्यांचा शिक्षणक्षेत्र लेखनावर विशेष भर आहे.
लाॅकडाऊनच्या काळात त्यांनी सोशल मीडियाद्वारे अनेक उपक्रम राबवलेत. कथालेखन, पत्रलेखन, कवितालेखन, ऑडिओ वगैरे वगैरे ! यामुळे बर्‍याच नवोदितांना साहित्य क्षेत्रात लेखन करण्याची संधी मिळाली. आज ना. सा.येवतीकर हे साहित्यिकांच्या यादीत सामावले आहेत. त्यांचे कुलदीपक हे नववे ई पुस्तक आहे. यापूर्वी त्यांचे वैचारिक लेखसंग्रह संवेदना, जागृती, मी एक शिक्षक, शाळा आणि शिक्षक, रोज सोनियाचा दिनू, हिंदू सण, हरवलेले डोळे कथासंग्रह आणि सारीपाट कवितासंग्रह असे एकूण आठ ई बुक प्रकाशित झाले आहेत.
लेखक  'शब्द हीच संपत्ती 'मानणारे आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे
मी होतो एक साधा माणूस
आज नासा कवी बनलो
शब्दाने दिली खूप संपत्ती
हेच साऱ्यांना सांगत गेलो.
शिक्षक आणि लेखक ही भूमिका एकमेकांना पूरक असते. लेखनामुळे, सकारात्मक विचारशक्ती वृद्धिंगत दृष्टीकोन बदलतो, विस्तारित होतो. कल्पनेचा उपयोग, शब्दांचा उपयोग शिकवण्यात होतो.
ई -साहित्य हे सुप्रसिद्ध प्रकाशन असून त्यांचे काम अफाट आहे. आमच्याकरिता ई -साहित्य प्रकाशन नेहमी प्रेरणा देणारी आहे.
कुलदीपक पुस्तकातील प्रत्येक कथा ही नीतीमूल्य जपणारी, मदत करायला शिकविणारी, संस्कारी सुस्वभावी आदर्श अशी आहे .
'रमेशचे शौर्य'  कथेत रमेश पोहण्याची कला शिकल्यामुळे आपल्या दोन मित्रांना पूरातून वाचवतो. शौर्य आणि धैर्याकरिता त्याला पुरस्कार मिळतो. नामा अनाथ असला तरी विनयशील, दयाळू, कष्टाळू स्वभावामुळे गावातील लोकांची मन जिंकून घेतो. त्यामुळे बिनविरोध सरपंच होतो.
'सर्कस ' या कथेत लहान मुलांच्या आवडत्या सर्कसमधील गमती जमती खूपच सुंदररित्या मांडल्या आहेत. ही कथा वाचतांना लहानपणीच्या अनेक आठवणींना उजाळा मिळतो.
'फेसबुक फ्रेंड ' या कथेमध्ये फेसबुकवर मित्र ऑनलाईन कसे फसतात ? याची कहाणी मांडली आहे. माणसाला भुलवून टाकणाऱ्या अनेक जाहिराती सध्या फेसबुकवर बघायला मिळतात. त्यापासून सावध राहण्याचा सल्ला या कथेतून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसून येतो. सैन्यात वीर मरण झालेल्या एका शहिदांच्या कुटुंबाची कहाणी 'व्यर्थ न हो बलिदान ' या कथेत आहे. माझ्यासोबत आई असते असे म्हणण्यापेक्षा मी आई सोबत राहतो हे सांगणारी कथा म्हणजे 'आईचे घर ' आहे. कुठलीही वस्तू  चोरीला गेल्यानंतर त्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली तरी ती वस्तू सहजासहजी आपल्याला मिळत नाही, त्यासाठी काय खटाटोप करावा लागतो याचा अनुभव 'सायकल गेली चोरीला ' या कथेत विषद केला आहे. 'रेल्वेतील शाळेत' रेल्वेत काही बाही विक्री करणाऱ्या मुलांना गुरुजी शाळेचा लळा कसा लावतात हे वाचनीय आहे. 'गावाची आठवण' मध्ये गावाचे सुंदर चित्रण आहे. मित्राने संकटकाळात मदत केली तर त्याची परतफेड मित्र कसा करतो हे 'परत फेड ' ही कथा सांगते .
'ब्लू व्हेल 'कथेत मोबाईल वरील गेम खेळून स्वतः चे जीवन संपवितो ही भयानकता सांगितली आहे. 'कुलदीपक '..मुलगाच पाहिजे म्हणून हट्ट करणाऱ्या सासूबाईची ही मुखपृष्ठ कथा  अत्यंत वाचनीय आहे. आनंदाची मैत्री, टोकाचे पाऊल, गोष्ट एका आंबेगावाची, भिजवणारा पाऊस, पाच रुपये अशा छान छान कथा यात आहेत.
त्यांनी या कथासंग्रहमध्ये भ्रष्टाचार, मोबाईलवरील खेळांच्या दुष्परिणामावर वाचकांना सजग केले असून मातेची जबाबदारी,
बालकामगारांच्या शिक्षणावर प्रकाश टाकलाय.
या पुस्तकातील कथांमधून जीवनातील नैतिक मूल्ये, चारित्र्य, सद्गुण, सकारात्मकता हे संस्कार मोती सहज मिळतात. एकूणच या कथासंग्रहातील सर्वच कथा ह्या मुलांसाठी संस्कारक्षम असून सर्वच वयोगटातील वाचकांसाठी वाचनीय कथा असून वाचल्यावर मानसिक समाधान देणारे आहे. या 'कुलदीपक' नंतर  'कुलज्योती ' नावाचे पुस्तक सरांनी प्रकाशित करावे असे मी सुचवते आणि पुढील लेखनास शुभेच्छा देते.

पुस्तकाचे नाव - कुलदीपक कथासंग्रह
लेखकाचे नाव :- नासा येवतीकर, 9423625769
प्रकाशन दिनांक :- 19 फेब्रुवारी 2021
प्रकाशक :- ई साहित्य प्रकाशन
किंमत :- विनामूल्य लिंक http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/kuldeepak_nasa_yeotikar.pdf
पृष्ठे :- 119


पुस्तक परिचय
मीना खोंड, हैद्राबाद, 7799564212

Tuesday, 13 February 2024

मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांना पत्र ( CM Letter to Student )

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान अंतर्गत पत्र


एकनाथ संभाजी शिंदे
मुख्यमंत्री महाराष्ट्र

मंत्रालय
मुंबई ४०० ०३२


प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

नव्या दिशेचे, नव्या उषेचे गीत सूर हे गाती,
या मंगल देशाचे आहे, भविष्य अपुल्या हाती'

आपल्या देशाला अनेक महापुरुषांचा महान वारसा लाभला आहे. शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, बुद्धिवंतांनी, विचारवंतांनी आपला देश घडवला आहे. विविध प्रयोगशील व्यक्तिमत्त्वांनी रुजवलेल्या संशोधनाच्या बीजाचा वटवृक्ष झालेला आपल्याला आज पाहायला मिळतो आहे. 'चांद्रयान-३' मोहिमेच्या यशाने भारताचे नाव आता अंतराळावरही सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. या ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार आहोत, ही आपल्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे. अंतराळ विज्ञानाकडे अभ्यासात्मक तसेच व्यवसायात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची वेळ आली आहे, हे दर्शवणारी ही घटना आहे, जनसामान्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांचे जगणे सुखकर करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरणे महत्त्वाचे आहे.
आपल्या भारत देशाचे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे भविष्य तुमच्या हाती आहे आणि त्याची तयारी तुम्हाला वर्तमानातच करावी लागणार आहे. शेतीपासून माहिती तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक क्षेत्राचा विज्ञानाच्या आधारे विचार करून भविष्याचा वेध घ्यायला हवा. त्यासाठीच सर्वप्रथम शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घ्यायला हवे. महाराष्ट्रातील तुम्हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यावर आम्ही सदैव भर दिला असून विविध शैक्षणिक सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या स्पर्धात्मक अभियानाचा समावेश आहे. या अभियानांतर्गत चाकोरीबाहेरील विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळा परस्परांशी स्पर्धा करतील व त्या माध्यमातून विद्याथ्यांच्या सर्वागीण विकासास चालना मिळेल. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी व त्यायोगे साहित्याप्रती त्यांच्या अभिरुचीत व सामान्य ज्ञानात वाढ व्हावी, यासाठी 'महावाचन महोत्सव' हा उपक्रम राबविला जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक कामाची आवड निर्माण व्हावी तसेच लागवडीचे तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात करावे यासाठी 'माझी शाळा, माझी परसबाग' हा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे. सार्वजनिक स्वच्छता व त्या माध्यमातून चांगले आरोग्य जोपासता यावे यासाठी 'स्वच्छता मॉनिटर-टप्पा २' हे अभियान राबविण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांत राज्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन मी या प्रसंगी करीत आहे.
राज्यातील सर्व शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 'एक राज्य, एक गणवेश' योजना राबवित आहोत, गणवेशासोबत सर्व भुलामुलींना बूट आणि पायमोज्यांची जोडीही देण्यात येत आहे. तुमच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांनाच वह्यांची पाने जोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तुमच्या शरीरस्वास्थ्यासाठी शालेय पोषण आहारात सुधारणा करण्यात येत असून त्याद्वारे राज्याच्या विविध भागांतील प्रादेशिक आहाराच्या आवडीनिवडी आणि सवयी विचारात घेऊन त्यानुसार पोषण आहाराची आखणी केली जात आहे. प्रत्येक शाळेत तुम्हा विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सहभागातून परसबाग विकसित करून त्यातील भाज्या व फळभाज्यांचा समावेश तुमच्या आहारात

करण्याची योजना आखली आहे. तुमच्या आरोग्याची तपासणी करून पोषण आहारात सुधारणा करण्यासाठी आम्ही भारतीय बालरोगतज्ज्ञांच्या असोसिएशनसोबत करार केला आहे. विद्यार्थिनीच्या शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शासनातर्फे सॅनिटरी नॅपकिन पुरवणारी मशीन लावण्यात येत आहेत जेणेकरून मुलीना सॅनिटरी नॅपकिन निःसंकोच उपलब्ध व्हावेत.
तुम्हा सर्वांना नोकरीच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून HCL, TISS या संस्थांबरोबर आपल्या सरकारने करार केला आहे. पूर्वी इयत्ता आठवीपासून दिले जाणारे व्यावसायिक शिक्षण आता इयत्ता सहावीपासून सुरू होत आहे. व्यावसायिक शिक्षणाच्या अद्ययावत प्रशिक्षणाद्वारे तुमच्यापैकी सुयोग्य विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या देशाशी करार करण्यात येत आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आसपासच्या परिसरातील उच्च शिक्षणाच्या आणि नोकरीच्या कक्षा विचारात घेऊन त्या दृष्टीने मनोवैज्ञानिक चाचण्या घेऊन तुमचे आणि तुमच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. सर्व शाळांमध्ये Digital Library, English Language Lab, STEM Lab, Robotic Lab, इत्यादी उभारून त्याद्वारे तुम्हाला २१ व्या शतकातील शिक्षणाच्या अद्ययावत संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
राज्यातील काही शाळांची सद्यस्थिती आणि शासनाच्या अनुदानाच्या मर्यादा विचारात घेऊन 'दत्तक शाळा योजना' राबविण्यात येत आहे, जेणेकरून त्या शाळांमध्ये चांगल्या भौतिक सुविधा पुरवता येतील.
मित्रांनो, या राज्याचे, देशाचे भविष्य तुमच्या हाती आहे. तुमचे यश हे उद्याच्या सक्षम महाराष्ट्राचा पाया असेल. त्यासाठी तुम्ही सर्वांनी कला, क्रीडा, ज्ञान, विज्ञान अशा विविध क्षेत्रांत पारंगत व्हायला हवे. 'शासन आपल्या दारी' सारख्या अभिनव उपक्रमाची तुम्हाला तुमचे भविष्य घडविण्यात साथ मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रातील कोट्यावधी नागरिकांना याचा लाभ होत आहे. तुमच्या स्वप्नांना वेग देण्यासाठी सायकल, पुस्तके, गणवेश यांसह अनेक वस्तु, साधने आपण उपलब्ध करून देत आहोत. तुमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठीच हा सर्व खटाटोप सुरू आहे.
शासन, समाज हे जसे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न करताहेत, तसाच विचार तुम्हीही अगदी छोट्या गोष्टींपासून करू शकता. तुमचे घर, परिसर, गाव स्वच्छ राहावे हे जसे तुम्हाला वाटते, तसेच तुमची शाळा सुंदर करण्यासाठी रोज थोडा वेळ द्या. त्यातून आरोग्यदायी आणि सुदृढ समाज घडू शकेल. तुम्हीच हा बदल घडवू शकता. हा बदल स्वतःपासून सुरू करावा लागतो, असे मला वाटते. या बदलातून तुम्ही प्रगत महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकाल. यात तुमचा सहभाग तुम्ही नक्कीच नोंदवाल, अशी मी अपेक्षा बाळगतो.
या प्रसंगी सर्व पालकांना व शाळांच्या माजी विद्यार्थ्यांना मी असे आवाहन करीत आहे की, त्यांनी आपल्या शाळेप्रती उत्तरदायित्वाच्या भावनेतून त्या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी यथाशक्ती आपले योगदान  द्यावे.

*जय हिंद, जय महाराष्ट्र !*


Tuesday, 30 January 2024

अशोक सराफ ( Ashok Saraf )

*चेहऱ्यावरील हावभावाने विनोद निर्माण करणारा अभिनेता - अशोक सराफ*


अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि दमदार अभिनेता म्हणून अवघ्या हिंदुस्थानाला परिचीत आहे. मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. अशोक सराफ यांना चार फिल्मफेअर मराठी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत . त्यांना मराठी चित्रपटसृष्टीतील महानायक  अर्थात  'सर्वोत्तम अभिनेता', अशोक सम्राट किंवा मामा असे संबोधले जाते. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर यांच्यासोबत त्यांनी मराठी विनोदी चित्रपटांची मालिकाच केली.

अशोक सराफ हे मुळचे बेळगाव या गावचे पण त्याचा जन्म मुंबईतील चिखलवाडी येथे ४ जून १९४७ रोजी झाला. त्यांचे बालपणही येथेच गेले. ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांच्या नावावरून त्यांचे नाव "अशोक" ठेवण्यात आले. त्यांचे शिक्षण डी. जी. डी. या विद्यालयात झाले. अभिनयाची आवड असल्याने वयाच्या अठराव्या वर्षापासूनच अभिनयास सुरुवात केली. शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी या व्यावसायिक नाटकापासून त्यांनी रंगमंच्यावर प्रवेश केला. यानंतर दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार मधील इरसाल पोलीस, राम राम गंगाराम मधील म्हमद्या खाटिक यांसारख्या बहुरंगी भूमिका त्यांनी साकारल्या. त्यांनी आपले कामाचे क्षेत्र मर्यादित न ठेवता त्यांनी विनोदी, खलनायक तसेच गंभीर पात्रेही पडद्यावर साकार केली आणि त्यातून आपली वेगळी शैली निर्माण केली. ऐंशीच्या दशकात अशोक आणि लक्ष्या या जोडीने रुपेरी पडद्यावर धमाल उडवून दिली. अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, दे दाणादाण यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी मराठी प्रेक्षक वर्गास पोटभरुन हसवले. अशोक सराफांच्या अभिनय उभारुन यायला दिग्दर्शक सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारेही तितकेच साथीदार आहेत. अशोक सराफांचे काही उल्लेखनिय चित्रपट नवरी मिळे नव-याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबा, एक उनाड दिवस, शुभमंगल सावधान, आई नंबर वन, नवरा माझा नवसाचा आजही लोकांच्या मनात घर करुन आहेत. मराठी चित्रपटासोबत त्यांनी हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. अजय देवगण सोबत सिंगम चित्रपटातील त्यांची छोटी भूमिका देखील आठवणीत राहून जाते. शाहरुख व सलमान खान यांच्या सोबत करण-अर्जुन मधील भूमिका देखील प्रेक्षक विसरू शकत नाहीत.

पत्नी अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ बरोबर त्यांनी स्वत:ची निर्मिती संस्था चालू केलेली आहे. त्याद्वारे काही मालिकांची निर्मिती त्यांनी केली आहे. टिव्ही मालिकांमध्ये त्यांची सर्वात गाजलेली मालिका म्हणजे ’हम पांच’. अशोक सराफांनी चित्रपट संख्या कमी केलेली असली तरी प्रेक्षक अजूनही त्यांच्या नवीन चित्रपटांच्या प्रतिक्षेत असतात.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ याना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले. अशोक सराफ यांच्या प्रत्येक चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. अभिनंदन .....!

संकलन :- नासा

Monday, 29 January 2024

महात्मा गांधीजी प्रश्नमंजुषा ( Mhatma Gandhi )

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याविषयी प्रश्नमंजुषा


01. महात्मा गांधीजी यांचे पूर्ण नाव काय होते ? - मोहनदास करमचंद गांधी

02. महात्मा गांधीजी यांचा जन्म केव्हा झाला ? - 02 ऑक्टोबर 1869

03. महात्मा गांधीजी यांचा जन्म कोठे झाला ? - पोरबंदर ( गुजरात )

04. महात्मा गांधीजी यांच्या आईचे नाव काय होते ? - पुतळीबाई

05. महात्मा गांधीजी यांच्या पत्नीचे नाव काय होते ? - कस्तुरबा

06. महात्मा गांधीजी हे कस्तुरबा यांना कोणत्या नावाने बोलावत असत ? - बा

07. महात्मा गांधीजी यांनी आपले वकिलीचे शिक्षण कुठून पूर्ण केले ? - लंडन विद्यापीठ

08. महात्मा गांधीजी यांनी दक्षिण आफ्रिकेत किती वर्षे राहिले ? - 21 वर्षे

09. महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरू कोण होते ? - गोपाळ कृष्ण गोखले

10. महात्मा गांधीजी यांच्या जीवनातील भारतातील पहिला यशस्वी लढा कोणता होता ? - चंपारण्य सत्याग्रह

11. कोणत्या घटनेच्या निषेधार्थ महात्मा गांधीजी यांनी कैसर-ए-हिंद पदवीचा त्याग केला ? - जालियनवाला बाग हत्याकांड

12. महात्मा गांधीजी यांचा मृत्यू केव्हा झाला ? - 30 जानेवारी 1948

13. 30 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात कोणता दिवस म्हणून ओळखला जातो ? - हुतात्मा दिन

14. महात्मा गांधीजी यांची समाधी कोठे आहे ? - राजघाट ( दिल्ली )

15. कस्तुरबा गांधी यांची समाधी कोठे आहे ? - आगा खान पॅलेस, पुणे

16. महात्मा गांधीजी यांना महात्मा ही उपाधी कुणी दिली ? - गुरुदेव रवींद्रनाथ टागोर

17. महात्मा गांधीजी यांना राष्ट्रपिता म्हणून कोणी संबोधन केले ? - नेताजी सुभाषचंद्र बोस

18. सत्याचे प्रयोग ही आत्मकथा कोणाची आहे ? - महात्मा गांधी

19. महात्मा गांधीजी यांना संपूर्ण भारतात अजून कोणत्या नावाने ओळखले जाते ? - बापू

20. महात्मा गांधीजी यांच्या मुखातून निघालेले शेवटचे शब्द काय ? - हे राम

संकलन :- नासा येवतीकर, मुख्याध्यापक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Sunday, 28 January 2024

प्रश्नमंजुषा उत्तरे

कोण होईल ज्ञानपती 2024
प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा 

उत्तरे :- 
01) उजव्या 
02) श्री नरेंद्र मोदी
03) प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी
04) नेताजी सुभाषचंद्र बोस
05) लोकमान्य टिळक
06) सरदार वल्लभभाई पटेल
07) सिंदखेडराजा
08) 30 जानेवारी
09) खाशाबा जाधव
10) ब्रेल लुई
11) वारा
12) आयझक न्यूटन
13) गाय
14) जय जय महाराष्ट्र माझा
15) कुस्ती
16) परमवीर चक्र
17) ऊन
18) नोबेल पुरस्कार
19) कल्पना चावला
20) साबण
21) स्वामी रामानंद तीर्थ  
22) रझाकार  
23) निजाम 
24) दगडाबाई शेळके 
25) नांदेड 
26) हैद्राबाद 
27) स्वामी रामानंद तीर्थ 
28) 17 सप्टेंबर1948 
29) डॉ. ताराबाई परांजपे 
30) अर्जापूर 
31) पोलो ऑपरेशन 
32) औरंगाबाद 
33) 17 सप्टेंबर 
34) सरदार वल्लभभाई पटेल 
35) कासीम रझवी 
36) वसंतदादा पाटील 
37) उर्दू 
38) गोदावरी 
39) 08  
40) 565
41) दिल्ली
42) मुंबई
43) द्रौपदी मुर्मु
44) श्री नरेंद्र मोदी
45) श्री एकनाथ शिंदे
46) पंडीत जवाहरलाल नेहरू
47) डॉ. राजेंद्र प्रसाद
48) श्रीमती इंदिरा गांधी
49) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
50) 15 ऑगस्ट

- नासा येवतीकर, मुख्याध्यापक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

प्रश्नमंजुषा 2024 ( Republic Day )

कोण होईल ज्ञानपती 2024 ( प्रजासत्ताक दिनानिमित्त )
प्रश्नमंजुषा स्पर्धा - जानेवारी 2024
विद्यार्थ्यांचे नाव -                                                                                           वर्ग :-

शाळेचे नाव - 
------------------------------------------------------------------------------------------------------------
सूचना - दिलेल्या चार पर्यायापैकी योग्य पर्यायावर टीक करावे. एका प्रश्नाला एक गुण असेल. 

1. चालतांना रस्त्यांच्या कोणत्या बाजूने चालावे ? 
1)    डाव्या            2)    उजव्या               3)    मधोमध             4)  यापैकी नाही

 2. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात कोणी मार्गदर्शन केले ? 
1)  श्री एकनाथ शिंदे              2)  श्रीमती द्रौपदी मुर्मु                3) श्री नरेंद्र मोदी        4) श्री देवेंद्र फडणवीस

3. या मातीच्या पुण्याईचा या गीताचे कवी कोण  ? 
1)   प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी     2)   कवी राजा बढे         3)  लक्ष्मण माने               4) कुसुमाग्रज

4. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जय हिंद असा नारा कोणी दिला ? 
1)  पंडित नेहरू          2)  महात्मा गांधी          3)  लोकमान्य टिळक          4) नेताजी सुभाषचंद्र बोस

5. केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ? 
1)   महात्मा गांधी        2)  लोकमान्य टिळक          3)   महात्मा फुले           4) पंडित नेहरू

6.  लोहपुरुष असे कोणास म्हटले जाते ? 
1) महात्मा गांधी             2)  लोकमान्य टिळक          3)  सरदार पटेल            4)  पंडित नेहरू

7. राजमाता जिजाऊ यांचा जन्म कोठे झाला ? 
1)    पुणे             2)   शिवनेरी                3)   सातारा              4) सिंदखेडराजा

8. हुतात्मा दिन कधी असतो  ? 
1)   26 जानेवारी            2)   03 जानेवारी                3)  30 जानेवारी               4) 12 जानेवारी

9. पहिले भारतीय ऑलिम्पिक विजेते कोण ? 
1)   विजयकुमार दहिया      2)   खाशाबा जाधव        3)  सायना नेहवाल      4) राज्यवर्धन सिंह राठोड

10. ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला ? 
1)   आयझॅक न्यूटन        2)   एडिसन         3)  लुई पाश्चर           4) ब्रेल लुई

11. खालीलपैकी कोणता वनस्पतीचा अवयव नाही  ? 
1)   मूळ              2)   पान                3)   वारा              4) खोड

 12. गुरुत्वाकर्षण चा शोध कोणी लावला ? 
1)   आयझॅक न्यूटन        2)   एडिसन         3)  लुई पाश्चर           4) ब्रेल लुई

13. खालीलपैकी गटात न बसणारा ओळखा ? 
1)   वाघ              2)  सिंह                 3)  कोल्हा               4) गाय

14. खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते ? 
1) खरा धर्म      2) जय जय महाराष्ट्र माझा    3)  हा देश माझा    4) बलसागर भारत होवो

15. विजयकुमार दहिया कोणत्या खेळांशी संबंधित आहे ? 
1)  हॉकी               2)      खो-खो             3)  कबड्डी               4)  कुस्ती

16. लान्सनायक अल्बर्ट एक्का यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे ? 
1)  भारतरत्न           2)  परमवीर चक्र               3)  पद्मविभूषण                4) पद्मश्री

17. खालीलपैकी झाडापासून आपणांस काय मिळत नाही ? 
1)   लाकूड              2)   सावली                3)  फळ               4) ऊन

18. डॉ. जगदीशचंद्र बोस यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे ? 
1)  भारतरत्न पुरस्कार      2) परमवीर चक्र पुरस्कार       3) नोबेल पुरस्कार          4) पद्मविभूषण पुरस्कार

19. भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण ? 
1)   कल्पना राठोड           2)   कल्पना चावला           3) जुही चावला          4) सुनीता चावला

20.  खालीलपैकी प्रथमोपचार पेटीत नसलेली वस्तू कोणती ? 
1)   आयोडीन           2)   साबण              3)  इंजेक्शन               4)  कात्री

21. हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्याचे नेतृत्व कोणी केले ? 
1)   महात्मा गांधी              2)  स्वामी विवेकानंद                 3)   स्वामी रामानंद तीर्थ                 4) गोविंदभाई श्रॉफ

 22. कासीम रझवी यांच्या सैन्याचे नाव काय होते ?
1)   सरकार               2)   सरदार             3)   रझाकार               4)  निजामकार

23. हैद्राबाद संस्थानावर कोणाचे राज्य होते ?
1)   औरंगजेब               2)  बादशाह                    3)  निजाम                  4)  शिवाजी महाराज

24. मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून कोणास ओळखले जाते ? 
1)  दगडाबाई शेळके              2) ताराबाई मोडक                   3)  ताराबाई परांजपे                   4) अनुताई वाघ

25. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे ? 
1)   औरंगाबाद             2)  नांदेड                  3)  परभणी               4) लातूर

26. स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा कोणत्या संस्थानात होता ? 
1)  काश्मीर              2)  जुनागढ                    3)  हैद्राबाद            4) यापैकी नाही

27. नांदेड एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ? 
1)    महात्मा गांधी              2)  स्वामी विवेकानंद                 3)   स्वामी रामानंद तीर्थ                 4) गोविंदभाई श्रॉफ

28. हैद्राबाद संस्थान भारतात केव्हा विलीन झाले ? 
1)   17 सप्टेंबर 1949       2)    17 सप्टेंबर 1948           3)   17 सप्टेंबर 1947                     4)  17 सप्टेंबर 1950

29. निवडुंगाची फुले हे पुस्तक कोणी लिहिले  ? 
1)   दगडाबाई शेळके              2) ताराबाई मोडक                   3)  ताराबाई परांजपे                   4) अनुताई वाघ

30. हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या हत्या कोणत्या ठिकाणी झाली ? 
1)   धर्माबाद             2)   अर्जापूर            3)  अर्धापूर            4) बिलोली

31. निजाम सरकारवर कारवाई करणाऱ्या ऑपरेशनचे नाव काय होते ?
1)  सोलो ऑपरेशन              2)  पोलो ऑपरेशन        3)  खोलो ऑपरेशन           4) डोलो ऑपरेशन

32. मुक्ती स्तंभ कोठे बांधण्यात आले आहे ? 
1)   औरंगाबाद              2)  हैद्राबाद                3)  निजामाबद                4) धर्माबाद

33. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 
1)   15 सप्टेंबर       2)    15 ऑगस्ट           3)   26 जानेवारी                     4)  17 सप्टेंबर

34. हैद्राबाद मुक्तीसंग्राम वेळी भारताचे गृहमंत्री कोण होते  ? 
1)   पंडीत नेहरू              2) सरदार वल्लभभाई पटेल      3)  डॉ. राजेंद्र प्रसाद      4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

35. निजामच्या सेनापतीचे नाव काय होते ? 
1)  कासीम अली        2)  मीर उस्मान           3)  कासीम रझवी          4)  अब्दुल कासीम

36.  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्याचा निर्णय कोणत्या मुख्यमंत्र्यांनी घेतला ? 
1)  शंकरराव चव्हाण        2)  वसंतदादा पाटील           3)  वसंतराव नाईक          4)  विलासराव देशमुख

37. निजाम सरकारमध्ये शिक्षणाची भाषा कोणती होती ? 
1)  तेलगू        2)  इंग्रजी           3)  उर्दू         4)  मराठी

38. मराठवाड्यातून कोणती नदी वाहते ? 
1)  गंगा        2)  गोदावरी           3)  कृष्णा          4)  चंद्रभागा

39.  हैद्राबाद संस्थानात मराठवाड्यातील किती जिल्ह्याचा समावेश होता ? 
1)  07        2)  09           3)  08          4)  10

40. स्वातंत्र्यापूर्वी भारतात एकूण किती संस्थाने होती ? 
1)  665        2)   565          3)  562          4)  546

41.  खालीलपैकी भारताची राजधानी कोणती ?
1) मुंबई         2) दिल्ली       3) नागपूर           4) कलकत्ता

42. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे ?
1) मुंबई         2) जपान        3) न्यूयॉर्क         4) इंग्लंड

43. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत ?
1) श्री रामनाथ कोविंद     2) द्रौपदी मुर्मु        3) नरेंद्र मोदी    4) एकनाथ शिंदे

44. भारताचे पंतप्रधान कोण आहेत ?
1) श्री रामनाथ कोविंद     2) द्रौपदी मुर्मु       3) नरेंद्र मोदी    4) एकनाथ शिंदे

45. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
1) श्री रामनाथ कोविंद     2) द्रौपदी मुर्मु    3) नरेंद्र मोदी    4) एकनाथ शिंदे

46. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर     2) डॉ. राजेंद्र प्रसाद   3) पंडीत जवाहरलाल नेहरू  4) श्रीमती इंदिरा गांधी

47. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर   2) डॉ. राजेंद्र प्रसाद    3) पंडीत जवाहरलाल नेहरू   4) श्रीमती इंदिरा गांधी

48. भारताचे पहिले महिला पंतप्रधान कोण होते ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर   2) डॉ. राजेंद्र प्रसाद    3) पंडीत जवाहरलाल नेहरू    4) श्रीमती इंदिरा गांधी

49. भारतीय घटनेचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर    2) डॉ. राजेंद्र प्रसाद    3) पंडीत जवाहरलाल नेहरू    4) श्रीमती इंदिरा गांधी

50. भारत देश केव्हा स्वतंत्र झाला ?
1) 17 सप्टेंबर    2) 26 जानेवारी     3) 15 ऑगस्ट      4) 01 मे

वरील प्रश्नांची उत्तरे चेक करण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. 


धन्यवाद .......!

संकलन :- नासा येवतीकर, मुख्याध्यापक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

मराठी सिनेमा आणि प्रेक्षक ( Marathi Cinema )

मराठी सिनेमा आणि प्रेक्षक


भारतात चित्रपटाची निर्मिती करणारे पहिले व्यक्ती म्हणजे  दादासाहेब फाळके हे होत. महाराष्ट्रातील सन 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र नावाचा मूकपट त्यांनी तयार केला. म्हणून त्यांना मराठी चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हणतात. मराठी चित्रपटानेच सिनेसृष्टी प्रारंभ झाली, त्यामुळे मराठी सिनेमाला फार मोठा इतिहास आहे. त्यानंतर बाबुराव पेंटर सारख्या दिग्दर्शकाने मराठी सिनेमाला वैभव मिळून दिले. त्याकाळी पौराणिक कथा, मराठ्यांच्या इतिहासातील घटना, प्रसंग तसेच रोजच्या जीवनातील हलकेफुलके प्रसंग यावर आधारित चित्रपट तयार होत होते. त्यामुळे प्रेक्षक वर्ग त्या चित्रपटांकडे आकर्षिला जात होता. समाजात बदलणाऱ्या काळाचे ठसे चित्रपटातून व्यक्त होत असल्यामुळे चित्रपट आणि लोकांमध्ये एक प्रकारचा जिव्हाळा होता. त्याचसोबत चित्रपट बनविणे हा त्या लोकांचा एक छंद होता. त्याकडे त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून कधीही पाहिले नाही.
भारतीय चित्रपट सृष्टीचा श्री गणेशा मराठी माणसाने व मराठी सिनेमाने जरी झाला असेल तरी, मराठी सिनेमाचा विकास त्या गतीने झाला नाही. सन 1931 मध्ये हिंदीतील आलम आरा या चित्रपटाची निर्मिती झाली आणि आपला मराठी माणूस हळूहळू मराठी चित्रपटापासून दुरावत गेला. मराठीमध्ये सुद्धा एकापेक्षा एक चांगल्या चित्रपटांची निर्मिती झाली. आचार्य अत्रे यांनी श्यामची आई चित्रपटा द्वारे मराठी सिनेमाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. श्वास या मराठी चित्रपटाने ऑस्कर वारी करून आली. यावरून आजही मराठी सिनेमा जिवंत आहे याचा विश्वास वाटतो. एवढेच नाही तर त्यास राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. कला ही भाषेमध्ये अडकून राहणारी नाही त्यामुळे मराठीतील कलाकार इतर भाषांच्या चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी करतात असे वाटते, परंतु तसे काही नाही. आपल्या मराठी सिनेमाला नेहमीच प्रेक्षकांची संख्या कमी असते कारण सतत रटाळ पटकथा, तेच ते विषय आणि तेच कलाकार घेऊन कमी बजेटमध्ये सिनेमा तयार केल्या जातात. त्यामुळे प्रेक्षक वर्ग मराठी सिनेमाकडे पाठ करतात. शंभर पैकी जे एक दोन चित्रपट चांगले तयार होतात त्यांची अवस्था  गव्हासोबत किडे रगडणे यासारखी होऊन जाते.
मराठी सिनेमासाठी मध्यंतरीचा काळ हा चांगला होता. सचिन पिळगावकर, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, रंजना जोशी, जयश्री गडकर या मराठी कलाकाराने प्रेक्षकांची नाडी ओळखून चित्रपट तयार केले. त्यामुळे मराठी सिनेमा बघायला प्रेक्षक मिळत होता. अलका कुबलच्या माहेरची साडी या सिनेमाने कित्येक महिलांच्या डोळ्यांत अश्रू उभे केले. चांगल्या कलाकृतीला प्रेक्षक केव्हाही दाद देतात. त्यास्तव निर्मात्यांनी सर्वस्व पणाला लावून सिनेमा तयार करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे पण तसे अभावानेच बघायला मिळते. प्रदीर्घ विश्रांतीनंतर सचिन व सुप्रिया या जोडीने नवरा माझा नवसाचा हा चित्रपट घेऊन आले. विषयाची मांडणी आणि हलकेफुलके विनोद यामुळे लोकांनी हा सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतले. मकरंद अनासपुरे व सिद्धार्थचा दे धक्का सर्व प्रेक्षकांना खरंच धक्का देऊन गेला. मैत्री वरचा दुनियादारी चित्रपट हा एका वेगळ्या जगात घेऊन जातो. लैला-मजनू, सोहनी-महिवाल, हीर-रांझा ही प्रेमी युगुल जोडी जशी आपल्या प्रेमकथेसाठी प्रसिद्ध आहे तेवढीच प्रसिद्धी नागराज मंजुळे यांनी सैराट या मराठी चित्रपटात आर्चि-परश्याची जोडी प्रसिद्ध केली.
मराठी चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाहीत ही ओरड काही खरी नाही. सिनेसृष्टीतील लोकांकडे काहीतरी वेगळे करण्याची जिद्द, तीव्र इच्छाशक्ती, आगामी दृष्टिकोन, नवनवीन कल्पना अमलात आणण्याची इच्छा असेल तर नजीकच्या काळात मराठी सिनेमा सुद्धा दमदार पाऊल टाकेल. मराठी पाऊल पडती पुढे असे म्हणायला त्या ठिकाणी संधी मिळणार यात शंका नाही. मराठी सिनेमा जेमतेम 50 70 लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंतच गल्ला जमा करतो. म्हणून निर्माते मंडळी सुद्धा कमी बजेटचे चित्रपट तयार करतात. अशा विपरीत काळात डबल सीट चित्रपटाने आठवडाभरात पाच कोटी रुपयांचा गल्ला जमा करून दाखविला आहे, हे नोंद घेण्यासारखे आहे. भविष्यात मराठी सिनेमा वाचविण्यासाठी आपण सर्वचजण मराठी चित्रपट जरूर पाहूया आणि थिएटरवाल्यांनी सुद्धा प्रत्येक तिकिटामागे सवलत देण्याची प्रथा मराठी चित्रपटांसाठी सुरू करावी जेणेकरून प्रेक्षक चित्रपट गृहाकडे आकर्षिले जातील. मराठी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना प्रेक्षक कधीच विसरणार नाहीत. मराठी सिनेसृष्टी जिवंत ठेवणे आपणा सर्वांची जबाबदारी आहे.

 
- नासा येवतीकर, स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...