Tuesday 30 January 2024

अशोक सराफ ( Ashok Saraf )

*चेहऱ्यावरील हावभावाने विनोद निर्माण करणारा अभिनेता - अशोक सराफ*


अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि दमदार अभिनेता म्हणून अवघ्या हिंदुस्थानाला परिचीत आहे. मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. अशोक सराफ यांना चार फिल्मफेअर मराठी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत . त्यांना मराठी चित्रपटसृष्टीतील महानायक  अर्थात  'सर्वोत्तम अभिनेता', अशोक सम्राट किंवा मामा असे संबोधले जाते. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर यांच्यासोबत त्यांनी मराठी विनोदी चित्रपटांची मालिकाच केली.

अशोक सराफ हे मुळचे बेळगाव या गावचे पण त्याचा जन्म मुंबईतील चिखलवाडी येथे ४ जून १९४७ रोजी झाला. त्यांचे बालपणही येथेच गेले. ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांच्या नावावरून त्यांचे नाव "अशोक" ठेवण्यात आले. त्यांचे शिक्षण डी. जी. डी. या विद्यालयात झाले. अभिनयाची आवड असल्याने वयाच्या अठराव्या वर्षापासूनच अभिनयास सुरुवात केली. शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी या व्यावसायिक नाटकापासून त्यांनी रंगमंच्यावर प्रवेश केला. यानंतर दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार मधील इरसाल पोलीस, राम राम गंगाराम मधील म्हमद्या खाटिक यांसारख्या बहुरंगी भूमिका त्यांनी साकारल्या. त्यांनी आपले कामाचे क्षेत्र मर्यादित न ठेवता त्यांनी विनोदी, खलनायक तसेच गंभीर पात्रेही पडद्यावर साकार केली आणि त्यातून आपली वेगळी शैली निर्माण केली. ऐंशीच्या दशकात अशोक आणि लक्ष्या या जोडीने रुपेरी पडद्यावर धमाल उडवून दिली. अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, दे दाणादाण यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी मराठी प्रेक्षक वर्गास पोटभरुन हसवले. अशोक सराफांच्या अभिनय उभारुन यायला दिग्दर्शक सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारेही तितकेच साथीदार आहेत. अशोक सराफांचे काही उल्लेखनिय चित्रपट नवरी मिळे नव-याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबा, एक उनाड दिवस, शुभमंगल सावधान, आई नंबर वन, नवरा माझा नवसाचा आजही लोकांच्या मनात घर करुन आहेत. मराठी चित्रपटासोबत त्यांनी हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. अजय देवगण सोबत सिंगम चित्रपटातील त्यांची छोटी भूमिका देखील आठवणीत राहून जाते. शाहरुख व सलमान खान यांच्या सोबत करण-अर्जुन मधील भूमिका देखील प्रेक्षक विसरू शकत नाहीत.

पत्नी अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ बरोबर त्यांनी स्वत:ची निर्मिती संस्था चालू केलेली आहे. त्याद्वारे काही मालिकांची निर्मिती त्यांनी केली आहे. टिव्ही मालिकांमध्ये त्यांची सर्वात गाजलेली मालिका म्हणजे ’हम पांच’. अशोक सराफांनी चित्रपट संख्या कमी केलेली असली तरी प्रेक्षक अजूनही त्यांच्या नवीन चित्रपटांच्या प्रतिक्षेत असतात.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ याना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले. अशोक सराफ यांच्या प्रत्येक चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. अभिनंदन .....!

संकलन :- नासा

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...