Thursday, 8 December 2016

गीता जयंती

गीता जयंती विशेष प्रासंगिक लेख

" कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन "

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषू कदाचन अर्थात फळाची आशा न करता कर्म करीत जा असे पवित्र ग्रंथ श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे. पाच हजार वर्षापुर्वी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या सुप्रभाती कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला समोर ठेऊन संपूर्ण मानवमात्राला जीवनाभिमुख करणेस्तव श्रीकृष्णाने आपल्या मुखारविंदातून जे जीवनाचे सार मांडले ती म्हणजे गीता. आज गीता जयंतीचा दिवस. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ही जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी केली जाते. गीता ही भगवंताने स्वतः गायिली आहे, हेच याचे प्रमुख वैशिष्ट्ये आहे. गीता हे वैश्विक ग्रंथ आहे. गीता ही मानव धर्मासाठी आहे, त्यावर आधारीत मानव आपले आदर्श असे आयुष्य जगू शकतो. मानवाचे जीवन चरितार्थ कसे असावे ? याबाबत मोलाचे मार्गदर्शन यात सांगितले आहे. "योगक्षेमं वहाम्यहम" ची संकल्पना यात दिसून येते. अहं ब्रम्हास्वी ची जाणीव सुद्धा मिळते. लहान थोरांपासून वृद्धांपर्यंत ,साधू संन्यासापासून संत महात्म्यापर्यंतच्या सर्वच लोकांना यातून मार्ग मिळतो. हीच गीता लोकांना सहज समजावी म्हणून संत ज्ञानेश्वरानी मराठी मायबोलीतून 'ज्ञानेश्वरी' लिहली. गीता ही प्रत्येकासाठी पथदर्शी आहे. मानवाला लाभलेले जीवन खुप अनमोल आहे म्हणून जीवनात रडण्यापेक्षा हसण्याला जास्त महत्व द्यावे. संकटाला भिवून पळण्यापेक्षा त्यास तोंड देण्याची शक्ती या गीतेतून मिळते.
एखाद्या कामात यश मिळाले नाही की व्यक्ती निराश होतो. परंतु निराश न होता अधिक शक्तिने प्रयत्न केल्यास त्यात नक्कीच यश मिळते. निराशेच्या अंधारात भटकणाऱ्या मानवाच्या जीवनात गीता प्रकाश पसरवते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, याची शिकवण सुद्धा गीता देते. निरुत्साही माणसाला उत्साह मिळवून देते. मानवाला स्वतः वरील श्रद्धा नष्ट होऊ देत नाही. वारंवार स्वतः चा आत्मविश्वास जागृत करीत राहते. त्यामुळे मानव जीवनात विफल होत नाही व अपयशातुन यश मिळविण्याचा प्रयत्न करतो. समाजातील प्रत्येक व्यक्तीला गीता जीवन जगण्याचा आदर्श मार्ग सांगते. त्या मार्गावरुन गेलेला व्यक्ती आजपर्यंत असफल झाला नाही.
या गीतेत एकूण 18 अध्याय असून 700 श्लोक आहेत. प्रत्येक अध्यायाला एक विशिष्ट असे नाव आहे जसे की बाराव्या अध्यायाला भक्तीयोग असे नाव आहे ज्यात भक्तीचे सुंदर वर्णन केलेले आहे.
मानवाचे जीवन बालपण, तारुण्य व वार्धक्य या तीन अवस्थेतून जातो तेव्हा तो काही महत्त्वाचे गुण स्वीकारूनच दुसऱ्या अवस्थेत प्रवेश करतो. बालपणात बालक असून बालिश नाही, तरुण बनेल परंतु उत्श्रृंखल नाही, वृद्ध होईन परंतु निराश नाही ही जीवनाची त्रिसूत्री गीतेतून मिळते . जीवनात प्रत्येक मनुष्य मृत्यूला घाबरतो, मरण कोणालाच नको वाटते. परंतु जन्म घेणारा प्रत्येक जीव मरतोच, याची जाणीव गीता लोकांना करून देते त्यामुळे माणूस हसत-हसत मृत्यूचे स्वागत करतो. भगवे कपडे अंगावर टाकले की कोणी संन्यासी होत नसतो त्यासाठी मनावर भगवे कपडे टाकण्याची गरज आहे. खरा संन्यासी बनण्यासाठी त्याग, बलिदान आणि समर्पणाची भावना गीतेतून सांगण्यात आली. तरीही काही साधू, संन्यासी ढोंगीपणा करून समस्त समाजाला दुःख पोहोचवितात . त्यास्तव संत चोखामेळा या संताने म्हटले की '' ऊस डोंगा परि रस नाही डोंगा, काय भुललासि वरलिया रंगा .'' नुसते बाह्यरूप पाहून कोणाचे शिष्य न होता प्रथम त्याचे सर्व ज्ञान जाणून घ्यावे आणि त्यानंतर योग्य दिशा ठरवावी. जसे आपले कर्म असतील तसेच आपणाला फळ मिळत राहतील. करावे तसे भरावे या म्हणीप्रमाणे. तंबाखुचे बी लावून कापसाच्या पिकाची अपेक्षा ठेवताच येत नाही असे गीता सांगते .
स्त्रियांच्या बाबतीत गीता सांगते ,''कीर्ती श्रार्वाक नारीच , स्मृतिमेर्धा धृती: क्षमा: " अर्थात लज्जा हा स्त्रीचा खरा दागिना आहे व मर्यादेतच तिचे सौदर्य साठवलेले आहे. स्त्रीची वाणी प्रेमळ, पावन आणि प्रेरक असली पाहिजे. स्त्री ही महान कार्य करायला जन्मलेली आहे याची तिला स्मृती असायला पाहिजे आजच्या काळातही वरील ओळ तंतोतंत जुळत नाही का ? 
विद्यार्थी कसा असावा ? या बाबतीत गीता सांगते " तद्विध्दी प्रणिपातेन परीप्रश्नेन सेवया:"  अर्थात विद्यार्थी म्हणजे ज्ञान घेणारा, ज्ञान प्राप्त करणारा. जर त्याला विद्या मिळवायची असेल तर त्याच्याकडे प्रणिपात म्हणजे नम्रता, परीप्रश्न म्हणजे जिज्ञासा आणि सेवा या तीन बाबी त्यांच्या जवळ असाव्याच लागतात. नम्रतेशिवाय ज्ञान मिळतच नाही. जर मिळालेच तर टिकत नाही टिकलेच तर शोभत नाही. म्हणूनच म्हटले आहे . "विद्या विनयेन शोभते ." आजचा विद्यार्थी असा आहे का ? आजन्म विद्यार्थी राहायचे असेल तर वरील तीन बाबी आपणाजवळ असावेच लागतात .
गुरुच्या बाबतीत सांगताना गीता म्हणते की, "उपदेक्ष्यन्ति ते ज्ञान ज्ञानिनस्तवं दर्शिन" अर्थात ज्ञानाचा उपदेश करणारा मनुष्य ज्ञानी आणि तत्वदर्शी असला पाहिजे. गुरु हा विचाराने विद्वान आणि आचाराने सज्जन असला पाहिजे. साधी राहणी पण उच्च विचारसरणी असलेल्या गुरुला समाजात मानाचे स्थान मिळवावे लागत नाही तर ते आपोआपच प्राप्त होते. गुरुनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजकल्याणासाठी करावा. संतानी म्हंटल्याप्रमाणे "जे जे आपणासि ठावे, ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करुन सोडावे सकळजन". या उक्तिप्रमाणे गुरुनी आपल्या जवळ असलेले ज्ञान समाजात देऊन जनकल्याण करावे. ज्याप्रमाणे साठवून ठेवलेल्या पाण्याचे रूपांतर डबक्यात होते,तर वाहत्या पाण्याचे रूपांतर ओढा, नाला, ओहोळ, नदी आणि शेवटी सागरात जाऊन मिसळते, तेंव्हा त्या पाण्याचे अथांग स्वरुप बघण्यास मिळते, ज्ञानाचे सुद्धा असेच आहे. जेवढे ज्ञान देत राहू तेवढेच ज्ञान उत्तरोत्तर समृद्ध होत राहते. लोकांच्या श्रद्धा व विश्वास यांना तडा बसेल असे काही वर्तन गुरुनी करू नये असा संदेश यातून मिळतो.
          परिश्रमाशिवाय कोणतीच वस्तू प्राप्त होत नाही. विना मेहनत फळाची अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणा, संत रामदास स्वामी यांनी म्हटल्याप्रमाणे "आधी कष्ट मग फळ, कष्टाविना सर्व निष्फळ." कर्म करीत असताना फळाची अजिबात आशा न ठेवता अविरत काम करत राहिल्यास केलेल्या कार्याचे चांगलेच फळ मिळतील. नुसते दहावीच्या वर्षात कठोर अभ्यास केल्याने यश मिळत नाही.  राज्यातून पहिला वा दूसरा नंबर मिळावा अशी आशा ठेऊन अभ्यास केले  आणि त्यात यश मिळाले नाही तर निराशा येते. म्हणून कसलीही आशा न ठेवता अविरत मन लावून अभ्यास केले तर त्याचे चांगलेच परिणाम बघायला मिळतात. असे अनेक मौलिक संदेश या गीतेतून मिळतात. त्यास्तव आज गीता जयंतीच्या दिवशी यातील काही मौलिक गोष्टी लक्षात घेऊन तसा वागण्याचा आपण प्रयत्न केल्यास आपले जीवन सुखी, समृध्दी व आनंदी निश्चितच होईल, यात संदेह नाही

            - नागोराव सा.येवतीकर
             मु.येवती ता. धर्माबाद
             9423625769

Wednesday, 7 December 2016

हमें तो लूट लिया

*हमें तो लूट लिया ...........*

मोबाईलमुळे आज जग बदलल्यासारखे आणि जवळ आल्यासारखे वाटत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोबाईलची क्रांती संपूर्ण इतिहास बदलून टाकली आहे. आजही ते पोस्टातील पत्रव्यवहाराचे दिवस आठवले की " डाकिया डाक लाया " हे गीत आठवण आल्या शिवाय राहत नाही. पोस्टमन गावात आला म्हटले की, लोक उत्साहाने त्याच्याकडे पाहायचे कोणाचे पत्र आले म्हणून....? सासरी गेलेल्या मुलींचे पत्र आले काय म्हणून आई वाट पहायची तर, माहेराहुन काही खुशाली आहे काय म्हणून मुलगी वाट बघत असायची. महिनोनमहीने आई-मुलींची बातचीत व्हायची नाही. पत्राद्वारे काय ते ख्यालीखुशाली कळायचे. त्यामुळे महिन्यात कधी भेटले तर दिवसरात्र गप्पा मारायच्या, पण आज काळ बदलला. मोबाईलच्या सुविधेमुळे आज मुलगी सासरी आहे असे वाटतच नाही कारण दिवसातुन दोन-तीन वेळा तरी मोबाईल वर त्यांचे थेट बोलणे होत असते. त्यामुळे पूर्वी असलेली तळमळ आणि आस्था हे दोन्ही आज दिसत नाही, हे ही सत्य असेल कदाचित. बाहेरगावी शिकायला असलेला मुलगा दर महिन्याला पैसे पाठविण्यासाठी घरी पत्र पाठवायाचा. तब्बल 15 - 20 दिवसा नंतर त्याला ते मिळायचे. आपला अभ्यास आणि निकाल मुले पत्राद्वारे कळवायचे. पण आज मुलांच्या अगोदर आई-बाबाना त्यांचे गुण कळत आहेत. हे सर्व मोबाईल मुळे शक्य होत आहे. म्हणजे मोबाईल चांगले आहे तर....! आम्ही ही त्यास काही नावे ठेवत नाही, मात्र याच मोबाइलने आज कित्येक लोकांना तंगुन सोडले आहे. सोडता ही येत नाही अन धरता ही येत नाही अशी कात्रीत सापडल्यासारखी स्थिती झाली आहे. फोनचा प्रवास ही थक्क करून टाकणारी आहे. पूर्वी घरात ट्रिंग ट्रिंग करणारी फोन हळूहळू मोबाईल चे रूप कधी घेतले हे कळले देखील नाही. एवढेच नाही तर मोबाईल स्मार्ट फोनचे रूप धारण केले हे ही कळले नाही. आज प्रत्येक जण यामुळे स्मार्ट झाला आहे. क्षणात त्यांना हवी ती माहिती मिळत आहे आणि एकमेकांना संपर्क करणे अधिक सोपे झाले आहे. मात्र याच स्मार्ट फोनमुळे त्याला अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे, हे ही विसरून चालणार नाही.
स्मार्ट फोन चांगले जरी वाटत असेल तरी यामुळे लोकं आता चुप झाली आहेत. पूर्वीसारखे बडबड करेनाशी झाली. कारण चोवीस तास त्यांचे डोके त्या मोबाईलच्या स्क्रीन वरच चिकटुन राहत आहे. कधी गाणे पाहणे, तर कधी चित्रपट पाहणे यामुळे मोबाईल सदैव त्यांच्या हाती दिसत आहे. तरुण आणि युवकाना तर या स्मार्ट फोनने अक्षरशः वेड लावले आहे. मागे काही दिवसा पूर्वी एक बातमी वाचण्यात आली होती की, वडिलांनी स्मार्ट फोन घेऊन देण्यास नकार दिल्यामुळे एका युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. काय म्हणावे या तरूण पिढीला .....! आपले अभ्यास आणि मेहनत करण्याच्या या वयात कशाला पाहिजे आपणास स्मार्ट फोन ? त्यांचे उत्तर फार मजेशीर असते ते म्हणतात की माझे सारे मित्र फेसबुक आणि व्हाट्सएप्पचा वापर करतात आणि मी एकटाच वापरत नाही त्यामुळे सर्व मुले माझी टिंगल उडवतात. मला ही फेसबुक आणि व्हाट्सएप्पचा वापर करायचे आहे आणि मित्राशी सदा कनेक्टेड राहायचे आहे. यापेक्षा त्यांना अभ्यास महत्वाचे वाटत नाही ही आजची युवा पिढी. त्यांचे पुढील भविष्य कसे असेल काही कल्पनाही करवत नाही. याचा वापर चांगल्या कामासाठी होत असेल तर ठीक आहे अन्यथा ती पिढी बरबाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फेसबुक वरुन युवकास काही भविष्याचे मार्गदर्शन मिळेल असे वाटत नाही कारण निव्वळ करमणुकीचे एक माध्यम म्हणजे फेसबुक. ज्याला निवांत वेळ आहे, ज्याला कशाचीही काळजी किंवा चिंता नाही अश्या लोकांनी हे वापरावे म्हणजे त्यांचा वेळ मित्रासोबत घालाविता येईल आणि वेळ निघुन जाईल. तेंव्हा युवकानी आपला वेळ संपविण्यासाठी स्मार्ट फोन वापरायचे का ? याचा प्रथम विचार करणे आवश्यक आहे. फेसबुकने सर्वात जास्त भुरळ घातली आहे ती नवयुवकांना. दिवस रात्र फेसबुकवर चैटिंग करत फिरताना घरातील कोणत्याच व्यक्ती सोबत बोलत नाहीत. चिडिचुप व्यवहार चालू असतो. आईने जेवायला बोलावले तरी 'आत्ता एका मिनिटात आलो' म्हणत एक तास उलटतो तरी त्यांची जेवण करण्याची तयारी नसते. म्हणजे तहानभूक विसरून ते या फेसबुकचा वापर करतात. हे कुठे तरी थांबले पाहिजे. यासाठी तरुणाचे याबाबतीत समुपदेशन करणे आवश्यक आहे. वेळेचे काही बंधन स्वतः ला लावून याचा वापर केल्यास हे माध्यम आपणास देणगी ठरु शकते.
फेसबुकच्या नंतर वापरली जाणारी सर्वात जास्त लोकप्रिय झालेली सोशल साइट म्हणजे व्हाट्सएप्प होय. यामुळे तर आबालापासून वृद्धापर्यंत पुरुष आणि स्त्री सारेच जण वेडे बनले आहेत की काय अशी शंका मनात येते. कारण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपी जाईपर्यंत येथे एकमेकांच्या गप्पा न बोलता गपगुमान चालू राहते. घरात कोण आले ? कोण गेले ? याचे त्यांना काही सोयरसूतक नसते. ते आपल्या धुंदीत मदमस्त होऊन रंगून गेलेले असतात. सध्या भारतात जेवढे मोबाईल धारक आहेत त्यातील पाऊण टक्के हे व्हाट्सएप्प चा वापर करतात नव्हे करावेच लागते.
सरकार म्हणते व्हाट्सएपचा वापर करा आत्ता सर्व माहिती यावरच मिळणार, घरी गेल्यानंतर बायको म्हणते पहिले ते व्हाट्सएप बंद करा, घरात काय चालले आहे याकडे तुमचे अजिबात लक्ष नाही, लेकराचे अभ्यास घेणे नाही, बाजारात जाऊन काही सामान आणने नाही, घरातल्या कामात कसलीच मदत नाही,  दिवसरात्र त्या मोबाईल मध्येच डोके खुपसून बसायची सवय लागली, नाही रोगच लागलाय. स्त्री कर्मचारीच्या बाबतीत यापेक्षा काही वेगळे नाही. दिवसभर मोबाईल बघितल्यावर खायला कधी करणार ? या प्रश्नाने ती जागी होते. अन कामाला लागते. हे संवाद कर्मचारी वर्ग असलेल्या घरात सध्या ऐकू येत आहे. कोणत्याही कार्यालयात जावे तेथे हे दोन माध्यम चालूच राहतात. शाळा-महाविद्यालययात सुध्दा हेच चालू असते. त्यामुळे ' शांतता मोबाइल चालू ' असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

सोशल मिडीया मध्ये पालकानी खुप जागरूकपणे पाऊल उचलायला हवे. आपला जास्तीत जास्त वेळ जर पालकानी सोशल मिडीया तील फेसबुक किंवा व्हाट्सअप वर घालवू लागले तर आपले पाल्य बिघडणार नाही हे कश्यावरुन. म्हणून दिवसातील ठराविक वेळ यासाठी देऊन बाकी च्या वेळी आपल्या घरातील पती, पत्नी आई वडील आणि मुले यांच्याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. आज घराघरात अशा तक्रारी ऐकायला येत आहेत की, आमचे हे सदानकदा मोबाईलवरच असतात. घरातल्या कोणाकडे मुळी लक्षच नसते. घरी तेच आणि बाहेरही तेच काय करावे कळत नाही. हे स्मार्ट फोन आल्या पासून ना खुप गप्प गप्प असतात. त्यांचे पूर्वी सारखे बोलणे आत्ता खुप कमी झाले आहे. खळखळुन हसणे आणि हसविणे देखील कमी झाले. जेवताना देखील ते बोलत नाहीत. नेहमी त्यांच्या डोक्यात कश्याचे तरी विचार चालूच असतात. सायंकाळी बाहेर फिरायला जाणे कमी झाले आहे. मित्रासोबत बोलणे कमी झाले. नातेवाईकासोबत वागणे विक्षिप्त झाले. हे सर्व या सोशल मिडीया तील फेसबुक आणि व्हाट्सअप मुळे घडत आहे. मुलांचे संगोपन करण्याची फार मोठी जबाबदारी पालकावर आहे म्हणून सोशल मिडीया चा वापर करीत असताना जरा स्वतः ला जपणे आवश्यक आहे. पालक असलेल्या माता भगिनी यांनी सुद्धा या माध्यमापासून दूर रहावे. महिलांचे व्हाट्सअप आणि फेसबुक सारख्या सोशल मिडीया वर जास्त वावर नसेल ही कदाचित मात्र फोनवर बोलण्याचे प्रमाणा वर मात्र नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. काही महिला फोनवर एक-एक तास संभाषण करतात. त्याचे देखील परिणाम कुटुंबावर होतात. त्यामुळे फोनचा वापर शक्यतो कमी करावा. आजच्या काळात फोन जवळीक आणणारे साधन असले तरी फोनच्या माध्यमातून काही जरी गैरसमज पसरले तर दुरावा निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे त्याचा वापर योग्य पध्दतीने करणे पालकासाठी खुप आवश्यक आहे.

व्हाट्सएपचा वापर करण्यावर काही घरात वादविवाद भांडणतंटे होत असल्याचे ऐकू येत आहेत. यावरून लक्षात येईल की, लोकांना या सोशल मीडियातील फेसबूक आणि व्हाट्सएप किती वेड लावले आहे. एखाद्या दिवशी जर इंटरनेट बंद असेल तर मानसिक स्वास्थ्य बिघडेल की काय अशी शंका सध्या मनात निर्माण होत आहे. याशिवाय मी जगूच शकत नाही असे सध्या ज्याला त्याला वाटत आहे. पण ते आभासी आहे. तेंव्हा फेसबुक आणि व्हाट्सएप व्यसन होणार नाही यांची काळजी आजपासून प्रत्येकानी घ्यावे. येणारा काळ अजुन कठिण येणार आहे. यावर एक जुने गीत आठवते ते म्हणजे ' हमें तो लूट लिया मिलके ......' याच गीतास ऐका वेगळ्या शब्दाने असे म्हणता येईल.

*हमें तो लूट लिया मिलके सोशल मीडियाने*
*फेसबुकवालोंने और व्हाट्सएपवालोंने*

- नागोराव सा. येवतीकर
   स्तंभलेखक
9423625769

Sunday, 4 December 2016

माणुसकी जागवू ; विषमता संपवू

माणुसकी जागवू ; विषमता संपवू

भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक या देशात एकत्र राहतात. देशातील लोकांची एकता हीच राष्ट्रीय शक्ती आहे आणि वेळप्रसंगी ही शक्ती अनुभवास ही येते. सुमारे दोनशे ते तीनशे वर्षापूर्वी भारत हा देश मागासलेला होता मात्र नैसर्गिक साधनसंपत्ती मुळे समृध्द होता. भारताला सोने की चिडिया असेही म्हटले जायचे. परंतु भारतावर ब्रिटिश सरकारची वाईट नजर पडली. सुमारे दीडशे वर्षे भारतावर अधिराज्य केले शिवाय येथील सर्व साधनसंपत्ती लुटून नेली. इंग्रज नीती कधीही चांगली नव्हती. फोडा आणि राज्य करा हे त्यांचे तंत्र होते. भारतात ग्रामीण भागात राहणारी जनता इंग्रज येण्यापूर्वी खुप सुखात आणि आनंदात राहत होती. मात्र व्यापारी म्हणून ब्रिटिश भारतात आले आणि राज्यकर्ते बनून त्यांनी संपूर्ण भारताचा चेहरा पार बदलून टाकला.

इंग्रज जेंव्हा भारतातून गेले त्यावेळी देशात अनेक प्रकारची विषमता दिसून येत होती.

*धार्मिक विषमता :-*

देशातील सर्वात पहिली विषमता म्हणजे धार्मिक विषमता होती. धर्माच्या नावावर भारत आणि पाकिस्तान राज्याची निर्मिती झाली. हिंदू साठी भारत आणि मुस्लिम धर्मासाठी पाकिस्तान अशी सरळ फाळणी करण्यात ब्रिटिश यशस्वी झाले. तो तिढा गेल्या 60 ते 65 वर्षात सोडविता आला नाही. ब्रिटिशाच्या मनात जे कूट विचार होते ते त्यांनी जाता जाता करून गेले. मात्र आजपर्यंत ही धार्मिक विषमता नष्ट झाली नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीप्रमाणे प्रत्येकाची विचारधारा भिन्न असते. त्यामुळे काही लोक या गोष्टीला मानतात किंवा काही लोक कट्टर विरोध करतात. पण हिंदू असो वा मुस्लीम या दोघांनी सुद्धा सामंजस्यपणाने ह्या प्रश्नांची सोडवणूक केली तर अंर्तगत असलेला वाद मिटविण्यासाठी लवादाची काय गरज ? परंतु तसे होताना दिसत नाही. दररोज सीमारेषेवर गोळीबार होत आहेत आणि रोज सैनिक मारला जात आहे. कधी आपला तर कधी त्यांचा. बंदुकीच्या गोळीने ही समस्या धार्मिक विषमता संपणार नाही. खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे ही परमपूज्य साने गुरुजीं यांचे वचन लक्षात घेणे आवश्यक आहे.

ग्रामीण भारतामध्ये आज ही हिंदू-मुस्लिम एकोपा दिसून येतो. मात्र या उलट चे चित्र शहरात पाहायला मिळते. धार्मिक शिक्षण देणाऱ्या मंडळीनी समाजातील लोकांना आपल्या धर्माचे चांगले शिक्षण द्यावे यात काही संदेह नाही मात्र दुसऱ्या धर्मावर टीका, टिपण्णी न करता त्या धर्मात काय चांगले आहे किंवा काय घेता येते यांची माहिती द्यावी. यामुळे धर्मा-धर्मात असलेली तेढ कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल. ही धार्मिक विषमता कमी होण्यासाठी प्रत्येक जण विशेष करून प्रयत्न करणे गरजेचे आहे. धार्मिक तेढ निर्माण होणार नाही असे वर्तन ठेवल्यास भविष्य नक्कीच चांगले असेल.

*जातीय विषमता :-*

भारतात विविध जातीचे लोक एकत्र राहतात. हाताची पाचही बोटे सारखी नसतात या म्हणीप्रमाणे प्रत्येक जण जगावेगळा असतो, मग तो कोण्या ही जातीचा का असेना. पण भारतात सध्या जातीयतेवरुन खुप गढुळ वातावरण तयार होताना दिसून येत आहे. प्रत्येक व्यक्ती आपलीच जात सर्वश्रेष्ठ कशी आहे हे दाखविण्याची शर्यत लागली आहे की काय असे वाटू लागले. प्रत्येक जातीतील लोक आपली शक्ती प्रदर्शन दाखवित आहेत. एका समाजातील जातीचा मोर्चा निघाला म्हणाले की असे प्रत्येक जातीचे लोक मोर्चा काढत आहेत आणि यात सामान्य लोकांना विविध संकटाना तोंड द्यावे लागते. जातीयतेचे सर्वात जास्त चटके डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सहन करावे लागले. त्यातून त्यांना बरेच काही अनुभव आले. म्हणून तर त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरच्या दीक्षाभूमी वर हजारो अनुयायीना सोबत घेऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांनी समाजातील जातीयता नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण आज समाजातील ही जातीयतेची विषमता नष्ट झाली काय ? याचे उत्तर नाही असे मिळते. आजही समाजात जातीवरुन लोकांना उच्च-नीचतेची वागणूक दिली जाते. अमक्या कमी जातीचा आहे म्हणून त्यांच्या सोबत कुणी संपर्क करीत नाहीत की जवळ येऊ देत नाहीत. माझा एका मित्राला राहण्यासाठी किरायाने घर सुध्दा मिळाले नाही. कारण काय तर तो अमक्या जातीचा आहे. काय ही विषमता ? लोकांच्या आडनावावरुन ही लोक एकमेकाला दूर करताना दिसतात. ही जातीय विषमता नष्ट होणे आवश्यक आहे. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही म्हणून प्रत्येकाने सामंजस्यपणाने राहाणे आणि वागणे आवश्यक आहे ?  याचा एक वेळा विचार करावा.

*आर्थिक विषमता :-*

ज्यांच्याकडे पैसा त्यांच्याकडे सर्व काही उपलब्ध होते तर जो गरीब आहे त्यास एक वेळचे पोट भरण्यासाठी जेवण ही मिळत नाही अशी विदारक स्थिती भारतात बघायला मिळते ही आहे आर्थिक विषमता. श्रीमंत लोक गरीब व्यक्ती कडे फारच तुच्छ नजरेने पाहतात. त्यामुळे त्यांच्यात कधीच समानता दिसून येत नाही. समाजाने सुद्धा तशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. श्रीमंत माणसे आलीशान बंगल्यात रहावे आणि गरीब लोक झोपडीत रहावे असा विधिलिखित नियम केला आहे असे वाटते. दारिद्रयरेषेखालील लोकांच्या नावाच्या यादीतील नावे कमी होण्या ऐवजी दिवसेंदिवस त्यात भरच पडत आहे. या यादीत नाव यावे म्हणून लोक धडपड करताना पाहून या लोकांची कीव आल्याशिवाय राहत नाही. श्रीमंत लोकांची नावे या यादीत पाहून हसावे की रडावे हेच मुळात कळत नाही. दारिद्रयरेषेखालील जीवन जगणे खुप हालअपेष्टाचे असते असे चित्र कुठे ही दिसत नाही कारण मूळ दारिद्रयरेषेखालील लोक बाजूला राहतात आणि इतर लोक मात्र योजनेचा फायदा घेतात, याचा विचार सामान्य लोकांनी करावा. या देशात एका बाजूला घरात मुबलक अन्न आहे तर भूक लागत नाही आणि दुसऱ्या बाजूला भूक आहे पण त्यांना खायला अन्न मिळत नाही असे विरोधाभास असलेले चित्र दिसते. ही आर्थिक विषमता संपविणे आवश्यक आहे असे वाटते. यासाठी स्वातंत्र्य काळात विनोबा भावे यांनी संपूर्ण भारतात भूदान चळवळ सुरु केली होती. प्रत्येक व्यक्ती कडे संपत्ती किती प्रमाणात रहावा याविषयी एखादा कायदा निर्माण केले तर संपत्ती एका व्यक्ती जवळ एकवटल्या जाणार नाही. जसे की सध्या भारताचे पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांनी सोने वापरण्यावर निर्बंध आणले आहेत. विवाहित स्त्री 50, पुरुष 10 आणि अविवाहित स्त्री 25 तोळे सोने वापरता येईल असा नियम केला आहे. असेच काही नियम घर, बंगला, गाडी, पैसा याबाबत करायला हवे तरच ही आर्थिक विषमता दूर होऊ शकते.

*शैक्षणिक विषमता :-*

स्वातंत्र्यपूर्वी भारत देशात शिकलेल्या लोकांची संख्या फारच कमी होती त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशापुढे लोकांची निरक्षरता हा फार मोठा प्रश्न होता, यास शैक्षणिक विषमता असे म्हटले जाते. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटले आहे तर शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे त्याचे जे कुणी प्राशन करील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. या सारख्या तत्ववेत्या महान लोकांच्या म्हणण्यानुसार शैक्षणिक क्रांती होत गेली आणि समाजात आज थोडी फार समानता दिसून येत आहे. पण ती समानता पुरेशी नाही कारण आज ही शैक्षणिक विषमता भरपूर प्रमाणात दिसून येते. इयत्ता पाहिली ते आठव्या  वर्गापर्यंत मोफत शिक्षण दिले म्हणजे शैक्षणिक समानता मिळणार नाही. आरक्षणाचा लाभ घेऊन देखील आज किती लोक उच्च शिक्षण पूर्ण करतात हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. जर आरक्षण मिळालेच नसते तर या भारतात आज काय चित्र राहिले असते याचा कधी एक वेळा तरी विचार केला आहे का ? या प्रश्नवार एकदा विचार करा अन बघा आपले मन  किती अस्वस्थ होते ते. तरी सुध्दा ही शैक्षणिक विषमता नष्ट करण्यासाठी प्रत्येक शिक्षित व्यक्तिनी स्वतः हुन पुढाकार घेतला पाहिजे लोकांना शिक्षित आणि सजग करण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजे. तरच ही शैक्षणिक विषमता दूर होईल.

*स्त्री-पुरुष विषमता :-*

स्त्री पुरुष समानता हे फक्त कागदा वर लिहिण्यापुरते आणि भाषणात बोलण्यापुरते छान वाटते. पण प्रत्यक्षात मात्र स्त्री पुरुषा मध्ये कुठेच समानता आढळून येत नाही. घराच्या उंबरठ्यापासून ते थेट संसदेच्या दारापर्यंत पदोपदी आपणास स्त्री आणि पुरुषात विषमता दिसून येते. स्त्री सुद्धा एक व्यक्ती आहे म्हणून तिला घटनेने सर्व प्रकारचे हक्क दिले आहे. महिलांना 33 टक्के आरक्षण दिलेले आहे त्यामुळे तिचा विकास होईल आणि ही विषमता संपेल. पण या आरक्षण प्रणालीचा काही उपयोग होताना दिसत नाही. ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदच्या अध्यक्ष पदापर्यंत महिला निवडून जात आहेत. पदभार स्विकारत आहेत मात्र कार्यभार त्यांच्या पती, दीर, मुलगा यांच्या हाती आहे. ती फक्त सही पुरती शिल्लक उरली आहे. अश्याने स्त्री पुरुष  विषमता संपेल काय ? आज मुलीचा जन्मदर दर हजारी पुरुषामागे नऊशेच्या घरात आहे म्हणजे मुलगा आणि मुलगी यांच्या जन्म दरात शंभर चा फरक आहे. ही विषमता भरून निघाली नाही तर भविष्यकाळ खुपच अवघड आहे. प्रत्येक जण वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा असा हट्ट धरतात. मुलगी परया धन म्हणून तिच्या जन्माने नाके मुरडली जाते, तिचा जन्म नकोशी वाटते. ही विचारधारा संपुष्टात येणे आवश्यक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या विचाराने संविधान तयार केले ते स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न केले पाहिजे तरच धार्मिक, जातीय, सामाजिक, शैक्षणिक आणि स्त्री-पुरुषातील विषमता दूर होण्यास मदत मिळेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की गुलामाला गुलाम असल्याची जाणीव करून द्या म्हणजे तो गुलामगिरीविरुध्द बंड करून उठेल. त्यांच्या याच वचनाचा आपण असा अर्थ घेऊ या माणसाला माणूस असल्याची जाणीव करून द्या तो नक्की माणुसकी जपल्याशिवाय राहणार नाही. समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी प्रत्येकांची माणुसकी जागी व्हायला पाहिजे.

- नागोराव सा. येवतीकर

स्तंभलेखक , 9423625769

nagorao26@gmail.com

हेडफोन पासून दूर रहा

हेडफोन पासून दूर रहा

कानात हेड फोन लावून रुळावरुन जाणाऱ्या एका विद्यार्थ्याला निजामुद्दीन - यशवंतपूर एक्सप्रेसने उडविले आणि त्यात त्याचा करुण अंत झाला असल्याची बातमी वाचण्यात आले. मोबाईलच्या हेडफोन मुळे त्या युवकाचा मृत्यू झाला. वास्तविक पाहता रेल्वेचा आवाज किती मोठा असतो तरी ही त्याला ऐकू आले नाही कारण त्याचे सर्व लक्ष त्या मोबाईल वर चालत असलेल्या गाण्यावर असल्यामुळे हा प्रकार घडला. गाणे ऐकल्यामुळे शारीरिक थकवा दूर होते आणि मानसिक आधार मिळतो म्हणून आपण निवांत क्षणी गाणे ऐकत असतो. फार पूर्वी गाणे ऐकन्यासाठी टेपरिकॉर्डर सारख्या साधनाचा वापर केला जात होता. त्या पूर्वीचा जर विचार केलो तर रेडियो हे सुद्धा एक साधन होते गाणे ऐकण्यासाठी. आकाशवाणीवरील कार्यक्रम लोक मोठ्या उत्साहाने ऐकत असत. सकाळी पहाटेच्या भक्तिगीतापासून दिवसाची सुरुवात व्हायची ती शेवटचे सदाबहार गाणे ऐकल्यावर रेडियो बंद व्हायचा. रेडियोवरील बातम्या सुध्दा मन लावून ऐकले जायचे. काही मंडळी खास करून बातमी ऐकण्यासाठी रेडियो ज्यांच्या घरी असेल त्यांच्या घरी जायचे. कारण तेंव्हा वर्तमानपत्र सुद्धा वाचण्यास मिळत नव्हते. चालू घडामोडी समजून घेण्यासाठी रेडियो एकच माध्यम होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा रेडियोला अच्छे दिन आले आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. पूर्वी घरात रेडियो असणे श्रीमंतीचे लक्षण समजले जायचे. कानाला रेडियो लावून क्रिकेट समालोचन ऐकण्याची मजा काही औरच होती. रेडियो सिलोन आणि विविधभारती स्टेशन फार मोठ्या प्रमाणावर ऐकले जायचे. रेडियोचे श्रोते आपले आवडीचे गाणे ऐकण्यासाठी पोस्टातील पत्रव्यवहार करायचे. काळ बदलला आणि रेडियोची जागा टीवी ने घेतली तसे हळूहळू बदल दिसू लागले.
प्रत्येकांच्या घरात टीवी ने कोपऱ्याची जागा मिळविली त्यातल्या त्यात रंगीन टीवी मुळे तर लोक अजुन याकडे आकर्षित झाले. तंत्रज्ञानच्या प्रगतीमुळे पाहता पाहता अनेक शोध लागू लागले. 10 -12 वर्षापूर्वी फक्त श्रीमंत लोकांकड़े असलेले मोबाईल आज प्रत्येकांच्या खिशात खणखणु लागले. माणसाच्या आयुष्यात जसे ही या मोबाईलचा समावेश झाला तसे अनेक गोष्टी काळाच्या पडद्याआड झाले. विशेष करून रेडियो, टेप रिकॉर्डर हे अडगळीत पडले आणि आत्ता मोबाईल वर सर्व काही मिळू लागले.
मोबाईल ही आज जीवनावश्यक बाब बनली आहे. क्षणभर सुध्दा त्याशिवाय जीवन जगणे अशक्य बनले आहे. या छोटाश्या मोबाईल मध्ये माणसाच्या करमणुकीसाठी हवी असलेली प्रत्येक बाब समाविष्ट केलेली आहे, जसे की यात गाणे ऐकता आणि पाहता येण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यात एखादा गेम सुध्दा खेळत येऊ शकतो. व्हाट्सएप्प, फेसबुक किंवा ट्विटर सारख्या सोशल मीडिया मुळे लोकांच्या हातात सदानकदा मोबाईल विराजमान झाले आहेत.
मोबाईलचा वापर जेवढा चांगल्या कामासाठी करता येतो अणि तेवढा वाईटसाठी पण. सध्या कानाला हेड फोन लावून गाणे ऐकण्याची वाईट सवय लोकांना लागली आहे. गाणे ऐकन्यात धन्य मानले जात आहे. ज्यामुळे बरेच जीव गमवावे लागले. रस्त्यावर गाडी चालवित असताना ही कानाला हेड फोन लावून गाणे ऐकण्याच्या प्रकारामुळे अनेक रस्ते अपघात घडत आहेत. काही दिवसांपूर्वी आंध्रप्रदेशात एक स्कुल बस चालक कानाला हेड फोन लावून गाणे ऐकत रेल्वे क्रॉस करताना अपघात झाला ज्यात अनेक चिमुकल्या जीवाना आपले प्राण गमवावे लागले. आज काल तरुण पिढी कानाला हेड फोन लावून गाणे ऐकण्यात स्वतः ला धन्य समजतात. रेल्वेने प्रवास करीत असताना ही कानसेन मंडळी कानात हेडफोन लावून दारावर लोंबकळत असतात. तोल सुटल्यामुळे किंवा अन्य कारणाने काही कळण्याच्या आत दुर्दैवी घटना घडते आणि विनाकारण त्याचा जीव जातो. जाणाऱ्याचा जीव जातो मात्र त्याच्या मागे राहणारे लोकांना त्याचा काय त्रास सहन करावा लागतो, हे त्यांनाच कळते. ज्यांच्या घरी अशी दुर्घटना झाली असेल, त्यांचे सर्व घर दुःखाच्या डोंगराखाली येतो. त्यामुळे आपल्या वागण्यामुळे कोणाला त्रास होणार नाही असे वागणे केव्हाही चांगले. कानाला हेड फोन लावून मोबाईल वरील गाणे ऐकणे कधी ही चांगले नाही त्यामुळे कानाचा ही त्रास संभावतो. शक्यतो हेडफोनपासून दूर राहिलेले केव्हा ही बरे नाही का ....?

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  9423625769

Saturday, 3 December 2016

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लेख

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त प्रासंगिक लेख

"  शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा "

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेश मधील महू येथे झाला. त्यांचे मूळ नाव भीमराव असॆ होते. परंतु भारतातच नाही तर परदेशात ते बाबासाहेब या नावानेच सुप्रसिध्द आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. भीमराव लहान असताना त्यांची आई देवाघरी गेली. तेंव्हा त्यांच्या आत्यानी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील उद्योगी, महत्वाकांक्षी आणि शिस्तीने वागणारे होते. लष्कराच्या शाळेत शिकून लष्कराच्याच शाळेत नोकरी करीत होते. ते सुभेदार मेजर या पदापर्यंत पोहोचले होते. शिक्षणाविषयी त्यांचे वडील जागरूक होते, त्यामुळे त्यांनी भीमरावाच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष दिले. बाबासाहेब लहानपणापासूनच जिद्दी स्वभावाचे होते. एखादी गोष्ट पूर्ण करायची म्हटले की, ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैन पडायचे नाही. आपण फुकट वेळ घालवायचा नाही, झटून अभ्यास करायचा ही वडीलांची लहानपणीची शिकवण त्यांनी संपूर्ण जीवनभर अवलंबिले. आजुबाजुला घडणाऱ्या बारीकसारीक गोष्टीकडे बाबासाहेबांचे बारकाईने लक्ष असॆ. बाबासाहेबांना लहानपणापासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. शाळेत शिकत असताना त्यांना स्वतःच्या गोणपाटावर बसावे लागायचे, तसेच शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या हौदेला हात लावण्याची परवानगी नव्हती. शाळेत चपरासी उपस्थित असेल तरच पिण्यासाठी पाणी मिळत असॆ अन्यथा तसेच घरी जावे लागत असॆ. ओंजळीने पाणी प्यावे लागत असॆ.  सर्व मित्रांसोबत एकत्र बसण्याची परवानगी नव्हती लहानपणी त्यांच्या जीवनात आलेल्या या कटू अनुभव आणि दाहकता त्यांच्या मनाला चटके देऊन गेली. यातूनच बाबासाहेब घडत गेले. याच प्रसंगांतून शिकवण घेऊन त्यांनी सन 1927 मध्ये इतिहासात खूपच प्रसिध्द असलेला महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, येथूनच त्यांच्या लढ्यास प्रारंभ झाला असॆ म्हणण्यास काही हरकत नसावी. त्यानंतर त्यांनी नाशिकचा काळाराम मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी लढा दिला आणि त्यात ते यशस्वी सुध्दा झाले. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला, त्या लोकांचा उध्दार करणे हे आपले कर्तव्य आहे ही जाणिव ज्यांना आहे ते धन्य होत असॆ ते मानीत. त्यांच्या या विचारांची आज खरी गरज आहे. स्वतःचा समाज आणि जमात यांच्याविषयी ज्यांच्या मनात तळमळ राहत नाही, त्यास जगण्याचा खरा अर्थ ही कळत नाही. बाबासाहेबांना स्वतःच्या समाजाविषयी व जातीविषयी खूप तळमळ होती. लोकांची दयनीय अवस्था पाहून त्यांना अस्वस्थ वाटायचे.  लहानपणी बाबासाहेबांना ज्या ज्या गोष्टीचा त्रास झाला, तो तो त्रास समाजातील इतर बांधवांना होऊ नये यांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. शेवटी सनातन्यांच्या अवमानी वृत्तीला कंटाळून बाबासाहेबांनी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे धर्मांतराचा. बुद्धाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृशच नव्हे तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही असा त्यांचा ठाम निश्चय झाला होता. बाबासाहेबांना बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण , सदाचार , समता , स्वातंत्र्य व बंधुतेचा वाटला, बौद्ध धर्माचे त्यांना खूप आकर्षण होते. ह्याच धर्माच्या आधाराने आपल्या लोकांचा विकास साधता येतो म्हणून विजयादशमीच्या पर्वावर दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षा भूमीवर हजारों अनुयाया सोबत बौद्ध धर्माचा जाहिररित्या स्विकार केला आणि “साऱ्या भारताला मी बौद्धमय करीन ” अशी गगनभेदी भीमगर्जना केली.

देशांतील अतिगरीब आणि अतिमागास असलेल्या लोकांना शिक्षणाचे महत्व त्यांनी पटवून दिले. शिक्षणानेच समाज परिवर्तन होऊ शकते असे त्यांचे मत होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, त्यांचे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असॆ त्यांनी लोकाना सांगितले होते. शिक्षण प्राप्त झाल्याने मनुष्य विचाराने समृद्ध होतो. माणसाला काय  चांगले आणि काय वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा , शील आणि करुणा  हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. म्हणूनच लोकांनी शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले आणि स्वतः सोबत आपल्या परिवाराचा पर्यायाने समाजाचा विकास साधला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले म्हणून त्यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असॆ म्हटले त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. यांसाठी त्यांनी १९४६ मध्ये पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरु केले . राष्ट्रहिताचे व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय, असे त्यांचे म्हणणे होते.

प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असून त्याला स्वतःला एक अस्मिता आहे. याची जाणिव प्रत्येकाना होणे गरजेचे म्हणूनच ते एका जातींतल्या लोकांना नाही तर समस्त लोकाना उद्देशून म्हटले आहे की, गुलामाला गुलाम असल्याची जाणिव करून द्या तो नक्की बंड करून उठेल. याच अर्थातून माणसाला माणूस म्हणून ओळख देण्याचा प्रयत्न सुध्दा त्यांनी केला. म्हणूनच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर देवासमान आहेत. गौतम बुध्दाच्या शिकवणीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे असॆ गौतम बुध्दानी जे म्हटले त्याचा बाबासाहेबानी आयुष्यभर पालन केले. त्यांचे पुस्तक वाचनावर विशेष प्रेम होते, त्यांना वाचण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे सदानकदा ते वाचन करताना आढळून येत असत. एकदा वाचन करीत बसले की सर्व काही विसरून जात असत. सलग 18 - 18 तास अभ्यास करायचे. या वाचनामुळेच त्यांच्या ज्ञानात भरमसाठ वाढ होत गेली. त्यांचे राजगृह घर पुस्तकाने भरून गेले होते. त्यांनी अनेक पुस्तकांचा अभ्यास केले आणि विविध विषयांवर 53 पुस्तके लिहली. त्यांची कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द या दोन गोष्टीमुळे भारताचा कायापालट झाला असॆ म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण त्यांनी दोन वर्ष अकरा महीने सतरा दिवस अहोरात्र विविध देशाच्या कायद्याचा अभ्यास करून भारताची घटना संविधान तयार केली. त्याच घटनेवर आज भारत देश सुरक्षित असून प्रगतशील राष्ट्रांच्या यादीमध्ये भारत अगदी वरच्या स्थानावर आहे. त्यांच्यामुळेच आज देशांतील प्रत्येक व्यक्तीला हक्काने जीवन जगता येतो. आपल्यावर अन्याय होत आहे असॆ वाटल्यास न्यायालयाद्वारे प्रत्येकाला न्याय मिळविता येतो. समता, बंधूता आणि समानता या राष्ट्रीय मूल्यांची जोपासना या घटनेद्वारे केल्या जाते. म्हणूनच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असॆ म्हटले जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घालून आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली . त्यांनी मनुष्यमात्रांच्या जीवनातील दुःख , दारिद्र्य आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले संपूर्ण ज्ञान आणि माहितीच्या बळावर रंजल्या-गांजल्या जनतेच्या , शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या तसेच स्त्री वर्गाच्या उद्धारार्थ आपले प्राणपणाला लावून योग्य रस्ता दाखविले आणि मानवतेची दिव्यज्योत निर्माण केले. त्यांनी फक्त दलित लोकांचाच उध्दार केला नसून समस्त भारतीय लोकांना आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी वाव दिलेला आहे. ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती सर्वाना नेहमीच प्रेरक ठरते. या महामानवाचे कार्य म्हणजे समाजासाठी व देशासाठी एक दिशादर्शक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. अश्या महामानवाची दिनांक 06 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले, आज त्यांची जयंती त्यानिमित्त त्यांच्या पावन स्मृतिस कोटी कोटी प्रणाम.


- नागोराव सा. येवतीकर

( लेखक नांदेड जिल्हा परिषदेत उपक्रमशील शिक्षक आहेत. )

  मु. येवती ता. धर्माबाद 

  9423625769

nagorao26@gmail.com


Monday, 28 November 2016

खबरदार

खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय

सकाळी सकाळी त्या बातमीने सारा गाव दुःखात बुडालेले होते. कारण गावातील एका तिसीच्या आतील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जीवन जगण्यास सुरुवात ही झाली नव्हती की त्याचा शेवट झाला. त्याच्या मरणावर लोक काही बाही बोलत होते, एकमेकाच्या कानात कुजबुजत होते. त्यास महारोग झाला होता, वाचणे शक्य नव्हते, बरे झाले गेला तो, असे अनेकाचे बोलणे कानावर पडत होते. यावरून माहिती मिळाली की तो युवक एड्सचा रुग्ण होता आणि गेल्या पाच-सहा महिन्यापासून अंथरुणावर पडून होता. वास्तविक पाहता तो एक चांगला धडधाकट आणि मेहनती तरुण होता. गावात काही काम मिळत नाही म्हणून पैसे कमाविण्यासाठी दोन वर्षापूर्वी मोठ्या शहरात गेला होता. भरपूर मेहनत करून दोन वर्षात खुप संपत्ती कमाविली आणि परत आपल्या गावी आला. परत येताना मात्र संपत्ती सोबत एड्स नावाचा रोग ही घेऊन आला होता. त्याचे लग्न होऊन वर्ष ही उलटले नव्हते. एके दिवशी त्याला खुप ताप चढली म्हणून दवाखान्यात नेण्यात आले. तेथे त्याची लघवी आणि रक्ताचे नमुने तपासण्यात आले. याच निमित्ताने कळले की तो HIV पॉजिटिव आहे. असे कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तो अर्ध मेला झाला होता. जसेही ही गोष्ट त्याच्या बायकोला कळाली तसे तिने सर्वात पहिल्यांदा त्याचा त्याग केली. मागे पुढे कश्याचाही विचार न करता तिने घर सोडण्याचा विचार केला. हा जबर धक्का त्यास बसला. तो पूर्वीच शरीराने खंगला होता आत्ता मनाने ही खचला होता. काही दिवसानंतर ही गोष्ट घरात कळाली तेंव्हा घरात चिंतेचे वातावरण तयार झाले. घरातल्या लोकांनी त्यास वेगळ्या खोलीत जागा करून दिली, त्यांचे सर्व साहित्य वेगळे करण्यात येऊ लागले म्हणजे जवळपास त्यास वाळीत टाकल्यासारखी वागणूक मिळाली. त्याचे गावात फिरणे कमी झाले. लोकांशी संपर्क कमी झाला. लोक सुद्धा त्यास फटकारुन राहू लागले. त्याची रोज थोडी थोडी शक्ती कमी होऊ लागली. कामासाठी मोठ्या शहरात गेला होता तेंव्हा त्यांच्या हातून झालेल्या चुकाची आत्ता त्यास पश्चाताप वाटत होता. पण त्यांच्या हातात काही उरले नव्हते. अखेर तो दिवस उजाडला आणि त्याचा शेवट झाला. वास्तविक पाहता तो त्याच दिवशी मेला होता, ज्यादिवशी त्याची बायको त्याला सोडून गेली होती. वास्तविक पाहता ज्याठिकाणी गरज होती मानसिक आधार द्यायची त्याठिकाणी ती मागे पुढे विचार न करता त्यास सोडून गेली. तिने जर आधार दिला असता तर काही दिवस आनंदात जगला असता. घरच्यानी सुद्धा त्यास खुप हीन वागणूक दिली ज्यामुळे त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण झाले आणि मी कधी एकदा मरतो की काय असे त्याला वाटू लागले.
     प्रातिनिधीक स्वरूपातील ही कहाणी एका युवकाची नाही तर देशात असे अनेक युवक आहेत जे की कळत नकळत एड्स या आजाराशी जोडल्या गेले आहेत. एड्स रुग्णाची संख्या सध्या लाखाच्या घरात आहे. दहा वर्षा पूर्वीची जी संख्या होती ती संख्या आज नक्कीच नाही. याचे सारे श्रेय आरोग्य विभागला जाते, ज्यानी या विषयी खुप जनजागृती केली आणि त्यावर नियंत्रण मिळविले. ज्या चार कारणा मुळे एड्स चा प्रसार होतो ती कारणे आत्ता सर्व लोकांना कळून चुकले आहे. मात्र तरी सुध्दा काही ठिकाणी याचे रुग्ण जेंव्हा आढळून येतात तेंव्हा परत काळजी वाढू लागते.
संपूर्ण जगात 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो. ‘एड्स’ हा शब्द उच्चारताना किंवा ऐकताना काळीज धस्स करते. हा रोग कुणाला झाला असे कळाले की अंगावर काटे उभे राहतात. एड्स झालेल्या रुग्णाला समाजात वेगळ्या नजरेने पाहिले जाते. पूर्वी कर्करोग म्हणजे कॅन्सर हा सर्वांत भयानक रोग असे मानले जात असे. कॅन्सर म्हणजे माणूस कॅन्सल असे बोलले जायचे. मात्र जसे ही ‘एड्स’ विषयी लोकांना कळायाला लागले तसे मोठ्या रोगाच्या यादीत वरच्या क्रमांकावर एड्स या रोगाला पाहण्यात येऊ लागले. विज्ञानाच्या प्रगती मुळे कॅन्सरवर आता इलाज शक्य झाले आहे. समाजात अनेक रुग्ण यातून वाचले आहेत असे आढळून येतात. वैद्यकीय उपचार किंवा शस्त्रक्रिया करून कॅन्सर बरा होऊ शकतो. मात्र एड्सचे तसे नाही त्यामुळे लोकांच्या मनात या रोगाविषयी खुप भीती निर्माण झाली आहे. सन १९८६ साली भारतातल्या मद्रासच्या वेश्या वस्तीत पहिल्या एड्सच्या रुग्णाचं निदान झालं. तसे पाहिले तर सन 1981 साली जगात अमेरिकेत हे रुग्ण सापडले होते. मग त्या पाठोपाठ अनेक मोठमोठ्या शहरातून एड्स विषयीची तपासणी झाली आणि त्या ठिकाणी अनेक रुग्ण सापडू लागले. एड्स नावाचा भस्मासुर देशात उत्पन्न झाल्याची बातमी बघता बघता देशात सगळीकडे पसरली. लोकांना याविषयी सुरुवातीला काहीच माहित नव्हते मात्र आज 30 वर्षा नंतर या रोगाविषयी प्रत्येक जण जाणुन आहे. आजतागायत एड्स ह्या आजारावर कसलाही इलाज, औषध, लस किंवा उपचार  यांचा शोध लागला नाही. यावर उपचार नसल्यामुळे खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय आहे याची माहिती सुध्दा लोकांना आत्ता झाली आहे. 
योग्य वयात योग्य वेळी समज मिळाली तर त्यांचे जीवन सूकर होते. मात्र भारतात लैंगिक शिक्षण हा विषय काढला की लोकं नाक मुरडतात. त्यांना अस्वस्थ वाटायला लागते. पण जेंव्हा पोरगा हातून वाया जातो त्यावेळी विचार करतो की मी एकदा तरी त्याच्या सोबत याविषयी का बोललो नाही. तसा हा विषय खुलेपणाने किंवा मोकळ्या मनाने बोलण्यासारखा नाही. म्हणून त्यास लपवून लपवून बोलेल्या जाते. यामुळे मुले सुद्धा व्यक्त होत नाहीत. मग मित्राकडून चुकीची माहिती मिळविली जाते आणि हा त्याच्या आहारी जातो. आजकाल तर मोबाईलमुळे मुले अजुन जास्त बिघडत चालली आहेत. पूर्वी जे लपून छपुन अश्लील सिनेमा पाहिले जायचे ते आत्ता मोबाईल वर एका क्लिकवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे युवा पिढी नको त्या गोष्टी आत्मसात करीत आहेत. व्यसन करणारी पिढीवर फार लवकर याचा प्रभाव जाणवत आहे. बेरोजगार युवक आपल्या हाताला काही काम धंदा नसल्यामुळे व्यसनाच्या आहारी जात आहे. दारू पिने, गुटखा खाने, नशा करणे या सर्व वाइट सवयी वाइट संगतीच्या मित्रा कडून मिळत आहेत. म्हणून नकळत त्याचे पाय नरकात जात आहे. आई-वडिलांचे फाजिल लाड सुध्दा त्यास कारणीभूत आहेत. आपल्या मुलांचे मित्र कोण आहेत ? दिवसभर काय करतात ? या गोष्टीची शहानिशा पालकानी करणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्याने मागितलेली वस्तू त्यास देणे एवढे काम मात्र पालक न चुकता करीत आहेत. आपल्या मुलांना या वयात एका मित्रा प्रमाणे वागणूक देऊन एकमेकास समजून घेतल्यास ही वेळ नक्की येणार नाहीज्या तरुण पिढी वर भारताची प्रगती अवलंबून आहे ती पिढी अश्या रोगाच्या विळख्यात जखडल्या जात आहे. यापासून वाचण्यासाठी खबरदारी घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर 
  मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
  9423625769
  nagorao26@gmail.com

Sunday, 27 November 2016

A I D S

जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त प्रासंगिक लेख

                 खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय

संपूर्ण जगात 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो. ‘एड्स’ हा शब्द उच्चारताना किंवा ऐकताना काळीज धस्स करते. हा रोग कुणाला झाला असे कळले की अंगावर काटे उभे राहतात आणि त्या रुग्णला वेगळ्या नजरेने पाहिले जाते.पूर्वी कर्करोग म्हणजे कॅन्सर हा सर्वांत भयानक रोग असे मानले जात असे. कॅन्सर म्हणजे माणूस कॅन्सल असे बोलले जायचे. मात्र जसे ही ‘एड्स’ विषयी लोकांना कळायाला लागले तसे मोठ्या रोगाच्या यादीत वरच्या क्रमांकावर एड्स ला पाहण्यात येऊ लागले. विज्ञानाच्या प्रगती मुळे कॅन्सरवर आता इलाज शक्य झाले आहे. समाजात अनेक रुग्ण यातून वाचले आहेत असे आढळून येतात. वैद्यकीय उपचार किंवा शस्त्रक्रिया करून कॅन्सर बरा होऊ शकतो. मात्र एड्सचे तसे नाही त्यामुळे लोकांच्या मनात या रोगाविषयी खुप भीती निर्माण झाली आहे. सन १९८६ साली भारतातल्या मद्रासच्या वेश्या वस्तीत पहिल्या एड्सच्या रुग्णाचं निदान झालं. त्या पाठोपाठ अनेक मोठमोठ्या शहरातून एड्स ची तपासणी झाली अशा ठिकाणी अनेक रुग्ण सापडू लागले आणि एड्स नावाचा भस्मासुर देशात उत्पन्न झाल्याची बातमी बघता बघता देशात सगळीकडे पसरली. लोकांना याविषयी सुरुवातीला काहीच माहित नव्हते मात्र आज 30 वर्षा नंतर या रोगा विषयी प्रत्येक जण जाणुन आहे. आजतागायत एड्स ह्या आजारावर कसलाही इलाज, औषध, लस यांचा शोध लागला नाही. यावर उपचार नसल्यामुळे खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय आहे याची माहिती सुध्दा लोकांना आत्ता झाली आहे. याविषयी एक अनुभव मला प्रकर्षाने सांगावेसे वाटते, सकाळी सकाळी त्या बातमीने सारा गाव दुःखात बुडाले होते. कारण गावातील एक तरुण तिसीच्या आतील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मरणावर लोक काही बाही बोलत होते, एकमेकाच्या कानात कुजबुजत होते. त्यास महारोग झाला होता, वाचणे शक्य नव्हते, बरे झाले गेला तो, असे अनेक बोलणे कानावर पडत होते. यावरून माहिती मिळाली की तो एड्सचा रुग्ण होता आणि गेल्या पाच-सहा महिन्यापासून अंथरुणावर पडून होता. पैसे कमविण्यासाठी दोन वर्षापूर्वी मोठ्या शहरात गेला होता. भरपूर मेहनत करून खुप संपत्ती कमविली आणि परत आपल्या गावी आला मात्र येताना एड्स नावाचा रोग घेऊन आला होता. लग्न होऊन वर्ष ही उलटले नव्हते. एके दिवशी खुप ताप चढली म्हणून दवाखान्यात नेले. तेथे रक्त तपासण्याचे निमित्त झाले अन कळले की HIV पॉजिटिव आहे. असे कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. जसे ही ही गोष्ट बायकोला कळली तसे तिने सर्वात पहिल्यांदा त्याचा त्याग केली. मागे पुढे कश्याचाही विचार न करता तिने घर सोडण्याचा विचार केला. हा जबर धक्का त्यास बसला. तो पूर्वीच शरीराने खंगला होता आत्ता मनाने ही खचला होता. काही दिवसानंतर ही गोष्ट घरात कळाली तेंव्हा घरात चिंतेचे वातावरण तयार झाले. घरातल्या लोकांनी त्यास वेगळ्या खोलीत टाकले, त्यांचे सर्व साहित्य वेगळे करण्यात येऊ लागले म्हणजे जवळपास त्यास वाळीत टाकल्यासारखी वागणूक मिळाली. गावात फिरणे कमी झाले. लोकांचा संपर्क कमी झाला. रोज थोडी शक्ती कमी होऊ लागली. मोठ्या शहरात त्यांच्या हातून झालेल्या चुकाची आत्ता त्यास पश्चाताप वाटत होता पण त्यांच्या हातात काही उरले नव्हते. अखेर तो दिवस उजडला आणि त्याचा शेवट झाला. वास्तविक पाहता तो त्याच दिवशी मेला होता, ज्यादिवशी त्याची बायको त्याला सोडून गेली होती. वास्तविक पाहता ज्याठिकाणी गरज होती मानसिक आधार द्यायची त्याठिकाणी ती मागे पुढे विचार न करता त्यास सोडून गेली. तिने जर आधार दिला असता तर काही दिवस आनंदात जगला असता. घरच्यानी सुद्धा त्यास खुप हीन वागणूक दिली ज्यामुळे त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण झाले आणि मी कधी एकदा मरतो की असे त्याला वाटू लागले.
     प्रातिनिधीक स्वरूपातील ही कहाणी एका युवकाची नाही तर देशात असे अनेक युवक आहेत जे की कळत नकळत या आजाराशी जोडल्या गेले आहेत. एड्स रुग्णाची संख्या लाखाच्या घरात आहे. दहा वर्षा पूर्वीची संख्या आज नक्कीच नाही याचे सारे श्रेय आरोग्य विभागला जाते, ज्यानी या विषयी खुप जनजागृती केली आणि त्यावर नियंत्रण मिळविले. ज्या चार कारणा मुळे एड्स चा प्रसार होतो ती कारणे आत्ता सर्व लोकांना कळून चुकले आहे. मात्र तरी सुध्दा काही ठिकाणी याचे रुग्ण जेंव्हा आढळून येतात तेंव्हा परत काळजी वाढू लागते.
योग्य वयात योग्य वेळी समज मिळाली तर त्यांचे जीवन सूकर होते. मात्र भारतात लैंगिक शिक्षण हा विषय काढला की लोकं नाक मुरडतात. त्यांना अस्वस्थ वाटायला लागते. पण जेंव्हा पोरगा हातून वाया जातो त्यावेळी विचार करतो की मी एकदा तरी त्याच्या सोबत याविषयी का बोललो नाही. तसा हा विषय खुलेपणाने किंवा मोकळ्या मनाने बोलण्यासारखा नाही. म्हणून त्यास लपवून बोलेल्या जाते. यामुळे मुले सुद्धा व्यक्त होत नाहीत. मग मित्राकडून चुकीची माहिती मिळविली जाते आणि हा त्याच्या आहारी जातो. आजकाल तर मोबाईलमुळे मुले अजुन जास्त बिघडत चालली आहेत. पूर्वी जे लपून छपुन पाहिले जायचे ते आत्ता एका क्लिकवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे युवा पिढी नको त्या गोष्टी आत्मसात करीत आहेत. व्यसन करणारी पिढीवर फार लवकर याचा प्रभाव जाणवत आहे. ज्या तरुण पिढी वर भारताची प्रगती अवलंबून आहे ती पिढी अश्या रोगाच्या विळख्यात जखडल्या जात आहे. यापासून वाचण्यासाठी खबरदारी घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर 
  मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
  9423625769
  nagorao26@gmail.com

दिनविशेष माहिती - 29 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम गुरुपौर्णिमा विशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर. आपल्या दिनविशेष माहिती का...