Friday, 23 January 2026

24 जानेवारी दिनविशेष माहिती ( 24 January )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण  भारताचे विज्ञानरत्न डॉ. होमी भाभा यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी 
            डॉ. होमी जहागीर भाभा येथे क्लिक करावे. 

डॉ. होमी जहागीर भाभा हे भारताच्या आधुनिक विज्ञान व अणुऊर्जेचे जनक मानले जातात. त्यांनी भारतात अणु संशोधनाची पायाभरणी करून देशाला वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम बनवले. त्यांचे योगदान केवळ विज्ञानापुरते मर्यादित न राहता संशोधन संस्था उभारणी, शिक्षण आणि राष्ट्रीय विकास यांमध्येही अतुलनीय आहे.
डॉ. होमी भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील जहागीर भाभा हे प्रसिद्ध वकील होते. सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी भौतिकशास्त्रात संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळवली. 
शिक्षण घेऊन भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतीय विज्ञान संस्थान, बंगळूर येथे प्रोफेसर म्हणून कार्य केले. पुढे १९४५ मध्ये त्यांनी मुंबईत टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) स्थापन केली. ही संस्था भारतातील उच्चस्तरीय वैज्ञानिक संशोधनाची प्रमुख केंद्र बनली. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणुभट्टीची स्थापना होऊ शकली. डॉ. भाभा यांच्या दूरदृष्टीमुळे भारतात वैज्ञानिक संशोधनाला योग्य दिशा मिळाली.
१९४८ मध्ये भारत सरकारने त्यांची नियुक्ती भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून केली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतात अणुऊर्जेच्या शांततामय वापरासाठी संशोधन सुरू झाले. दिनांक १८ मे १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला. अणुऊर्जेचा वापर वीज निर्मिती, औषधनिर्मिती, कृषी व औद्योगिक क्षेत्रात होण्यासाठी त्यांनी भक्कम पाया घातला. त्यामुळे त्यांना “भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार” असे संबोधले जाते.
डॉ. भाभा हे केवळ शास्त्रज्ञ नव्हते, तर उत्कृष्ट प्रशासक, कलाकार आणि संगीतप्रेमीही होते. त्यांनी विज्ञान आणि कला यांचा सुंदर संगम साधला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात शिस्त, दूरदृष्टी आणि राष्ट्रभक्ती यांचा सुंदर समन्वय दिसून येतो.
२४ जानेवारी १९६६ रोजी फ्रान्समधील माउंट ब्लाँक परिसरात झालेल्या विमान अपघातात त्यांचे अकाली निधन झाले. त्यांचा मृत्यू भारतीय विज्ञानासाठी मोठी हानी ठरली, तरी त्यांनी उभारलेली संशोधनाची परंपरा आजही देशाला मार्गदर्शन करत आहे.
डॉ. होमी जहागीर भाभा यांनी भारताला वैज्ञानिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरवले. त्यांचे कार्य आजही भारतीय वैज्ञानिकांना प्रेरणा देत आहे. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने भारताचे विज्ञानरत्न मानले जातात.
आज त्यांचा पुण्यस्मरण दिवस त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - डॉ. होमी भाभा यांचा जन्म केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. होमी भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी मुंबई येथे झाला.

दुसरा प्रश्न - भारत सरकारने भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून केव्हा नियुक्त केले ?
बरोबर उत्तर आहे, १९४८ मध्ये भारत सरकारने भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. 

तिसरा प्रश्न - भारताने कोठे पहिला अणुस्फोट घडवून आणला ? 
बरोबर उत्तर आहे, भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला. 

चौथा प्रश्न - भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार” असे कोणाला संबोधले जाते ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. होमी भाभा यांना भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार” असे संबोधले जाते.

शेवटचा पाचवा प्रश्न - डॉ. होमी भाभा यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - २४ जानेवारी १९६६ रोजी डॉ. होमी भाभा यांचे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

No comments:

Post a Comment

दिनविशेष माहिती - 31 जानेवारी ( 31 January )

🇮🇳  परमवीर चक्र विजेते वीर मेजर सोमनाथ शर्मा  🇮🇳 मेजर सोमनाथ शर्मा हे भारतीय सैन्याचे पहिले परमवीर चक्र सन्मानित अधिकारी असू...