Thursday, 22 January 2026

23 जानेवारी दिनविशेष माहिती ( 23 January )


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 
मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत. लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी 
        नेताजी सुभाषचंद्र बोस येथे क्लिक करावे. 

नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर, धाडसी आणि क्रांतिकारक नेते होते. त्यांनी आपल्या तेजस्वी नेतृत्वाने आणि देशप्रेमाने भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्याची तीव्र जाणीव निर्माण केली. “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा” ही त्यांची घोषणा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा बनला.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओरिसा राज्यातील कटक येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस होते. ते एक नामवंत वकील होते. सुभाषचंद्र बोस हे लहानपणापासूनच बुद्धिमान, शिस्तप्रिय आणि देशभक्त होते. वयाच्या १५व्या वर्षी नेताजी बोस गुरूच्या शोधात हिमालयात गेले होते. पण त्यांना गुरूचा शोध लागला नाही. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, नेताजी बोस हे त्यांचे शिष्य बनले. त्यांनी १९२१ साली इंग्लंडमध्ये जाऊन आय.सी.एस. (Indian Civil Services) परीक्षा उत्तीर्ण केली ; परंतु देशसेवेच्या इच्छेने त्यांनी ही प्रतिष्ठित नोकरी सोडून मायदेशी परत आले.
नेताजी सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कार्यरत होते आणि त्यांनी अध्यक्षपदही भूषविले. मात्र, महात्मा गांधींच्या अहिंसक धोरणापेक्षा वेगळा मार्ग अवलंबण्याची त्यांची भूमिका होती. त्यामुळे महात्मा गांधीजी सोबत मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी काँग्रेसपासून वेगळे होऊन फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नेताजींनी जर्मनी व जपानच्या मदतीने आझाद हिंद सेना उभारली. “चलो दिल्ली” हा नारा देत त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा उभारला. आझाद हिंद सरकारची स्थापना करून त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. त्यावेळी त्यांनी “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा” ही घोषणा केली.
नेताजींचे देशप्रेम, त्याग, शिस्त आणि धैर्य आजही प्रेरणादायी आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाने 2021 पासून नेताजी बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. जपानमध्ये काम करताना तेथील लोकांनी त्यांना नेताजी ही उपाधी दिली. त्यांनी दिलेला जय हिंद हा नारा भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. 
नेताजी सुभाषचंद्र बोस हे खऱ्या अर्थाने राष्ट्रनायक होते आणि भारतीय इतिहासात त्यांचे स्थान खूप महान आहे.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कोठे झाला ? 
बरोबर उत्तर आहे, ओरिसा राज्यातील कटक येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला.

दुसरा प्रश्न - नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणती घोषणा केली ?
बरोबर उत्तर आहे,  “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा” अशी घोषणा केली.

तिसरा प्रश्न - कोणाचे साहित्य वाचून नेताजी बोस त्यांचे शिष्य बनले ?
बरोबर उत्तर आहे, स्वामी विवेकानंद यांचे साहित्य वाचून नेताजी बोस त्यांचे शिष्य बनले.

चौथा प्रश्न - आय. सी. एस. चे full form काय आहे ? 
बरोबर उत्तर आहे, Indian Civil Services हे आय. सी. एस. चे full form आहे.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - कोणत्या वर्ष्यापासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला ? 
बरोबर उत्तर आहे - सन 2021 पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

No comments:

Post a Comment

दिनविशेष माहिती - 31 जानेवारी ( 31 January )

🇮🇳  परमवीर चक्र विजेते वीर मेजर सोमनाथ शर्मा  🇮🇳 मेजर सोमनाथ शर्मा हे भारतीय सैन्याचे पहिले परमवीर चक्र सन्मानित अधिकारी असू...