नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत. लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे येथे क्लिक करावे.
बाळासाहेब ठाकरे - मराठी जनतेचे प्रभावी नेतृत्व
बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील एक अत्यंत प्रभावी नेते होते. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ केशव ठाकरे असे होते. त्यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे प्रसिद्ध समाजसुधारक, लेखक आणि विचारवंत होते. वडिलांच्या प्रखर विचारांचा बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव पडला.
बाळासाहेब ठाकरे यांनी आपले शिक्षण मुंबईत पूर्ण केले. ठाकरे यांनी मुंबईतील फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांची व्यंगचित्रे द टाईम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या आवृत्तीतही प्रकाशित झाली. त्यांनी राजकीय आणि सामाजिक विषयांवर प्रभावी व्यंगचित्रे काढली. नंतर त्यांनी मार्मिक हे साप्ताहिक सुरू केले. या माध्यमातून त्यांनी मराठी माणसांच्या समस्यांवर आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. बाळासाहेब ठाकरे हे मराठी भाषेतील वृत्तपत्र दैनिक सामनाचे संस्थापक देखील होते.
मराठी तरुणांना रोजगार मिळावा, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि मराठी अस्मिता जागृत व्हावी या उद्देशाने १९ जून १९६६ रोजी त्यांनी शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना केली. शिवसेना ही सुरुवातीला सामाजिक संघटना होती, परंतु पुढे ती एक महत्त्वाची राजकीय शक्ती बनली. मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेने मोठे स्थान मिळवले. बाळासाहेब ठाकरे हे उत्तम वक्ते होते. त्यांची भाषणे थेट, परखड आणि प्रभावी असत. ते कोणत्याही विषयावर निर्भीडपणे मत मांडत. त्यांच्या विचारांशी अनेकजण सहमत होते, तर अनेकजण असहमतही होते; मात्र त्यांच्या नेतृत्वक्षमतेबाबत दुमत नव्हते. त्यांनी शिस्त, स्वाभिमान आणि मराठी माणसाच्या हक्कांवर भर दिला. ते स्वतः निवडणुका लढवत नसले तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा मोठा प्रभाव होता.
मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेचे जतन करणे, तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे त्यांच्या कार्याचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लोकजागृती केली. त्यामुळे त्यांना हिंदूहृदयसम्राट असे ही म्हटले जाते.
बाळासाहेब ठाकरे यांचा विवाह १३ जून १९४८ रोजी मीनाताई ठाकरे (सरला वैद्य) यांच्याशी झाला. त्यांना तीन मुले होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव.
दिनांक १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक प्रभावी नेता गमावला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले होते, हे त्यांच्या लोकप्रियतेचे द्योतक होते. आजही त्यांच्या विचारांचा प्रभाव समाजावर आणि राजकारणावर दिसून येतो.
बाळासाहेब ठाकरे हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर ते हिंदू जनतेचे व मराठी अस्मितेचे प्रतीक होते. त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण मिळाले. त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात.
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्ण नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, बाळ केशव ठाकरे असे बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्ण नाव होते.
दुसरा प्रश्न - बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या साप्ताहिकाचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या साप्ताहिकाचे नाव मार्मिक होते.
तिसरा प्रश्न - बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव होते.
चौथा प्रश्न - बाळासाहेब ठाकरे यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे, दिनांक १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले.
शेवटचा पाचवा प्रश्न - बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कोणत्या कामाने केली ?
बरोबर उत्तर आहे - व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन 🌹🙏
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment