या ब्लॉग वरील सर्व लेखाचे हक्क सौ.अर्चना नागोराव येवतीकर यांच्याकडे आहेत. परवानगी शिवाय लेख फॉर्वर्ड किंवा प्रकाशित करू नये पाऊलवाट पुस्तकाचे प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते प्रकाशन
Thursday, 8 June 2023
पंढरीची वारी ( Pandhari Wari )
Wednesday, 7 June 2023
विद्यार्थी लाभाच्या योजना ( Vidyarthi Labhachya Yojana )
01) शालेय पोषण आहार योजना ज्याचे सध्याचे नाव प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना
उद्देश्य - विद्यार्थ्यांची गळती कमी करणे आणि कुपोषण थांबवणे.
इ. 1 ली ते 8 वी पर्यंत शिकणा-या शासकीय, निमशासकीय, खाजगी-अनुदानित शाळाांमधील सर्व विद्यार्थ्यांना यांचा लाभ मिळतो. ही योजना तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहाराव यांनी 22/11/1995 पासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जून 2002 पासून शिजवलेले अन्न देण्यास सुरुवात झाली.
शासकीय आदेशाप्रमाणे इ. 1ली ते 5 वी साठी 100 ग्रॅम ताांदूळ, तर इ. 6 वी ते 8 वी = 150 ग्रॅम ताांदूळ या प्रमाणात अन्न शिजवले जाते.
02) मुलींचा उपस्थिती भत्ता
उद्देश्य - दुर्बल घटकातील मुलींना शाळेत येण्यास प्रोत्साहन मिळावे. आणि शिक्षणातील सातत्य टिकावे. मुलींचे गळतीचे प्रमाण कमी होऊन उपस्थितीचे प्रमाण वाढविणे.
1) इ. 1 ली ते 4 थी पर्यंतच्या आदिवासी क्षेत्रातील व दारिद्र्यरेषेखालील सर्व मुली.
2) आदिवासी क्षेत्राबाहेरील अनु.जाती, अनु.जमाती, नवमुक्त जाती/भटक्या जमातीच्या मुलींना. 3) किमान उपस्थिती 75 टक्के असणाऱ्या मुलींना प्रतिदिन एक रुपया याप्रमाणे मुलींचा उपस्थिती भत्ता दिला जातो.
4) वर्षभरातील एकूण कार्यदिनापैकी 220 रु. अनुज्ञेय आहे.
5) ही योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी म्हणजे 03 जानेवारी 1992 रोजी सुरू करण्यात आली.
3) मोफत पाठ्यपुस्तक योजना
इ. 1 ली ते 8 वी पर्यंत शिकणाऱ्या खाजगी अनुदानित, शासकीय, निमशासकीय शाळेतील सर्व विद्यार्थी. या योजनेसाठी पात्र आहेत.
उद्देश्य - ई. 1ली ते 8 वी मध्ये शिकणारे बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये आणि त्याला पाठ्यपुस्तकांअभावी शिक्षणात अडथळा येऊ नये. शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे
04) मोफत गणवेश योजना
इ. 1 ली ते 8 वी पर्यंत शिकणाऱ्या शासकीय, निमशासकीय शाळेतील सर्व विद्यार्थी. *अनु.जाती, अनु.जमाती व दारिद्र्यरेषेखालील सर्व मुले. वार्षिक दोन गणवेशाकरिता 600 रु. प्रति लाभार्थी याप्रमाणे अनुदान मिळते.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोफत गणवेश
*इ. 1 ली ते 4 थी मध्ये शिकणाऱ्या खाजगी अनुदानित, शासकीय, निमशासकीय शाळेतील अल्पसंख्याक विद्यार्थी. वार्षिक दोन गणवेशाकररता 400 रु. प्रती लाभार्थी
आदिवासी विद्यावेतन
आदिवासी मुलींमधील गळती थांबवण्यासाठी प्रोत्साहन भत्ता
विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे आकर्षित करणे व प्रोत्साहन देणे.
1) इ. 5 वी ते 10 वी चे विद्यार्थी. 2) अदिवासी / बिगर आदिवासी क्षेत्रातील सर्व आदिवासी विद्यार्थी (पालकाचे उत्पन्न एक लाख पेक्षा कमी असावे.)
3) किमान 75 टक्के उपस्थिती 4) चांगली वर्तणूक व समाधानकारक प्रगती. मुले 500/- मुली 600/-
5) योजना सन २००३-०४ पासून सुरु करण्यात आली आहे.
6) आदिवासी स्वर्णजयंती शिष्यवृत्ती
विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे आकर्षित करणे व प्रोत्साहन देणे.
1) सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळामधील इ. 1 ली ते 10 वी च्या अनु.जमातींचे विद्यार्थी. 2) पालकाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी. 3) विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बॅंकेतील खाते अनिवार्य. इ. 1 ली ते 4 थी = 1000/- इ. 5 वी ते 7 वी = 1500/- इ. 8 वी ते 10 वी = 2000/-
अस्वच्छ व्यवसायाचे काम करणा-या पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती
* मुलांना शिक्षण प्रवाहात आणणे. * शिक्षणाची सोय करणे. इ. 1 ली ते 10 वी मध्ये शिकणारे अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांची मुले. 110 रु.प्रति माह प्रति लाभार्थी(10 महिने फक्त) व 750 रु. वार्षिक अनुदान. एकूण=1850 रु.
समाज कल्याण विभागाकडून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
उद्देश्य - मुलींची गळती थांबणे .
इ. 5 वी ते 10 वी तील अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त-भटक्या, अनुसूचित जाती फक्त मुली.
इ. 5 वी ते 7 वी = 60 रु. दरमहा
ही योजना 1995-96 मध्ये सुरू झाली तर
इ. 8 वी ते 10 वी = 100 रु. दरमहा (फक्त 10 महिन्याकरिता)
ही योजना 2002-2003 मध्ये सुरू झाली.
सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना ( 1990 पासून सुरू झाली ) तत्कालीन शिक्षण संचालक वि वि चिपळूणकर यांनी ह्या उपक्रमाची सुरुवात केली.
आर्थिक / दुर्बल घटकातील विद्यार्थांना मदत करणे. आर्थिक / दुर्बल घटकातील विद्यार्थांना शाळा व्यवस्थापन समितीची सभेत पूर्व परवानगी घेणे, उपस्थिती 75 टक्के. 30 रु. दरमहा (फक्त 10 महिने)
अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत बस प्रवास ( 13 ऑगस्ट 1996 रोजी शासकीय परिपत्रक काढण्यात आले. )
मुलींना शिक्षण प्रवाहात आणणे.
ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला प्रेरणा देणे
1) इ. 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थिनी पुढे चालून ही योजना बारावी पर्यंतच्या मुलींसाठी करण्यात आली. 2) गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नसेल तरच लाभ. 3) 75 टक्के उपस्थिती अनिवार्य राहत्या गावापासून शाळेपर्यांचा बस प्रवास मोफत.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थांना नुकसान भऱपाई देणे. विद्यार्थाचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास / मृत्यू झाल्यास. मृत्यू = 75000 रु., कायम अपंगत्व = 50000 रु., एक अवयव / डोळा निकामी झाल्यास = 30000 रु.
पूर्व माध्यमिक /माध्यमिक शिष्यवृत्ती गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे. इ. 4 थी व 7 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ताधारक विद्यार्थी. पुढील 3 वर्षासाठी शिष्यवृत्तीचा लाभ इ. 4 थी = 750 रु. प्रति वर्ष (5वी, 6वी, 7वी), इ. 7 वी = 1000 रु. प्रति वर्ष (8वी, 9वी, 10वी)
मुलींची सैनिकी शाळा -
राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा पिरंगुट जि. पुणे येथे आहे.
* मुलींना सैनिकी शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करणे.
* मागासवर्गीय मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनीत प्रवेश मिळवणे.
* शिस्त, आत्मविश्वास, देशभक्ती, नेतृत्व विकसित करणे. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.
* 1997 मध्ये सुरू झालेली, महाराष्ट्रातील मुलींसाठीची पहिली आणि देशातील दुसरी मिलिटरी स्कूल
*इयत्ता सहावी वर्गात येथे प्रवेश मिळतो. बौद्धिक व शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाते.
मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृह
मागासवर्गीय मुलामुलींना शिक्षण घेता येणे. मागासवर्गीय मुलामुलींना प्रस्ताव सादर करणे. --------
शासकीय विद्यावेतन
ग्रामीण, होतकरू, हुशार चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे व दर्जेदार शिक्षण देणे. स्पर्धा परीक्षा (गुणवत्ता निकषांनुसार इ. 5 वीत प्रवेश) --------
राजमाता जिजाऊ सायकल वाटप
मुलींना माध्यमिक शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे.
1)दुर्गम / अति दुर्गम / झोपडपट्टी / गलीच्छ वस्तीतील मुलींना प्राधान्य. 2) इ. 7 वीत किमान 45 टक्के गुण (अट) 3) दारिद्रय रेषेखाली असणे आवश्यक. प्रत्येकी एक सायकल इ. 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना.
अल्पसंख्यांक प्रीमॅट्रिक शिष्यवृत्ती
अल्पसंख्यांक मुलांना शिक्षणास प्रोत्साहित करणे.
1) मुस्लीम, ख्रिचन, बौद्द, शीख, पारसी धर्मातील विद्यार्थी 2) शासकीय / नीमशासकीय, मानयताप्राप्त खाजगी शाळामधील अल्पसंख्यांक विद्यार्थी 3) 50 टक्के पेक्षा जास्त गुण आवश्यक 4) एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न 5) एका कुटुंबातील दोनच विद्यार्थांना शिष्यवृत्ती 6) 30 टक्के शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव. प्रति वर्षाला 1000 रु. पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात.
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता
अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी, उपस्थथती किमान 75 टक्के. 2 रु. प्रतिदिन
शालेय आरोग्य तपासणी
* मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे.
* विद्यार्थांना संदर्भसेवा पुरवणे.
इ. 1 ली ते 8 वी चे सर्व विद्यार्थी वर्षातून एकदा तपासणी
अपंग शिष्यवृत्ती
अपंग विद्यार्थांना शैक्षणिक प्रवाहात आणणे.
1) इ. 1 ली ते 12 वी चे अपंग विद्यार्थांना 2) 40 टक्के पेक्षा जाथत अपंगत्व प्रमाणपत्र आवश्यक. समाजकल्याण विभागाकडून इ. 1 ली ते 4 थी = 600 रु. प्रति वर्ष , इ. 5 वी ते 7 वी = 750 रु. प्रति वर्ष, इ. 8 वी ते 10 वी = 1000 रु. प्रति वर्ष.
राष्ट्रीय प्रज्ञा शोध (N.T.S.)
शिष्यवृत्ती प्रज्ञावान विद्यार्थाचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे.
1) इ. 10 वी चे विद्यार्थी - राष्ट्रीय प्रज्ञा शोध (N.T.S.) राष्ट्रीय स्तर परीक्षेत गुणवत्ता यादीत येणे आवश्यक. 2) देशात फक्त 1000 विद्यार्थी निवडले जातात. एन. सी. ई. आर. टी कडून 1) इ. 11 वी ते 12 वी = 1250 रु. दरमहा, 2) पदवीपूर्व शिक्षण व पदव्यूत्तर शिक्षणासाठी = 2000 रु. दरमहा, 3) पी.एच.डी विद्यार्थासाठी विद्यावीठ अनुदान आयोगाच्या नियमाप्रमाणे
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी(N.M.M.S.) शिष्यवृत्ती
आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यायांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना इ. 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत करणे.
1) इ. 8 वी चे विद्यार्थी 2) पालकाचे वार्षिक उत्पन्न 150000 पेक्षा कमी असावे. 3) संबधित परीक्षेतील गुणवत्ता यादी व सामाजिक आरक्षणाप्रमाणे निवड एन. सी. ई. आर. टी./मानव सांसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली कडून 1) 12 वी पर्यंत = 500 रु. दरमहा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु ( Droupadi Murmu )
Friday, 31 March 2023
April fool Day
एप्रिल फूल दिन
( पूर्ण लेख वाचल्यावर उत्तर कळेल )
एप्रिल महिन्याचा पहिला दिवस. ह्या दिवशी गमतीने एखाद्यास बनविण्याची प्रथा पाश्चिमात्य राष्ट्रांत प्रामुख्याने दिसून येते. बनलेल्या व्यक्तीस ‘एप्रिल फूल’ म्हणण्याचा प्रघात आहे. ह्या प्रथेची सुरुवात केव्हा व कशी झाली हे निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि काही लोक तिचा संबंध प्राचीन रोममधील व्हीनस व फॉर्चुना व्हिरिलीस या देवतांच्या उत्सवाशी लावतात. ग्रेगोरियन पंचांग १५६४ साली स्वीकारल्यानंतर फ्रान्समध्ये या प्रथेस सुरुवात झाली व ती १६०० पर्यंत इतरत्र पसरली असेही म्हटले जाते. काही लोक त्यास लूच्या वसंतोत्सवाची स्मृती मानतात.
प्राचीन रोममधील हिलेरिया व भारतातील होळी या उत्संवाशी या एप्रिल फूलचे बरेच साम्य आहे. होळी व हिलेरिया यांच्याप्रमाणेच हा प्रकार वसंतागमनाच्या वेळीच साजरा करतात.
मेक्सिकोत २८ डिसेंबरला हा दिवस पाळतात. त्या दिवशी उसनी घेतलेली वस्तू परत न करण्याची तेथे प्रथा आहे. बनलेल्या व्यक्तीस इंग्लंडमध्ये ‘एप्रिल फूल’, स्कॉटलंडमध्ये ‘एप्रिल गॉक’ व फ्रान्समध्ये ‘एप्रिल फिश’ म्हणतात. ब्रिटिशांच्या अंमलाबरोबर ही प्रथा भारतात आली. या दिवसास सकल मूर्खांचा दिवस असेही म्हणतात.
खोडवे, अच्युत.
संकलन :- इंटरनेट
उत्तर -
Monday, 6 March 2023
जागतिक महिला दिन ( World Women Day )
आई, मला जग बघू दे
बाबाला एकदा भेटू दे
माझी मुलगी होती
गर्भातुन बोलत
मी ओझे नाही होणार
कोणाच्या घरात
मी काम करेंन
घरातील सारी
शिक्षण घेईन खुप
होईन अधिकारी
तुझ्या हाताला देईन
नेहमी मदत
विचार करू नको
दे मला साथ
आई, तुझं मन कर
एकदा कठोर
तुझ्यासारखेच माझं
जीव आहे तर
निश्चय केला पक्का
नको भृणबळी
मुलगा-मुलगी समान
संधी द्या वेळोवेळी
तिचे बोलणे ऐकून
मन गहिवरलं
गोंडस कन्या रत्नाला
जन्म दिलं
- नागोराव सा. येवतीकर
विषय शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
••••••••••••••••••••••••••••••••••••
जागतिक महिला दिनानिमित्त
" ती " ला समर्पित माझी कविता
कविता - ती
- नासा येवतीकर, 9423625769
ती रोज सकाळी
सर्वांच्या अगोदर उठते
आम्ही सर्व झोपेत असतो
तिच्या कामाला सुरू होते
ती रोज सर्वांसाठी
चवदार स्वयंपाक करते
आम्ही त्याला नावे ठेवतो
त्याकडे ती कानाडोळा करते
ती रोजच आम्हा सर्वांची
एवढी देखभाल ठेवते
आमच्या कडून कसलीच
तिची कधी ही अपेक्षा नसते
सकाळपासून झोपेपर्यंत
ती खूप राब राब राबते
आम्हांला तिची किंमत कळते
ती जेंव्हा आजारी पडते
मग ती कोण आहे ?
आई आहे ताई आहे
कुणाची मावशी तर
कुणाची बायको आहे
••••••••••••••••••••••••••••••••••••
कविता - ती काय करते ?
सर्वाना असंच वाटते की
ती काहीच करत नाही
ती काय करते म्हणून कोणी
विचारल्याशिवाय राहत नाही
नेहमी हा प्रश्न सतावतो
कोणी विचारलं ती काय करते
माझं ठरलेलं उत्तर असल्याचं
ती खूप काही काम करते
सकाळी भल्या पहाटे उठून
घरासमोर सडा टाकते
छान छान रंगाची रांगोळीने
सारे अंगण सजवून टाकते.
आम्ही सारे अंथरुणात असतो
सर्वाना चहा फराळ करते
सर्वांची अंघोळी होईपर्यंत
जेवणाचा डबा तयार करते
सारे गेले आपापल्या कामाला
घरदार पुसून स्वच्छ करते
घरात पडलेला पसारा आवरून
धुणी-भांडी स्वच्छ करून घेते
दुपारच्या वेळी विश्रांती म्हणून
जराशी डुलकी काय घेते
घड्याळात चारचा ठोका वाजला
आमची परत येण्याची वाट पहाते
तिन्ही सांजाच्या सायंकाळी ती
सर्वाना चहा देऊन ताजे करते
बैठकीत आम्ही टीव्ही पाहतो
ती किचनमध्ये स्वयंपाक करते
पटकन आम्ही झोपी जातो
तिच्यामुळे काळजी नसते
दाराची कडी कोंडा पाहूनच
ती समाधानाने झोपी जाते
सारे आनंदात मजेत राहावे
यासाठी तिचा खटाटोप असते
परत मला कोणी विचारू नका
ती काय करते ? ती काय करते ?
- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769
••••••••••••••••••••••••••••••••••••
लेख - स्त्री जन्माचे स्वागत करूया ...!
••••••••••••••••••••••••••••••••••••
ग्रामीण महिला आणि महिला दिन
आज 08 मार्च अर्थात जागतिक महिला फिन. स्त्रियांवर होत असलेले अत्याचार, अन्याय दूर व्हावे, सर्वच क्षेत्रात महिलांचा विकास व्हावा यासाठी आज जगभर महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी संपूर्ण वर्षभराचा आराखडा पाहिला जातो. आपण काय केलोय ? कुठपर्यंत यश लाभलं ? यांच्यासमोर काय करायचं ? इत्यादी विविध प्रश्नांच्या बाबतीत आज चर्चा केली जाते. अश्या या बाबीमुळे आज महिला थोडीफार सुधारली ( ? ) असे म्हणायला हरकत नाही.
नेमिची येतो मग पावसाळा या म्हणीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण हा उत्सव साजरा करणार, यात काही शंका नाही. शहरात असलेली मुलगी पदवी पर्यंतचे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायांवर उभी राहण्यास पात्र ठरत आहे. महानगरातील मुली ही शिक्षण घेऊन सरकारी, खाजगी किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या कार्यालयात विविध पदावर काम करतांना दिसत आहेत, शहरातील मुलीं मुलांबरोबर शिक्षण घेऊन त्यांच्या पेक्षाही वरचढ ठरत आहेत, ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. शहरातील मुलींचे जीवन चांगले आहे, याचा अर्थ असा नव्हे की, मुली शिक्षणाच्या बाबतीत आता वंचित राहिलेल्या नाहीत. पण जरा शहारावरचा आपला कॅमेरा ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाकडे आणि त्यांच्या विकासाकडे फिरविल्यास आपणास अनेक समस्या आणि प्रश्न तेथे दिसून येतात.
शहरातल्या मुली शिक्षणात किंवा अन्य क्षेत्रात जेवढ्या पुढारलेले आहेत, तेवढेच ग्रामीण भागातील मुली मागासलेले आहेत. एकदम विरुद्ध टोक आहेत. ग्रामीण मुलीवर आज देखील अन्याय होत आहे. ग्रामीण भागात मुलींसाठी शिक्षण आवश्यक नसून त्यापेक्षा आवश्यक आहे त्यांना घरात स्वयंपाक करता येणे, धुणी-भांडी करता येणे, मुलं बाळांना सांभाळता येणे, घरातील पुरुषांना आनंदी ठेवता येणे, इत्यादी कामे तिला जमलेच पाहिजे. पण तिला शाळेत जाण्याची किंवा काही नवीन शिकण्याची संधी मात्र दिल्या जात नाही. आज ही ग्रामीण भागात शंभर मुलींमागे सातवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले पन्नास टक्के आढळतील मात्र पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या मुली एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच सापडतात. ही किती चिंतनीय बाब आहे. मुलींसाठी शासनाने विविध योजना तयार केल्या आणि त्या राबविल्या देखील तरी ही मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत आज ही म्हणावी तेवढी प्रगती नाही, असे का ? कारण ग्रामीण भागातील लोक आजही रूढी, परंपरा, अंधश्रद्धा आणि कर्मकांडमध्ये रुतलेले आहेत. त्याच्या विरोधात त्यांना वागणे कदापिच जमणार नाही. विज्ञानाच्या आधारे माणूस चंद्रावर गेला पण ग्रामीण भागातील लोकं आहे त्याच ठिकाणी घट्ट बसून आहेत. त्या लोकांचा विकास फक्त शिक्षणाने होते हे सुद्धा एक निर्विवाद सत्य आहे. गावात ज्या वर्गापर्यंत शाळा आहे त्याच वर्गापर्यंत मुलींना शाळा शिकविले जाते. काळजी आणि सुरक्षा या कारणांमुळे मुलींना पुढील शिक्षणासाठी गावाबाहेर पाठविले जात नाही. यात पालकांची मानसिकता लक्षात घेण्यासारखे आहे. आजच्या विषम वातावरणात कोणत्याही पालकांना असे विचार मनात येणे साहजिक आहे, मात्र त्यासाठी तिला उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याची चूक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ही योजना कार्यान्वित झाल्यापासून अनुसूचित जाती आणि जमातीच्या मुलींच्या दहावी पर्यंतच्या शिक्षणात लक्षणीय वाढ झाली असल्याचे बहुतांश महिला शिक्षिकानी मत व्यक्त केले. अशीच काही योजना ग्रामीण भागात राबविणे आवश्यक आहे. महिलांना स्वयं रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी शहरात ज्याप्रकारे सोयी सुविधा निर्माण केल्या जातात अश्याच सुविधा ग्रामीण भागात पोहोचविणे आवश्यक आहे. छोटे छोटे काम शिकण्यासाठी त्यांना शहरात येणे शक्य नाही त्यामुळे त्यांच्या गावांत जाऊन मुलींना स्वयंरोजगाराचे धडे दिल्यास ते स्वतःच्या पायावर नक्की उभे राहतील.
जगात सर्वत्र कायद्याला मान दिला जातो. त्यात खूप शक्ती आहे, याची जाणीव असून देखील महिलांवरील अत्याचार व अन्याय का कमी होत नाही ? एक दिवस सुद्धा असे उजाडत नाही, ज्या दिवशी महिलांवर अन्याय, अत्याचार, अमानुष छळ, किंवा बलात्कार झाले नाही. पैशाच्या जोरावर श्रीमंत लोकं नाचतात, कायदा हातात घेतात, पैशाच्या बळावर काही ही करायला ते तयार असतात. कधी जर त्यांच्या घरातील महिलांवर असा प्रसंग ओढवला तर तेंव्हा त्यांना कळते की खरोखरच किती वेदना होतात ते ?
आपण दरवर्षी असे दिन उत्सवाप्रमाणे साजरा करतो. काही जुने संकल्प सोडतो तर काही नवीन संकल्प करतो. नव्याच्या नऊ दिवसाप्रमाणे त्या संकल्पला ही विसरतो. एखाद्या महिलेवर आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असेल तर आपण फक्त अरेरे असा खेद व्यक्त करून तोंड जरासे वेडेवाकडे करून निघून जातो किंवा पाहत बसतो. त्यापलीकडे आपण काही करत नाही. ग्रामीण भागातील लोकांना अनेक गोष्टी मुळात माहिती नसतात म्हणून त्यांच्या पर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम पहिल्यांदा करणे आवश्यक आहे. माहिती नसल्यामुळे येथील लोकं वर्षनुवर्षे मागासलेले आहेत.
आजच्या या महत्वपूर्ण दिवशी असा संकल्प करू या की, गावातील प्रत्येक तरुणीला स्वयं रोजगार करण्यासाठी मदत कारेन, त्यांना योजनांची माहिती देऊन जागृत करेन आणि मी महिलांवर अत्याचार करू देणार नाही, तिला जे हवं ते मिळवून देण्याचा प्रयत्न करीन.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक व प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
••••••••••••••••••••••••••••••••••••
लेख - मुलींचे शिक्षण: प्रगतीचे लक्षण
शनि शिंगणापूर येथील मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा किंवा नाही या बाबत समाजात, मिडियामध्ये जोरदार चर्चा होते.. खरोखरच शनि मंदिराच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश मिळाला तर त्यांचे सारेच प्रश्न सुटतात काय ? चारशे वर्षापासून चालू असलेली परंपरा सहजा सहजी बदलेल असे वाटत नाही. ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण, महिलांची कुचंबणा, घरात व दारात महिलांची होत असलेली मुस्कटदाबी याविषयी फार कमी बोलल्या जाते. त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडल्या जात नाही त्यांमूळे त्यांच्या वरील अन्याय काही केल्या कमी होत नाही. यात महिलांनीच पुढाकार घेणे अत्ंयत गरजेचे आहे. महिलांवर होणारे अन्याय महिलांनीच सक्षमरित्या सामना करून सोडविले पाहिजे, त्याशिवाय महिलांची प्रगती अशक्य आहे आणि ही शक्ती महिलांमध्ये फक्त शिक्षणामूळेच येऊ शकते. शिक्षण हा मानवी जीवन विकासाचा मुख्य स्त्रोत आहे. शिक्षण घेतल्यामुळे आपल्या जीवनाला एक दिशा मिळते, संजिवनी मिळते. यांचे उत्तम उदाहरण म्हणून आपण महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्राबाई फुले यांच्या जीवनचरित्राकडे पाहू शकतो. अनाडी व निरक्षर पत्नी मूळे एके दिवशी ज्योतिबाना त्यांचा महत्वाचा कागद गमवावा लागला आणि त्याच वेळी पत्नी सावित्रीबाईला साक्षर करण्याचा त्यांनी मनसुभा केला. तेवढ्याच तत्परतेने त्यास सावित्रीबाईंनी होकार दिला. घरातल्या घरात शिक्षण दिले. त्याचा फायदा एवढा झाला की, देशातील पहिली महिला शिक्षिका होण्याचा मान सावित्राबाई फुले यांना मिळाला. साहित्याच्या क्षेत्रात त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. महात्मा फुले यांना शिक्षणाचे महत्व कळाले होते. त्यामुळे त्यांनी सन १८४८ मध्ये पुणे येथील भिडेच्या वाड्यात खास करून मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटूंब शिकते अशी त्यांची धारणा होती त्यातूनच मग त्यांनी आपल्या पत्नीला शिकवले. असे महत्व प्रत्येक पालकांना, नव-यांना म्हणजेच पुरूष मंडळींना कळणे गरजेचे आहे. समाजात आजही मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत पालक जागरूक नाहीत. असे म्हणण्यापेक्षा मुलांच्या व मुलींच्या शिक्षणाबाबत दुजाभाव करीत असतात. मुलगी शिकून काय करणार ? ही पालकांची भावना अजूनही दुर झालेली नाही. इंग्रजांच्या गुलामीगिरीच्या काळात महिलानी घराबाहेर जाणे अगदी तुच्छ समजले जायचे. महिला या " चूल आणि मूल " एवढ्याच कामासाठी समाजात राबत असत, तर शिक्षणासाठी घराबाहेर जाणे दूरची गोष्ट. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी देशासमोर निरक्षरता ही फार मोठी समस्या होती. त्यातल्या त्यात महिलांची निरक्षरता तर देशाच्या प्रगतीत फार मोठी अडसर ठरत आले आहे. त्यामुळे शासन प्रथम पासुनच महिलांच्या शिक्षणावर भर देत आले आहे. गेल्या वीस एक वर्षापासुन शिक्षणाच्या बाबतीत भारताची प्रगती उल्लेखनीय झाली म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्राथमिक शिक्षणात सर्व शिक्षा अभियान मोहिमेमुळे मुलींच्या शिक्षणाला प्रेरणा मिळाली. शासनाने मुलींच्या शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा या साठी मुलींचा उपस्थिती भत्ता, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, मोफत गणवेश, मोफत पुस्तके, सावित्रीबाई फुले मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना, विद्यावेतन, शाळेला ये-जा करण्यासाठी राजमाता जिजाऊ मोफत सायकल योजना, एसटी ने मोफत प्रवास करण्यासाठी अहिलाबाई होळकर योजना, कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालय, मानव विकास योजना, तसेच लेक वाचवा लेक शिकवा या सारख्या अनेक योजनाच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी शासन प्रयत्न करीत होते आणि करीत आहे. त्यांना त्यात काही अंशी यश मिळाले पण पुर्ण यश मिळालेच नाही. त्यांची अनेक कारणे आहेत. त्या कारणाचा विचार करून त्यावर उपाय योजना करणे आवश्यक आहे.
* पालकांची शिक्षणाबात अनास्था -
मुलींच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागातील पालकामध्ये तेवढी उत्सुकता व जागरूकता दिसत नाही, जेवढे शहरी भागातील पालक जागरूक असतात. ग्रामीण भागातील पालक स्वत: शिक्षणाच्या बाबतीत अनभिज्ञ असतात, त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्व पटत नाही. बरं शिक्षणाचे महत्व पटत नाही असे जर म्हणावे तर हेच निरक्षर पालक आपल्या मुलाचे शिक्षण कुठेच थांबू देत नाहीत. पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलाचे शिक्षण पुर्ण करतात आणि मुलीचे शिक्षण मात्र या ना त्या कारणांवरुन थांबवितात. गावात ज्या वर्गापर्यंत शाळा त्याच वर्गापर्यंत मुलींना शाळा शिकण्याची मुभा दिली जाते. पुढील शिक्षणासाठी जवळच्या गावात किंवा शहरात जावे लागते आणि त्याठिकाणी जाण्यासाठी मुलींना परवानगी दिली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज प्राथमिक वर्गातील मुलींची संख्या माध्यमिक वर्गात गेल्यावर ५० % पेक्षा कमी होते ही गळती मुलीच्या विकासास नक्कीच बाधक ठरत आहे.
* अनिष्ठ रूढी व परंपरा -
ग्रामीण भागातील समाज आज ही अनिष्ठ रुढी व परंपरेच्या खोल गर्तेतुन बाहेर येण्यास तयार नाहीत. मुलींच्या शिक्षणा विषयी त्यांच्या मनात आज ही तेच विचार घोळत आहेत जे की, वीस वर्षापूर्वी होते. मुलीने शिकून काय करावं ? शेवटी घरच तर सांभाळायचे आहे. त्यासाठी एवढं शिक्षण पुरेस आहे या विचाराने ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलींचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच बंद करायला भाग पाडतात. काही पालक मंडळी मुलींना सुरक्षेच्या कारणांवरून शाळेत पाठविणे बंद करतात. मुलींचे लग्न होईपर्यंत आई-वडिलांना तिची काळजी वाटते, मुलींच्या वाट्याला कोणतेही वाईट प्रसंग येऊ नये असे प्रत्येक पालकांना वाटते त्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण बंद करण्यात आल्याचे काही पालक खाजगीत बोलतात. तर काही पालक मुलगी आता उपवर झाली, तिच्या साठी एखादे चांगले स्थळ बघुन एकदाचं हात पिवळं केलं की, मी मोकळा होईन असे बोलतात. त्यांच्या या बोलण्यातून मुलीं विषयी असलेली त्यांची तळमळ व काळजी स्पष्टपणे दिसून येते. सध्या समाजात असलेले गढूळ वातावरण आणि मुलींच्या बाबतीत वाढत चाललेली असुरक्षितता यामूळे कोणीही मुलीच्या शिक्षणासाठी पुढील पाऊल टाकताना दिसून येत नाही. त्याच बरोबर देशात चालत आलेली वधूपक्षाकडून वरपक्षाला द्यावी लागणारी देणगी म्हणजे हुंडा. यामुळेसुध्दा मुलींच्या शिक्षणावर फार मोठा प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. एखाद्या पालकांने आपल्या मुलींना खुप शिकविले, तिच्या शिक्षणावर खूप खर्च केला, असे असले तरी मुलींच्या लग्नाच्या वेळी देणगी द्यावीच लागते अशी परंपरा मुलींच्या शिक्षणास घातक ठरत आहे. त्यामुळे अश्या अनिष्ठ रूढी व परंपरा यास तिलांजली देणे अत्यावश्यक आहे. एवढं शिकवून, खर्च करून जर पुन्हा आहे तीच प्रथा सांभाळायची असेल तर मुलींच्या शिक्षणावर खर्च का करावा ? असा सर्व सामान्य विचार पालक करतोच, यात त्याचा तरी काय दोष ? पण याउलट मुलगी शिकून सवरून नौकरीला लागली किंवा स्वत:च्या बुध्दीमत्तेच्या बळावर रोजगार मिळवून कमावती झाली तर समाजात तिची पद, प्रतिष्ठा, मानसन्मान या सर्वच गोष्टी वाढीस लागतात. महिलांच्या हातात स्वत:चा पैसा असला किंवा पुरुषांकडे भीक मागण्याची वेळ जर महिलांवर येत नसेल तर तिला स्वाभिमानाने जीवन जगता येते. स्वाभिमानी स्त्रिया ह्या अनिष्ठ रूढी, परंपरा आणि प्रथा यांच्याविरोधात लढा देऊ शकतात आणि त्यात यश सुध्दा मिळवू शकतात. म्हणूनच मुलींचे शिक्षण अत्यंत महत्चाचे आहे.
* हक्क आणि कर्तव्याची जाण -
भारतात आज सर्वच क्षेत्रात महिलांची प्रगती नेत्रदीपक अशी आहे. भारताच्या सर्वोच्च अश्या राष्ट्रपती पदावर प्रतिभाताई पाटील यांनी पाच वर्ष आपली धुरा सांभाळली आणि पहिली महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळविला.घरातून राजकीय वारसा लाभलेली श्रीमती इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. देशातल्या विविध राज्यात महिला ह्या मुख्यमंत्री वा इतर महत्वाच्या पदावर काम करीत आहेत. देशाची पहिली महिला पोलिस महासंचालक पदावर श्रीमती किरण बेदीचे नाव ठळक अक्षराने लिहीले गेले. लता मंगेशकर यांना भारताची गानकोकीळा म्हणून संबोधले जाते. क्रीडा क्षेत्रात पी.टी. उषा, कविता राऊत, मल्लेश्वरी, साईना नेहवाल, सानिया मिर्झा इत्यादी सर्व महिला आपल्या अपूर्व योगदानाने देशाला यशोशिखरावर नेण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली आहे. विविध क्षेत्रात असंख्य महिला आहेत. ज्यांची कामगिरी खरोखरच नेत्रदीपक आहे. त्या सर्वाची यादी करीत बसलो तर फारच लांबलचक यादी होईल. महिलांची भरारी डोळ्यात भरणारी असली तरी हे चित्र फार समाधानकारक नाही. कारण आज ही महिलांना म्हणावी तशी संधी मिळत नाही, हे वास्तव नाकारून चालणार नाही. देशाच्या राजकारणात आणि इतर महत्चाच्या क्षेत्रात महिलांना संधी मिळावी, त्यांच्यात धाडस, साहस, प्रगती व्हावी यासाठी सरकारने महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याच्या तयारीत आहे. परंतु आज जे काही महिला राजकारणात आहेत किंवा ज्यांनी निवडणूक जिंकून सत्ता व पद मिळविले आहेत. त्या पदावर खरोखरच महिलाच राज्य करीत आहेत काय ? याचे वास्तव चित्र असे आहे की बहुतांश ठिकाणी सरपंच, पोलिस पाटील, तालुक्याचे सभापती, शहराचे नगराध्यक्ष किवा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महिलांची वर्णी लागत आहे. त्यांचे रिमोट मात्र त्यांच्या पतीराजच्या हातात आहे. यास कारण एकच आहे ते म्हणजे या पदाधिकारी महिला शिकलेल्या नसल्यामूळे ते आपल्या पतीच्या हातून कारभार पाहत असतात. संविधानाने ज्या हेतूने किंवा उदेश्याने नियमावली तयार केली त्याचा आपण अश्याप्रकारे अनादर करीत असतो. आपणाला आपले हक्क आणि कर्तव्याची जाण निर्माण करावयाचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. निरक्षर किंवा अडाणी बाई लोकप्रतिनिधी झाली तर त्या विभागाचा विकास जसा व्हायला पाहिजे तसा होतो का ? निदान याचा एक वेळा विचार करून आपल्या मुलींना शिकवू या. उद्या कदाचित ती गावची सरपंच बनून गावाचा कायापालट करू शकेल.
* पालकांचे दारिद्र्य – मुलींच्या शिक्षण विकासात पालकांचे दारिद्र्य ही फार मोठी समस्या आहे. पोटाचे प्रश्न जो पर्यंत सुटत नाहीत तो पर्यंत माणसाचे कशातच लक्ष नसते. शेती काम करतांना घरातील लहान मोठी कामे करण्याची गरज घरातील मुलीं कडून पूर्ण केल्या जाते. घरातील छोटी भांवडे सांभाळणे, कपडे धुणे, भांडी घासणे, घर सांभाळणे इत्यादी कामे अर्थातच मुलींना करावे लागते. याउलट मुले काहीच काम करीत नाहीत तरी आई-वडीलांचा मुलांविषयी वेगळाच भाव असतो आणि मुलीं विषयी वेगळाच. एवढं असून सुध्दा प्राथमिक वर्गात मुलींची अभ्यासातील प्रगती मुलांपेक्षा जास्त दिसून येते. याची प्रचिती दहावी व बारावीच्या निकाल ज्यावेळेस लागतो त्यावेळेस निदर्शनास येते. मुलींचा निकाल मुलांच्या निकालापेक्षा नेहमीच सरस असतो. पहिल्या दहा मध्ये सर्व श्रेष्ठ गुणांत मुलींच बाजी मारतात. मात्र पुढे पदवीचे शिक्षण घेतांना मुलींच्या संख्येत लक्षणीय घट होते. गुणवत्ता यादीत झळकणा-या मुलीं कदाचित कुठे तरी नौकरी मिळवतिल परंतु बाकीच्या मुलींचे पुढे काय प्रगती होते ? या बाबत प्रश्न चिन्हच आहे. याउलट दहावी-बारावीत सर्वसाधारण गुण मिळविलेला मुलगा मात्र आपले शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी प्रयत्न करतो. ही प्रथा कुठे तरी बंद व्हायला पाहिजे मुलगा असो वा मुलगी सर्वांना शिक्षण मिळायलाच हवे. याउलट मुलींचे शिक्षण समाजाच्या व देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. आज देशात जे काही अनैतिक किंवा अराजकता वाढत चालले आहे. त्यास मुलींना शिक्षण न देणे हेच प्रमुख कारण दिसून येते. मुलीने शिक्षण घेतले तर तिला स्वत:बद्दल आत्मविश्वास निर्माण होतो. आज घरोघरी हुंडाबळी किंवा विवाहित मुलींचा जो छळ चालू आहे त्यास शिक्षण घेतलेली मुलगी नक्कीच विरोध करेल यात शंकाच नाही. मुलींच्या सुरक्षित आयुष्यासाठी तिला वयाच्या आठराव्या वर्षा पर्यंत शिक्षण देणे आवश्यक आहे. देशाच्या प्रगतीसाठी मुलींचे शिक्षण हे फारच आवश्यक आहे. पराया धन किेंवा परक्या घरची सून म्हणून जाणारी, आपल्या घरांसाठी तिचा ज्ञानाचा काय फायदा ? अश्या गोष्टीचा विचार न करता मुलींना शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यायाच्या विरूध्द आवाज उठविण्यासाठी मुलींना शिकवलेच पाहिजे, त्याशिवाय देशाचा विकास अशक्य आहे. म्हणूनच मुलींचे शिक्षण म्हणजे प्रगतीचे लक्षण असे म्हटल्या जाते ते काही खोटे नाही हे आपण नेहमी साठी लक्षात ठेवावे.
- नागोराव सा. येवतीकर
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद
ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
••••••••••••••••••••••••••••••••••••
लेख - स्त्रियांचा दर्जा उंचाविण्यासाठी.....
" यत्र नार्यस्तु पुज्यन्ते, तत्र रमन्ते देवता " या संस्कृत भाषेतील सुवचनाचा अर्थ आहे ज्याठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते त्याच ठिकाणी देव रमतो. हे झालं त्या श्लोकाचा शब्दशः अर्थ परंतु प्रत्यक्षात त्याचा अर्थ असा आहे. ज्या घरात स्त्रियांची पूजा केली जाते म्हणजे स्त्रियांना मानाचे स्थान दिले जाते, त्यांच्या विचारांना वाव दिले जाते, त्यांचा मान ठेवला जातो आणि त्यांना समानतेची वागणूक दिली जाते, त्या घरात देव रमतो यांचा अर्थ त्या घरात शांतता व समृद्धी राहते. त्या घरची उत्तरोत्तर प्रगती होत राहते. वरील सुवचन आपणांस बऱ्याच ठिकाणी वाचण्यात येते. नेहमीप्रमाणे वाचन करणे आणि सोडून देणे यापलीकडे आपण काहीच करीत नाही हे ही सत्यच आहे. पुरातन काळापासून महिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो होता अजूनही बदललेला नाही हे वृत्तपत्रातून प्रकाशित होणाऱ्या छोट्या मोठ्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्यामधून कळून येते. आजही स्त्रियाना चूल आणि मूल या क्षेत्रापुरतेच बांधून ठेवले आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना आजही त्यांना त्यांचा दर्जा मिळालेला नाही. तेंव्हा त्यांचा दर्जा उंचाविण्यासाठी काय उपाययोजना करता येईल ? यांचा विचार करण्याची ही योग्य वेळ आहे असॆ वाटते.
शनि मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी समाजात वादविवाद झाले आणि न्यायालयाने महिलांच्या बाजूने निकाल दिला आहे. परंतु समाज तो निकाल मानण्यास तयार नाही. तेंव्हा प्रश्न असा पडतो की, महिलांना मंदिरात प्रवेश दिल्याने त्यांचे सर्व प्रश्न सुटणार आहेत काय ? याचा विचार करणे गरजेचे आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार, अमानुष छळ या विषयावर आंदोलने झाली असती तर कदाचित महिलांना मोकळा श्वास घेता आले असता. स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते आजपर्यंत स्त्रियांच्या समस्येवर सर्वांनी भरभरून लिहिले आहे मात्र समाजात आजही महिलांच्या समस्या काही कमी झाले नाहीत कारण या समस्यावर ठोस अशी उपाययोजना झालीच नाही. फक्त चर्चा आणि चर्चाच झाली. म्हणूनच उपायांची अंमलबजावणी करण्याची नितांत आवश्यकता आहे. संसारात पुरुष आणि स्त्री दोघांनाही समान महत्व आहे. रथाच्या चाकाप्रमाणे पुरुष आणि स्त्री हे एकमेकांना पूरक आहेत. एक जरी चाक खराब झाले तर ज्याप्रमाणे रथ चालत नाही अगदी तसेच पुरूष आणि स्त्रियांचे आहे. दोघांच्याही प्रगतीत एकमेकास असलेला आधार महत्वाचे आहे त्याशिवाय जीवनाची प्रगती शक्यच नाही.
शिक्षणाने माणसाचा संपूर्ण विकास होतो हे यापूर्वी महात्मा फुले यांनी सांगितले आहे. शिक्षणामुळे व्यक्तींमध्ये आत्मविश्वास निर्माण होते. अन्यायाविरूध्द लढण्याची शक्ती मिळते. समाजात मान आणि सन्मान दोन्ही मिळतात. याचमुळे समाजात स्त्रियांचा दर्जा उंचाविण्यासाठी मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचसोबत याच शिक्षणाच्या माध्यमातून ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले तर कोणत्याही संकटाला न डगमगता यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतात. आज कित्येक स्त्रिया स्वतःच्या पायांवर उभे होत आहेत. त्यामुळेच समाजात त्यांचा दर्जा सुध्दा उंचावला जात आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाकडे सर्वांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. प्राथमिक वर्गात शिकणाऱ्या मुलींची संख्या समाधानकारक आहे मात्र उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संख्येत लक्षणीय फरक दिसते. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच मुली उच्च शिक्षण पूर्ण करतात, यांत बदल झाले पाहिजे. शासनाने सुध्दा मुलींच्या उच्च शिक्षणाकडे विशेष लक्ष देवून मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. प्रत्येक पालकांनी मुलींच्या शिक्षणाला प्रथम प्राधान्य द्यायलाच पाहिजे. मुलगा - मुलगी यांत भेद न मानता समान तत्वावर चालले पाहिजे असॆ वाटते.
जी व्यक्ती पैसा कमाविते, त्यांस घरात, समाजात आणि गावात प्रतिष्ठा मिळते आणि आपल्या पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये पैसा फक्त पुरुष कमावितो म्हणूनच त्यालाच प्रतिष्ठा मिळते, यांत काही चूक नाही. मग स्त्रियांनी देखील रोजगार किंवा नौकरी मिळविले आणि त्याद्वारे पैसे कमावू लागले तर समाजात, घरात आणि गावात त्यांची सुध्दा प्रतिष्ठा नक्कीच वाढू लागेल, यांत शंकाच नाही. यांचाच विचार करून प्रत्येकाने आपल्या बहिणीला किंवा मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल असॆ शिक्षण देऊन त्यांना रोजगार किंवा नौकरी करण्याची संधी दिली तर ते स्वतः प्रगल्भ होतील आणि त्यांची समाजातील पत वाढून दर्जा सुध्दा वाढण्यास मदत होईल. कायद्याने प्रत्येक क्षेत्रात महिलांना समान संधी देण्याची तरतूद केलेली आहे. आज नोकरी असो वा राजकारण तेथे महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येत आहेत. घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पाऊल न ठेवणारी महिला आज रात्र पाळी च्या ठिकाणी काम करण्याची तयारी दर्शविते यावरून तिचा दर्जा उंचावला आहे असे नक्कीच म्हणता येईल. पण हे वर वर दिसणारे चित्र आहे. याच चित्राची दुसरी बाजू फारच भयानक आहे. आज बऱ्याच स्त्रिया नोकरी किंवा इतर कारणाने घराबाहेर पडत आहेत, पुरुषा सारखे काम करून पैसा देखील कमावित आहेत मात्र तरी ही त्यांना त्यांच्या मनासारखे जीवन जगता येत नाही. नोकरी करावी महिलांनी आणि तिच्या पगारावर नियंत्रण पुरुषाचे. ATM सारख्या कार्डने पुरुषांना खूप सोईचे केले आहे. नाही तर पूर्वी पैसे काढण्याच्या निमित्ताने बँकेत जायला भेटायचे. आत्ता ती ही सोय उपलब्ध नाही. काही महिलांची एवढी बिकट अवस्था आहे की ATM चा पिन क्रमांकदेखील त्यांना माहीत नसतो. मग आपल्या एवढ्या शिक्षणाचा आणि नोकरीचा फायदा तो काय ? इकडे राजकारणामध्ये ही महिलासाठी अच्छे दिन आहेत असे वाटत नाही. पुरुषांच्या बरोबरीने महिला देखील राजकारण मध्ये सहभागी व्हावे म्हणून त्यांना आरक्षण दिले आहे. त्याचमुळे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी श्रीमती इंदिरा गांधी विराजमान होऊ शकल्या. भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपतीच्या पदावर श्रीमती प्रतिभाताई पाटील यांची निवड झाल्यावर सर्व महिलांना नक्की अभिमान वाटला असेल यात शंका नाही. भारतीय राजकारणात नाव घेण्याजोग्या अजून भरपूर महिला आहेत. जे की स्वबळावर पुढे आले आहेत. पण नेमके याच ठिकाणी आपल्या हातून चूका होतात आणि ग्रामपंचायतच्या सरपंचपदापासून ते महापालिकेच्या महापौरपदापर्यंत महिलांना संधी दिली जाते. मात्र याठिकानी त्या महिलांना निर्णय घेण्याची संधी फार कमी वेळा मिळते. कारण त्यांचे पतिदेव किंवा घरातील कर्तबगार पुरुष निर्णय घेत राहतो. महिलांना फक्त सहीपुरते सिमीत ठेवल्या जाते. कळसूत्रीबाहुली प्रमाणे यांचे वागणे होऊन जाते. याठिकाणी एक गोष्ट खास करून नमूद करावेसे वाटते, सभापती किंवा अध्यक्ष पदावर महिला असेल तर त्यांचे पती किंवा इतर कोणी तरी पुरुष सर्व सूत्रे हातात घेऊन काम पाहतात. असेच जर एखादी महिला नोकरदार आहे, याठिकाणी त्या महिलेच्याऐवजी तिच्या पतीला किंवा घरातील एखाद्या पुरुषांना तिथे पाठविले तर याच लोकप्रतिनिधी मंडळीना ही बाब नक्की पटत नाही. असे का ? याचा ही जरा विचार करावा लागेल. नुकतेच पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका पूर्ण होऊन त्याचे निकाल देखील जाहीर झाले आहेत. बऱ्याच ठिकाणी सभापती, अध्यक्षा किंवा महापौर होण्याची संधी महिलांना मिळाली असेल. त्यांनी महिलांच्या आत्मसन्मानासाठी जरा विचार करावा. पुरुष मंडळीनी सुद्धा महिलेला मिळालेल्या संधीनुसार तिला मार्गदर्शन करावे आणि स्वतंत्र व्यवहार तिला करू दिल्यास काही तरी विकास नक्की होईल.
जुन्या विचारांचा पगडा डोक्यावर असल्यामूळे समाज आज सुध्दा त्या सनातन परंपरेत अडकून पडले आहे. महिला वर्ग या विचार पध्दतीत मोठ्या प्रमाणात दिसून येतात. श्रध्दा आणि अंधश्रद्धाच्या विळख्यातून महिला अजूनही बाहेर आले नाहीत. तेंव्हा महिलांनी आत्ता आपला समाजातील दर्जा वाढविण्यासाठी स्वतः प्रयत्न करणे सुध्दा तेवढेच आवश्यक आहे. समाजात एकाएकी असॆ बदल होणार नाही. त्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष आणि स्त्रिया या दोघांनीही सामंजस्यपणे वागणे ही गोष्ट सुध्दा विसरून चालणार नाही.
नागोराव सा . येवतीकर
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत. )
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
nagorao26@gmail.com
••••••••••••••••••••••••••••••••••••
लेख - तिला मदत .... ?*
आठ मार्च रोजी संपूर्ण जगात महिला दिन साजरा केला जातो. महिलांना सन्मान मिळावा या उद्देशाने हा दिवस फक्त आजच्या दिवशी साजरा करण्यात काही अर्थ आहे का ? महिला दिन रोजच साजरा करण्यासारखा आहे. कारण पुरुषांच्या जीवनातून महिला वजा केल्यावर जीवन काय उरते ? याची साधी कल्पना देखील करवत नाही. विचार करण्यासारखी बाब आहे, पण यावर कोणाताच पुरुष विचार करत नाही, हीच फार मोठी खेदाची बाब आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिलांना देखील वागणूक मिळायलाच हवे असे बोलणारे अनेक भेटतील पण बोलल्या प्रमाणे कृती करणारे फारच कमी बघायला मिळतात. महिलांना घरात मिळणारे दुय्यम स्थान हा विषय सर्वांसाठी चिंतन करणारा आहे. यासाठी सर्वात पहिल्यांदा पुरुषाला स्वतः मध्ये बदल करणे आवश्यक आहे तरच महिलांना काही करता येईल.
घरात, समाजात कामाची झालेली विभागणी यावर चर्चा व्हायला पाहिजे. आपल्याकडे कामाची अशी विभागणी झालेली आहे की, अमुक काम पुरुषांनी आणि तमुक काम स्त्रियांनीच केली पाहिजे. याठिकाणी कसलीही तडजोड स्वीकारायला आपले मन तयार होत नाही. याची शिकवण अर्थात लहानपणापासून मिळते ज्यामुळे एकामेकांची कामे वाटून घेतली आहे. म्हणून महिलांच्या या कामामध्ये पुरुषांनी स्वतः हुन सहभागी झाल्यास काही बदल होऊ शकेल. प्रत्येक पुरुषांनी घरातील महिलांच्या कामात थोडीशी मदत करायला हवी. आपली जराशी मदत देखील महिलांना खुप काही बळ देऊन जाईल. प्रत्येक घरातील महिला सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत भरपूर काम करत असते. त्या सर्व कामातील काही काम पुरुषांनी केले तर तेथे खरी समानता सुरू होईल. ज्या घरात पुरुष आपल्या पत्नीला किंवा आईला मदत करतो त्या घरात असणारे मुलं देखील भविष्यात तसे वर्तन करतील. म्हणजे नकळत आपण आपल्या मुलांवर असे संस्कार करत असतो हे महत्वाचे आहे.
आज रोजची वर्तमानपत्रे किंवा टीव्ही चालू केले की महिलांवर होत असलेल्या अनेक अन्यायकारक बातम्या वाचायला व पाहायला मिळते. अनैतिकता खूप वाढली आहे असे चिंताजनक वाक्य आपल्या तोंडून बाहेर पडते पण ही अनैतिकता का निर्माण झाली असेल यावर चिंतन करत नाहीत. पूर्वी महिलांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती आज त्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी मिळून देखील ते निर्भयपणे फिरू शकत नाहीत. म्हणजे ते आज ही आपल्या घरातच कैद असल्यासारखे आहेत. एखादी महिला रात्रीच्या वेळी सुमसान रस्त्यावर असेल तर तिच्या जीवाला धोखा ठरलेला आहे. दिल्ली, मुंबई सारखी महानगरे रात्रीला झोपत नाहीत असे म्हणतात पण त्याच न झोपणाऱ्या शहरात लोकांची झोप उडून जाईल अश्या घटना घडत आहेत. महिलांच्या मनातील भीती काढण्यासाठी प्रत्येकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. नुसते असे महिला दिन साजरे करून काही निष्पन्न होणार नाही. म्हणून महिला दिन एक दिवस नाही तर 365 दिवस ही साजरे व्हायला पाहिजे असे वाटते.
- नासा येवतीकर, 9423625769
••••••••••••••••••••••••••••••••••••
लघुकथा - मुलांपेक्षा मुलगी बरी.....!
आज ती फारच अस्वस्थ होती. दवाखान्याच्या पायऱ्या चढताना तिच्या मनात नाना प्रकारचे विचार चालू होते. तिच्या सोबत तिची सासूबाई होती त्यामुळे तिला अजुन जास्त धडकी वाटत होती. अखेर दवाखान्यात पोहोचल्यावर तिथल्या खुर्चीवर तिने जरा आराम करण्यासाठी बसली. थोड्या वेळानंतर तिचा नंबर लागला. तशी ती आत गेली. सासुबाई डॉक्टरांकडे गेल्या आणि ती तिथल्या पलंगावर आडवी झाली. डॉक्टर येऊन तपासून निघुन गेले. काही त्रास होते काय ? अशी विचारण करून डॉक्टर आपल्या जागेवर गेली. तसे सासुबाई आणि डॉक्टर यांच्यात काही तरी कुजबुज बोलणे झाले. पण तिला काही त्यातले कळू दिले नाही. घरी आल्यावर चर्चा झाली. गर्भात मुलींचे अंश असल्यामुळे गर्भपात करावा अशी सासुबाईची ईच्छा होती. कारण तिला पहिली अडीच तीन वर्षाची एक सुंदर मुलगी होती. सध्या तिला दिवस गेले होते. सासुबाईची ईच्छा होती की यावेळी मुलगाच हवा अशी ती हट्ट करत होती. कारण मुलगा हा वंशाचा दिवा असतो. तो जर नसेल तर आपल्या साऱ्या संपत्तीचे करायचे काय ? या समस्येमुळे तिला खुप त्रास होत होता. तो सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत होता. त्याला तिची समस्या कळत होती पण तो आईला समजावू शकत नव्हता. काही केल्या ती कोणाचे ऐकत नव्हती. ती जुन्या विचारसरणीची होती. त्यामुळे त्या दोघांना पण डोक्यावर टेंशन येत होते. पण गर्भपात करायचे नाही यावर ते दोघे ठाम होते. त्यादिवशी पोटात त्रास होत असल्यामुळे सकाळी सकाळी तिला दवाखान्यात भरती करावे लागले. काही वेळानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पहिल्या मुलींपेक्षा ही ती खुप सुंदर दिसत होती. तो तिच्या सोंबतच होता. मुलगी झाली हे कळताच सासुबाईचा चेहरा खुप उतरुन गेला. सासुबाई मुलगी जन्मली हे कळाल्यावर देखील दवाखान्यात आली नाही. त्यामुळे तिला खुप दुःख वाटले पण त्याची खंबीर सोबत होती म्हणून तिला काळजी वाटत नव्हती मात्र चिंता लागली होती पुढे काय होणार ?
दिवस असेच पुढे सरकत होते. दोन्ही मुलीं चंद्रकलेप्रमाणे वाढत होती. दोन्ही मुलीं खुप हुशार होत्या त्यामुळे चांगले गुण घेत प्रत्येक वर्गात उत्तीर्ण होत गेल्या. दोघांनाही मेडिकलला प्रवेश मिळाला आणि एक मुलगी डोळ्याची डॉक्टर झाली तर छोटी मुलगी मेडिकल ऑफिसर झाली. सर्व काही आनंदात होते. दोघीचे थाटामाटात लग्न झाले. लग्न होऊन ते सासरी जरी गेले असतील तरी आई बाबा आणि आजी यांना ते विसरले नाहीत. दोन्ही मुलीं आजीवर खुप प्रेम करायचे एवढे असून देखील सासुबाई अजुन मोकळेपणाने बोलत नव्हत्या. पण एके दिवशी सासुबाईला डोळ्याचा त्रास झाला तेंव्हा तिला मोठ्या मुलींच्या दवाखान्यात एडमिट करण्यात आले. मोठ्या मुलीने आपल्या अभ्यासाच्या बळावर डोळ्याची यशस्वीपणे शस्त्रक्रिया पूर्ण केली. त्यावेळी तिच्या आई बाबाला खुप आनंद झाला. डोळ्यांची समस्या सुटल्यामुळे सासुबाईचे डोळे उघडले आणि आज ती म्हणते मुलापेक्षा मुलगी बरी उजेड देते दोन्ही घरी.
( आज जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने मुलींच्या जन्माविषयी प्रत्येकाने डोळसपणे विचार करणे गरजेचे आहे. हेच या कथेच्या माध्यमातून सांगण्याचा एक छोटा प्रयत्न. )
- नागोराव सा. येवतीकर
( लेखक नांदेड जिल्हा परिषदेत उपक्रमशील शिक्षक आहेत. )
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
Sunday, 5 March 2023
होळी ( Holi )
होळीचा रंग
होळी आली रे बघ होळी आली
नाना रंगाची झोळी घेऊन आली
मनातला राग द्वेष काढून टाक
सांगत आला आहे लाल रंग
सकारात्मक विचार करून वाग
बोलतो आहे हिरवा हिरवा रंग
विचारात क्रांती करण्या आली
होळी आली रे बघ होळी आली
सर्वाना आपल्यात सामावून घे
संदेश देत आहे बघ रंग निळा
इतरांच्या दुःखाचे निवारण कर
आदेशाने सांगतोय रंग काळा
वागण्यात बदल करण्या आली
होळी आली रे बघ होळी आली
धैर्याने संकटाला तोंड देत राहा
प्रेरणा देत आहे तुला केसरी रंग
प्रगतीसाठी अविरत चालत राहा
प्रोत्साहित करतोय पिवळा रंग
जगण्याची उर्मी देण्या आली
होळी आली रे बघ होळी आली
- नासा येवतीकर, धर्माबाद 9423625769
🌳 चला मित्रांनो होळी साजरा करु या 🌳
दुर्गुणाची, दुराचाराची होळी करु या
सद्गुण आणि सदाचाराने झोळी भरू या
चला मित्रांनो होळी साजरा करु या
वाईट विचारांच्या टोळी सोडून देऊ या
चांगल्या विचारांच्या आळीत फिरू या
चला मित्रांनो होळी साजरा करु या
निराशा अन् दारिद्र्याचे दहन करु या
निरोगी अन् सुखी जीवनाची आशा करु या
चला मित्रांनो होळी साजरा करु या
- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769
होळी करू या ......
लघुकथा - (बे) रंगपंचमी
होळीचा सण आबालापासून वृद्धांपर्यंत सर्वानाच आवडणारा सण. सायंकाळी होळी करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धुलीवंदन म्हणजे एकमेकांना रंग लावणे, त्यालाच रंगपंचमी असे देखील म्हटले जाते. हा रंगाचा खेळ विशेष करून लहान मुलांना खूपच आवडते. मराठी व हिंदी चित्रपटात देखील या सणाला विशेष असे महत्व आहे. शोले चित्रपटातील गब्बरसिंगच्या भारदस्त आवाजातील " कब है होली ? " हे डॉयलॉग रसिक अजूनही विसरू शकत नाही. तसेच सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे हे गाणे होळीच्या दिवशी हमखास ऐकायला मिळते. प्रत्येकांच्या घरात या दिवशी आनंदाचे वातावरण असते. प्रत्येकजण निळ्या, पिवळ्या, लाल गुलाबी रंगाने रंगून गेलेला असतो. घरातील व्यक्तीच ओळखणार नाही अशी अवस्था घरातल्या बालकांची होत असते. अश्या या आनंदीमय वातावरणात रमेशच्या घरात मात्र नीरव शांतता होती. घरात कोणी कोणाला बोलत नव्हते. पीन ड्रॉप सायलेंट होतं. टीव्हीचा आवाज नव्हता की मोबाईलचा आवाज. रमेश पलंगावर आडवा पडला होता आणि त्याची नजर खिडकीतून बाहेर रंग खेळणाऱ्या मुलांवर स्थिरावली होती. मी देखील आज त्यांच्यासोबत रंग खेळू शकलो असतो अशी खंत त्याच्या मनात चालू होतं. मनात असून देखील तो बाहेर मित्रांसोबत रंग खेळायला जाऊ शकत नव्हता कारणही तसेच होतं .........
रमेश नुकतीच दहावीची परीक्षा चांगल्या मार्कने उत्तीर्ण होऊन महाविद्यालयात अकरावीला गेलेला तरुण धडधाकट व गुणी मुलगा. नुकतेच त्याला मिसरूड फुटू लागले होते. पहिली ते दहावीपर्यंतची शाळा जवळ होती म्हणून त्याला ये-जा करण्यासाठी काही त्रास झाला नाही. मात्र अकरावी शिकण्यासाठी त्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता ते घरापासून खूप अंतरावर होते. सायकलवर शाळेला जाण्याची त्याला लाज वाटत होती म्हणून त्याने स्कुटी घेऊन देण्याचा हट्ट लावून धरला. त्याची गरज लक्षात घेऊन त्याच्या बाबाने त्याला स्कुटी घेऊन दिली. तसा त्याचा महाविद्यालयात जाण्याचा प्रश्न सुटला. स्कुटी म्हटल्यावर त्यात पेट्रोल भरावेच लागते, ती काय सायकल सारखी हवेवर चालणारी वस्तू नाही. त्यामुळे बाबाकडून पॉकेटमनी मिळू लागली. खिशात पैसा आणि फिरायला गाडी मिळाल्यामुळे रमेश वेगळ्याच ट्रॅकवर गेला. आवारा गर्दी करणाऱ्या मित्रांची त्याला संगत मिळाली. कॉलेजच्या नावाखाली तो सिनेमा बघणे, बागेत फिरणे असे काम करू लागला. हळूहळू त्याला पॉकेटमनी कमी पडू लागली तसे तो आपल्या आईजवळ हट्ट करू लागला. लाडक्या लेकांचे हट्ट पूर्ण करण्यासाठी त्याची आई लपून छपून त्याला पॉकेटमनी देऊ लागली. त्यामुळे तो अजून सैराट झाला होता. मित्रांसोबत हॉटेल शेअर करण्याचे प्रकार वाढू लागले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तो मित्रांसोबत पार्टी केला आणि दारू पिऊन रात्री बारानंतर घरी आला. दुसऱ्या दिवशी त्याच्या बाबाने त्याला खूप खडे बोल ऐकू घातले. तो गप्प गुमान ऐकत होता. काही दिवस शांततेत गेले पण त्याचे मित्र त्याला शांत बसू देत नव्हते. काही दिवसांनी होळीचा सण येणार होता म्हणून साऱ्या मित्रांनी शेतात जाऊन हा सण साजरा करण्याचा प्लॅन तयार केला. त्यात रमेशचा ही सहभाग होताच. पण त्याच्याजवळ पैसे नव्हते त्यामुळे तो एक पाऊल मागे सरकला होता. मात्र त्याचा जिवलग मित्र सुरेशने त्याच्या वाट्याचे पैसे भरले आणि होळी सण आनंदात व रंगात साजरी करण्याचा प्लॅन तयार केले.घरी काही ही न सांगता मित्रांसोबत रंग खेळून येतो असे सांगून रमेश आपली स्कुटी घेऊन बाहेर पडला. " अरे, सावकाश जा, आज बाहेर वातावरण खराब असते, सांभाळून चालवं " रमेशच्या आईने त्याला जाताना बोलले. तो आपली मान हलवत निघून गेला.
शेतात दहा ते बारा मित्रांची पार्टीची जय्यत तयारी चालू होती. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होते. पाच-सहा किलो मटणाची भाजी शिजत होती. सोबत दारूच्या दोन तीन बाटल्या देखील आणले होते. शिजत असलेल्या मटणाचा वास सर्वत्र पसरला होता. तेवढ्यात बाटलीचे झाकण उघडले गेले, ग्लासात भरले, त्यात कोणी पाणी टाकले, कोणी सोडा टाकले, तर कोणी कोक टाकले एकदाच चिअर्स झालं आणि हॅपी होली म्हणून ग्लास खाली झाले. रमेश देखील त्या पार्टीत सामील झाला. बघता बघता त्यांची दारूची पार्टी वाढू लागली. आता साऱ्यांना चढू लागली. सारेच झिंगु लागले. गाण्यावर नाचू लागले. एकामेकांना रंग लावू लागले. या साऱ्या धुंदीत खाण्याचे त्यांना भान राहिलेच नाही. रंग खेळून खेळून रमेश घरी जाण्यासाठी आपली स्कुटी घेऊन बाहेर पडला. त्याला जागेवरून स्कुटी काढता येत नव्हती, त्याचा तोल जात होता, दारू जरा जास्त झाली होती. तरी ही तो स्कुटी बाहेर काढला आणि मुख्य रस्त्यावर चालवू लागला. त्याचे घर दोन किमी दूर अंतरावर होते. त्या रस्त्यावर अनेक वाहने वेगात जात येत होती. एका चौकात रमेशला कुठं जावे कळलेच नाही त्याने सरळ समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिला आणि बाजूला पडला. ते ट्रक देखील वेगात होते, रमेशचा स्कुटी अचानक त्याच्या पुढे आली, ब्रेक मारेपर्यंत धडक लागली, रमेश स्कुटीवरून खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायावरून ट्रकचे चाक गेले. तो जागेवरच बेशुद्ध पडला. लोकांनी त्याला दवाखान्यात घेऊन गेले. काही वेळाने त्याचे आई बाबा तेथे आले. पाय गेले तर गेले जीव वाचला म्हणत सारे रडत होते. रमेश दोन्ही पाय नसलेला दिव्यांग व्यक्ती झाला होता. पलंग हेच त्याचे विश्व झाले होते. त्याची रंगपंचमी दारुमुळे बेरंग झाली होती. आज होळीच्या निमित्ताने त्याला त्याची चूक जाणवत होती. प्रायश्चित करण्यापलीकडे त्याच्या हातात काहीच नव्हते.
- नासा येवतीकर, धर्माबाद
जि. नांदेड 9423625769
Monday, 27 February 2023
सौ. चंदा मॅडम यांचा निरोप समारंभ Retierment of Chanda Madam
दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )
सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...
-
कर्मचाऱ्यांच्या जीवनातील एक अनमोल क्षण म्हणजे सेवानिवृत्ती. एका डोळ्यात आसू तर एका डोळ्यात हसू अशी विपरीत स्थिती यावेळी असते. कभी खुशी, कभी...
-
दीपोत्सवाचा सण : दिवाळी दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळी सणाची आबालापासून वृध्दापर्यंत सर्वानाच चातक पक्ष्य...
-
आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर प्रमुख पाहुणे, आदरणीय गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, आज मी आपल्या समोर भारतमातेचे दोन ...