Friday, 7 May 2021

08/05/2021 red cross day

।। रक्तदान ।।


काही गोष्टी अशा आहेत
जे तयार करता येत नाही
अन्न, पाणी, हवा नि रक्त
कोठेही निर्माण होत नाही

अन्नदान केल्याने व्यक्तीचे
एका वेळेचे पोट भरेल
पण रक्तदान केल्यामुळे
आयुष्यभर जीवन मिळेल

मानवाला जगण्यासाठी
खूप अनमोल आहे रक्त
माणसाच्या शरीरातच 
तो तयार होत असतो फक्त

रक्ताचे नाते असते घट्ट
जुळवून घेतो कोणालाही
जाती जमाती धर्म पंथ
पाहत नाही मुळीच काही

आजारी किंवा अपघातात
रक्ताची खरी गरज भासते
हिंडून हिंडून रक्त भेटेना
रक्ताचे महत्व तेंव्हा कळते

रक्ताचे आहेत अनेक प्रकार
जरी दिसत असेल ते लाल
रक्तगटानुसार जुळते रक्त
मिळत नसेल तर हालबेहाल

रक्त दिल्याने कमी होत नाही
रक्तदानाचे महत्व तुम्ही जाणावे
उलट रक्ताचे शुद्धीकरणासाठी
नियमित रक्तदान करत राहावे

ओ पॉजिटिव्ह जगाचा रक्तदाता
रक्तदानाने इतरांना होतो फायदा
रक्तदान हेच आहे जीवनदान
बी पॉजिटिव्ह राहावे सदासर्वदा

- नासा येवतीकर, 9423625769


Wednesday, 5 May 2021

06/05/2021 N P Bendre

एक आठवण ........!

🌹भावपूर्ण श्रद्धांजली 🌹

श्री एन. पी. बेंद्रे
सेवानिवृत्त मुख्याध्यापक
हु. पानसरे हायस्कुल धर्माबाद

माझ्या वडिलांचे वर्गमित्र ही सरांसोबतची पहिली ओळख झाली. पानसरे शाळेत खूप विद्यार्थी आणि खूप शिक्षक सारे बघून माझ्या मनात धडकी भरली होती. मात्र बेंद्रे सरांनी मला दिलासा दिला आणि काही समस्या आली तर मला येऊन भेट, काळजी करू नको असे ते म्हणाले. त्यावेळी ते उपमुख्याध्यापक या पदावर होते. मी दहावीला गेलो आणि त्यांच्याकडे मुख्याध्यापक पद आले. योगायोगाने माझ्या दहावीचा परीक्षा क्रमांक पानसरेमध्येच आला. त्यामुळे अजून थोडं बरे वाटले. कॉप्या करण्याचा प्रश्नच नव्हता कारण तेव्हा परीक्षा खूप कडक होत होत्या. फक्त मनाला दिलासा म्हणून पहिल्या पेपरला वडिलांनी परत बेंद्रे सरांची भेट घालून दिली. त्यावेळी ते जे बोलले ते आज ही आठवते, " सायन्ना, अरे नागोराव खूप हुशार विद्यार्थी आहे. त्याची काळजी करू नको, तो छान पेपर सोडावेल, तू जा आता " त्यांचे पहिल्या पेपरच्या दिवशी बोललेले वाक्य शेवटच्या पेपरपर्यंत ऊर्जा देत राहिली. सर्वच पेपर इंग्रजीसह ( सर्वात जास्त भीती इंग्रजी विषयाची होती ) छान पैकी सोडविण्यात आले. परीक्षेत उत्तीर्ण झालो नाही तर विशेष प्राविण्य घेऊन उत्तीर्ण झालो. म्हणून धर्माबाद नागरपालिकेकडून सन्मानचिन्ह देण्यात आले. त्यावेळी मी उपस्थित नव्हतो म्हणून बेंद्रे सरांनी माझ्या वडिलांचा सत्कार केला. एका वर्गमित्रांनी एका वर्गमित्रांचा त्यावेळी सत्कार केला हे पाहून दोघे ही आनंदी झालो असे वडिलांनी मला नंतर सांगितले. अकरावी, बारावी आणि डी एड पूर्ण करायला चार ते पाच वर्षे संपली. 
माझ्या वडिलांनी ईच्छा होती की मी पानसरे शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करावी. योगायोगाने बेंद्रे सर त्यावेळी देखील मुख्याध्यापक म्हणून काम पाहत होते. माझा मित्र तिथे आहे, मी बोलून पाहतो तू काळजी करू नको असे म्हणून त्यांनी बेंद्रे सरांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी अर्ज करायला सांगितलं. माझ्या SBC प्रवर्गासाठी एकच जागा होती. त्याच जागेसाठी मी प्राथमिक शिक्षक पदासाठी अर्ज केला. निवड मंडळासारखी आधी लेखी परीक्षा झाली. त्यात मी टॉप मध्ये उत्तीर्ण झालो. नंतर वर्गावर शिकवणे झाले आणि प्रत्यक्ष मुलाखत सुरू झाली. मुलाखतीला गेलो, समोर सर्व मला शिकवलेले शिक्षक बसलेले होते. माझ्यातली गुणवत्ता त्यांना थोडीफार माहीत होतीच. म्हणून प्रत्येकांनी एक एक प्रश्न विचारले मी पण समाधानकारक उत्तर दिलो आणि बाहेर पडलो. माझी निवड होईल असे मला वाटत होते. वडिलांनी बेंद्रे सरांना भेटून जागेविषयी विचारणा केली. तेव्हा बेंद्रे सरांनी परत एकदा म्हणाले, " सायन्ना, नागोराव हुशार विद्यार्थी आहे, तो जिल्हा परिषद मध्ये लागतो, इथे पैसे द्यावे लागतात, तुझी तयारी असेल तर सांग, मी बोलतो." यावर वडिलांची तयारी होती पण माझा नकार होता कारण मीपुणे निवड मंडळाची परीक्षा दिली होती आणि माझी निवड होईल याची मला खात्री होती. सायंकाळी आम्ही घरी परत आलो. ती जागा दुसऱ्याला मिळाली हे ही तिथेच कळाले. मला तेव्हा काही वाटले नाही, मी जरा देखील नाराज झालो नाही. 
दुसऱ्याच दिवशी निवड मंडळाची यादी लागली त्यात माझी निवड झाल्याची माहिती नांदेडहुन माझ्या वडील बंधूने कळविले. त्यावेळी माझ्या घरी लँडलाईन फोन उपलब्ध होते. निवड झाली पण किनवट तालुक्यात पोस्टिंग मिळाली हे ऐकून माझं जीव धस्स केलं. किनवटचे नाव ऐकून मला भीती वाटू लागली. पानसरे शाळेत नोकरी स्वीकारली असती तर बरं झालं असतं असे तेव्हा वाटू लागले. वडिलांनी बेंद्रे सरांना संपर्क केले, पैसे भरायची तयारी आहे, जागा आहे का ? यावर त्यांनी उत्तर दिलं " नाही, कालच ती जागा भरण्यात आली." मला किनवटला पोस्टिंग मिळाल्याचे त्यांना सांगितलं. तेव्हा त्यांनी मला घेऊन भेटायला सांगितलं. माझं त्यांनी समुपदेशन केले आणि मी किनवटला जाण्यास तयार झालो. 
त्यानंतर खूप दिवसाचा काळ उलटला. सर सेवानिवृत्त झाले. मी आदिवासी भागात पाच वर्षे सेवा करून धर्माबादला बदली करून आलो. एके दिवशी रस्त्यात त्यांची भेट झाली. मी नमस्कार केलो. त्यांनी माझी आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि जाता जाता म्हणाले, " नागोराव तू छान लिहितोस, मागे तुझा एक लेख पुण्यनगरी मध्ये वाचलं होतं, छान वाटलं, असेच लिहीत राहा " म्हणून आशीर्वाद दिले. नंतर जेव्हा केव्हा भेट व्हायची तेव्हा ते माझ्या प्रसिद्ध झालेल्या लेखांवर भरभरून बोलायचे. सर्वांची चौकशी करायची. मी पाहिलेला एक प्रेमळ माणूस म्हणजे एन पी बेंद्रे सर होय. गेल्या वर्षी काकू गेल्या आणि एका वर्षात सरांनी देखील या जगाचा निरोप घेतला. 

श्रद्धांजली लिहितांना देखील डोळ्यात अश्रू दाटत आहेत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो. 

- नासा येवतीकर, धर्माबाद

Saturday, 1 May 2021

02/05/2021 Dogs story

राजू आणि कुत्र्याचे पिल्लू
शाळेतून येता येता राजूला रस्त्यावर एक छोटंसं कुत्र्याचे पिल्लू दिसलं. त्याच्या आसपास कोणीच नव्हतं. तो एकटाच होता, त्याची आईपण जवळ नव्हती, त्याला भूक लागली असेल असे राजूला वाटले म्हणून त्याने आपल्या बॅगमधील खाऊचा डबा काढला. त्यात एक दोन बिस्कीट होते. दुपारच्या सुट्टीत खाल्ले नव्हते म्हणून ते शिल्लक होते. डब्यातून दोन बिस्कीट काढला आणि त्या छोट्या कुत्र्याच्या पिल्लूला खायला दिला. ते खाल्यावर त्याला जरा बरे वाटले म्हणून तो रस्त्याच्या एका बाजूला जाऊन बसला. ते कुत्र्याचं पिल्लू खूपच सुंदर होतं, त्यांचा रंग गव्हाच्या रंगासारखं होतं आणि नाकावर काळा रंग होता, दिसायला गुबगुबीत होता म्हणून तर राजूला तो खूपच आवडला होता. त्याला बाय बाय करून तो आपल्या घरी आला. त्यादिवशी त्याच्या मनात तो कुत्रा घर करून राहिला होता म्हणून त्याचे मन कुठेही लागत नव्हते. रात्रीला देखील त्याला झोप लागली नाही. सकाळ कधी होते आणि त्या कुत्र्याच्या पिल्लूला कधी एकदा भेटतो असे त्याला झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तो लवकरच तयार झाला. आज खाऊच्या डब्यात चार बिस्किटे जास्तच घेतली तेव्हा आई त्याला ओरडली " राजू, नुसते बिस्किटे खाऊन राहणार आहेस का ? पोळी-भाजी काही खाणार आहेस की नाही " 
यावर राजू म्हणाला " हो आई, सर्वच खातो, काळजी नको, बाय" असे म्हणून तो बॅग खांद्याला लटकावला आणि शाळेला निघाला. राजू चौथ्या वर्गात शिकणारा एक हुशार आणि अभ्यासू मुलगा. एकुलता एक होता पण त्याने कधी हट्ट करून आपल्या आई-बाबांना त्रास दिला नाही. त्याचे वडील एका खाजगी कंपनीत कामावर होते. सकाळी लवकर जात असत आणि रात्रीला उशिरा येत असत. राजुची आई मात्र खूपच प्रेमळ होती. शाळेतून घरी आली की ती त्याचा अभ्यास करवून घेई आणि छान छान गोष्टी सांगत गप्पा मारत असे.
घरापासून काही अंतर चालून गेल्यावर काल त्याला ते कुत्र्याचे पिल्लू दिसले होते म्हणून तो त्याला शोधू लागला. पण त्याला कुठेच दिसत नव्हतं. कुत्र्याचे पिल्लू दिसत नाही हे पाहून त्याला दुःख वाटू लागले. तो नाराज झाला होता पण तेवढ्यात काही अंतरावर ते कुत्र्याचे पिल्लू शेपूट हलवत हलवत राजूकडे येत असल्याचे त्याने पाहिले. तेव्हा राजू खूप आनंदी झाला. बॅगमधील खाऊच्या डब्यातून दोन बिस्किटे त्याला खाण्यास दिली आणि आनंदाने शाळेला गेला. शाळेत आज त्याला खूपच वेगळं वाटत होतं. आपण काहीतरी मोठं काम केलोय असे त्याला मनोमन वाटत होतं. 
मोरे सर वर्गात आले आणि त्यांनी शिकवायला सुरुवात केली. मुक्या प्राण्यांवर प्रेम करा असे आपल्या संतांनी सांगून गेले आहेत. असे मोरे सर बोलत होते आणि राजू मनोमन खूप खुश झाला होता. सायंकाळी शाळेतून घरी जाताना परत त्या कुत्र्याच्या पिल्लूला त्याने आपल्या खाऊच्या डब्यातील दोन बिस्किटे दिली. राजूने बिस्किट खाणे बंद केले आणि आपले बिस्किटे त्या कुत्र्याच्या पिल्लाला देऊ लागला. राजूची आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाची छान मैत्री जमली. शाळेतून येता जाता राजू त्याला बिस्किट खायला द्यायचा आणि ते पिल्लू राजूजवळ येऊन घुटमळत बसायचा. कुत्र्याच्या पिल्लाला राजुची ओळख झाली होती. तो दूरवर येताना पाहून त्याच्याकडे तोंड करून शेपूट हलवत उभा राहायचा.
त्या दिवशी रविवार होता. राजूने आपल्या आईला त्या रस्त्यावरील कुत्र्याच्या पिल्लूबद्दल पूर्ण माहिती सांगितली आणि म्हणाला, " आई, त्या कुत्र्याच्या पिल्लाला आपण घरी आणू या ना, प्लिज" यावर आई म्हणाली, " नको बाळा, आपल्या बाबांना हे मुळीच आवडत नाही" हे ऐकून तो खूप नाराज झाला. राजुचे बाबा जरा कडक शिस्तीचे होते. त्या दिवशी रविवारची सुट्टी होती. त्यामुळे राजूला देखील सुट्टी होती. पण त्या कुत्र्याच्या पिल्लूला काय माहीत ? आज रविवारची सुट्टी असते. तो राजू ज्या रस्त्याने येतो त्या रस्त्यावर डोळे लावून बसला पण तो काही आलाच नाही. ते पिल्लू खूप नाराज झाले. त्याला भूक लागली होती. काही तरी खायला मिळते का म्हणून तो रस्त्यावर इकडे तिकडे भटकू लागला. पण त्याला काहीच भेटले नाही. तेवढ्यात त्याला रस्त्याच्या मधोमध काहीतरी पडल्याचे दिसले आणि तो ते खाण्यासाठी तो पळत सुटला. तेवढ्यात दुसरीकडून खूप वेगात आलेल्या कारने त्या कुत्र्याच्या पिल्लाला उडवले. ते कुत्र्याचे पिल्लू जागेवरच गतप्राण झाले. कुणी तरी त्या कुत्र्याच्या पिल्लाला उचलून रस्त्याच्या एका बाजूला केलं. 
राजूला त्या दिवशी दिवसभर चैन पडले नाही. ते पिल्लू आज काय खाल्ले असेल ? उपाशीच झोपला असेल का ? असे नाना विचार त्याच्या डोक्यात घोळत होते. त्याला घरी आणलं असतं तर बरं झालं असतं असा विचार करतच तो झोपी गेला. सकाळ झाली. तो नेहमीप्रमाणे आपली बॅग घेऊन शाळेला निघाला. त्याठिकाणी आल्यावर तो इकडे तिकडे पाहू लागला. पण त्याला कुठेच कुत्र्याचे पिल्लू दिसत नव्हते. राजूला पाहताच ते पिल्लू धावत त्याच्याकडे येत होतं. पण आज तसे काही घडत नव्हते. काही तरी विपरीत घडलं असणार अशी शंकेची पाल राजुच्या मनात चुकचुकली. बराच वेळ वाट पाहून देखील ते पिल्लू आले नाही तेव्हा राजूने तेथील एका माणसाला त्या पिल्लू विषयी विचारलं, " अहो काका, येथे एक छोटं कुत्र्याचं पिल्लू होतं, ते कुठं गेलंय, दिसत नाही" यावर त्या माणसाने काल रस्त्यावर घडलेली घटना राजूला सांगितली. ते पिल्लू आता या जगात नाही हे ऐकून तो खूप नाराज झाला. शाळेत गेल्यावर देखील त्याचे कुठेही मन लागत नव्हते. दिवसभर तो त्या पिल्लाच्या विचारात मग्न होता. घरात देखील त्याचे मन लागत नव्हते, यावर त्याची आई म्हणाली, " काय झालं राजू, बरं वाटत नाही का ? एवढा उदास का आहेस ? " यावर राजू काही बोलला नाही डोळ्यातून अश्रू गाळत राहिला. तेव्हा आईने त्याला जवळ घेतले आणि प्रेमाने विचारल्यावर तो म्हणाला, " आई, ते कुत्र्याचे पिल्लू मेलंय गं ! " हे ऐकून आईला देखील खूप दुःख झालंय. राजुची इच्छा आपण पूर्ण केली असती तर ते कुत्र्याचं पिल्लू देखील वाचलं असतं आणि राजू देखील आनंदी राहिला असता असे आईला वाटू लागले. 

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

कथा आवडली तर comment मध्ये लिहा

Friday, 30 April 2021

02/05/2021 avkali

कविता - अवकाळी पाऊस
कुणाला न सांगता येतो वेळी अवेळी
अश्यालाच जग म्हणतंय अवकाळी

त्याचे वागणे जरासे असते चित्रविचित्र
साऱ्यांचे बिघडवून टाकतो चांगले चित्र

सुरळीत काम चालू असतांना तो येतो
साऱ्या नियोजनावर पाणी फेरून जातो

मोजता येत नाही एवढं होते नुकसान
क्षणासाठी येतो नि सर्व होती परेशान

मान्सूनसारखे तो देखील हजेरी लावतो
कोणी दुःखी होतो कोणा सुखावून जातो

येणारे संकट काही केल्या टळत नाही
नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड
9423625769

29/04/2021 corona self disipline

कोरोना आणि स्वयंशिस्त
घरात धिंगाणा करणाऱ्या मुलांविषयी आईबाबा एक वाक्य नेहमी म्हणतात, याचे शाळेत जाण्याचे दिवस कधी पूर्ण होतात की ? तसं तर आई बाबांना देखील माहीत असतं की वयाची सहा वर्षे पूर्ण झाली की मूल शाळेतील पहिल्या वर्गात प्रवेशित होतो. तरी देखील मुलांचे आईबाबा तसे का म्हणत असतील ? तर याचे उत्तर अगदी साधे आणि सोपे आहे. मूल शाळेत प्रवेश घेतला की त्याची घरात धिंगाणा करण्याची प्रवृत्ती हळूहळू कमी होते आणि शहाण्या लेकरसारखं तो वागायला लागतो. काय शिकवलं जातं त्या पहिली दुसरी वर्गाच्या शाळेत ? तेथे मुलांना वाचायला शिकवलं जातं, लिहायला शिकवलं जातं, बोलायला शिकवलं जातं आणि महत्वाचं म्हणजे त्याला स्वयंशिस्त शिकविली जाते. होय, प्राथमिक शाळेतून मुलांना स्वयंशिस्त प्रामुख्याने शिकवली जाते. मात्र ती जशी जशी अंगाने व शरीराने मोठी होत जातात तसे तसे स्वयंशिस्त विसरून जातात, ही फार मोठी शोकांतिका आहे. तसं तर पहिल्या वर्गात येणार सहा वर्षाचे मूल घाबरत घाबरत येते. त्याच्या मनात शाळेची आणि शिक्षकांची भीती असते. वरच्या वर्गातील मुलांकडे पाहत पाहत ही मुले शाळेतील वातावरणाशी समरस होत असतात. शिक्षकांची एक रणनीती असते. संपूर्ण वर्गाला किंवा शाळेला शांत करायचे असेल आपल्या नियंत्रणाखाली आणायचे असेल तर कुण्या तरी एकावर खूप राग आणि मोठी शिक्षा करावी लागते. हे बघून बाकीचे सारे चिडीचूप होतात. सर्कसमध्ये रिंगमास्टर जसे काम करतो तसे काम प्राथमिक वर्गांना अध्यापन करणारे शिक्षक करतात. ( आज तसे शिक्षण नसून आनंददायी शिक्षण आहे, हा भाग वेगळा ) आपल्या वर्गातील वा शाळेतील मुलांना वाचायला किंवा लिहायला नाही आले तरी चालेल पण त्यांच्यात स्वयंशिस्त असायलाच पाहिजे अशी धारणा शिक्षकांमध्ये असते. सकाळी घंटी वाजले की विद्यार्थी शाळेत आलेच पाहिजे, शिक्षकांनी शिट्टी वाजवली की सारे विद्यार्थी एका रांगेत उभे राहिले पाहिजे, सावधान-विश्राम झाले की आदेशानुसार राष्ट्रगीत म्हटले पाहिजे विद्यार्थी हे सर्व आपल्या शरीराला लावलेल्या स्वयंशिस्त सवयीमुळे करत असतो. शाळेत अभ्यासासोबत स्वयंशिस्त प्रत्येक शाळेतून शिकवल्या जाते. पुढील भावी जीवनावर या स्वयंशिस्तीचा परिणाम दिसायला लागते. जे विद्यार्थी शाळेत स्वयंशिस्त पाळलेली असतात ते मोठेपणी देखील स्वयंशिस्त पाळून देशाचे, राज्याचे आणि समाजाचे नियम पाळतात. 
गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. पहिल्या लाटेत लोकांनी खूप जबाबदारी पूर्वक राहिले किंवा सुरुवातीला या कोरोनाची मनात खूप भीती होती. म्हणून शासनासह जनतेनी देखील स्वतःला घरात बंदीस्त केले होते. पण कोरोना आजार म्हणजे सर्दी, पडसं आणि खोकला आहे. त्याला काही जास्त मनावर घ्यायचं नाही असा गोड गैरसमज करून घेतल्यामुळे लोकं निष्काळजीपणाने वागण्यास सुरुवात केली. म्हणूनच दुसऱ्या लाटेत देशभरात लाखो लोक कोरोना पॉजिटिव्ह निघत आहेत. हजारो लोकं मृत्युमुखी पडत आहेत. मरण पावलेल्या लोकांना सरण लावण्यासाठी देखील रांगेत जावे लागत आहे. किती कठीण काळ आला आहे, याची जाणीव आपणा सर्वांना आहे. मात्र तरीदेखील अजूनही जनता सरकारच्या नियमाचे पालन करताना दिसून येत नाही. शाळेत शिकविण्यात आलेली स्वयंशिस्त आता प्रत्येकांनी उपयोगात आणली पाहिजे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखायाचा असेल तर त्याची साखळी तोडावी लागते. ती साखळी तोडण्यासाठी स्वतःला घरात कैद करावे लागेल. शासनाला नाईलाजास्तव संचारबंदी आणि लॉकडाऊन करावे लागत आहे कारण आपण नागरिकांनी स्वयंशिस्तीने वागणे विसरून गेलो आहोत. घराबाहेर पडतांना तोंडावर मास्क वापरावे, पोलिसांना घाबरून असे करू नका तर ती एक स्वयंशिस्त आहे. आपल्या शरीराला तशी सवय लागलीच पाहिजे. घराच्या बाहेर पडताना तोंडावर मास्क वापरणे. काही कामासाठी जर आपण बाहेर गेलोच तर सुरक्षित अंतर ठेवणे आपल्यासाठी आवश्यक आहे. बाहेरून आल्यानंतर आपले हात-पाय स्वच्छ धुणे आणि सोबत मास्क देखील धुतले पाहिजे. बरेचजण हात-पाय धुतात आणि मास्क तसेच घरात नेतात त्यामुळे हा विषाणू घरात पसरत आहे. घरात वावरताना देखील थोडे जागरूक होणे आवश्यक आहे. एकाच कुटुंबातले जरी असाल तरी एकमेकांचे उष्टे अन्न खाऊ नका. पाणी पिण्यासाठी दररोज एकच ग्लास वापरावे. शक्यतो आपले जेवलेले ताट आपण स्वतः धुवून बाजूला ठेवलं तर अजून चांगलं. या काळात टीव्हीवरील बातम्या पाहून काळजाची धडधड वाढविण्यापेक्षा कानाला सुमधुर वाटणारे गाणे ऐका, चांगले चित्रपट पहा, पुस्तके वाचा, मनपसंद खेळ खेळावे यामुळे आपल्या मनाला विरंगुळा मिळेल. कोरोना रोग हा साधा आजार आहे मात्र ते अंगावर काढणे वाईट आहे तसेच कोरोना आजाराची धसकी घेतल्यामुळे अनेकजण आपल्या जीवाला मुकत आहेत. म्हणून मित्रांनो या कोरोना विषम काळात आपल्या शरीराला स्वयंशिस्त लावून घ्यावे म्हणजे देशात वाढणारी ही समस्या काही प्रमाणात कमी करता येईल. घरी राहा सुरक्षित राहा, आवश्यक काम असेल तर बाहेर जावे, नियमित हात स्वच्छ धुवावे, बोलताना सुरक्षित अंतर ठेवावे, तोंडावर मास्क वापरावे अश्या साध्या साध्या गोष्टीच्या सवयीचे स्वयंशिस्त लावून तसे वागले पाहिजे तरच या कोरोनाला आपण हरवू शकतो. आपली एक जरी चूक झाली तर आपल्यासोबत आपल्या कुटुंबाला, नातलगांना, समाजाला, गावाला, राज्याला आणि पर्यायाने देशाला धोका निर्माण होऊ शकते.

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद जि. नांदेड
9423625769

30/04/2021 dole

डोळ्यांची भाषा 
ती बोलत तर काहीच नव्हती
फक्त तिचे डोळे बोलत होते
मनातले सारे भाव सांगत होती
मला सारे ते कळून देखील
काहीच करता येत नव्हते
कारण ती आज माझी नव्हती
तर दुसऱ्याची प्राण झाली होती
माझ्याविषयी कळवळा आहे
चुपचाप ती डोळ्यातून सांगते
माझ्या मनात देखील आहे आस्था
माझ्या डोळ्यातून तिला कळते
आमच्या दोघांची संवादाची भाषा
फक्त डोळ्याने डोळ्यालाच समजते

- नासा येवतीकर,धर्माबाद जि.नांदेड
 9423625769

Thursday, 29 April 2021

01/05/2021 majha maharshtra

महाराष्ट्र भूमीची कहाणी
देशात आहेत अनेक राष्ट्र
त्यात माझा हा एक महाराष्ट्र
एक मे एकोणिशे साठाला
निर्माण झाला राज्य महाराष्ट्र
महाराष्ट्राची खास आहे लावणी
महाराष्ट्र भूमीची अनोखी कहाणी

त्याची राजधानी मुंबई शहर
आर्थिक घडामोडीचे मुख्य नगर
उपराजधानी आहे नागपूर
पुणे आमचे सांस्कृतिक शहर
येथील लोकांची आहे साधी राहणी
महाराष्ट्र भूमीची अनोखी कहाणी

विठ्ठलाचे मंदीर पंढरपूरात
ग्रंथसाहिब नांदेडच्या गुरुद्वारात
अंबामाता वसली कोल्हापुरात
तुळजाईचे दर्शन तुळजापूरात
सप्तश्रृंगी देवीचं गाव आहे वणी
महाराष्ट्र भूमीची अनोखी कहाणी

बापुजीची कुटी आहे वर्ध्यात
आमची उटी सातारा जिल्ह्यात
जंगल पसरला आहे गडचिरोलीत
वाघांचा व्याघ्रप्रकल्प ताडोब्यात
खानदेशाची भाषा आहे अहिराणी
महाराष्ट्र भूमीची अनोखी कहाणी

वंदन करू शिर्डीच्या साईबाबांला
सबका मालिक एक सांगती सर्वाला
सागरी किनारा लाभला कोकणला
गोदावरी उगम पावते नाशिकला
औरंगाबादला प्रसिद्ध वेरूळची लेणी
महाराष्ट्र भूमीची अनोखी कहाणी

संत महात्मे लाभले या राज्याला
पुण्य गौरव मिळाले या धरतीला
राज्याने कीर्ती दिली खेळाला
देशात नवी ओळख महाराष्ट्राला
माय मराठी आहे आमची वाणी
महाराष्ट्र भूमीची अनोखी कहाणी

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625768

सर्वगुणसंपन्न माझा महाराष्ट्र

आजपासून एक्याऐंशी वर्षांपूर्वी म्हणजे एक मे एकोणिशे साठ रोजी भाषावार प्रांत रचनेनुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. बहुसंख्य मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आले. संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर दीक्षाभूमीसाठी प्रसिद्ध असलेले नागपूर ही उपराजधानी झाली. तसे मुंबई आणि नागपूर हे दोन्ही शहर महाराष्ट्रातील प्रमुख शहरात गणले जातात. मुंबई ही राज्याचीच नव्हे तर देशातील देखील महत्वाचे शहर आहे. गेटवे ऑफ इंडिया, बॉलीवूडची चंदेरी दुनिया, वानखेडे स्टेडियम, सीएसटी, यासारख्या अनेक स्थळामुळे मुंबई सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते. संत्र्याच्या उत्पादनासाठी नागपूर शहर प्रसिद्ध आहेच त्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे दीक्षाभूमीवर लाखों अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती, म्हणून देखील हे शहर प्रसिद्ध झाले आहे. त्याखालोखाल ज्या शहराचे नाव घेतले जाते ते म्हणजे पुणे होय. पुणे तिथे काय उणे असे या शहराच्या बाबतीत बोलल्या जाते. पुणे हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर आहे. अनेक सारस्वत मंडळी पुण्यातून निर्माण झाले. आज ही पुणे शहर आपल्या संस्कृतीला नावाप्रमाणे टिकवून ठेवले आहे. राज्यातील महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणं उन्हाळ्यात पर्यटकांनी भरून जातात. शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंह यांची समाधी गुरुद्वारा म्हणून प्रसिद्ध आहे जे की नांदेड येथे आहे. शीख धर्मातील लोकांसाठी हे स्थळ काशी म्हणून प्रसिद्ध आहे. पंजाबमधून लाखो भाविक दरवर्षी नांदेड येथे ये-जा करतात.
राज्यात एकूण छत्तीस जिल्हे असून कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर असे राज्यात प्रशासकीय कामासाठी एकूण सहा विभाग करण्यात आले आहेत, ज्यामुळे अनेक कामांची विभागणी होऊन काम सुरळीत पार पडण्यास मदत मिळते. 
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळ्खले जाते. येथील भूमीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, समर्थ रामदास स्वामी यासारखे अनेक संत होऊन गेले. त्याचसोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या सारख्या समाजसुधारक संतांनी देखील येथील भूमी पवित्र झाली आहे. लोकांच्या कल्याणासाठी झटणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या थोर महापुरुषांनी आपल्या कार्याने आणि विचाराने महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. महाराष्ट्रातील जनता या महापुरुषांच्या कार्याला आणि विचाराला कदापिच विसरू शकणार नाही. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देखील महाराष्ट्राच्या अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपले संपूर्ण जीवन अर्पण केले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोपाळ गणेश आगरकर, आदी क्रांतिकारकाविषयी आमच्या मनात नेहमीच कृतज्ञतेची भावना तेवत असते. साहित्याच्या क्षेत्रात देखील कवयित्री बहिणाबाई चौधरी, अण्णाभाऊ साठे, वि. स. खांडेकर, गदिमा, ना. सी. फडके, कुसुमाग्रज, प्र. के. अत्रे, भा. रा. तांबे, सुरेश भट, बालकवी, केशवसुत इत्यादी साहित्यिकांनी उत्तम साहित्य निर्माण करून ठेवले आहे, ज्याच्या बळावर आज नवीन साहित्यिक नवे साहित्य निर्माण करत आहेत. खेळाच्या बाबतीत देखील महाराष्ट्रातील खेळाडूचे अनन्यसाधारण महत्व आहे. सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, खाशाबा जाधव यासारख्या खेळाडूंनी महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नाव जगाच्या नकाशावर कोरून ठेवले आहे. तर चित्रपट क्षेत्रातील भालजी पेंढारकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, दादा कोंडके, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे माधुरी दीक्षित, उषा नाडकर्णी, लता मंगेशकर, आशा भोसले, पंडीत भीमसेन जोशी यासारखे अनेक कलाकारांनी आपल्या कला कौशल्याने महाराष्ट्राचे नाव सर्वदूर पोहोचविले आहे. सह्याद्री पर्वत रांगेतील कळसूबाईचे शिखर अनेक गिर्यारोहकाना नेहमी खुणावत असते. कर्नाळा पक्षी अभयारण्य, ताडोबाचे व्याघ्रप्रकल्प, स्व. बाबा आमटे यांचे आनंदवन, यासारखे अनेक स्थळ महाराष्ट्रात पर्यटकांना आकर्षित करत असतात. राज्याला सातशे वीस किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे ज्यामुळे राज्याला अनेक बाबतीत समृद्धता मिळाले आहे. कोयना, जायकवाडी, भंडारदरा यासारख्या धरणामुळे राज्य सुजलाम सुफलाम होण्यास मदत मिळाली आहे.  उद्योगधंद्यात देखील महाराष्ट्र मागे नाही. मुंबई, पुणे, सोलापूर, इचलकरंजी, औरंगाबाद या शहरातील उद्योगाने अनेक कामगारांच्या हाताला काम देऊन उद्योगाच्या क्षेत्रात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. पर्यटकांना आकर्षित करणारे महाराष्ट्र हे एक प्रमुख राज्य आहे. औरंगाबाद येथील अजिंठा व वेरूळच्या लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून लोकं येत असतात. त्याचसोबत राज्यात असलेले अनेक किल्ले आणि गड हे देखील पर्यटकांना आपल्याकडे नेहमीच भुरळ घालत असतात. तिरुपती बालाजी नंतर दुसरे देवस्थान म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा यांचे मंदीर होय. सबका मलिक एक असा संदेश देणारे साईबाबा हे सर्व धर्मियांचे दैवत आहे. येथे अनेक लोकं दरवर्षी दर्शनासाठी गर्दी करतात. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तश्रृंगी देवी हे साडे तीन पीठ स्थळ अनेक महिलांसाठी प्रेरणेचे स्थान आहेत. वारकरी संप्रदायाचे विठ्ठल भक्त दरवर्षी आषाढी आणि कार्तिकेला पंढरपूर येथे पायी वारी करण्यासाठी येतात. शेगावचे गजानन महाराजाचे मंदीर स्वच्छतेच्या बाबतीत सर्वाना एक मार्गदर्शक ठरेल असे ठिकाण आहे. तेथे गेल्यानंतर जे आत्मिक व मानसिक समाधान मिळते ते कदाचित कुठे ही मिळत नसेल. कोकणची किनारपट्टी, तेथील हापूस आंबा, नारळ आणि इतर वृक्ष पाहिल्यावर डोळ्याचे पारणे फिटतात. त्याचसोबत महाराष्ट्रातील अजून घटना घडली, देशातील सर्वप्रथम रेल्वे ठाणे - मुंबई दरम्यान धावली होती, ज्यामुळे इतिहासात याची ठळक नोंद घेतली आहे. कारण आज देशातील रेल्वेचे जाळे पाहिलं तर त्यात महाराष्ट्राचे स्थान अग्रस्थानी दिसून येते. महाराष्ट्रात दर कोसावर भाषा बदलत जाते. मुंबईची भाषा वेगळी तर पुण्याची भाषा वेगळी. मराठवाड्याची भाषा अनेकांना अवघडल्यासारखे वाटते तर विदर्भाची भाषा प्रेमळ वाटते. खानदेशाची अहिराणी भाषा आणि पश्चिम महाराष्ट्रातील रुबाबदार भाषा आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. तसे महाराष्ट्रात गोदावरी, कोयना, कावेरी, चंद्रभागा, भीमा अश्या अनेक नद्यांनी समृद्ध केले आहे तर अमरावती, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातल्या जंगलाने विविध प्राणी, पशु-पक्षी यांना खरा आधार दिले आहे. विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे लोकं या महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत. शिक्षणाच्या बाबतीत देखील महाराष्ट्र मागे नाही. मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद इत्यादी शहरात शाळा, विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठ, कृषी विद्यापीठ विद्यार्जनासाठी निर्माण करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे असतील किंवा पोपटराव पवार यासारखे व्यक्तींच्या आदर्शावर आज महाराष्ट्रातील ग्रामीण जनता पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या वसंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, शरद पवार, सुधाकरराव नाईक, मनोहर जोशी इत्यादी लक्षात राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यास अनेक योजना आखल्या आणि त्या कार्यान्वित देखील केले. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मा. उद्धव ठाकरे साहेब जे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत, ते काम पाहत आहेत. त्यांच्या हाती सत्ता आल्यापासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगासह महाराष्ट्र देखील पादांक्रांत केले आहे. मा. उद्धव ठाकरे साहेबांची खरी कसोटी या क्षणी पाहायला मिळत आहे. या कोव्हीड-19 काळातील एक कणखर मुख्यमंत्री म्हणून इतिहास त्यांची नोंद घेईल इतके सुंदर कार्य चालू आहे. महाराष्ट्र दर्शन करायला निघालं तर आयुष्य देखील कमी पडू शकते, एवढं समृद्धता राज्यात आढळून येते. मी महाराष्ट्रयीन असल्याचा मला नेहमीच अभिमान आहे. असा माझा हा महाराष्ट्र सर्वगुणसंपन्न असून देशात आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण करून ठेवले आहे. आज महाराष्ट्र दिन त्यानिमित्ताने आपणा सर्वांना हार्दीक शुभेच्छा ....!

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड 9423625769


महाराष्ट्र माझा


देशात उंचावलेली आहे मान

देशाचे हृदय महाराष्ट्र माझा

संपूर्ण देशात गाजावाजा

जय जय महाराष्ट्र माझा


आपली भाषा आपले लोक

आपला प्रांत आपले राष्ट्र

चालावा आपला व्यवहार

असा हा आपला महाराष्ट्र


येथील लोकं बोलती मराठी

येथे व्यवहार होतो मराठी

पुस्तकाची भाषा ही मराठी

महाराष्ट्राची राजभाषा मराठी


मुंबई आहे राज्याची राजधानी

येथे घडते आर्थिक कहाणी

नागपूर राज्याची उपराजधानी

संत्री खाऊन गाती गोड गाणी


राज्यात एकूण छत्तीस जिल्हे

आहेत अनेक गड आणि किल्ले

राष्ट्रावर झाले आहेत अनेक हल्ले

घाबरणार कसे महाराष्ट्राची पिल्ले


सोनियाचा मे महिन्याचा एक

राज्यात नांदती लोकं अनेक

गुण-गौरव गातसे माय लेक

माझा महाराष्ट्र सर्वात नेक


- नासा येवतीकर, विषय शिक्षक, 

कन्या शाळा धर्माबाद, 9423625769


।। माझा महाराष्ट्र ।।

महात्मा फुले शाहू आंबेडकर
लाभले टिळक नि आगरकर
देशासाठी केली अपार सेवा
राज्याचे नाव पोहोचले जगभर

या थोर समाजसुधारकासह
होती महाराष्ट्र संतांची भूमी
भारताच्या स्वातंत्र्यासाठी आले
राज्यातील अनेक वीर कामी

छत्रपती शिवाजी राजे यांनी
निर्मिले मराठ्यांचे स्वराज्य
त्यांची प्रेरणा घेऊनच झालं
मराठी भाषिक लोकांचे राज्य

देशाच्या प्रगतीमध्ये हातभार
मुंबई शहर असतो अग्रेसर
देशाच्या विकासात महाराष्ट्र पुढे
प्रत्येक शहराची दिशा विकासाकडे

एक्याऐंशी वर्षांपूर्वी झाली होती
महाराष्ट्र राज्याची निर्मिती
मुंबई बनली राज्याची राजधानी
तर नागपूर ठरले उपराजधानी

महाराष्ट्राला आहे एक इतिहास
प्रत्येक जिल्ह्याचे स्थान वेगळं
प्रत्येक जिल्हा वैशिष्टयपूर्ण
पर्वत डोंगर जंगल हे सगळं

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद, 9423625769




दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...