Thursday, 14 March 2019

अंधश्रद्धा

*अंधश्रद्धा कशी नष्ट होईल ?*

अंधश्रद्धा म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात. शिकलेला व्यक्ती सुद्धा आंधळेपणाने काही गोष्टी स्वीकारत असेल तर त्याच्या शिक्षणाचा काय फायदा झाला असा प्रश्न निर्माण होतो. यात काही अंशी शिक्षण प्रणालीचा ही दोष असू शकते कारण वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावे असे शिक्षण अजूनही मुलांना मिळत नाही. म्हणून कालची मुले जे की आज भारताचे जबाबदार नागरिक म्हणून समाजात वावरत आहेत ते विज्ञानवादी बनू शकले नाहीत. वाहन एक प्रकारचे यंत्र आहे आणि त्यास लिंबू, मिरची आणि बिब्या बांधले नाही तर ती गाडी चालणार नाही, प्रत्येक अमावस्येला गाडी धुवून त्याची पूजा केली तरच गाडीला काही घात अपघात होत नाही अशी लोकांची धारणा आहे. मात्र ती धारणा अंधश्रद्धेमध्ये मोडते हे जेंव्हा शिकलेल्या लोकांना कळते तेंव्हा तरी निदान असे करणे सोडून द्यायला हवे. लोकं करतात म्हणून आपण करणे म्हणजे साक्षर असून देखील निरक्षर लोकांच्या ही पलीकडचे जीवन जगणे आहे. श्रद्धा माणसाच्या मनात आत्मविश्वास निर्माण करते तर अंधश्रद्धा माणसाच्या मनात न्यूनगंड तयार करते. आजपर्यंत तरी या अंधश्रद्धेमुळे कोणालाही फायदा झालेलं नाही. मात्र ज्यांनी लोकांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण केली ते मात्र करोडपती झालेले पाहायला मिळाले. अंधश्रद्धेला सर्वात जास्त बळी पडणारा घटक म्हणजे महिला वर्ग. त्यांच्या मानसिक आणि भावनिक गोष्टीचा फायदा अनेक ढोंगी लोकं उचलतात. त्यांना या बाबीतून बाहेर आणण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. भारत देशाचा खरा विकास जर साधायचा असेल तर देशातील प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात असलेली अंधश्रद्धा घालविण्याचा प्रयत्न करायला हवं. घरातील मुले घरातल्या आई किंवा बाबा यांचे अजिबात ऐकत नाहीत. मात्र शिक्षकांचे एक ही शब्द खाली पडू देत नाहीत. याच बाबीचा विचार करून प्राथमिक शाळेत अध्यापन करणाऱ्या शिक्षक मंडळींनी विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न करायलाच हवे. शाळा हे राष्ट्रीय शिक्षण देण्याचे केंद्र बनले पाहिजे. सर्वधर्मसमभाव ही संकल्पना फक्त शाळेतून विकसित करता येऊ शकते. प्राथमिक शाळेत केलेले संस्कार मोठेपणी निश्चित कामाला येतात. म्हणून अगदी लहानपणापासून मुलांच्या मनात असलेली अंधश्रद्धा समूळ नष्ट केली पाहिजे. भूत-पिशाच्च असे काही नसते हे आपणास माहीत असते मात्र मूल जेंव्हा लहान असते त्यावेळी त्याला भीती घालण्यासाठी भूत ही विचारधारा पुढे आणली जाते. आम्ही लहान असताना चिंचेच्या मोठ्या झाडाजवळ कधीच जात नसू कारण त्या झाडावर भूत येऊन बसते असे सांगितले जायचे. कालांतराने तेच चिंचेचे मोठे झाड गावातील सर्वांचे बैठकीचे एक महत्वाचे ठिकाण बनते. आता येथे भूत येत नाही का ? असा प्रश्न आज ही मनात निर्माण होतो. मनामध्ये एकदा विचार जो बसला तो एकदम फिट बसतो. मन दुसरे विचार ऐकून घ्यायला तयारच होत नाही. शहरापेक्षा ग्रामीण भागात अंधश्रद्धेचे प्रमाण जरा जास्त आढळून येते. अंगात देव येणे आणि भानामतीसारखे अनिष्ट प्रथा ग्रामीण भागात आजही पाहायला मिळतात. या प्रकाराला जास्तीत जास्त महिलांच बळीचा बकरा ठरतात. अमुक देवी अंगात येते आणि सर्वांच्या समस्या मिटविते असा प्रचार आणि प्रसार केला जातो. ठराविक एखाद्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी करून त्या अंगात येणाऱ्या स्त्री किंवा पुरुषांची भेट घेतली जाते. महिलांच्या अंधश्रद्धेमुळे अश्या ढोंगी, बाबा लोकांचे फावते आणि दरवेळी काही तरी नवीन समस्या डोळ्यासमोर दाखवून लोकांना लुबाडत असतात. म्हणून वेळीच अश्या लोकांचे पितळ उघडे पाडण्याचे काम जागरूक लोकांनी करणे आवश्यक आहे. प्रा. श्याम मानव कुठल्याही व्याख्यानात एक वाक्य नेहमी म्हणतात, वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया. हे चित्र सर्वत्र दिसते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्याचे खूप मोठे कार्य केले. पण काही अविचारी लोकांनी त्यांची हत्या केली. समाजातून जर ही अंधश्रद्धा समूळ नष्ट करायचे असेल तर सर्वाना वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल असे शिक्षण देणे हा एकमेव पर्याय आहे. यासाठी सर्वप्रथम शाळेतून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना याबाबतीत प्रशिक्षित केले पाहिजे. त्यांना जर याचे महत्व पटले तर ते नक्की विद्यार्थ्यांना पटवून सांगू शकतील. अंधश्रद्धा निर्मूलनची चळवळ घराघरांत पोहोचविण्यासाठी शाळेतील शिक्षकांची मदत नितांत गरजेचे आहे, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
( लेखक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे धर्माबाद तालुका अध्यक्ष आहेत. )

Tuesday, 12 March 2019

मृत्यू : एक अटळ सत्य

मृत्यू

मृत्यूच्या दारात उभा राहून तो परत आला, मृत्यूच्या जबड्यातून डॉक्टरांनी त्याला वाचविला, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, एवढ्या मोठ्या अपघातातून एक वर्षाचे लहान बाळ वाचले अश्या मथळ्याची बातमी वाचतो त्यावेळी त्या त्या नशीबवान व्यक्तीविषयी मनात उत्कंठेची भावना निर्माण होते. नशीब चांगला होता म्हणून तो वाचला असे ही सहज बोलून जातो. त्याचवेळी हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू, रस्ताच्या अपघातात एकाचा मृत्यू, उपचार चालू असताना एकाचा मृत्यू अश्या बातम्या जेंव्हा कानावर येतात त्यावेळी त्याच्या विषयी मनात दुःखाची भावना मनात तयार होते. मृत्यू हे कोणाच्या हातात नाही आणि ते कोणाला सांगून देखील येत नाही. म्हणून मानवाला सर्वात जास्त भीती कोणाची वाटत असेल तर ते मृत्यूची. प्रत्येकाला वाटते की मृत्यू येऊच नये मात्र जन्म घेतलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. त्यात काही बदल करता येत नाही. स्त्री असो पुरुष असो, गरीब असो असो श्रीमंत असो, राजा असो वा रंक असो प्रत्येकांचा एक ना एक दिवस मृत्यू होणार हे निश्चित. जसे जसे जीवन जगण्याचा आनंद कळत जातो तसेतसे जास्तीत जास्त आयुष्य जीवन जगावे असे वाटते. जे सुखात जीवन जगत आहेत त्यांना मरण कधीच येऊ नये असे वाटते तर जे खूपच दुःखात जीवन जगत आहेत ते मृत्यूची याचना करतात. देवा मला लवकर मरण येऊ दे अशी देवाजवळ मागणी करतात. पण ज्याच्या नशिबात जेवढं आयुष्य लिहिलेलं असेल तेवढं आयुष्य जगावेच लागेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस हे दोन वेळा हेलिकॉप्टर दुर्घटनेत बालंबाल वाचले, तेंव्हा सोशल मीडियात त्यांच्या सुदैवाविषयी खूप काही चर्चा झाली. पंजाबमध्ये रावणदहन चालू असताना ते पाहणाऱ्या काही लोकांवरून ट्रेन धावली आणि एका क्षणात मृत्यूचा सडा पडला. लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात 30 सप्टेंबर च्या रात्री भूकंपाच्या धक्यांनी दुसऱ्या दिवसाची सकाळ पूर्ण काळरात्र ठरली. कोणाला काही कळण्याच्या आत होत्याचे नव्हते झाले होते. दुष्मनाच्या तावडीत सापडून देखील एखादा व्यक्ती परत आपल्या देशी येतो म्हणजे हे त्याचं नशीबच म्हणावं लागेल ना ! असे प्रसंग अनेकांच्या जीवनात घडतात. काही जणांचा पुनर्जन्म होतो. त्याना जीवनाचा खरा अर्थ कळलेला असतो. कारण त्या मोठ्या अपघातातून बचावल्यानंतर जे जीवन आज जगत आहे ते एकप्रकारे त्यांना बोनस मिळालेलं असते. शोले चित्रपटात गब्बर सिंग म्हणतो जो डर गया समझो वो मर गया. खरंच आहे हे भिऊन भिऊन जगण्यात काही अर्थ नाही. शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगले पाहिजे. ही वृत्ती आपल्यात निर्माण झाली तर जगण्याची खरी मजा घेऊ शकतोत. राजेश खन्ना आनंद चित्रपटात जी भूमिका केली ती खरोखरच या मृत्यूला घाबरण्याचे करण नसल्याबाबत खूप काही प्रेरणा देऊन जाते. मृत्यूची निश्चित अशी तारीख जर माणसाला कळाली असती तर काय झालं असतं ? अशी कल्पना केली तर खूप काही भन्नाट कल्पना सुचतात मात्र जसजसे मृत्यूची तारीख जवळ येते तशी खूपच काळजी वाढीस लागते आणि चिंता देखील वाढते. म्हणून कधी कधी असे वाटते की, मृत्यूची तारीख माहीत नसते ते खरोखरच आपल्या आयुष्यासाठी खुप चांगले आहे. मृत्यू म्हणजे सर्व काही खल्लास. आजपर्यंत कमावलेले संपत्ती, धन-दौलत, जायदाद सर्व काही इथेच राहते, सोबत आपण काहीच घेऊन जात नाही. जगजेत्ता सिंकदर त्याला कशाचीच कमतरता नव्हती पण जाताना रिकाम्या हाताने गेला. पण नाव मात्र आजपर्यंत कायम आहे. म्हणून जीवनात संपत्ती कमाविण्यापेक्षा नाव कमविणे खूप महत्वाचे आहे. कवी भा. रा. तांबे आपल्या कवितेत म्हणतात की, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय ? आपल्या मृत्यू पश्चात आपले नाव आणि कार्य जगात टिकून ठेवायचे असेल तर काही चांगले कार्य करावं. गरजू लोकांना मदत करावी, दान धर्म करावं, इतरांशी प्रेमाने आणि सहकार्याने वागावे, खूप चांगली व्यक्ती होती असे प्रत्येकाच्या तोंडून निघेल असे वागले पाहिजे. आज आहे उद्या नाही याची नोंद आपल्या मेंदूला देऊन रोजच्या सकाळला प्रणाम करीत काही विधायक कार्य करीत राहिले तर मृत्यू आपल्या दारात आलं तरी त्याचे भय वाटत नाही. म्हणून मृत्यूला घाबरून चालणार नाही उलट त्याचे हसतमुखाने स्वागत करायला हवे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Thursday, 7 March 2019

जागतिक महिला दिन 08

ग्रामीण महिला आणि महिला दिन

आज 08 मार्च अर्थात जागतिक महिला फिन. स्त्रियांवर होत असलेले अत्याचार, अन्याय दूर व्हावे, सर्वच क्षेत्रात महिलांचा विकास व्हावा यासाठी आज जगभर महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी संपूर्ण वर्षभराचा आराखडा पाहिला जातो. आपण काय केलोय ? कुठपर्यंत यश लाभलं ? यांच्यासमोर काय करायचं ? इत्यादी विविध प्रश्नांच्या बाबतीत आज चर्चा केली जाते. अश्या या बाबीमुळे आज महिला थोडीफार सुधारली ( ? ) असे म्हणायला हरकत नाही. 
नेमिची येतो मग पावसाळा या म्हणीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण हा उत्सव साजरा करणार, यात काही शंका नाही. शहरात असलेली मुलगी पदवी पर्यंतचे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायांवर उभी राहण्यास पात्र ठरत आहे. महानगरातील मुली ही शिक्षण घेऊन सरकारी, खाजगी किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या कार्यालयात विविध पदावर काम करतांना दिसत आहेत, शहरातील मुलीं मुलांबरोबर शिक्षण घेऊन त्यांच्या पेक्षाही वरचढ ठरत आहेत, ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. शहरातील मुलींचे जीवन चांगले आहे, याचा अर्थ असा नव्हे की, मुली शिक्षणाच्या बाबतीत आता वंचित राहिलेल्या नाहीत. पण जरा शहारावरचा आपला कॅमेरा ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाकडे आणि त्यांच्या विकासाकडे फिरविल्यास आपणास अनेक समस्या आणि प्रश्न तेथे दिसून येतात. 
शहरातल्या मुली शिक्षणात किंवा अन्य क्षेत्रात जेवढ्या पुढारलेले आहेत, तेवढेच ग्रामीण भागातील मुली मागासलेले आहेत. एकदम विरुद्ध टोक आहेत. ग्रामीण मुलीवर आज देखील अन्याय होत आहे. ग्रामीण भागात मुलींसाठी शिक्षण आवश्यक नसून त्यापेक्षा आवश्यक आहे त्यांना घरात स्वयंपाक करता येणे, धुणी-भांडी करता येणे, मुलं बाळांना सांभाळता येणे, घरातील पुरुषांना आनंदी ठेवता येणे, इत्यादी कामे तिला जमलेच पाहिजे. पण तिला शाळेत जाण्याची किंवा काही नवीन शिकण्याची संधी मात्र दिल्या जात नाही. आज ही ग्रामीण भागात शंभर मुलींमागे सातवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले पन्नास टक्के आढळतील मात्र पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या मुली एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच सापडतात. ही किती चिंतनीय बाब आहे. मुलींसाठी शासनाने विविध योजना तयार केल्या आणि त्या राबविल्या देखील तरी ही मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत आज ही म्हणावी तेवढी प्रगती नाही, असे का ? कारण ग्रामीण भागातील लोक आजही रूढी, परंपरा, अंधश्रद्धा आणि कर्मकांडमध्ये रुतलेले आहेत. त्याच्या विरोधात त्यांना वागणे कदापिच जमणार नाही. विज्ञानाच्या आधारे माणूस चंद्रावर गेला पण ग्रामीण भागातील लोकं आहे त्याच ठिकाणी घट्ट बसून आहेत. त्या लोकांचा विकास फक्त शिक्षणाने होते हे सुद्धा एक निर्विवाद सत्य आहे. गावात ज्या वर्गापर्यंत शाळा आहे त्याच वर्गापर्यंत मुलींना शाळा शिकविले जाते. काळजी आणि सुरक्षा या कारणांमुळे मुलींना पुढील शिक्षणासाठी गावाबाहेर पाठविले जात नाही. यात पालकांची मानसिकता लक्षात घेण्यासारखे आहे. आजच्या विषम वातावरणात कोणत्याही पालकांना असे विचार मनात येणे साहजिक आहे, मात्र त्यासाठी तिला उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याची चूक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ही योजना कार्यान्वित झाल्यापासून अनुसूचित जाती आणि जमातीच्या मुलींच्या दहावी पर्यंतच्या शिक्षणात लक्षणीय वाढ झाली असल्याचे बहुतांश महिला शिक्षिकानी मत व्यक्त केले. अशीच काही योजना ग्रामीण भागात राबविणे आवश्यक आहे. महिलांना स्वयं रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी शहरात ज्याप्रकारे सोयी सुविधा निर्माण केल्या जातात अश्याच सुविधा ग्रामीण भागात पोहोचविणे आवश्यक आहे. छोटे छोटे काम शिकण्यासाठी त्यांना शहरात येणे शक्य नाही त्यामुळे त्यांच्या गावांत जाऊन मुलींना स्वयंरोजगाराचे धडे दिल्यास ते स्वतःच्या पायावर नक्की उभे राहतील. 
जगात सर्वत्र कायद्याला मान दिला जातो. त्यात खूप शक्ती आहे, याची जाणीव असून देखील महिलांवरील अत्याचार व अन्याय का कमी होत नाही ? एक दिवस सुद्धा असे उजाडत नाही, ज्या दिवशी महिलांवर अन्याय, अत्याचार, अमानुष छळ, किंवा बलात्कार झाले नाही. पैशाच्या जोरावर श्रीमंत लोकं नाचतात, कायदा हातात घेतात, पैशाच्या बळावर काही ही करायला ते तयार असतात. कधी जर त्यांच्या घरातील महिलांवर असा प्रसंग ओढवला तर तेंव्हा त्यांना कळते की खरोखरच किती वेदना होतात ते ? 
आपण दरवर्षी असे दिन उत्सवाप्रमाणे साजरा करतो. काही जुने संकल्प सोडतो तर काही नवीन संकल्प करतो. नव्याच्या नऊ दिवसाप्रमाणे त्या संकल्पला ही विसरतो. एखाद्या महिलेवर आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असेल तर आपण फक्त अरेरे असा खेद व्यक्त करून तोंड जरासे वेडेवाकडे करून निघून जातो किंवा पाहत बसतो. त्यापलीकडे आपण काही करत नाही. ग्रामीण भागातील लोकांना अनेक गोष्टी मुळात माहिती नसतात म्हणून त्यांच्या पर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम पहिल्यांदा करणे आवश्यक आहे. माहिती नसल्यामुळे येथील लोकं वर्षनुवर्षे मागासलेले आहेत. 
आजच्या या महत्वपूर्ण दिवशी असा संकल्प करू या की, गावातील प्रत्येक तरुणीला स्वयं रोजगार करण्यासाठी मदत कारेन, त्यांना योजनांची माहिती देऊन जागृत कारेन आणि मी महिलांवर अत्याचार करू देणार नाही, तिला जे हवं ते मिळवून देण्याचा प्रयत्न करीन. 

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक व प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Wednesday, 6 March 2019

जागतिक महिला दिन

Tuesday, 26 February 2019

जागतिक मराठी राजभाषा दिवस

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त

मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व

10-15 वर्षापूर्वी शहरापुरते मर्यादित असलेल्या इंग्रजी शाळा पाहता पाहता छोट्या छोट्या गावात देखील सुरु झाले. इंग्रजी शाळेचे पेव आत्ता खेडोपाड्यात देखील पसरले आहे. त्याचा सर्वात जास्त परिणाम सरकारी मराठी शाळेवर झाला. कारण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांना हे इंग्रजी शाळांचे मंडळी पळवून नेत आहेत. पालकांची ईच्छा नसेल तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवून त्यांच्या मुलांना मोफत दप्तर, वह्या, पुस्तके, आणि येण्या-जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून पालकाना आकर्षित करण्याचे काम केल्या जात आहे. याउलट सरकारी शाळेत सर्व काही सुविधा शासन अगदी मोफतपणे पुरवठा करते तरी सुद्धा ग्रामीण भागातील पालकाचे या इंग्रजी शाळेकडील लक्ष अजुनही कमी झाले नाही.
दुरुन डोंगर साजरे या म्हणीनुसार इंग्रजी शाळा पालकाना आकर्षित करतात. मात्र त्यांचे आकर्षण फार काळ टिकत नाही. विविध कारणामुळे एक-दोन वर्षात ही मुले पुन्हा सरकारी शाळेत प्रवेश घेतात. काही पालकाना या शाळेचा खर्च झेपत नाही. त्यांच्या शाळेचा गणवेष, लागणाऱ्या वह्या आणि इतर खर्च, त्याच सोबत न झेपावणारा अभ्यास या सर्व बाबीला कंटाळून पालक आपल्या मुलांना जवळच्या शाळेत प्रवेश देतात. इंग्रजी शाळेतील अभ्यास मुलांना समजण्यास अवघड जाते. घरात बोलली जाणारी भाषा एक शाळेत बोलली जाणारी भाषा दुसरीच त्यामुळे मुले गोंधळुन जातात. त्या मुलांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी होते. दोन वर्ष इंग्रजी शाळेत शिकलेली मुले जेंव्हा मराठीत प्रवेश घेतात, तेंव्हा ते गोंधळुन जातात. त्यांच्यासाठी सेमी हा एक उत्तम पर्याय आहे. पालकानी आपल्या मुलांची क्षमता लक्षात घेऊन त्यास प्रवेश द्यायला हवे. काही मुले खुप हुशार असतात. काही ही सांगितले की ते लगेच स्विकार करतात आणि त्यात प्रगती देखील करतात. ज्याप्रकारे हाताची पाचही बोटे सारखी नसतात. अगदी त्या प्रमाणे प्रत्येक मूल हा वेगळा असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती प्रमाणे. शेजाऱ्यांचा मुलगा ज्या शाळेत जातो त्याच शाळेत आपला ही मुलगा जावा असा विचार करणे साफ चुकीचे आहे. जे पालक आपल्या पाल्यांच्या भविष्याची काळजी करतात ते विचारपूर्वक पाऊल उचलतात. म्हणून तर त्यांचे पाल्य जीवनात यशस्वी होतात. जीवनात इंग्रजी फाडफाड बोलता आले की यश मिळते हे साफ चुकीचा समज आहे. जे की समाजात प्रत्येक घरात पोहोचले आहे. घरातील मूल रेन रेन कम अगेन म्हणाले की आई वडिलांची छाती भरून येते. लेकरु इंग्रजी गाणे म्हणत आहे म्हणून कौतुक करतात. पण खरोखर त्याचा अर्थ त्याला कळतो काय ? तर उत्तर नाही असे येते. मिसने ते गीत ज्या हावभावयुक्त पद्धतीने शिकविले त्यांच हावभावाने मूल गाणे म्हणते. अर्थात त्याचा अर्थ त्याला माहित नसतो. याउलट मराठीत म्हणजे मातृभाषेतील येरे येरे पावसा म्हणताना त्यास हावभाव पाठ करण्याची गरज नसते. त्या ओळीतील प्रत्येक शब्दाचा अर्थ माहित असतो आणि हावभाव करताना ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते. असेच काही अनुभव इतर विषयाच्या बाबतीत घडत असते म्हणून मुलांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून म्हणजे मराठीत होणे मुलांच्या प्रगती साठी आवश्यक आहे. एखाद्या विषयाचा गाभा किंवा मुळ संकल्पना कळाली तर त्याचे अभ्यास करून कोणत्याही भाषेत व्यक्त करता येते. पण मुळ संकल्पनाच कळाली नाही तर पोपटपंची करून इतर भाषेत व्यक्त करता येत नाही. मातृभाषेतून शिकल्या ने वाचनाची आवड निर्माण होऊन उत्तम ज्ञान, संशोधक वृत्ती, व उच्च अभिरूची संपन्न व्यक्तिमत्व तयार होते. आकलन शक्तिस भरपूर चालना मिळते. तसेच स्वयंअध्ययन करण्यास मदत मिळते. सभोवती मराठीचे वातावरण असल्यामुळे पाठांतर करण्याची गरज भासत नाही. तसेच मराठीत जे बोलले तसेच लिहिल्या जाते मात्र इंग्रजी बोलणे वेगळे आणि लिहिणे वेगळे असते त्यामुळे मुले गोंधळून जातात. त्यांना शब्दार्थ पाठ केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याच मुळे इंग्रजी शाळेत शिकणारी मुले नेहमी घोकंपट्टी करताना दिसून येतात. कधी कधी काही पाठ झाले नाही तर वैतागतात, निराश होतात तर काही मुले व्यसनाधीन बनतात. इंग्रजी शाळेतील बहुतांश शिक्षक प्रशिक्षित व तज्ञ नसतात, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यांना तूटपुंजा पगार असतो जे की वेळेवर देखील मिळत नाही त्यामुळे ते खाजगी शिकवणी घेण्याकडे वळतात त्याचा खर्च वेगळाच. काही इंग्रजी शाळा यास अपवाद असतील मात्र ते हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच.
विस्मृती ही माणसाला मिळालेली एक देणगी आहे. ती चांगली आहे आणि वाईट देखील. चांगली एवढेसाठी की काही दुःखद गोष्टी विसरून गेलोत तर माणूस जिवंत राहू शकतो. जीवनातील प्रत्येक गोष्ट जर स्मृतीत राहिले असते तर माणूस नक्कीच पागल झाला असता. म्हणून विस्मृती चांगली बाब आहे. मात्र जे की स्मृतीत रहावे म्हणून शालेय जीवनात पाठांतर करतो ते मात्र काही काळ उलटल्यानंतर विसरून जातो हे आपल्यासाठी वाईट बाब आहे. पोपटपंची केलेल्या गोष्टी चिरकाल लक्षात राहत नाही मात्र समजून घेतलेल्या अनेक गोष्टी नेहमीसाठी लक्षात राहते. म्हणून मातृभाषेतील शिक्षण आवश्यक आहे. कारण मातृभाषेतील शिक्षणासाठी पोपटपंची करण्याची गरज राहत नाही. समजून घेऊन अभ्यास करू शकतात. घरातील इतर मंडळी देखील अभ्यासात मदत करू शकतात. काही चुकले असेल तर मार्गदर्शन करू शकतात. मात्र इंग्रजी शाळेतील मुलांच्या बाबतीत उलट घडते. मुलांना शाळा आणि ट्यूशन याच गोष्टीवर अवलंबून रहावे लागते. सहसा ग्रामीण भागातील पालकाना इंग्रजी वाचता येत नाही तर ते मुलांना काय सांगू शकतील. तुझ्या गुरुजींना विचार असे उत्तर आपल्या मुलांना द्यावे लागते. येथूनच मग पालकाचा संवाद कमी होतो. मुले इंग्रजी भाषा खाडखाड बोलतील मात्र मातृभाषेत शिक्षण घेतलेल्या मुलासारखे आपले स्वतः चे मनोगत व्यक्त करू शकणार नाहीत. त्यांना अनेक अडचणी येऊ शकतात. यास शंभरातून एखादा अपवाद असू शकतो. येेत्या काही दिवसात शाळा प्रवेशाचे कार्य चालू होणार आहे. एकदा प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली तर पालकाना नंतर काही करता येत नाही म्हणून पालकानी आपल्या पाल्याना कोठे प्रवेश द्यावा ? इंग्रजी शाळेत की मातृभाषेतील शाळेत याविषयी पालकांचे आजच प्रबोधन होणे आवश्यक आहे. हातातून गेलेली वेळ कधीच परत येत नाही. त्यामुळे पालकानी आपल्या मुलांविषयी डोळसपणे विचार करून निर्णय घ्यावे. अन्यथा आपल्या मुलांचे आयुष्य बरबाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऐकावे जनाचे करावे मनाचे या उक्तीनुसार काम केल्यास आपणास पश्चाताप होणार नाही. पालकानी मातृभाषेचे महत्त्व प्रथम जाणून घ्यावे मगच आपल्या मुलास जेथे योग्य वाटेल तेथे प्रवेश द्यावे. आज मराठी भाषेचे प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज म्हणजे वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणून आजच्या दिवशी संकल्प करू या की आपल्या मुलांना मराठी भाषेतील शाळेतून शिक्षण द्यावे, अशी प्रत्येक पालकांना विनंती

नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
  nagorao26@gmal.com
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत. )

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...