Tuesday, 12 March 2019

मृत्यू : एक अटळ सत्य

मृत्यू

मृत्यूच्या दारात उभा राहून तो परत आला, मृत्यूच्या जबड्यातून डॉक्टरांनी त्याला वाचविला, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, एवढ्या मोठ्या अपघातातून एक वर्षाचे लहान बाळ वाचले अश्या मथळ्याची बातमी वाचतो त्यावेळी त्या त्या नशीबवान व्यक्तीविषयी मनात उत्कंठेची भावना निर्माण होते. नशीब चांगला होता म्हणून तो वाचला असे ही सहज बोलून जातो. त्याचवेळी हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू, रस्ताच्या अपघातात एकाचा मृत्यू, उपचार चालू असताना एकाचा मृत्यू अश्या बातम्या जेंव्हा कानावर येतात त्यावेळी त्याच्या विषयी मनात दुःखाची भावना मनात तयार होते. मृत्यू हे कोणाच्या हातात नाही आणि ते कोणाला सांगून देखील येत नाही. म्हणून मानवाला सर्वात जास्त भीती कोणाची वाटत असेल तर ते मृत्यूची. प्रत्येकाला वाटते की मृत्यू येऊच नये मात्र जन्म घेतलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. त्यात काही बदल करता येत नाही. स्त्री असो पुरुष असो, गरीब असो असो श्रीमंत असो, राजा असो वा रंक असो प्रत्येकांचा एक ना एक दिवस मृत्यू होणार हे निश्चित. जसे जसे जीवन जगण्याचा आनंद कळत जातो तसेतसे जास्तीत जास्त आयुष्य जीवन जगावे असे वाटते. जे सुखात जीवन जगत आहेत त्यांना मरण कधीच येऊ नये असे वाटते तर जे खूपच दुःखात जीवन जगत आहेत ते मृत्यूची याचना करतात. देवा मला लवकर मरण येऊ दे अशी देवाजवळ मागणी करतात. पण ज्याच्या नशिबात जेवढं आयुष्य लिहिलेलं असेल तेवढं आयुष्य जगावेच लागेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस हे दोन वेळा हेलिकॉप्टर दुर्घटनेत बालंबाल वाचले, तेंव्हा सोशल मीडियात त्यांच्या सुदैवाविषयी खूप काही चर्चा झाली. पंजाबमध्ये रावणदहन चालू असताना ते पाहणाऱ्या काही लोकांवरून ट्रेन धावली आणि एका क्षणात मृत्यूचा सडा पडला. लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात 30 सप्टेंबर च्या रात्री भूकंपाच्या धक्यांनी दुसऱ्या दिवसाची सकाळ पूर्ण काळरात्र ठरली. कोणाला काही कळण्याच्या आत होत्याचे नव्हते झाले होते. दुष्मनाच्या तावडीत सापडून देखील एखादा व्यक्ती परत आपल्या देशी येतो म्हणजे हे त्याचं नशीबच म्हणावं लागेल ना ! असे प्रसंग अनेकांच्या जीवनात घडतात. काही जणांचा पुनर्जन्म होतो. त्याना जीवनाचा खरा अर्थ कळलेला असतो. कारण त्या मोठ्या अपघातातून बचावल्यानंतर जे जीवन आज जगत आहे ते एकप्रकारे त्यांना बोनस मिळालेलं असते. शोले चित्रपटात गब्बर सिंग म्हणतो जो डर गया समझो वो मर गया. खरंच आहे हे भिऊन भिऊन जगण्यात काही अर्थ नाही. शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगले पाहिजे. ही वृत्ती आपल्यात निर्माण झाली तर जगण्याची खरी मजा घेऊ शकतोत. राजेश खन्ना आनंद चित्रपटात जी भूमिका केली ती खरोखरच या मृत्यूला घाबरण्याचे करण नसल्याबाबत खूप काही प्रेरणा देऊन जाते. मृत्यूची निश्चित अशी तारीख जर माणसाला कळाली असती तर काय झालं असतं ? अशी कल्पना केली तर खूप काही भन्नाट कल्पना सुचतात मात्र जसजसे मृत्यूची तारीख जवळ येते तशी खूपच काळजी वाढीस लागते आणि चिंता देखील वाढते. म्हणून कधी कधी असे वाटते की, मृत्यूची तारीख माहीत नसते ते खरोखरच आपल्या आयुष्यासाठी खुप चांगले आहे. मृत्यू म्हणजे सर्व काही खल्लास. आजपर्यंत कमावलेले संपत्ती, धन-दौलत, जायदाद सर्व काही इथेच राहते, सोबत आपण काहीच घेऊन जात नाही. जगजेत्ता सिंकदर त्याला कशाचीच कमतरता नव्हती पण जाताना रिकाम्या हाताने गेला. पण नाव मात्र आजपर्यंत कायम आहे. म्हणून जीवनात संपत्ती कमाविण्यापेक्षा नाव कमविणे खूप महत्वाचे आहे. कवी भा. रा. तांबे आपल्या कवितेत म्हणतात की, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय ? आपल्या मृत्यू पश्चात आपले नाव आणि कार्य जगात टिकून ठेवायचे असेल तर काही चांगले कार्य करावं. गरजू लोकांना मदत करावी, दान धर्म करावं, इतरांशी प्रेमाने आणि सहकार्याने वागावे, खूप चांगली व्यक्ती होती असे प्रत्येकाच्या तोंडून निघेल असे वागले पाहिजे. आज आहे उद्या नाही याची नोंद आपल्या मेंदूला देऊन रोजच्या सकाळला प्रणाम करीत काही विधायक कार्य करीत राहिले तर मृत्यू आपल्या दारात आलं तरी त्याचे भय वाटत नाही. म्हणून मृत्यूला घाबरून चालणार नाही उलट त्याचे हसतमुखाने स्वागत करायला हवे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

1 comment:

  1. खरंय! मृत्युला न घाबरता 'आज' जगता आलं पाहिजे.

    ReplyDelete

दिनविशेष माहिती - 31 जानेवारी ( 31 January )

🇮🇳  परमवीर चक्र विजेते वीर मेजर सोमनाथ शर्मा  🇮🇳 मेजर सोमनाथ शर्मा हे भारतीय सैन्याचे पहिले परमवीर चक्र सन्मानित अधिकारी असू...