Sunday, 5 March 2023

होळी ( Holi )

होळीचा रंग

होळी आली रे बघ होळी आली
नाना रंगाची झोळी घेऊन आली

मनातला राग द्वेष काढून टाक
सांगत आला आहे लाल रंग
सकारात्मक विचार करून वाग
बोलतो आहे हिरवा हिरवा रंग
विचारात क्रांती करण्या आली
होळी आली रे बघ होळी आली

सर्वाना आपल्यात सामावून घे
संदेश देत आहे बघ रंग निळा
इतरांच्या दुःखाचे निवारण कर
आदेशाने सांगतोय रंग काळा
वागण्यात बदल करण्या आली
होळी आली रे बघ होळी आली

धैर्याने संकटाला तोंड देत राहा
प्रेरणा देत आहे तुला केसरी रंग
प्रगतीसाठी अविरत चालत राहा
प्रोत्साहित करतोय पिवळा रंग
जगण्याची उर्मी देण्या आली
होळी आली रे बघ होळी आली

- नासा येवतीकर, धर्माबाद 9423625769



🌳 चला मित्रांनो होळी साजरा करु या 🌳


दुर्गुणाची, दुराचाराची होळी करु या 

सद्गुण आणि सदाचाराने झोळी भरू या 

चला मित्रांनो होळी साजरा करु या 


वाईट विचारांच्या टोळी सोडून देऊ या 

चांगल्या विचारांच्या आळीत फिरू या 

चला मित्रांनो होळी साजरा करु या


निराशा अन् दारिद्र्याचे दहन करु या 

निरोगी अन् सुखी जीवनाची आशा करु या 

चला मित्रांनो होळी साजरा करु या


-  नासा येवतीकर, धर्माबाद

9423625769


होळी करू या ......

होळी करू या दुर्गुणाची
होळी करू या संशयाची
होळी करू या कुविचारांची
होळी करू या द्वेषाची
होळी करू या आळसाची
होळी करू या कपट बुद्धीची
होळी करू या वासनेची
होळी करू या लालसेची
होळी करू या मत्सरेची
होळी करू या व्यसनाची
होळी करू या वाईट संगतीची
होळी करू या वाईट बाबींची

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769


लघुकथा - (बे) रंगपंचमी

होळीचा सण आबालापासून वृद्धांपर्यंत सर्वानाच आवडणारा सण. सायंकाळी होळी करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धुलीवंदन म्हणजे एकमेकांना रंग लावणे, त्यालाच रंगपंचमी असे देखील म्हटले जाते. हा रंगाचा खेळ विशेष करून लहान मुलांना खूपच आवडते. मराठी व हिंदी चित्रपटात देखील या सणाला विशेष असे महत्व आहे. शोले चित्रपटातील गब्बरसिंगच्या भारदस्त आवाजातील " कब है होली ? " हे डॉयलॉग रसिक अजूनही विसरू शकत नाही. तसेच सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे हे गाणे होळीच्या दिवशी हमखास ऐकायला मिळते. प्रत्येकांच्या घरात या दिवशी आनंदाचे वातावरण असते. प्रत्येकजण निळ्या, पिवळ्या, लाल गुलाबी रंगाने रंगून गेलेला असतो. घरातील व्यक्तीच ओळखणार नाही अशी अवस्था घरातल्या बालकांची होत असते. अश्या या आनंदीमय वातावरणात रमेशच्या घरात मात्र नीरव शांतता होती. घरात कोणी कोणाला बोलत नव्हते. पीन ड्रॉप सायलेंट होतं. टीव्हीचा आवाज नव्हता की मोबाईलचा आवाज. रमेश पलंगावर आडवा पडला होता आणि त्याची नजर खिडकीतून बाहेर रंग खेळणाऱ्या मुलांवर स्थिरावली होती. मी देखील आज त्यांच्यासोबत रंग खेळू शकलो असतो अशी खंत त्याच्या मनात चालू होतं. मनात असून देखील तो बाहेर मित्रांसोबत रंग खेळायला जाऊ शकत नव्हता कारणही तसेच होतं .........
रमेश नुकतीच दहावीची परीक्षा चांगल्या मार्कने उत्तीर्ण होऊन महाविद्यालयात अकरावीला गेलेला तरुण धडधाकट व गुणी मुलगा. नुकतेच त्याला मिसरूड फुटू लागले होते. पहिली ते दहावीपर्यंतची शाळा जवळ होती म्हणून त्याला ये-जा करण्यासाठी काही त्रास झाला नाही. मात्र अकरावी शिकण्यासाठी त्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता ते घरापासून खूप अंतरावर होते. सायकलवर शाळेला जाण्याची त्याला लाज वाटत होती म्हणून त्याने स्कुटी घेऊन देण्याचा हट्ट लावून धरला. त्याची गरज लक्षात घेऊन त्याच्या बाबाने त्याला स्कुटी घेऊन दिली. तसा त्याचा महाविद्यालयात जाण्याचा प्रश्न सुटला. स्कुटी म्हटल्यावर त्यात पेट्रोल भरावेच लागते, ती काय सायकल सारखी हवेवर चालणारी वस्तू नाही. त्यामुळे बाबाकडून पॉकेटमनी मिळू लागली. खिशात पैसा आणि फिरायला गाडी मिळाल्यामुळे रमेश वेगळ्याच ट्रॅकवर गेला. आवारा गर्दी करणाऱ्या मित्रांची त्याला संगत मिळाली. कॉलेजच्या नावाखाली तो सिनेमा बघणे, बागेत फिरणे असे काम करू लागला. हळूहळू त्याला पॉकेटमनी कमी पडू लागली तसे तो आपल्या आईजवळ हट्ट करू लागला. लाडक्या लेकांचे हट्ट पूर्ण करण्यासाठी त्याची आई लपून छपून त्याला पॉकेटमनी देऊ लागली. त्यामुळे तो अजून सैराट झाला होता. मित्रांसोबत हॉटेल शेअर करण्याचे प्रकार वाढू लागले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तो मित्रांसोबत पार्टी केला आणि दारू पिऊन रात्री बारानंतर घरी आला. दुसऱ्या दिवशी त्याच्या बाबाने त्याला खूप खडे बोल ऐकू घातले. तो गप्प गुमान ऐकत होता. काही दिवस शांततेत गेले पण त्याचे मित्र त्याला शांत बसू देत नव्हते. काही दिवसांनी होळीचा सण येणार होता म्हणून साऱ्या मित्रांनी शेतात जाऊन हा सण साजरा करण्याचा प्लॅन तयार केला. त्यात रमेशचा ही सहभाग होताच. पण त्याच्याजवळ पैसे नव्हते त्यामुळे तो एक पाऊल मागे सरकला होता. मात्र त्याचा जिवलग मित्र सुरेशने त्याच्या वाट्याचे पैसे भरले आणि होळी सण आनंदात व रंगात साजरी करण्याचा प्लॅन तयार केले.घरी काही ही न सांगता मित्रांसोबत रंग खेळून येतो असे सांगून रमेश आपली स्कुटी घेऊन बाहेर पडला. " अरे, सावकाश जा, आज बाहेर वातावरण खराब असते, सांभाळून चालवं " रमेशच्या आईने त्याला जाताना बोलले. तो आपली मान हलवत निघून गेला.
शेतात दहा ते बारा मित्रांची पार्टीची जय्यत तयारी चालू होती. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होते. पाच-सहा किलो मटणाची भाजी शिजत होती. सोबत दारूच्या दोन तीन बाटल्या देखील आणले होते. शिजत असलेल्या मटणाचा वास सर्वत्र पसरला होता. तेवढ्यात बाटलीचे झाकण उघडले गेले, ग्लासात भरले, त्यात कोणी पाणी टाकले, कोणी सोडा टाकले, तर कोणी कोक टाकले एकदाच चिअर्स झालं आणि हॅपी होली म्हणून ग्लास खाली झाले. रमेश देखील त्या पार्टीत सामील झाला. बघता बघता त्यांची दारूची पार्टी वाढू लागली. आता साऱ्यांना चढू लागली. सारेच झिंगु लागले. गाण्यावर नाचू लागले. एकामेकांना रंग लावू लागले. या साऱ्या धुंदीत खाण्याचे त्यांना भान राहिलेच नाही. रंग खेळून खेळून रमेश घरी जाण्यासाठी आपली स्कुटी घेऊन बाहेर पडला. त्याला जागेवरून स्कुटी काढता येत नव्हती, त्याचा तोल जात होता, दारू जरा जास्त झाली होती. तरी ही तो स्कुटी बाहेर काढला आणि मुख्य रस्त्यावर चालवू लागला. त्याचे घर दोन किमी दूर अंतरावर होते. त्या रस्त्यावर अनेक वाहने वेगात जात येत होती. एका चौकात रमेशला कुठं जावे कळलेच नाही त्याने सरळ समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिला आणि बाजूला पडला. ते ट्रक देखील वेगात होते, रमेशचा स्कुटी अचानक त्याच्या पुढे आली, ब्रेक मारेपर्यंत धडक लागली, रमेश स्कुटीवरून खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायावरून ट्रकचे चाक गेले. तो जागेवरच बेशुद्ध पडला. लोकांनी त्याला दवाखान्यात घेऊन गेले. काही वेळाने त्याचे आई बाबा तेथे आले. पाय गेले तर गेले जीव वाचला म्हणत सारे रडत होते. रमेश दोन्ही पाय नसलेला दिव्यांग व्यक्ती झाला होता. पलंग हेच त्याचे विश्व झाले होते. त्याची रंगपंचमी दारुमुळे बेरंग झाली होती. आज होळीच्या निमित्ताने त्याला त्याची चूक जाणवत होती. प्रायश्चित करण्यापलीकडे त्याच्या हातात काहीच नव्हते.

- नासा येवतीकर, धर्माबाद
जि. नांदेड 9423625769

Monday, 27 February 2023

सौ. चंदा मॅडम यांचा निरोप समारंभ Retierment of Chanda Madam

गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आठवणीतल्या चंदा मॅडम


प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनात सेवानिवृत्तीचा दिवस येतोच येतो. नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवेतून कार्यमुक्त होणे प्रत्येक कर्मचाऱ्यांना गरजेचे असते. त्याच नियमानुसार आज जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद येथील प्रभारी मुख्याध्यापिका सौ. चंदा हमीदसाब सय्यद मॅडम या आपली वयाची 58 वर्षे पूर्ण केल्यामुळे सेवानिवृत्त होत आहेत, त्यानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा.....
दिनांक 05 फेब्रुवारी 1965 रोजी हमीदसाब आणि महेबुबबी या गरीब आणि कष्टाळू दाम्पत्याच्या पोटी चंदा मॅडम यांचा उमरी जि. नांदेड येथे जन्म झाला. घरातील वातावरण आर्थिक स्वरूपात अगदी विषम होते. विशेष करून चंदा मॅडम या मुस्लिम धर्मातील असल्याने मुलींना शिकविण्याच्या बाबतीत घरातून खूप विरोध होत होता. पण त्यांची आई महेबूबबी यांनी समाजाचा विरोध पत्करून आपल्या मुलीला म्हणजे चंदा मॅडमला शिकविले. त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण उमरी येथील नुतन विद्यालयात पूर्ण झाले. शिक्षण घेतांना त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. पण सावित्रीबाईचे बाळकडू त्यांना शालेय जीवनात मिळाले त्यामुळे त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा मनाशी घट्ट निर्धार केला होता. दहावीनंतर ते डी. एड. ला प्रवेश घेतला आणि चांगल्या मार्कानी उत्तीर्ण होऊन 13 जानेवारी 1986 रोजी त्या शिक्षिका म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लघुळ ता. बिलोली याठिकाणी रुजू झाल्या. त्यांच्या जीवनातील व कुटुंबासाठी देखील हा एक आनंदाचा व अविस्मरणीय असा क्षण होता. त्या शाळेवरील बंडेवार, कानगुलवार आणि पांचाळ या सहकारी शिक्षकांना ते कधीही विसरू शकत नाहीत. कारण त्यांनी त्यावेळी चंदा मॅडम यांना भरपूर मदत केली आणि प्रोत्साहन देखील दिले. त्यानंतर त्यांची बदली फक्त तीन महिन्यांसाठी केंद्रीय प्राथमिक शाळा रत्नाळी येथे झाली. अल्प कालावधीत येथे सेवा करून त्यांनी अनेक माणसे जोडली. तसे तर चंदा मॅडम यांचा स्वभाव खूपच प्रेमळ आणि गरजूना नेहमी मदत करणे असा आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत माणसे सहज जोडली जात असे. त्यानंतर त्यांची बदली धर्माबाद येथील जिल्हा परिषद हायस्कुलमध्ये झाली. याठिकाणी त्यांनी सलग 20 वर्षे सेवा केली. याठिकाणी केलेले त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे होते. या प्रशालेत शिकणारी मुलं हे गरीब घरातील असतात याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे प्रत्येक गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हवी ती मदत ते करीत असतात. याच शाळेवर असतांना त्यांना नांदेड जिल्हा परिषदेचा जिल्हा गुरूगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत संपन्न झालेल्या विविध क्रीडा स्पर्धा गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक अश्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांनी पहिला क्रमांक देखील मिळविला आहे, हे विशेष. नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी अशोक देवकरे सर, धर्माबाद तालुक्याचे माजी गटशिक्षणाधिकारी इनामदार सर आणि धर्माबाद प्रशाळेचे वर्ग 2 मुख्याध्यापक पठाण सर यांच्या समवेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.  एकाच ठिकाणी सलग वीस वर्षे सेवा केल्यानंतर त्यांची प्रशासकीय बदली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा धानोरा बु. ता. उमरी याठिकाणी झाली. याठिकाणी त्यांनी अत्यंत खडतर आणि कठीण परिस्थितीत तीन वर्षे सेवा केली. त्यानंतर उच्चश्रेणी पदोन्नत मुख्याध्यापक म्हणून त्यांची बदली धर्माबाद तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव येथे बढती मिळाली. मुख्याध्यापक पद जेवढे मानाचे आहे तेवढेच कठीण देखील आहे. याची अनुभूती त्यांना येथे येऊ लागली. या काळात त्यांना अनेक समस्यांना व संकटांना तोंड द्यावे लागले. नऊ वर्षे या पदावर काम केल्यानंतर वाढते वय आणि तब्येतीच्या तक्रारी यामुळे त्यांनी पदोन्नत मुख्याध्यापक पदाचा त्याग करून प्राथमिक शिक्षक म्हणून धर्माबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद याठिकाणी 29/05/2018 मध्ये रुजू झाले. आपल्या उभ्या आयुष्यात त्यांनी एकूण 37 वर्षे सेवा केले आहे. या संपूर्ण कालावधीत त्यांनी माणसे जोडण्याचे काम केले आहे. हळव्या मनाचे आणि मनमिळाऊ स्वभावाचे असलेले चंदा मॅडम कित्येक वेळा तरी शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन मदत केले आहे. कोणत्याही परिस्थितीत शिक्षण थांबवू नका असे ते नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतात. तसेच तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक अमिताभ गुप्ता यांच्या काळात ते धर्माबाद पोलीस स्थानकातील शांतता कमिटीचे सदस्य देखील होते.
त्यांचे पती नवाब हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांना तीन मुले आहेत मोठा मुलगा डॉ. असद हा व्यवसायाने डॉक्टर असून त्यांची पत्नी नशरा खानम ह्या देखील डॉक्टर आहेत. दुसरा मुलगा अहमद नवाब हा एम. सी. ए. केला आहे तर त्यांची पत्नी अमेजा महमंद ह्या रेम्बो हॉस्पिटल हैद्राबाद येथे बालरोग तज्ञ आहेत. तिसरा मुलगा अझर हा डी. फॉर्मसी केला असून त्यांची पत्नी नेहा ही यशवंत विद्यालय, धर्माबाद येथे इंग्रजी शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटले आहे की, घरातला एक पुरुष शिकला तर फक्त तोच शिकतो पण घरातील एक स्त्री शिकली तर सारे घर शिकते. त्याची अनुभूती चंदा मॅडम यांच्या परिवाराकडे पहिल्यानंतर लक्षात येते. सेवानिवृत्तीनंतरच्या भावी जीवनासाठी मनस्वी शुभेच्छा ........!

शब्दांकन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद
9423625769

Monday, 6 February 2023

Valentine's Day


प्रेमी युगुलांसाठी 14 फेब्रुवारी हा दिवस खास असतो. 14 फेब्रुवारीला कपल्स व्हॅलेंटाईन-डे (Valentine's Day) साजरा करतात. व्हॅलेंटाईन-डेच्या आधी एक आठवडा वेगवेगळे डेज साजरे केले जातात. व्हॅलेंटाईन-डेच्या आधी रोज डे (Rose Day), प्रपोज डे (Propose Day), चॉकलेट डे (Chocolate Day), टेडी डे (Teddy Day), प्रॉमिस डे (Propose Day),  हग डे (Hug Day), किस डे (Kiss Day) साजरे केले जातात. 
जाणून घेऊयात या व्हॅलेंटाईन्स वीकबाबत...

रोज डे (Rose Day)  7 फेब्रुवारी  

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

व्हॅलेंटाईन्स वीकची सुरुवात रोज-डेनं होणार आहे. बाजारात लाल, पांढऱ्या, पिवळ्या, गुलाबी रंगाचे गुलाब उपलब्ध असतात. जर तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला गुलाब देऊन तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर तुम्हाला त्या गुलाबाच्या रंगाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. लाल रंगाचे गुलाब हे प्रेमाचे प्रतिक आहे.नारंगी गुलाब हे प्रेमातील ऊर्जा, उत्कटता आणि उत्साह या सर्व गोष्टींचे प्रतिक आहे. पिवाळ्या रंगाचा गुलाब हे मैत्री आणि आनंदाचे प्रतिक आहे.पांढरा गुलाब हे  शुद्धता, निर्दोषता, कृपा आणि नम्रता या गोष्टींचे प्रतिक आहे. 

प्रपोज डे (Propose Day) 8 फेब्रुवारी 

8 फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी तुम्ही एखाद्या व्यक्तिला प्रपोज करुन आपल्या मनातील भावना सांगू शकता. जर तुम्हाला तुमचं प्रेम वेगळ्या अंदाजात व्यक्त करणार असाल तर मग त्या व्यक्तीला एखाद्या सुंदर ठिकाणी घेऊन जाऊन रिंग किंवा गुलाब देऊन तुम्ही प्रपोज करु शकता. 

चॉकलेट डे (Chocolate Day) फेब्रुवारी 9  

'व्हॅलेंटाईन वीक'चा आज तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला व्हाईट चॉकलेट किंवा डार्क चॉकलेट देऊ शकता. 

टेडी डे (Teddy Day) फेब्रुवारी 10 

एखाद्या व्यक्तीबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी टेडी डे साजरा केला जातो. तुम्हाला तुमच्या भावना किंवा प्रेम व्यक्त करायचे असेल तर त्यांना 'टेडी डे' ला टेडी गिफ्ट करावा. टेडी हा प्रेम, काळजी आणि आपुलकीचे प्रतिक आहे.

प्रॉमिस डे (Promise Day) फेब्रुवारी 11

'प्रॉमिस डे' दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला काही वचन देऊ शकता. जेव्हा  कपल्स एकमेकांना वचन देतात, तेव्हा ते या वचनाद्वारे त्यांच्या नात्यामधील प्रामाणिकपणा आणि प्रेम दर्शवतात. 

हग डे(Hug Day) February 12 

12 फेब्रुवारीला ‘हग डे’ साजरा केला जातो. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला तुम्ही मिठी मारुन आपल्या भावना व्यक्त करु शकता. 

किस डे (Kiss Day) February 13 

व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस म्हणजे किस डे. किस डेच्या नंतर व्हॅलेंटाईन-डे साजरा केला जातो. 


Valentine Day - 14 फेब्रुवारी

Tuesday, 31 January 2023

कल्पना चावला ( kalpna chavla )

भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला यांच्या कार्याची माहिती ऐकण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. 
कल्पना चावला


पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन

Wednesday, 18 January 2023

शृंगार मनाचे काव्यसंग्रह प्रकाशनानिमित्ताने कविसंमेलन संपन्न ( Kavisammelan )


उद्धात व व्यापक मानवी शृंगाराची जगावेगळी संकल्पना रेखाटणारा शृंगार मनाचे काव्यसंग्रह - श्रीपाल सबनीस
नांदेड : ( प्रतिनिधी ) धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे हायस्कूलचे मराठी विषयाचे शिक्षक तथा कवी पांडुरंग आडबलवाड लिखित शृंगार मनाचे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध विचारवंत, समीक्षक, साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.  प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी कादंबरीकार देविदास फुलारी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण कवी कथाकार शंकर वाडेवाले यांची उपस्थिती होती. शृंगार मनाचे काव्यसंग्रहाचे प्रकाशन करून श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले संत व महापुरुष हे मानवतावादी विचाराचे असून त्यांनी कोणतीही जात-धर्म न मानता जग कल्याणार्थ आपले आयुष्य झिजविले परंतु जातीनिहाय व्यवस्थेने प्रत्येक महापुरुषांना जातीतच बांधले. कवी पांडुरंग अडबलवाड यांनी आपल्या शृंगार मनाचे काव्यसंग्रहात महापुरुष हे सर्व समावेशक असतात यांची बेरीज केली असून त्यांच्या आदर्श कार्याची उद्धात व्यापक मांडणी,  मानवी शृंगाराची जगावेगळी संकल्पना कवीनी हृदयाशी कवटाळली आहे असे प्रतिपादन केले. 
सुख शांती समाधान मनमंदिरी शृंगार
स्थितप्रज्ञ चारित्र्याचे व्हावे जीवन आगार 
या काव्याचा उल्लेख करून विवेचित केले. या काव्यसंग्रहास श्रीपाल सबनीस यांनी प्रस्तावना दिली असून प्रस्तावितेत कवी पांडुरंग अडबलवाड यांचे आत्मा व परमात्मा यांच्या अंतरंगापर्यंत थेट भेटणारा अव्वल असे सूत्राचा शृंगार मनाचे काव्यसंग्रह मराठी भाषेला प्रदान केल्याचे म्हणत हार्दिक अभिनंदन केले आहे. पुढील प्रकाशित होणाऱ्या काव्यसंग्रहास शुभेच्छा दिल्या आहेत. संस्थेचे सचिव एडवोकेट विश्वनाथराव पाटील बन्नाळीकर यांनी प्रास्ताविक केले तर कवी पांडुरंग अडबलवार यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रकाशन सोहळ्यास अध्यक्ष रामचंद्र पाटील बन्नाळीकर, विश्वस्त श्रीनिवासराव रत्नाळीकर, सहसचिव सुरेश गंजेवार, डॉक्टर कमलकिशोर काकाणी, दिनेश सारडा, इनानी, सौ. ललिता सबनीस, सौ. सरोजा पाटील, सौ. शालिनी अडबलवाड, सौ. मंगला जोशी. मुअ. सन्मुख बेंबरेकर, मुअ. माधव मठपती, ज्येष्ठ पत्रकार जी.पी. मिसाळे, स्तंभलेखक ना.सा.येवतीकर, यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. येथील संगीत शिक्षक माधव वडगावे व बनसोडे यांच्या संचानी हु. गोविंदराव पानसरे गीत व स्वागत गीत गाईले.
काव्यसंग्रह प्रकाशनानंतर ग्रामीण कवी शंकर वाडेवाले यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन घेण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर ग्रामीण कादंबरीकार दिगंबर कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. कवी व्यंकटेश काटकर, ज्ञानोबा जोगदंड,  विजय चव्हाण, प्रल्हाद घोरबांड, तिप्पलवाड एन. एम., बालाजी कळसे, आनंद यडपलवार, मनमोहन कदम, वीरभद्र मिरेवाड, व्यंकट गंदपवाड, बालाजी पेटेकर,  आबा पांचाळ, पांडुरंग कोकुलवार, गोविंद कवळे, प॑डित पाटील बेळीकर, नासा येवतीकर, शंकर कांबळे जिगळेकर, सिद्धार्थ वाघमारे आणि जी. पी. मिसाळे आदींनी आपल्या उत्तम कविता सादर केल्या. या कार्यक्रमाला धर्माबाद शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी पचलिंग आणि अरुण भुसलवाड यांनी केले तर ज्योती पडगलवार यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हुतात्मा पानसरे मेमोरियल स्कुलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Sunday, 15 January 2023

शृंगार मनाचे काव्यसंग्रह ( Shrungar Manache )

[ मंगळवारी 17 जानेवारी रोजी थोर विचारवंत व साहित्यिक मा. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने नासा येवतीकर यांनी करून दिलेला पुस्तक परिचय ]

मानवी मनाचा वेध घेणारा काव्यसंग्रह शृंगार मनाचे


कवी पांडुरंग आडबलवाड हे धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे हायस्कूलमध्ये गेल्या 32 वर्षांपासून मराठी विषयाचे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले आणि वसतिगृहात राहून 'कमवा व शिका' या तत्वानुसार त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. कुटुंबाचे दारिद्र्य संपविण्यासाठी त्यांनी शिक्षकाची नोकरी मिळविली. 
मराठी विषयाचा गाढा अभ्यास असल्याने त्यांच्याकडे भरपूर शब्दसंपत्ती आहे. त्याच बळावर त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक, आध्यात्मिक धार्मिक, नैसर्गिक व चालू घडामोडीवर आशयघन, यमकबद्ध , समाजाभिमुख कविता लिहिल्या आहेत. आजपर्यंत त्यांच्या विविधाऺगी अनेक कविता महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रातून प्रकाशित झाल्या असून अनेक कवितांना राज्यस्तरीय पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. त्यातील सर्वोत्कृष्ट तारा॑कित बक्षीस प्राप्त कविता " शृंगार मनाचे " काव्यसंग्रह स्वरुपात वाचकांसमोर विस्तृत स्वरूपात ठेवली आहे. 
या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्रातील थोर विचारवंत, लेखक, साहित्यिक, 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी प्रस्तावना देऊन काव्यसंग्रहाची उंची वाढविली आहे तर सुप्रसिध्द काद॑बरीकार आणि साहित्यिक देवीदास फुलारी या॑नी त्यांच्या काव्यसंग्रहाची पाठराखण केली आहे. या संग्रहात विजेत्या 85 उत्कृष्ट रचनेचा समावेश करण्यात आला आहे.
प्रत्येकाच्या जीवनात आईचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. फुलात फूल जाईचे, जगात प्रेम आईचे असे म्हटले जाते. कवी पांडुरंग आडबलवाड यांच्या कविता वाचतांना पूज्य साने गुरुजी यांची प्रकर्षाने आठवण येते. कवी सहा महिन्यांचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे त्यांना आईचे सुख-दुःख, आईची तगमग आणि मेहनत जवळून पाहता आले, आईशिवाय त्यांना कुणाचा आधार नव्हता म्हणूनच ते पहिलीच कविता माय माझी मध्ये म्हणतात,

माय माझी वृक्ष । वृक्षांची सावली
एकच माऊली । जगामधी ।।

कवींनी उभ्या आयुष्यात अनेक दुःखाचा सामना केला. अश्या कठीण प्रसंगात आपली जोडीदार भक्कमपणे सोबत उभी होती. म्हणूनच ते ही भक्कम उभे राहू शकले. त्यास्तव ते वाचकांना आयुष्याचा जोडीदार कसा असावा ? याची माहिती सांगताना म्हणतात, 

सुख दुःख आजारात
हवा साथी जोडीदार
वेळ येता आणीबाणी
जीव अर्पिण्या उदार

अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांच्या जाण्याने कवी खूप उदास होतो आणि अशा प्रसंगी कवीच्या मनात ' पोरका पुष्प भुंग्याचा दरबार ' ही रचना जन्मास येते. कवीच्या मनात एक शंका निर्माण होते, 

दीनदुबळ्या पामरा नाही सृष्टीत कुठेही आसरा
स्वामी होऊन कुणी हातात धरली का कासरा

तसेच भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या जाण्याने देखील कवी भावूक होऊन 'हरपले सप्तसुर' कवितेत कवी म्हणतो, 

कंठेश्वर हा जिवात्मा ! जगी जनात अद्भूत!
स्वर्ग भूवरी थाटण्या ! आल्या लता देवदूत!

कवीला शालेय जीवनापासून कविता लिहिण्याचा छंद होता. मध्यंतरीच्या काळात कविता लिहिणे सोडले होते मात्र कोरोना काळात पुन्हा एकदा त्यांची काव्यलेखन प्रतिभा जागी झाली. कविता लेखन करण्यासाठी कोरोना काळात खूप रिकामा वेळ मिळाला. हीच संधी समजून त्यांनी काव्यलेखनास परत एकदा सुरुवात केली आणि सोशल मीडियातील विविध समूहात सहभागी होऊन त्यांना विविध वाड्मय प्रकारात कविता सादरीकरण करण्याची संधी मिळाली. म्हणून ते पुन्हा एकदा कविता करण्याकडे वळले. म्हणूनच ते म्हणतात, 

सुख शांती समाधान
मोद साहित्यात दिसे
देह मना लेखनाचा
छंद जिवा लावी पिसे

कोरोना काळात लोकांना अनेक कडू अनुभव आले. या काळात डॉक्टर जसे देव म्हणून धावून आले तसे पोलीस देखील लोकांच्या मदतीसाठी पांडुरंग म्हणून उभे राहिले. याची प्रचिती कोरोना काळात अनेकांना आली म्हणूनच 'पोलीस' कवितेतून कवी म्हणतो, 

माय बाप लेकरे त्यागुनी
प्रजेप्रती घाळतात घाम
कर्तव्य तत्पर पांडुरंगाला
करू सर्व शतशः प्रणाम !

मुलांवर संस्कार टाकण्याचे महत्वाचे कार्य आई-बाबा करत असतात. लहानपणी त्यांचे बोट धरून चालणारे मूल त्यांनी दाखविलेल्या वाटेवर चालतात. खाण तशी माती या म्हणीनुसार जसे आई-वडील असतात तसेच मुले तयार होतात. अश्याच अर्थाचा जन्मदाता कवितेतून गर्भित असा संदेश देतात.

आई बाबा खरे दाते
शील संस्कार नीतिचे
बोट धरुनी सामर्थ्य
देती संसार मतीचे

त्याहीपुढे चालून संस्कार म्हणजे काय असते ? याचे महत्व सांगताना कवी म्हणतो, 

संस्काराची धनलक्ष्मी
नित्य नांदते ज्या घरी
जन्मा येती हिरे मोती
माता भगीनी  उदरी

बहिणाबाई चौधरी यांची अरे संसार संसार ह्या कवितेची जराशी झलक त्यांच्या कवितेत जाणवते. कवी देखील संसाराची गाऱ्हाणे सांगताना म्हणतो,

अरे संसार संसार
जना द्यावा आधार
होवो किती दुःख पर
दुजा वंदावे साभार

श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री सर्वश्रुत आहे. जीवनात जिवाभावाचे मित्र खूप महत्वाचे आहे. दुःखांच्या प्रसंगी फक्त मित्रच धीर देऊ शकतो, 'भाव मैत्रीचा' या कवितेत कवी म्हणतो,

सुख दुःखी प्रसंगात
मित्र देती जिवाजीव
भाव मैत्रीचा अपार
नसे कशाची उणीव

माणसाचे मन हे खूप चंचल आणि अस्थिर आहे. वाऱ्याप्रमाणे तो सैरभैर धावत असतो. याविषयी कवी म्हणतो,

मन उधाण वाऱ्याचे
स्तब्ध बसेना घरात
सदा धावे बाहेरच
जणू खगांची वरात

काव्यसंग्रहाचे शीर्षक रचना "शृंगार मनाचे" या कवितेतून कवी मानवी मनाचा वेध घेताना आपणांस मुक्ती मिळवायची असेल तर कर्णासारखे दानशूर होण्याचा सल्ला देतात. 

लाभो मुक्ती स्वर्गस्थान
हेच शृंगार मनाचे
कर्ण बळी परी दाता
व्हावे उदात्त गुणांचे

आंतरजातीय विवाह पद्धतीला आजही समाजात मानाचे स्थान नाही. कवीची स्वतःची एकुलती एक मुलगी आंतरजातीय विवाह करून घराबाहेर पडल्यावर कवी मनाला काय दुःख झाले असेल याची प्रचिती 'सुख लाभो तुला' ही कविता वाचतांना येते सोबतच आपल्या लेकीला आशीर्वाद देऊन संकटात सोबत असल्याची देखील ते ग्वाही देतात. 
काव्यसंग्रहातील सर्वच कविता वाचनीय आणि चिंतनीय आहेत. जास्तीत जास्त कविता अष्टाक्षरी काव्यप्रकारात लिहिलेल्या असून आशयघन आणि चिंतनीय आहेत. काव्यसंग्रहातील विठोबा, कौलारू घर, विश्वकर्मा, गुढीपाडवा, शेतकरी, महिला, भ्रूण हत्या, जन्म-मृत्यू, सैनिक,  मराठी राजभाषा, प्रतीकात्मक कविता घड्याळ, बैलगाडी, रेल्वे, पुस्तक, धावते निवास, काठी असे अनमोल, प्रेम काव्य वेड्या मनाचा फकिर, सखे तुझ्या हसण्याने व कोरोना या विषयासह राजे शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, लहुजी साळवे, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, हुतात्मा पानसरे यांच्यावर आधारित प्रासंगिक कविता देखील उत्तम आहेत. संगत प्रकाशनने संग्रहाची बांधणी उत्तम केली असून उच्च दर्जाचे कागद वापरले आहे. संतोष घोंगडे यांनी नावाला अनुसरून सुंदर मुखपृष्ठ सजविले आहे. कवीच्या मनातील काव्य शृंगार अजून असेच फुलत राहो आणि अनेक चांगल्या चांगल्या कविता वाचकांना वाचण्यास मिळो अशी यानिमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा .......!

काव्यसंग्रहाचे नाव - शृंगार मनाचे
कवी - पांडुरंग आडबलवाड
प्रकाशक - संगत प्रकाशन, नांदेड
एकूण पृष्ठे - 136
किंमत 220 ₹

पुस्तक परिचय - 
नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Wednesday, 14 December 2022

World Tea Day ( चहा दिवस )

जगभरातील काही देशात 15 डिसेंबर हा दिवस जागतिक चहा ( World Tea Day ) दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो. चहा विषयी वाचू या मनातील भाव

जागतिक चहा दिवस निमित्ताने

एक कप चहा

प्रिय चहा
चहा या दोन अक्षरी शब्दांत खूप मोठी ताकत आहे. कारण या चहामुळे दोन मनाचे मिलन होते, थोडावेळ एकमेकांना बोलता येते, कितीही घाईत असलो तरी चहा घेण्यासाठी थोडा वेळ विश्रांती नक्की मिळते. चहाला इंग्रजीत एकाक्षरी शब्द म्हणजे टी असे म्हणतात तर हिंदीत चाय म्हटले जाते. तसे राजेश खन्नावर चित्रित केलेलं एक गाणं सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, शायद मेरी शादी का खयाल दिल में आया है, इसिलिए मम्मीने मेरे तुमहें चाय पे बुलाया है। आज ही प्रथा कायम आहे की, मुलगी बघायच्या कार्यक्रमात पोहे खाणे झाल्यानंतर नवरी मुलगी हातात चहाचा ट्रे घेऊन येते आणि आपला परिचय देते. बऱ्याच कामासाठी चहा हे एक निमित्त म्हणून त्याचा वापर केला जातो. एखाद्या ठिकाणी काही सौदा किंवा व्यापार झाला म्हणजे लगेच तोंड गोड करण्याची प्रथा असते. चहा हे एक गोड पेय, त्यामुळे सर्वजण चहा घेतात. दोन मित्र बाजारात खूप दिवसांनी असो वा काही तासानंतर असो त्यांची भेट झाली की, पहिलं वाक्य, चल एक कप चहा घेऊ. चहा पिता पिता मग खूप गप्पाटप्पा, अनेक विषयांवर चर्चा होते. याच दरम्यान गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गप्पा रंगतात. म्हणून काहीजण खास करून टी पार्टी आयोजित करतात, चाय पे चर्चा करण्यासाठी. म्हणजे येथे ही चहा हे एक निमित्त असते. तेच जर मित्राने चहा पिऊ असं म्हटलं नाही तर तो चारचौघात सांगतो त्याने मला साधं चहा सुद्धा विचारलं नाही. घरी नातलग किंवा पाहुणे आले की चहा विचारावं लागते आणि चहा पाजवावे लागते. नाहीतर समाजात साधी चहा देखील दिली नाही म्हणून आपली खूप बदनामी होते. घरी आलेल्या नातलगांची सरबराई करण्याचे प्रमुख साधन म्हणजे चहा. सकाळ व सायंकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात चहानेच होते. लहानपणी कपबशीचा आवाज आला की जाग यायची, कधीकधी चहाचा वास देखील नाकात जायचं आणि मग जाग यायचं. पावसात भिजून आल्यावर आणि हिवाळ्याच्या थंडीत गरम चहा खूप चांगले वाटायचे. चहामुळे तरतरी येते, सर्व काही योग्य होते, असे मनाला वाटते. 
दुधाची चहा आणि काळी चहा असे चहाचे प्रामुख्याने दोन प्रकार मोडतात. दुधाच्या चहात साखर, चहापत्ती आणि दूध एकत्रित गरम केल्या जाते तर काळी चहा म्हणजे डिकाशन चहा यात दूध नसते. पण ही चहा दुधाच्या चहापेक्षा चांगली असते. या डिकाशन चहात आद्रक, दालचिनी आणि तुळशीची पाने टाकल्यास ते खूप चांगले वाटतेे. लहान मुलांनी शक्यतो चहा पिणे टाळावे असे घरातील वडील मंडळी म्हणतात मात्र लहान मुलांना दुधापेक्षा चहा पिणे खूप आवडते. सकाळचा चहा आणि पेपर याचे अतूट नाते आहे. चहाविना पेपर वाचावे वाटत नाही आणि पेपरविना चहा प्यावे वाटत नाही. चहा आणि बिस्कीट याचे नाते देखील असेच आहे. काही मंडळी चहासोबत पाव म्हणजे ब्रेड किंवा खारी असे पदार्थ देखील खातात. जेव्हा खूप काम करून जरासा थकवा जाणवायला होते त्यावेळी चहा पिण्याची ईच्छा निर्माण होते. माणसाला स्वयंपाकातले कोणते पदार्थ तयार करता येवो किंवा न येवो चहा मात्र करता आले पाहिजे. नाही तर मित्रांमध्ये आपले हसे होते आणि मित्र म्हणतात, तुला, साधी चहा करता येत नाही. चहा करता आली तर त्याचे अनेक फायदे होतात. स्वयंपाक शिकण्याची पहिली पायरी म्हणजे चहा करता येणे. 
चहाचा शोध कसा लागला असेल ? हे एक संशोधन करण्याची बाब आहे. एक व्यक्ती झाडाखाली पाणी उकळत ठेवला होता तेव्हा वरून झाडाचे एक पान त्या उकळत्या पानात पडले तेव्हा त्या पाण्याला त्या पानाचा वास आला. त्याने ते पिऊन बघितले तर त्याचा थकवा दूर झाल्याचे जाणवले. अश्याप्रकारे चहाची सुरुवात झाली. भारतातल्या लोकांना हे चहा वगैरे काही माहीत नव्हते. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. अगदी सुरुवातीला सकाळी सकाळी इंग्रज लोकं भारतीय लोकांच्या घरापुढे या पानांची पुडी अगदी मोफत टाकू लागले. भारतीयांना त्या पानांची चव कळाली आणि जरा गोडी लागली. मग तेच पाने फुकट ऐवजी काही पैसे देऊन घ्यावे लागू लागली. यापद्धतीने चहाचा प्रचार व प्रसार वाढला. आज चहा पत्तीचे अनेक कंपनी चहा विक्री करतात. पूर्वी चहा पत्ती म्हणजे सुपर डस्ट एवढंच माहीत होतं. पण आज चहाचे अनेक कंपन्यामार्फत विक्री होत असून मोठ्या प्रमाणावर उत्पादन देखील करण्यात येत आहे. यातून भरपूर पैसा देखील मिळत आहे. साध्या चहाच्या दुकानावरून अनेक लोकांची प्रगती झाली आहे. यात देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. महाराष्ट्रात येवले अमृततुल्य चहा प्रत्येक जिल्ह्यात स्थान मिळविले आहे. कमी भांडवलावर चहाची विक्री कोठेही करता येणे अगदी सोपे आहे. रेल्वेत अनेक मंडळी सकाळी सकाळी चहा विकून आपल्या संसाराला चांगल्याप्रगती पथावर नेले आहेत. बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारातील मुख्य ठिकाण, थिएटर, मार्केट, शाळा, विद्यालये, महाविद्यालयाच्या परिसरात चहाची विक्री करून आर्थिक स्थिती मजबूत करता येऊ शकते. म्हणूनच वर म्हटले आहे, साधी चहा करता येत नाही, तुला. ते जर जमलं तर आपण सुखी जीवन जगू शकतो. चहाच्या व्यवसायावर आज लाखो लोकं जगत आहेत, कोणी चहाची पत्ती विकून तर कोणी गरमागरम चहा विकून. काहीजण म्हणतात चहा शरीरासाठी घातक आहे पण लाखो बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आपला एक कप चहा काही विघ्नसंतोषी ठरणार नाही. म्हणून जास्त विचार करू नका, चला एक कप चहा घेऊ या ....!

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...